सिनेमा. एक माणूस इतिहास घडवतो!

सिनेमा. एक माणूस इतिहास घडवतो!

 चार्ली विल्सन्स वॉर.

चार्ली विल्सन्स वॉर (२००७), नेटफ्लिक्स.

रशियाची हेलेकॉप्टरं आणि गनशिप हवेत भिरभिरतात, रॉकेटं फेकतात. धुराचा लोट मागं सोडत अनघड अफगाण घरावर कोसळतात. धुराचे लोट. उध्वस्थ घर, सैरावैरा माणसं.

अमेरिकेत चार्ली विल्सन हे काँग्रेसमन क्लबात, जाकुझीत, एका हातात ग्लास, दुसऱ्या हाती एक श्रीमंत महिला.जोआन हरिंग. हरिंग आणि चार्ली यांच्यातली सेक्समैत्री, पडद्यावर दिसते.

श्रीमंत महिला सभा बोलावते.  सभेत झिया उल हक. श्रीमंत महिला हक यांचं कौतुक करते. झुल्फिकार अली भुत्तो यांना हकनी फाशी दिलेली असते हे साऱ्या जगाला माहित असतं. तरीही ही महिला सभेत सांगून मोकळी होते की भुत्तोना हकनी मारलं नाही.

महिला सांगते अफगाणिस्तान घुसलेल्या रशियनांना हाकला.

महिलेची राजकारणी लोक आणि धनिकांमधे चांगलीच ऊठबस. काँग्रेसमन इस्रायली आणि इजिप्शियन पुढारी आणि शस्त्रांचं स्मगलिंग करणाऱ्यांशी सीआयएच्या अधिकाऱ्यांमार्फत भेट घेतो. गंमत पहा. इस्रायली आणि इजिप्शियन यांच्यात राजकीय वैर पण व्यवहारात ते एकमेकाला मदत करतात.

काँग्रेसनमवर ड्रग बाळगल्याचा खटला आहे. तो मॅनेज होतो.काँग्रेसमन सुटतो.

काँग्रेसमन इस्लामाबादेत. तिथं झियाशी बोलणी.

एक मातबर अमेरिकन माणूस पाकिस्तानातल्या निर्वासित छावणीत. तिथं उत्साहानं तो अल्ला हो अकबर अशी घोषणा करतो.

स्टिंगर रॉकेटं गाढवाच्या पाठीवरून अफगाणिस्तानात पोचतात, अफगाण मुजाहिदाच्या खांद्यावर. सुर्रर्रकन रॉकेट सुटतं, रशियन हेलेकॉप्टरचा वेध घेतं. हेलिकॉप्टर झेपाडत जमिनीवर कोसळतं. अफगाण माणसं अत्यानंदानं चित्कारतात.

रशियाची इतकी विमानं, इतके रणगाडे, इतकी हेलेकॉप्टर्स नष्ट झाली असं पडद्यावरचा मजकूर सांगतो.

रशियाचं सैन्य माघारी जातं.

काँग्रेसमनचा सत्कार व सन्मान होतो.

चार्ली विल्सन काँग्रेसमन आहे. त्याचा मतदार संघ टेक्सस. मतदारांना चिंता असते कर कमीत कमी असावेत आणि रोजगार मिळावेत. तेवढं केलं की झालं. मग काँग्रेसमन बाकीचे काय धंदे करतो यात मतदारांना रस नाही. चार्ली विल्सन अफगाण मुजाहिदांना स्टिंगर मिसाईल देतो,त्यासाठी सौदी आणि अमेरिका सरकारांकडून पैसे काढतो.

झिया उल हकच्या भूमिकेत ओम पुरी दिसतो. आपल्याला झिया दिसतच नाही, ओम पुरीच दिसतो.

युद्ध ओझरतं दिसतं. इस्लामाबादेत प्रेसिडेंट ओझरता दिसतो. दृश्य म्हणून त्यात विशेष काही नाही, छायाचित्रणही अगदी जेमतेम. अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान अगदी ओझरते दिसतात, दिसतो तो अमेरिका. अमेरिकेतलं राजकारण.

अफगाणिस्तानातून रशियाला बाहेर काढणं, त्यासाठी अब्जावधी डॉलरची शस्त्रं अफगाणिस्तानात ओतणं. शीतयुद्धाचा काळ होता.रशियानं युद्ध केलेलं चालत होतं पण दुसऱ्या देशानं जर शस्त्रानं प्रतिकार केला तर मात्र जागतीक शांतता धोक्यात येत होती. युनो ठराव करकरून रशियाला सैन्य मागं घ्यायला सांगत होती. वरवर ठराव, चर्चा आणि मुत्सद्देगिरी.आतून लढाया.

तर अशा स्थितीत स्टिंगर रॉकेटं अफगाणिस्तानात पोचली पण कशी? ते चित्रपटात दिसतं. चित्रपटात ॲक्शन कमी, पडद्यामागचे उद्योगच प्रामुख्यानं दिसतात. तोच चित्रपटाचा मुख्य मुद्दा आहे. अमेरिकन राजकारणाचे पैलू चित्रपटात दिसतात.

आज हा चित्रपट पहावासा वाटतो याचं कारण अगदी काल परवाच अमेरिकेनं युक्रेनला क्लस्टर बाँब देण्याचा निर्णय घेतला. या बाँबमुळं रशिया-युक्रेन युद्धाला एक निर्णायक वळण लागू शकतं.

