सिनेमा ए डिफरंट मॅन
ॲडम पियर्सन हा एक ब्रिटीश नट आहे. वयाच्या पाचव्या वर्षी त्याचं डोकं आपटण्याचं निमित्त होऊन त्याला neurofibromatosis या व्याधीनं ग्रासलं. चेहऱ्याच्या कातडीखाली गुठळ्या झाल्या, चेहरा विरूप झाला.
चेहरा विद्रुप पण गडी वर्तणुकीनं उमदा. त्याची आई कीव करायची, तुझं कसं रे होणार असा विलाप सतत करत असायची. पण हा गडी रंजीस झाला नाही. शिकला. मॅनेजमेंट केलं. नाना कामं करत राहिला. त्याच्या विद्रुपतेचा वापर करून त्याला मालिका, चित्रपटांत कामं मिळाली. पण त्यानं स्वतःचं बिझनेस मॅनेजमेंटचं कसब वापरलं, करमणुकीचे कार्यक्रम केले, स्वतःचं स्थान तयार केलं. बीबीसी ४ या वाहिनीवर (रेडियो आणि चित्र) त्यानं अनेक मालिका केल्या.
आईला आश्चर्य वाटायचं. ॲडम म्हणायचा ‘बघशील.एके दिवशी मी ऑस्कर मिळवेन.’
जोनाथन ग्लेझर या दिक्दर्शकानं अंडर द स्किन या चित्रपटात २०१३ साली ॲडमची निवड केली. ‘अंडर द स्किन’ ही एक भयकथा होती. परग्रहावरून एक स्त्री येते आणि ती पृथ्वीवरची माणसं परग्रहावर घेऊन जाते अशी गोष्ट. दर्शकाची टरकावी अशी दृश्यं होती. जोनाथन ग्लेझर हा माणूस कोण माहित आहे? २०२४ मधे त्याच्या झोन ऑफ इंटरेस्टला उत्तम चित्रपटाचं ऑस्कर मिळालं होतं.
ॲडमला ‘अंडर द स्कि’नमुळं प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळाली. चित्रपट मिळत राहिले. २०२३ मधे त्याची मुख्य भूमिका असणारा ‘ए डिफरंट मॅन’ प्रदर्शित झाला. बर्लिन उत्सवासह इतर आंतरराष्ट्रीय उत्सवात चित्रपट गाजला पण ॲडमला बक्षीस मिळालं नाही. २०२४ च्या मुंबईतल्या मामी चित्रपट महोत्सवात हा चित्रपट लोकांनी पाहिला, त्याची बरीच चर्चा झाली.
‘ए डिफरंट मॅन’ चं वेगळेपण आहे ते त्यातल्या पात्रांमुळं. विरूप पात्रं मुख्य भूमिकेत पहायची आपल्याला सवय नाही. एक डोळाच नाहीये, दुसरा आक्रसलेला आहे. जबडा कायच्या काय पसरलेला आहे, ठिकठिकाणी गुठळ्या आहेत, तोंड धड उघडत नाही तरी माणूस त्यातून बोलतो, एक कान असून नसल्यागत. माणूस नॉर्मल पण चेहरा हा असा. पण असा चेहरा पहायची सवय आपल्याला नाही, नको वाटतं, कीव येते.
एडवर्डला अशा चेहऱ्याचा पाहून काही माणसं दचकत. गंमत अशी की न्यू यॉर्क शहरात एडवर्ड फिरतो तेव्हां माणसं त्याच्याकडं लक्ष देत नसत. माणसं आपापल्या कामात असत. कोणाची कोणाला पडलेली नसते. माणसं अशीही असतात, तशीही असतात, कशीही असतात, कसेही कपडे घालतात, काहीही करतात. आपण आपलं काम करावं. बस. अशी न्यू यॉर्कची माणसं आणि त्यात विरूप एडवर्ड.
