शिरीष दाते भारतात? शक्य नाही.

शिरीष दाते भारतात? शक्य नाही.

“ गेल्या साडेतीन वर्षात तुम्ही अमेरिकेन जनतेसमोर खोटं बोललात त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो कां?” एका पत्रकारानं विचारलं.

व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत सामान्यपणे समर्थक पत्रकार सुखकारक प्रश्न विचारतात याची सवय असलेले प्रे. डोनल्ड ट्रंप गोंधळले. त्यांनी विचारलं “ कशा बद्दल?”

“ खोटं बोललात, जी जी बेईमानी (डिसॉनेस्टी) केलीत त्या बद्दल” पत्रकार म्हणाला.

“ कोणी ते केलं?” ट्रंपनी विचारलं.

“ तुम्ही.” पत्रकार म्हणाला.

प्रश्न विचारणारा माणूस कोण आहे ते ढुंढाळण्याच्या प्रयत्नात ट्रंप होते. या पूर्वी अनेक वेळा त्यांनी या पत्रकाराला प्रश्न विचारू दिला नव्हता. पण या वेळी बेसावधपणे त्यांनी पत्रकाराला प्रश्न विचारू दिला.

 या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर न देता ट्रंप यांनी लक्ष दुसऱ्या पत्रकाराकडं वळवलं.

वॉशिंग्टन पोस्टनं ट्रंप प्रेसिडेंट झाल्यापासून किती वेळा खोटं बोलले याची तारीखवार नोंद ठेवली आहे. त्या नोंदीनुसार खोट्या वक्तव्यांचा आकडा २० हजार पार करून जातो.  

बराक ओबामा अमेरिकेत जन्मले नाहीत असं ट्रंप  म्हणाले, म्हणतात. ओबामा यांचं जन्म सर्टिफिकेट हज्जारो ठिकाणी अधिकृत रीत्या नोंदलं गेलं असलं तरीही ट्रंप त्यांच्या मतावर ठाम आहेत. आता तर ते कमला हॅरिस याही अमेरिकेत जन्मलेल्या नाहीत असं पसरवत आहेत.

ट्रंप यांचा खोटेपणा पेपर  सतत उघडा पाडत होते पण कोणी पत्रकारानं कॅमेऱ्यासमोर त्यांना बोचरा प्रश्न विचारला नव्हता. तो उद्योग शिरीष दाते यांनी केला. 

शिरीष दाते पुण्यात जन्मले. वयाच्या तिसऱ्या वर्षी आई वडिलांसोबत अमेरिकेत स्थलांतरीत झाले. स्टॅनफर्डमधे त्यांनी राज्यशास्त्र विषयाची पदवी घेतली. नंतर ते गेली पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ पत्रकारी करतात, सध्या ते हफिंग्टन पोस्टचे व्हाईट हाऊस प्रतिनिधी आहेत.

कशी गंमत असते पहा.  एकाद्याला विचारायचं  की “ तुम्ही पत्नीला धोपटणं बंद केलंत  कां?”.

समजा त्यानं उत्तर दिलं “नाही” तर तो पत्नीला धोपटतो असं सिद्ध होतं.

समजा त्या व्यक्तीनं उत्तर दिलं “ होय” तर त्याचा अर्थ होतो की तो पत्नीला धोपटत होता.

 काहीही उत्तर दिलं तरी ती व्यक्ती संकटात असते. 

नेमक्या याच संकटात प्रे. ट्रंप सापडले.

फक्त इथे लोचा असा आहे की व्यक्ती खरोखरच पत्नीला धोपटत होती याची जाहीर नोंद आहे, ट्रंप यांचा खोटेपणा रीतसर नोंदला गेला आहे. 

प्रेसिडेंटांच्या चिंध्या करण्यासाठी अमेरिकेतली पत्रकारी प्रसिद्धच आहे.

खोटं बोलण्यातले उस्ताद रिचर्ड निक्सन लोकांसमोर जात तेव्हां पत्रकार आणि सामान्य जनताही त्याना तोंडावर सांगत असे की ते खोटं बोलतात. अनेक पत्रकार परिषदांची क्लिप्स तशी साक्ष देतील. निक्सन यांचे बेकायदेशीर उद्योग अमेरिकेतल्या मोठ्ठ्या पेपरांनी वेशीवर टांगले, पेंटॅगॉन पेपर्स प्रसिद्ध केले, वॉटरगेट घरफोडी चव्हाट्यावर आणली आणि हा उद्योग एक दोन दिवस नाही तर चारेक वर्षँ पेपरांनी केला. परिणामी रेकॉर्ड बहुमतानं निवडून आलेल्या निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला.

 निक्सन यांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा केला तेव्हां एका गायकवृंदाला गाणी गायला बोलावलं होतं. गाणाऱ्या तरूण मुलींपैकी एकीनं एक कापडी फलक काढून झळकवला,  त्यावर निक्सननी वियेतनाममधलं अमानवी हत्याकांड थांबवावं असा मजकूर लिहिला होता.पोलिसांनी तो फलक हिसकून घेतला. पण त्या घटनेचा  व्हिडियो रेकॉर्ड शिल्लक राहिला.  