क्लस्टर बाँब भयानक विध्वंसक आहे. या बाँबमधे अनेक छोटे छोटे बाँब असतात. बाँब कोसळला की त्यातले छोटे बॉंब मोठ्या भूभागावर पसरून फुटतात. खूप विध्वंस करतात. रशियानं हे बाँब बशर आसदसाठी सीरियात वापरून बशर विरोधकांचा नाश केला होता. तेव्हां या बाँबविरोधात अमेरिकेनं खूप बोंब केली होती. जगभर सीरिया आणि रशिया यांच्यावर क्लस्टर वापराबाबत टीका झाली होती. तेच बाँब आता अमेरिका युक्रेनला देणार आहे. ब्रीटन इत्यादी देशांनी अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. अमेरिका विरोध जुमानणार नाहीये.

बायडन यानी हा निर्णय कसा घेतला असेल? काँग्रेसला कसं पटवलं असेल? या निर्णयाला मान्यता देण्याच्या बदल्यात काँग्रेसजनाना बायडन यांनी कोणती आश्वासनं आणि आमिषं दिली असतील? शस्त्रं स्मगल करणारी माणसं, कॉर्पोरेट्स,बँकर इत्यादी माणसं यात कुठंकुठं गुंतली असतील? हे सारं मनात येतं ‘चार्ली विल्सन्स वॉर’ पहाताना.

युद्ध, राजकीय निर्णय.पण ते होतात सेक्स,ड्रग्ज, चोरटा व्यापार, बेकायदेशीर वर्तणुक या वाटेनं. त्याची कल्पना आपल्याला अशा चित्रपटातून येते.

गंमत म्हणून मनात येतं. अजीत पवारांनी पहाटे उठून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नंतरची शपथ दुपारी घेतली. त्याआधी ते नरेंद्र मोदी, शहा इत्यादींना भेटले. एकनाथ शिंदे  वीस पंचवीस आमदारांना घेऊन राजकीय पर्यटन करून मुख्यमंत्रीपदावर बसले. पण या घटनांच्या अलीकडं पलीकडं काय काय घडलं असेल? किलोवारी नोटा कुठून आल्या, कशा फिरल्या? किती तरी नाट्य असणार

चित्रपटाला, नाटकाला एकदम फिट असा विषय.

 फीचरपट, माहितीपट अशा मिश्र शैलीत चार्ली विल्सन वॉर तयार करण्यात आलाय. या शैलीचा फायदा असा की पृष्ठभागावर जे दिसतं त्याचा मेळ पृष्ठभागाखाली घडणाऱ्या न दिसणाऱ्या घटनांशी घालता येते.

चार्ली विल्सन हा माणूस खरोखरच होता की नाही? होता. पण चित्रपटात दाखवलाय तितका महत्वाचा भाग त्यानं निभावला होता या बद्दल मतभेद आहेत. म्हणजे तिथं पटकथेनं स्वातंत्र्य घेतलंय. चार्ली विल्सन पटकथेनं रंगवलाय. अनेक प्रसंग पटकथा आणि दिक्दर्शकानं कल्पिले आहेत. काही अंशी हे चार्ली विल्सनचं बायोपिकच म्हणायला हवं. चार्ली विल्सनच्या आयुष्यातल्या काही मोजक्या काळावरचा चित्रपट.

चित्रपटामधे माणसं आणि नाती यांची गुंतागुंत अपेक्षित असते. झिया आणि चार्ली विल्सन, झिया आणि धनिक स्त्री इत्यादीमधले संपर्क आणि संवाद कसे होते? पाकिस्ताननं अमेरिकेला सतत शेंडी लावली आहे. लोकशाही, मानवता यांना हरताळ फासून पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी कारभार चालवला आणि त्याकडं अमेरिकेला काणाडोळा करायला लावला. याच काळात किती तरी वर्षं पाकिस्ताननं ओसामा बिन लादेनला लपवून ठेवलं होतं. हे पाकिस्ताननं कसं जमवलं? कशा शेंड्या लावल्या? ते कळतं तर मजा आली असती.

अमेरिकन राजकारणाचं अंतरंग काही प्रमाणात चार्ली विल्सन्स वॉर दाखवतं.

चार्ली विल्सन ही व्यक्तिरेखा जितकी रंगवली आहे तितकी जोआन हर्लिंग ही चार्ली विल्सनची मैत्रिण रंगवलेली नाही. जोआनची भूमिका ज्युलिया रॉबर्ट्सनं केली. पण पटकथेत तिला वाव नाही, दिलेली कामगिरी ती पार पाडते, पाटी टाकल्यासारखी. टॉम हँक्स कौशल्यानं भूमिका पार पाडतो. टॉम काँग्रेसमनसारखा दिसतो.

सीआयएचा एक केस ऑफिसर गस ॲवरोकोटस हे पात्र आहे. सीआयएची माणसं आणि कारवाया हे नेहमीच एक गूढ असतं, नाट्य असतं. ते या चित्रपटात अगदी ओझरतं आहे. गसची भूमिका करणाऱ्या फिलिप हॉफमनला या भूमिकेसाठी ऑस्करचं नामांकन मिळालं. गस हे पात्र पटकथेच बरेपणानं चितारलं आहे, गस भाव खाऊन जातो.

जॉर्ज क्राईलनं २००३ साली लिहिलेल्या Charlie Wilson’s War: The Extraordinary Story of the Largest Covert Operation in History या पुस्तकावरून पटकथा तयार करण्यात आलीय.

।।

Comments are closed.