सावरकर, मंगेशकर, मोदी.
सावरकर, मंगेशकर, मोदी.
नुकताच एक वाद झाला.
वादाचं मुळ होतं नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतलं भाषण. भाषणात मोदी म्हणाले की हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांच्या गाण्याला संगीतबद्द केल्याबद्दल त्यांना आकाशवाणीनं शिक्षा दिली, नोकरीतून काढून टाकलं. तो काळ काँग्रेस सरकारचा होता, नेहरू पंतप्रधान होते. मोदींचं म्हणणं होतं की नेहरू (काँग्रेस) सावरकरविरोधी होते, हिंदुत्वविरोधी होते आणि त्यांच्या दबावाखाली हृदयनाथ मंगेशकरांवर अन्याय झाला.
यातलं तथ्थ्य काय?
सुधीर गाडगीळ यानी हृदयनाथ मंगेशकरांकडं या बाबत विचारणा केली. मंगेशकर म्हणाले की १९५७ साली ते आकाशवाणीत नोकरीला नव्हते; मंगेशकर आणि राजा बढे यांना आकाशवाणीनं चार गाण्यांना संगीत देण्याचं कंत्राट दिलं होतं. पैकी तीन गाण्यांचं रेकॉर्डिंग झालं. चवथ्या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं नाही. नंतर करार रिन्यू झाला नाही. रेकॉर्डिंग न झालेलं चौथं गाणं कोणतं ते मंगेशकर बोलले नाहीत.
हृदयनाथ आकाशवाणीत नोकरीला नव्हते, त्याना काढून टाकलेलं नाही. सारा मामला मोदींचा कल्पनेचा खेळ होता.
तत्कालीन सरकारी यंत्रणा आणि सत्ताधारी पक्ष यामधे सावरकर विरोध हा मुद्दा होता असं दिसत नाही.
१९५५ चा काळ तपासून पहा. नेहरू जिवंत असतानाचाच हा काळ आहे.मोदी म्हणतात तसं महाराष्ट्रात अजिबातच सावरकर विरोधी वगैरे वातावरण नव्हतं. सावरकरांचा नथूराम गोडसेना आशिर्वाद होता हे माहित असूनही एकूण महाराष्ट्रीय जनता सावरकरांबद्दल आदर बाळगून होती. सावरकरांचं अंदमान, समुद्रात उडी घेणं, परदेशात जाऊन बाँब तयार करणं या गोष्टीचा थरार महाराष्ट्री लोकांच्या मनामधे होता. त्यांच्या कविता आणि जाती निर्मूलनाचे प्रयत्नही महाराष्ट्रानं लक्षात घेतले होते.
स्वातंत्र्य चळवळीत भाग धेणाऱ्या माणसांबद्दल लोकांमधे आदर होता.गांधी, भगत सिंग, सावरकर अशी अगदी भिन्न प्रकृती आणि विचारांची माणसं महाराष्ट्रात लोकांनी आपलीशी केली होती. त्याच काळात सावरकरांची भाषणं होत आणि प्रचंड जनसमुदाय त्यांच्या भाषणांनी मंत्रमुग्ध होत असे.
सावरकरांची प्रतिमा राजकारणाच्या पलीकडची होती. तेंडुलकर आणि शिरवाडकर हे अगदी भिन्न शैली आणि विचारांचे साहित्यिक. दोघंही सावरकरांच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झालेले होते.
काँग्रेस वगैरे खुळ मोदींनी उचकलंय, तसं त्या काळात अजिबातच नव्हतं. सावरकरांची गाणी रेडियोवर होती, गावोगाव समारंभात म्हटली जात असत. सावरकरवादी जयंतराव टिळक काँग्रेसचे खासदार होते. सावरकर भक्त सुधीर फडके यांच्यासाठी गीत रामायण लिहिणारे गदी माडगूळकर तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कारकीर्दीत राज्यपालांनी नेमलेले आमदार होते. सावरकरांचे अनुयायी असलेले श्रीग माजगावकर आणि स.ह.देशपांडे यांना महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात मान्यता आणि मान होता. स्वतःला कट्टर सावरकरवादी म्हणवणारे सुधीर फडके यांचं गीत रामायण महाराष्ट्रानं तेव्हां आणि आताही डोक्यावर घेतलं. सुधीर फडके सावरकरवादी आहेत म्हणून त्यांचं संगित, गाणं लोकांनी अजिबात नाकारलं नव्हतं. लता मंगेशकरांची सावरकरांवर भक्ती होती हे त्या काळात आमच्या कानी नव्हतं. परवा परवा पेपर त्याचा गवगवा करू लागलेत. पण लता मंगेशकरांचं गाणं हे स्वतंत्रपणे लोकांनी स्वीकारलं, त्यांची सावरकरांवर निष्ठा होती म्हणून त्यांचं गाणं लोकांनी नाकारलं नाही.
१९७० साली सावरकरांचा फोटो असलेलं टपाल तिकीट निघालं. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.
सावरकरांची देशनिष्ठा आणि राम या व्यक्तिमत्वाचं धार्मिक-सांस्कृतीक स्थान महाराष्ट्रातल्या लोकांना तेव्हाही मान्य होतं, आजही मान्य आहे. दोन्ही गोष्टी राजकारणाचा भाग नव्हत्या.
अडचण अशी आहे की मोदींना त्यांच्या सत्ताकारणासाठी सावरकर, मंगेशकर आणि रामचंद्र यांचा वापर करायचा आहे, त्यांचा एकाधिकार मिळवायचा आहे. लता मंगेशकरांची अलौकीक संगीतमत्ता ही कोण्या पक्षाच्या किंवा संस्थेच्या मालकीची होऊ शकत नाही.परंतू मतं मिळवण्यासाठी स्वतःची लायकी कमी पडू लागल्यानं मोदींना आता इतिहासातल्या माणसांची मदत हवीशी झालीय.
लता मंगेशकरांना सावरकरांबद्दल प्रेम असण्याचा अधिकार आहे. पण राजकीय, तात्विक विचार करणारी माणसं जेव्हां हिंदुत्व-राज्यघटना-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करतात तेव्हां लता मंगेशकरांची साक्ष काढत नाहीत. संगीताचा अभ्यास करणारी माणसं सावरकरांची किंवा नेहरूंची साक्ष काढत नाहीत.तो नसता उद्योग मोदी करत आहेत.
मोदीनी लोकसभेत हा नसता उद्योग काढला कारण त्यांना होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी लोकांना उचकवायचं आहे. अन्यथा पन्नासेक वर्षांपूर्वी घडलेल्या/न घडलेल्या एका अगदीच क्षुल्लक गोष्टीचे उल्लेख देशाच्या संसदेत करण्याचं काहीच कारण नव्हतं.
पाच पन्नास वर्षांपूर्वी घडलेल्या/ न घडलेल्या या घटनेची वाच्यता झाल्यानं भारतातल्या शेतकऱ्यांच्या जगण्यावर परिणाम होत नाहीये ; तांदूळ वा ज्वारीचं पीक धोक्यात आलेलं नाहीये; गॅसचे दर वाढलेले किंवा कमी झालेले नाहीयेत; कोविडचे जंतू चवताळलेले किवा थंड पडलेले नाहीयेत; युक्रेनमधलं संभाव्य युद्ध टळलेलं नाहीये; भारतातल्या निरर्थक शिक्षण व्यवस्थेतून पडणाऱ्या अनाडी मुलांच्या आयुष्यात फरक पडत नाहीये.
सावरकरांचं प्रकरण उचकून काढून मोदी लोकांना भडकवत आहेत, त्यांचं निवडणुकीचं राजकारण साधत आहेत.
सावरकर होऊन गेले. ते जसे कसे होते त्यात कोणी बदल करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती काळाच्या उलथापालथीत घडते, काळाचे ठसे त्या व्यक्तीवर असतात.
सावरकरांच्या काळात त्यांना अनुयायी होते, विरोधक होते. सावरकरांचं गुणगान होत होतं आणि त्यांच्यावर टीकाही होत होती.
गांधीजींच्या काळात गांधीजींना अनुयायी होते आणि विरोधक होते. गांधीजींचं गुणगान होत होतं, गांधीजींवर टीकाही होत होती.
वर्तमान काळाशी व्यक्ती जोडू नये.
सावरकरांचा प्रश्न नाही.सावरकरांचा उपयोग करून घेणाऱ्यांचा प्रश्न आहे.
प्रश्न नेहरूंचा नाही, गांधींचा नाही, आंबेडकरांचा नाही.प्रश्न त्यांचा वापर आपलं क्षुद्रपण लपवण्यासाठी करणाऱ्यांचा आहे.
शिवाजी महाराज मोठे होते हे कोणी सतत सांगण्याची आवश्यकता नाही. पण त्यांचं नाव घेणारे, त्यांच्या जातीत जन्मलेले कसे मोठे ठरू शकतात असा प्रश्न आहे.
सावरकरांचा प्रश्न नाही.
प्रश्न त्यांचा वापर करणाऱ्या मोदींचा आहे.
मोदींचं वागणं अरेरारावी, उर्मट आहे; खोटेपणा आणि द्वेष यावर त्यांचा आचार आणि विचार आधारलेला आहे; त्यांची राजकीय आणि आर्थिक कामगिरी देशाला अपायकारक ठरलेली आहे. त्यावर चर्चा काढली की ते सावरकरांच्या मागं लपतात, आपल्या जन्मानं हिंदू असण्याच्या मागं लपतात.
सावरकर हा प्रश्नच नाहीये.
प्रश्न आहे मोदी इत्यादींच्या अपयशाचा, त्यांच्या पराभूत मनोगंडाचा, त्यांच्या असुरक्षितता मनोगंडाचा.
मोदी उघडे पडलेत.
सावरकर, हृदयनाथ, लताबाई त्यांच्या त्यांच्या जागी आहेत, रहाणार आहेत.
मोदी उघडे पडलेत.
।।