तरीही एडवर्डला एक काम मिळालेलं असतं. अशी माणसं दिसायला कशीही असली तरी ती माणसंच असतात, माणसासारखी माणसं असतात हे स्वीकारा हे सांगणारी एक स्वयंसेवी संघटना असते. या संस्थेच्या प्रचारासाठी फिल्म केल्या जात आणि त्यात एडवर्डला काम असे.
इनग्रीड नावाची एक लेखक त्याच्या शेजारच्या फ्लॅटमधे रहात असते. ती प्रथम एडवर्डला पहाते तेव्हां दचकते. तिचं दचकणं पाहून एडवर्ड दुःखी होतो.
एका प्रायोगीक औषधाचा प्रयोग एडवर्डवर होतो आणि एडवर्डचा चेहरा एकदम नॉर्मल होतो, एडवर्ड एकदम छानच दिसू लागतो. एडवर्ड आपलं नाव बदलतो. गाय असं नाव घेतो. आता इनग्रीड त्याच्या प्रेमात पडते. एडवर्ड सुखवस्तू होतो.
येवढ्यात लोचा होतो. विरूप चेहऱ्याची भूमिका विरूप चेहऱ्याचा मास्क घालून एडवर्ड करत असताना चक्क एक खराखुरा विरूप चेहऱ्याचा ओसवाल्ड नावाचा माणूस त्या नाटकात पोचतो. हा ओसवाल्ड विरूप असला तरी मजेशीर, विनोदी, उमदा असतो. लोक त्याच्या विरूपतेला विसरतात आणि त्याचे मित्र होतात, तो एकदम लोकप्रिय असतो.
आता एडवर्ड आणि ओसवाल्डमधे वितुष्ट येतं. एडवर्डचा दर्शनी छान दिसतो पण आतून स्वभावानं कुरूप. ओसवाल्डचा चेहरा कुरूप पण तो स्वभावानं उमदा. लोक सुंदर चेहऱ्याच्या एडवर्डला नाकारतात आणि विरूप चेहऱ्याच्या ओसवाल्डला आनंदानं स्वीकारतात. एडवर्डचं लग्न होत नाही, ओसवाल्डचं लग्न होतं, तो सुखानं संसार करतो. त्याची बायको चेहऱ्यावर नव्हे ओसवाल्डमधल्या माणसावर प्रेम करते.
सरळ रेषेत कथानक आहे. एकीकडं ती एक अद्भुतकथा आहे. माणसाचा चेहरा इतका विद्रुप असू शकतो आणि औषधोपचारानं तो एकदम उत्तम होऊ शकतो. हे अद्भूतच. त्याचा बदलता चेहरा पहाताना आपल्याला आश्चर्य वाटतं, खरंच वाटत नाही.
पण त्या बरोबरच ही नीतीकथाही आहे. माणूस महत्वाचा, चेहरा महत्वाचा नाही असा बोध ही गोष्ट देते.
एडवर्डची भूमिका करणारा नट आहे सेबॅस्टियन स्टॅन. हा देखणा, लोकप्रीय नट आहे. ओसवाल्डची भूमिका करणारा नट आहे ॲडम पियर्सन. तो खरोखरच व्याधीग्रस्त आणि विरूप चेहऱ्याचा आहे. आपण सुरवातीला पाहिलं की त्यासाठीच त्याची निवड झाली आहे. पण पडद्यावरचा त्याचा वापर खरोखरच आपल्याला हसवतो, सुखावतो. त्याला समजा बुरखा घालून काम दिलं असतं तर वूडी ॲलनच्या चित्रपटातलं एकादं धमाल पात्रं पहात आहोत असं आपल्याला वाटलं असतं.
मेकअपची करामत आहे. अमिताभ बच्चनच्या पा या चित्रपटाची आठवण होते. ‘ए डिफरंट मॅन’मधे विरूप चेहरा दिसतो, अगदी तंतोतंत विरूप चेहरा एका नटाला देण्याची करामत चित्रपटात आहे. त्यात कथानक आहे, अनेक पात्रं आहेत.
चित्रपट प्राईम व्हिडियोवर आहे. चित्रपट १ तास ५० मिनिटांचा आहे.
।।