सिनेमा. ‘खाकी’. बिहारी राजकारण, जात, सरकार.
खाकी. गुन्हे, जात, राजकारण, बिहार.
नेटफ्लिक्स.
बिहारमधील एका गुन्हेगाराची गोष्ट खाकी या मालिकेत नेटफ्लिक्सवर सादर झालीय. कथानक आणि मालिकेचा वास्तवाशी असलेला संबंध या दोन मुद्द्यावर ती गाजतेय.
मालिकेत चंदन महातो नावाचा एक गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर अनेक खून नोंदले गेलेत. पोलिस त्याची कोंडी करून एका गावात त्याला घेरतात. पोलिस त्याला पकडणार इतक्यात इन्सपेक्टरला वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन येतो. मंत्र्याची आज्ञा असते की चंदनला पकडू नका. निवडणुकीचा मोसम असतो. एका राजकीय पक्षाचा चंदनला पाठिंबा असतो.
इथून गोष्ट सुरु होते. गोष्ट मागे जाऊन चंदन महातोची करियर दाखवून पुढं सरकते. चंदन एक हत्याकांड करतो. शूर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अमित लोढा चंदनला पकडतो, चंदनला फाशी होते. इथे सात भागांची मालिका संपते.
हत्याकांड, गोळीबार, तुरूंग फोडणं, पाठलाग या घटना प्रेक्षकाला खिळवून ठेवतात. प्रत्येक भागाचा शेवट चुटपुट लावून जातो, पुढला भाग पाहिलाच पाहिजे असं वाटतं, न थांबता सगळी मालिका पाहिली जाते.
पटकथा वेगवान आहे.चित्रण वेगवान आहे. संकलनही वेगवान आहे. सामान्यतः रेंगाळायला होत नाही, पटापट गोष्ट पुढं सरकते. चित्रपट निर्मितीची सगळी अंग यथायोग्य हाताळलेली आहेत. अलीकडं चित्रण आणि संकलन दोन्हीतही सफाई आलेली दिसते.
बिहारमधल्या गावाशहरात पोलिस चंदन महातोला शोधतात, त्याचा पाठलाग करतात, त्याला पकडतात. गल्ल्या, रस्ते, कच्च्या बांधकामाच्या इमारती, गच्च्या, दुकानांची आणि माणसांची गिचमिड या मधून पाठलाग होतो. आसपास माणसं असतात. गर्दी हाताळणं हे चित्रपट निर्मितीतलं एक मोठं कष्टाचं काम असतं. चित्रीकरण होतंय असं सभोवतालच्या माणसांच्या आविर्भावातून जाणवता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. ती जेवढी जमते तेवढा चित्रपट प्रभावी होतो. खाकीमधे ते दिक्दर्शकाला बरंच जमलेलं आहे. बिहारी माणसं, गाव, या चित्रणातून समजतं.
मालिकेत गुन्हेगार मंडळी देवाची पूजा करतांना ठळकपणे दिसतात. देवधर्म आणि गुन्हे एकत्र कसे काय नांदतात? ते आपलं आपण ठरवायचं.
नायक पोलिस अधिकारी अमीत लोढा आणि त्याची पत्नी यांच्यातला तणाव दाखवणारा एक प्रसंग आहे. त्यात अमीत लोढा पत्नीला सॉलिड झापतो.मला सल्ले वगैरे देऊ नकोस, तू गृहिणी आहेस, गृहिणीच रहा असं तिला तीन चार वाक्यांत ठळकपणे सांगतो. पत्नी गप्प रहाते. पत्नीचं दुय्यम, तिय्यम स्थान, पती काहीही करो, पत्नीनं ते सहन करायचं. मालिकेतले बहुतेक पतीपत्नी संबंध या प्रकारचे.
चंदन महातो सभेत भाषण करून आपल्या जातीवर झालेल्या अन्यायाचा बदला आपण हत्याकांड करून घेणार आहोत असं सांगतो.
चंदन महातो परिवारातलं एक पात्र सांगतं की अन्याय निवारण करण्यासाठी गुन्हा करणं यात काहीही वावगं नाही.
अमीत लोढा राजस्थानी आहे. तो बहुदा ऊच्च जातीचा असावा. बिहारमधला एक मुरब्बी माणूस अमीत लोढाला सांगतो की तुला जेव्हां बिहारमधली जात व्यवस्था कळेल तेव्हां तिला बिहार समजलेला असेल.
जहाँबाज, शूर, ॲक्शनबाज पोलीस अधिकारी हे पात्रं मुळातच नाट्यमय असतं. तसंच ते लिहिलेलं असतं. अशा भूमिकांमधे अभिनय केला नाही तरी चालतो. नट लक्षात रहात नाहीत, पात्र लक्षात रहातं.
‘खाकी’मधे एक जयस्वाल नावाचा व्यापारी दाखवलाय. व्यापाऱ्याची अगतीकता, हुशारी, लाचारी, जुळवून घेणं. अगदी छोटी भूमिका, विजय कुमार डोग्रा छान करतो. मीता देवीनं दाखवलेला ग्रामीण सोंदर्य आणि खटका लक्षात रहातो. छोट्या भूमिका पण लक्षात रहातात. इन्सपेक्टर रंजन कुमार अभिमन्यू सिंगनी लक्षात राहावा इतका वेधक केलाय. आशुतोष राणा हा नट व्यावसायिक आणि अनुभवी आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पोलिस अधिकारी कमी दिसतो, आशुतोष राणाच अधिक दिसतात.