जेफ सेशन्स, विल्यम बार ही राजकीय माणसं अमेरिकेच्या कायदे मंत्री पदावर बसायला निघाली होती तेव्हां पेपरांनी त्यांची कारकीर्द चव्हाट्यावर आणली. केवाना या वादग्रसस्त वकीलाला ट्रंप जेव्हां सर्वोच्च न्यायालयात बसवायला निघाले तेव्हां पेपरांनी त्यांचा सगळा इतिहास चव्हाट्यावर मांडला, त्यांनी एका स्त्रीशी कशी गैरवर्तणुक केली होती याचा पाढा पुराव्यानिशी वाचला.

एक न्यायाधीश पोलिसांशी संगनमत करून शेकडो मुलांना विनाकारण किंवा अगदीच किरकोळ कारणासाठी तुरुंगात पाठवत असे. कारण अमेरिकेतली तुरुंगव्यवस्था खाजगी आहे, तिथं तुरुंगातली माणसं ही हॉटेलातली गिऱ्हाईकं आहेत असं मानलं जातं. तुरुंगात जेवढे जास्त कैदी तेवढं तुरुंगाचं उत्पन्न जास्त. त्या न्यायाधिशानं करोडो डॉलर कमवले. एका आईनं तक्रार केली. पोलिसांनी ती दडपली. हे प्रकरण पेपरांनी लावून धरलं. नेटानं सर्व पुरावे गोळा करून पेपरात छापले. नाईलाज झाला. तो न्यायाधीस कोर्टात आरोपी म्हणून उभा राहिला. दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा झाली.

अमेरिकेत नागरीक राज्यघटना आणि कायद्याला मान देतात. कायद्यानं वागणाऱ्या माणसाबद्दल आदर बाळगतात. म्हणजे हा आदर त्याच्या कायदेशीर वागण्याला असतो, त्या व्यक्तीला नव्हे. व्यक्तीपूजा तिथं मान्य नाही. व्यक्ती बंडल असेल तर तिच्यावर टीकेचा भडीमार होतो, इतका की त्या व्यक्तीला पद सोडायची पाळी येते.

इथे? भारतात?

विविध पदांवर आणि संस्थांमधे योग्य आणि कर्तव्य पालन करणारी माणसंही आहेत. पण पदांवर बसलेली गुन्हेगार सत्ता पिपासू माणसं वाढलीत. न्यायाच्या आणि कायद्याच्या कसोट्या पाळून निकाल देणारे न्यायाधीश आहेत आणि त्या कसोट्यांची ऐशी की तैशी करणारे वाढलेत. गुन्ह्यांचा भरपूर रेकॉर्ड असणारी माणसं सरकार, नोकरशाही, न्यायालयांत पोचली आहेत. त्यांना जाब विचारायची भारतीयांची तयारी नाही. लोकांनी नांगी तरी टाकलीय किंवा लोकांना जे चाललंय त्यात वावगं आहे असंच वाटत नाहीये.

प्रतीकात्मक रूपात वकील प्रशांत भूषण सरकार आणि न्यायव्यवस्थेचं रूप उघडं करू निघाले म्हणून त्यांनाच शिक्षा करायला न्यायालय पुढं सरसावलंय.  सरकारचा बचाव करण्याचा न्यायालयाचा बेकायदेशीर आणि अनैतिक प्रयत्न भूषण न्यायालयातच मांडू पहातात याचा राग न्यायालयाला आला आहे.

पद, वय, श्रीमंती, जात या कसोटीवर माणसांना आदर द्यायला भारतीय माणूस बांधलेला आहे. आदर आपल्या कर्तृत्वानं मिळवायचा असतो असं फक्त पाठ्यपुस्तकात सांगितलं जातं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं वचन सतत तोंडी बाळगणारी माणसं करणी आणि कथनी यात तफावत असलेल्यांनाच वंदन करतांना दिसतात. गुन्हे केलेल्या माणसांना हा देश मोठमोठ्या पदांवर आणि मखरांत नेऊन बसवतो. गुन्हे करणारे लोक पोलीस होतात,  सत्तेपुढं लाळ गाळणारेही  लोक सेनाधिकारी होतात. न्यायाधीशपदाची खुर्ची व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठीच असते असं मानणारी माणसं इथं खुश्शाल काळे डगले घालून निकालपत्रं ओकतात.पोलीस, सैन्यदल, मंत्रीमंडळ, न्यायालय, शैक्षणिक संस्था इत्यादी ठिकाणची प्रत्येक व्यक्ती आदरणीयच असते, तिच्याबद्दल काहीही बोलायचं नाही, तिला प्रश्न विचारायचे नाही, तिची समीक्षा करायची नाही असं भारतीय माणसाला वाटतं. कोणी बोललं तर तो देशद्रोही, सैन्यद्रोही, धर्मद्रोही वगैरे ठरतो. सत्तेतला माणूस असो की न्यायालयातला, त्याचं चुकत असतं हे एक तर भारतीय माणसाला कळेनासं झालंय किंवा तसं मुळातच त्याच्या डोक्यात येत नाही.

आधीच परंपरागत दांभिकता आणि लाचारीकडं ओढ, त्यात  व्हॉट्सअप या शिक्षण व्यवस्थेतून देण्यात आलेलं ज्ञान. 

शिरीष दाते यांचं उदाहरण समोर आलं की लोक म्हणतात ‘ तो अमेरिका आहे हा भारत आहे आमचा भारत हा असा आहे. तिथं काय चालतं त्याची अपेक्षा भारताकडून करणं फोल आहे.’

तेही खरंच आहे म्हणा.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *