शुक्रवार/ ॲनॉटॉमी: पडद्यावरची कथा
पुणे फेस्टिवलमधे ॲनॉटॉमी ऑफ ए फॉल पडद्यावर आला. काही दिवस आधी तो मुंबईच्या मामी फेस्टिवलमधेही दिसला होता.
दोन माणसांच्या जीवनातला एक कालखंड या चित्रपटात आहे. सॅमी आणि सँड्रा हे लेखक जोडपं आहे. दोघं लंडनमधे एकमेकाला भेटली, लग्न केलं, लंडनमधेच वास्तव्य करून होते. सॅमी एका पुस्तकासाठी झगडत होता, जमत नव्हतं. निवांत जागा आणि वेळ मिळावा यासाठी तो लंडनमधली नोकरी सोडून आपल्या मायदेशात, स्वित्झर्लंडमधे पोचला. एक शॅले घेतलं, त्याची डागडुजी आणि सजावट केली. त्यावर पैसे खर्च केले.
सँड्रा ही मूळ जर्मन आहे. पण सॅमीसाठी ती स्वित्झर्लंडमधे आलीय. सॅमीची भाषा फ्रेंच, सँड्राची जर्मन. तडजोड म्हणून दोघं इंग्रजीत बोलतात.
डॅनियल या त्यांच्या मुलाची दृष्टी अपघातात अधू झालीय. हा अपघात आपल्यामुळं झाला असा गंड सॅमला असतो. कर्ज झालंय, पुस्तक प्रसिद्ध होत नाहीये, मुलाकडंही लक्ष द्यावं लागतंय, पत्नी मात्र तिचा वेळ बरोबर मॅनेज करून लिहीत सुटलीय. सॅंड्राची पुस्तकं प्रसिद्द होतात, ती वाचकप्रीय आहे. याचा एक काँप्लेक्स सॅमला आहे. तो एक मानसिक आजार आहे. त्यासाठी तो गोळ्या घेतो. पण त्यामुळं त्याच्या लिखाणात अडथळे येतात. तो गोळ्या बंद करतो, त्याचा दुष्परिणाम होतो, तो दारू पीत सुटतो.
एके दिवशी तो घराच्या माडीवरून पडून मरतो.
सँड्रावर खुनाचा आरोप ठेवला जातो. खटला होतो. डॅनियलच्या साक्षीमुळं सँड्राची सुटका होते.
खटल्याचा काही आठवड्यांचा काळ आणि थोडासा फ्लॅश बॅक चित्रपटात आहे. कथेसारखं कथानकाचं रूप आहे. थोड्या काळात, दोन व्यक्तीमधील तणाव कथानकात आहेत. पात्रं मर्यादित, असलेल्या पात्रांचं मागलं आयुष्यही नाही. ती एक कथा होते, कादंबरी होत नाही.
एक कथा. कथेचा घाट. कथा सावकाश उलगडत असते. कथेला खूप पदर असतात, कंगोरे असतात. काळ मर्यादित. कथा पात्रांच्या आत उतरते.शांतपणे वेळ काढून, विचार करत कथा वाचावी लागते.
सॅमचा मनोगंड. आपणच मुलाकडं लक्ष देतो, आपली पत्नी मात्र स्वतःचा बहुतेक वेळ लिखाणावर खर्च करते. ती यशस्वी होते, मी यशस्वी होत नाही. पत्नीनं एका पुरुषाशी मजा केलीय. ती म्हणते एकाच पुरुषाशी मजा केलीय पण सॅमला वाटतं की ज्या अर्थी ती एकाबद्दल कबूल आहे याचा अर्थ तिचे अनेकांशी संबंध असणार. पत्नीचे एका तरूण मुलीशीही संबंध आहेत. पत्नी ते कबूलही करते. समलिंगी आकर्षण, भिन्नलिंगी आकर्षणही. हे सारं सॅमला दाचतंय.
सँड्रा म्हणते की तिला अशा प्रकारे संबंध ठेवण्यात काही गैर वाटत नाही, कधे मधेच तसं घडतं, परिस्थितीच्या तणावात घडतं. परंतू ती तिच्या नवऱ्याशी चांगले संबंध ठेवून आहे, ती नवऱ्याशी उत्तम शारीरीक संबंध ठेवून आहे. नवरा म्हणतो की ती चांगले शारीरीक संबंध ठेवत नाही.शारिरीक आणि मानसीक दोन्ही बाबतीत सँड्रा अंतरावर आहे, पुरेशी एकरूप नाही असं त्याचं मत. या एकरूपतेबद्दल सँड्राचे मतभेद आहेत. ते खूप छटांचे आहेत, व्यक्त करणं कठीण आहे; शिवाय भाषेचीही अडचण; ती जर्मन भाषेत वाढलेली आहे, तिचं म्हणणं नीट मांडायला कधी जर्मन भाषा अपुरी पडते तर कधी इंग्रजी अपुरी पडते.
मामला अशा रीतीनं काँप्लिकेटेड होत रहातो. प्रेम आहे परंतू ते प्रेम १०० टक्केच असायचं कारण काय?
