वॅग्नर सेनेनं उडवलेली धमाल. लेख क्र. १
२३ जून २०२३ रोजी वॅग्नर सेनेनं रशियाच्या नैऋत्येला युक्रेनच्या हद्दीवरच्या Rostov-on-Don या गावातल्या रशियन सैन्याच्या ठाण्याच्या ताबा घेतला. ते ठाणं म्हणजे रशियन सैन्याचं विभागीय मुख्यालय होतं. वॅग्नर ग्रुप, वॅग्नर सेना हे एक खाजगी सैन्य आहे.
वॅग्नर सेनेचे प्रमुख येवजेनी प्रिगोझीन यांनी जाहीर केलं की त्यांचं सैन्य रशियाची राजधानी मॉस्कोच्या दिशेनं कूच करणार आहे. एका खाजगी सेनेनं एका देशाची राजधानी ताब्यात घ्यायचं जाहीर केलं होतं.
वॅग्नर कोणत्याही देशाचं सैन्य नाही. या सैन्यात नेमके किती सैनिक आहेत माहित नाही पण ३० ते ५० हजार सैनिक असतील असा अंदाज आहे. या सैन्यामधे रशियनांबरोबरच जगातल्या इतर देशातले सैनिकही सामिल आहेत. हल्ली क्रिकेट मॅचमधे राज्य किंवा देशाची टीम नसते. टीम खाजगी असते आणि तिच्यात जगातल्या कुठल्याही देशातले खेळाडू भरती केलेले असतात, लिलाव लावून ते खेळाडू खरेदी केलेले असतात. कंत्राटी खेळाडू. इतक्या मॅचेस खेळण्यासाठी इतके इतके पैसे. मॅच संपली की खेळाडू आपापल्या घरी परत. तशीच ही वॅग्नर सेना आहे.
रशियानं २०२२ च्या फेब्रुवारीमधे युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर वॅग्नर सेनेनं रशियाच्या १.५ लाख सैन्याच्या दिमतीला युक्रेनमधे प्रवेश केला होता.
मॉस्कोवर हल्ला करण्याचं कारण काय?सेनेचे प्रमुख प्रिगोझीन यांनी जाहीर केलं की त्यांच्या वॅग्नर सेनेवर रशियन सैन्यानं पाठीमागून हल्ला केला, त्यात वॅग्नर सेनेचे १००० सैनिक मेले. प्रिगोझीन यांनी केलेल्या वक्तव्यात रशियन सरकारमधल्या आणि रशियन सेनेतल्या भ्रष्टाचार व अकार्यक्षमतेवर टीका केली.
रोस्टोव ठाणं ताब्यात घेतल्यावर रशियात खळबळ माजली. मॉस्कोमधे अनेकांनी वॅग्नर सेनेचं स्वागत केलं. मॉस्कोच्या दिशेनं निघालेल्या रणगाड्यावर रशियन सैन्याच्या हेलिकॉप्टरनी हल्ला केला. या साऱ्या बातम्या जगभरच्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्यावर अभ्यासकांनी या घटनेचं वर्णन रशियातलं बंड अशा शब्दात केलं.
वॅग्नर सेनेच्या बंडाची बातमी पसरली, त्यावर रशियन सरकारनं प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पुतीन ही बातमी येताच दक्षिणेत दाजस्तान या विभागात गेले. तिथं सभोवताली संरक्षकांचं कवच घेऊन ते लोकांमधे मिसळले. रशियाचा अभ्यास करणाऱ्या माणसांनी या घटनेचं वर्णन ‘पुतीन घाबरून मॉस्कोतून पळाले’ अशा शब्दात केलं. पुतीन यांचे चरित्रकार म्हणतात की पुतीन हे घाबरट आहेत, त्यांना सतत स्वतःच्या जिवाची भीती असते, कोणी तरी घात करेल अशा भीतीनं ग्रासलेले असतात. वॅग्नर सैन्य मॉस्कोत पोचेल आणि आपली राजवट उलथवेल अशी भीती पुतीनना वाटली असं निरीक्षकानी म्हटलं.
दुसऱ्या दिवशी पुतीन यांनी पत्रक काढून वॅग्नर सेनेवर टीका केली, सेनेला तंबी दिली. सेनेनं केलेला उद्योग हा देशद्रोह असल्यानं त्याना देशद्रोह्याना दिली जाते तीच शिक्षा दिली जाईल असं पुतीन यानी जाहीर केलं.इथून पुढं वॅग्नर सेनेला रशियन सरकार, सैन्य कवडीचीही मदत करणार नाही असं पुतीन म्हणाले.
या वक्तव्यानं एक गंमत केली. वॅग्नर सेना आपणच पोसली होती हे पुतीननी मान्य केलं. रशिया वॅग्नर सेना या खाजगी सेनेला पोसत होती हे जाहीर झालं. फेब्रुवारी २२ ते मे २०२३ या काळात रशियन सरकारनं वॅग्नरला १ अब्ज डॉलर दिले होते, पैसा आणि शस्त्रसामग्रीच्या रुपात.