मालिका असामान्य म्हणता येणार नाही पण रंजक आहे, पहावीशी वाटते.बिहारमधील जमताडा गावातली सायबर गुन्हेगारी काही दिवसांपूर्वी त्याच नावाच्या मालिकेत दिसली होती. बिहारवर गुन्हेगारीचा शिक्का मारणाऱ्या मालिका प्रदर्शित होताहेत.
हे झालं पडद्यावर दिसलेलं वास्तव.
अमित लोढा नावाचा एक पोलिस अधिकारी खरोखरच अस्तित्वात आहे. त्यानं लिहिलेल्या बिहार फाईल्स या त्याच्या आत्मकहाणीवर ही मालिका आधारलेली आहे. सोयीसाठी काही घटना आणि नावांत केलेले काही बदल सोडले तर मालिका वास्तवावर आधारलेली आहे.
चंदन महातो (खरा माणूस पिंटू महातो) या माणसाची गुन्हेगारी घडत होती त्या काळात लालू यादव आणि राबडी देवी यांची सत्ता होती. तेव्हां काँग्रेस आणि भाजप लालूच्या विरोधात होते. नितीश कुमार हे तेव्हां भाजपच्या अंगणात असल्यानं लालूच्या विरोधात होते. लालूचा राजद आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी गुन्हेगारीला प्रोत्साहन दिलं होतं, तसे आरोप एकमेकावर केले होते.
चंदन महातो याची जात कुर्मी. म्हणजे नितीश कुमारांची जात. मागास. लालू प्रसाद हे यादव. म्हणजे पुन्हा मागासच. दोन्ही जाती भूमिहार या वरिष्ठ जातीशी हाणामारी करत होत्या. भांडण जातींचं. सत्ता वरिष्ठांकडं रहाणार की मागासांकडं जाणार असा मुद्दा. भांडण मतांचं आणि गुन्हेगारीचं.
मालिकेत दाखवलंय की पुढारी, मंत्री, सरकार कसे जातीत गुंतले आहेत, गुन्हेगारीत गुंतले आहेत. मामला अगदी उघडपणे दाखवलाय. मालिकेतली पात्रं पहात असताना प्रत्यक्षात हा मंत्री कोण होता, हा आमदार कोण होता, हा खासदार कोण होता ते सटकन कळतं.
अमीत लोढा यांनी गुन्हेगारीची गोष्ट लिहितांना पोलिस खातं कसं काम करतं, सरकार आणि राजकीय पक्ष काय उद्योग करतात हे त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. सत्ताधारी पक्ष व सत्ताधारी जातीला त्रासदायक उद्योग केले की त्यांच्या बदल्या कशा होतात वगैरे गोष्टीही पुस्तकात आहेत, त्या मालिकेत दाखवल्या आहेत. पोलिस अधिकाऱ्यानं सेवेत असताना पोलिस व्यवस्था वगैरेवर लिहितांना सरकारची परवानगी घ्यायची असते. तशी परवानगी अमीत लोढा यांनी घेतलेली नाही असं त्या काळातले आणि आजचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणतात.
आपल्या पुस्तकावर मालिका करायला अमीत लोढांना परवानगी दिली. मालिका पुस्तकानुसार व्हावी यासाठी त्यांना निर्मात्याला मदतही केली. अमीत लोढा मालिकेत आणि बाहेरही हीरो झालेत.
नितीश कुमार यांनी आता अमित लोढा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून खटला भरलाय. नितीश कुमारांना पुस्तक आणि मालिका त्रासदायक वाटतेय. जातींची भानगड, मतांची भानगड. अमीत लोढा या मालिकेमुळं लोकप्रिय होताहेत, त्यांच्या मुलाखती होताहेत. कोणाही पुढाऱ्याला आपल्यापेक्षा अधिक लोकप्रिय होणारी माणसं आवडत नसतात. कॅमेऱ्यासमोर फक्त आणि फक्त आपणच दिसलो पाहिजेत असं पुढाऱ्यांना वाटतं,दुसरा कोणी कॅमेऱ्यात दिसू लागला तर पुढारी त्याचा काटा काढतात. तसंही काही घडलं असणं शक्य आहे.
मालिकेत जात, भ्रष्टाचार, बिहार हे राज्य याबद्दल खूप विधानं केलीत. ती बोल्ड आहेत.
बिहारमधली, राजकारणातली, गुन्हेगारी आणि जातीयवाद मालिकेतून ठळकपणे दिसतो. तोच मालिकेचा संदेश आहे.
संदेश देण्यासाठी मालिका केलीय?
रंजक आणि वेधक अशा कथानकात आपोआपच संदेश आलाय?
मालिका पाहिल्यावर प्रेक्षकांना संदेश लक्षात रहातो की एक नाट्य लक्षात रहातं?
❖