कोर्टात आरोप असा की तिनं नवऱ्याचा खून केलाय. तिनं लिहिलेल्या एका कादंबरीत जवळपास अशाच स्थितीतल्या एका स्त्रीनं नवऱ्याचा खून झालेला दाखवलाय. कोर्टात तो एक आनुषंगिक पुरावा म्हणून मांडला जातो.
कोर्टात हीही चर्चा की लेखकाचं जगणं त्याच्या कादंबरीत येत असतं? लेखनात लेखक येत असतो?सँड्रा म्हणते की येऊ शकतो. परंतू म्हणून मी खून केलाय असा त्याचा अर्थ होत नाही. ती सांगते की आमच्यात तणाव होते, भांडण होतं, मुलाची काळजी घेण्यावरून वाद होत. सँड्रा आपल्या मुलाला तो अधूदृष्टीचा म्हणून वाढवत नाही, त्याला नॉर्मल मुलगा म्हणून वाढवत असते. सॅम मात्र आपल्या अपराध गंडामुळं मुलाला फार जपत असतो, सतत त्याला आपल्या सावलीखाली ठेवत असतो. मूल कसं वाढावं यावरून मतभेद.
ही कथा असती तर वाचतांना वाचक मधे मधे थांबला असता. वाचकांनी त्याचे अनुभव, त्यानं पाहिलेले इतर कोणातले तरी तणाव, शक्यता यांचा विचार केला असता. पात्रं त्यानं आपल्या मनात मुरवली असती. ही कथा वाचकाच्या मनाच पाच पन्नास दिवसही रेंगाळत राहिली असती. त्या रेंगाळण्याला छापील कथेमधे वाव असतो.
कथा चित्रपट या रूपात कशी सांगायची?
सिनेमाघरात चित्रपट थांबवून बाहेर जाता येत नाही, चित्रपट मधेच थांबवून मित्राबरोबर चहाच्या कपावर चर्चा करता येत नाही. चित्रपट थांबवून संगीत लावून खुर्चीत बसून मद्याचा प्याला घेऊन विचार करता येत नाही. दोन अडीच तास तुम्हाला खिळून रहावं लागतं. हां. अलीकडं लॅपटॉवर चित्रपट पहाताना मात्र ते सुख मिळवता येतं. परंतू मुळात चित्रपट हा दोन अडीच तासांचाच असतो.तो प्रेक्षकाच्या मर्जीनुसार कितीही काळ लांबवायची सोय नसते.
ही मर्यादा ओलांडून प्रेक्षकाला आस्वाद घेता येईल अशी सोय करणं हे दिक्दर्शकाचं कसब.
ॲनाटॉमीमधे सँड्राची जबानी चालली असताना मधेच काही सेकंद दुसरी माणसं दिसतात, मुलगा दिसतो, घडून गेलेली घटना दिक्दर्शिका दाखवते.
जबानी चालली असताना सँड्रा थांबते. काही सेकंद कोणी बोलत नाही.
जबानी चालली असताना वकील धाडधाड बोलत सुटतो. नंतरचं दृश्य संथ गतीनं सरकतं, पॉज घेतल्यासारखं. दृश्यांच्या गतीत बदल करून दिक्दर्शिका प्रेक्षकांना विचार करायला वेळ देते.
डॅनियल आपल्याला दिसतो. तो बोलत नाही. काही तरी करत असतो. तो त्याच्या कुत्र्यासोबत हिंडतो, त्याला प्रेमानं कुरवाळतो.
सॅंड्रा पार्टीत असते, दारू चढलेली असते, गप्पाथट्टा चाललेली असते.
सँड्रा कारमधून जात असते. काही सेकंद आपल्याला गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात रस्ता दिसत असतो. सँड्रा स्वतःच्या भावना नियंत्रित करायचा प्रयत्न करते, लपवायचा प्रयत्न करते, शेवटी उन्मळून रडते.
पटकथेत केलेली अशी दृश्यांची गुंफण प्रेक्षकाला अवकाश देते. दृश्यं आणि त्यांची गती.निःशब्द दृश्यं.
चित्रपट अर्थातच लांबतो. कारण दिक्दर्शिकेला एका विशिष्ट गतीनं कथा दाखवायची असते.
कथा लांबते, वाचकाला धरून ठेवते.तसंच चित्रपटाचंही. चित्रपट लांबतो पण प्रेक्षकाला धरून ठेवतो. दोन्ही ठिकाणी आस्वाद घेणाऱ्याला स्पेस मिळते.
तेच तर कथाकाराचं आणि दिक्दर्शकाचं कसब.
पुण्याच्या महोत्सवात सिनेघर पूर्ण भरलेलं होतं. माणसं पडद्याला खिळली होती. कोणी हलत नव्हतं. कोणी बाहेर गेलं नाही. माझ्या आसपासच्या पाच दहा प्रेक्षकांत तरी कोणी सेलफोन उघडला नव्हता.
।।