त्या दिवसापर्यंत वॅग्नर सेनेचा आणि आपला संबंध नाही असं पुतीन म्हणत असत. वॅग्नर सेनेनं अत्याचार केला, बलात्कार केले, नागरिकांचा छळ केला असे आरोप झाले. युनायटेड नेशन्सनही वॅग्नर सेनेवर टीका करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी गेली होती. तेव्हां रशियानं हात झटकले होते, आपला त्यांच्याशी संबंध नाही असं म्हटलं होतं.
तिसऱ्या दिवशी चित्र एकदम पालटलं. रशिया-युक्रेनच्या शेजारच्या बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेंको यांनी मध्यस्थी केली. ते प्रिगोझीनना भेटले. त्यानंतर प्रिगोझीननी पत्रक काढून जाहीर केलं की आपण बंड केलंच नव्हतं, आपल्याला पुतीन यांची राजवट उलथवायची नव्हती. आपला राग रशियन सेनापतींवर होता, सेनापतीनी आपल्याला दगा दिल्यानं आपल्याला ठाणं ताब्यात घेणं, मॉस्कोकडं कूच करणं हे उद्योग करावे लागले. याच पत्रकात रशियन सरकार भ्रष्ट आहे आणि अकार्यक्षम आहे हा आरोप करायला मात्र प्रिगोझीन विसरले नाहीत.
मॉस्कोच्या दिशेनं निघालेलेले रणगाडे थांबले. बंडोबा थंडोबा झाले.
हल्ला करायले निघालेल्या प्रिगोझीननी शेपटी कां घातली? माघार कां घेतली? हे लुकाशेंको मधेच कसे घुसले? असे प्रश्न निर्माण झाले.
लुकाशेंको हे रशियाचे मांडलीक आहेत. बेलारूसमधे त्यांच्या विरोधात आंदोलन चाललंय. लुकाशेंको कमालीचे भ्रष्ट आणि हुकूमशहा आहेत असं बेलारूसमधले लोक म्हणतात. विरोध करणारी माणसं लुकाशेंकोनी तुरुंगात तरी डांबलीयत किवा त्यांना देशोधडीला तरी लावलंय. बेलारूसची अर्थव्यवस्थाही कोसळली आहे. रशियाकडून कवडीमोल भावानं मिळणाऱ्या तेलावर बेलारूस चाललंय. रशियाकडनं मिळालेलं स्वस्त तेल इतर देशांना महागात विकून लुकाशेंको कारभार चालवत आहेत. सर्वस्वी रशियाच्या मदतीवर बेलारूस अवलंबून आहे. लुकाशेंकोंना होणारा विरोध रशियन हस्तक मोडून काढत असतात. थोडक्यात असं की लुकाशेंको हे पुतीन यांच्या ताटाखालचं मांजर आहेत.
त्यामुळंच लुकाशेंको यांनी पुतीनच्या वतीनं मध्यस्थी केली हे उघड होतंय.
लुकाशेंको आणि प्रिगोझीन यांच्यात काय करार झाला, काय बोलणी झाली?
प्रिगोझीन यांना कोणतं गाजर पुतीननी दाखवलं?
पन्नास हजार कंत्राटी सैन्याच्या बळावर रशियन सैन्याला नमवता येणं तर अशक्यच आहे. केवळ भाडोत्री सैन्याच्या बळावर रशियन सरकार काबीज करणंही अशक्य आहे. पुतीन यांची सैन्य, सरकार, समाज यावर पकड आहे. ती भले दहशतीच्या बळावर असेल, पण आहे. रणगाडे मॉस्कोत नेऊन ती पकड ढिली करणं शक्य नाही. पुतीन यांच्यासोबत असलेल्या लोकांना आपल्या बाजूनं करण्याचा अनुभव आणि कसब प्रिगोझीन यांच्याकडं नाही. त्यामुळं प्रिगोझीन पुतीन यांचं सरकार उलथवू शकत नाहीत हे नक्की.
फार तर फार रशियन सैन्याचं सेनापतीपद प्रिगोझीनना मिळू शकेल. ते देण्याचं पुतीननी कबूल केलं काय? सरकारात मंत्रीपद देऊ केलं काय? की पुतीननी कारवाई करायची दिलेली तंबी परिणामकारक ठरून प्रिगोझीननी माघार घेतली? माघार ही प्रिगोझीन यांची पुढल्या प्रभावी चालीची पूर्व तयारी आहे काय? की माघारीमुळं मिळालेल्या उसंतीचा उपयोग करून पुतीन प्रिमोझीनना संपवून आपण कसे प्रभावी राजकारणी आहोत ते सिद्ध करतील?
रशियाला कारस्थानांच्या राजकारणाचा इतिहास आहे. लोकशाही वाटेनं सत्ता उलथवण्याची सवय रशियाला नाही. त्यामुळं राज्यकर्ता कायम भीती, असुरक्षितता, शंका यानं ग्रासलेला असतो. घडलेली घटना पुतीन यांना हादरवणारी होती येवढं खरं.
तर पुतीनना हादरवून टाकणारी ही वॅग्नर सेना हे काय प्रकरण आहे?
पुढल्या लेखात पाहूया.
❖