सिनेमा. फास्टेस्ट इंडियन

सिनेमा. फास्टेस्ट इंडियन

दी वर्ल्ड्स फास्टेट इंडियन.(२००५)

न्यू झीलंडचा चित्रपट आहे. नेटफ्लिक्सवर आता दिसतोय.

वेग हाच देव आहे असं मानणाऱ्या माणसाची गोष्ट आहे.

खेळ चित्रपट अशी चित्रपटांची एक वर्गवारी अलीकडं केली जाते. भाग मिल्खा भाग चित्रपटात मिल्खा सिंग हा धावपटू दिसतो. एम एस धोनीमधे धोनी दिसतो. मेरी कोम मधे मेरी कोम दिसते. खऱ्या खुऱ्या खेळाडूनं यश मिळवण्यासाठी कसकशी धडपड केली ते चित्रपटात दाखवलंय. एका परीनं ते कौतुक चित्रपट आहेत आणि ते ते खेळाडू नक्कीच कौतुकास प्राप्त आहेत.

फास्टेस्ट इंडियन चित्रपटाचा नायक बर्ट मन्रो हाही  खेळाडू आहे, खराखुरा खेळाडू आहे. १९५० च्या दशकात त्यानं मोटारसायकलच्या वेगाचे अनेक उच्चांक गाठले होते. न्यू झीलँडमधल्या मन्रोनं अमेरिकेत अनेक उच्चांक केले होते.

अमेरिकेत युटा या राज्यात बोनेविल नावाच्या एका गावात सुमारे २० किमी लांबीची धावपट्टी आहे. अगदी सरळ अशी जमीन असल्यानं तिथं मोटार आणि मोटारसायकलच्या स्पर्धा होत असतात. मन्रो बोनेविलमधे जाऊन उच्चांक गाठत असे. त्याची एक मोटारसायकल होती. त्यानं स्वतः तयार केलेली. ती जास्तीत जास्त ५० मैल वेगानं पळू शकत होती. पण मन्रोनं जुगाड करून तिच्यात असे काही चमत्कारीक बदल केले होते की तिनं २०५ मैलाचा उच्चांक केला.

चित्रपटात मन्रोचं व्यक्तिमत्व रंगवलंय. एकादी कथा रंगवावी अशा रीतीनं. वेग, मोटारसायकल या गोष्टी ओघानं येतात. पण तेवढंच. मन्रो ही काय चीज आहे ते चित्रपटात दिसतं. रेस, मोटार सायकल जणू निमित्त आहे, मन्रोचं व्यक्तिमत्व हाच चित्रपटाचा खरा मुद्दा.

मन्रो नावाचा खरा माणूस आणि त्याचं रेस जिंकणं हे खरं पण तो माणूस पटकथेत दिसतो तो तसा होता की नाही ते कळायला मार्ग नाही. पटकथाकारानं खऱ्या मन्रोत आपल्या कल्पनेतला मन्रो मिसळलेला आहे.

मन्रोची टॉम नावाच्या एका छोट्या मुलाशी दोस्ती आहे. मन्रो साठी उलटून गेलेला असला आणि टॉम दहा बारा वर्षाचा असला तरी दोघे एकाच वयाचे वाटतात.  त्यांच्या निरागसतेसाठी, त्यांच्या कल्पनाशक्तीसाठी, उत्सूकता आणि प्रयोगशीलतेसाठी.

एका घराच्या कुंपणाला लागून असलेल्या पडीक जागेत एक वर्कशॉप मन्रोनं तयार केलंय, त्यातच तो रहातो.टॉम हा त्याचा शेजारी.

‘तू त्या लिंबाच्या झाडाशी शू कां करतोस?’ टॉम मन्रोला विचारतो.

मन्रो आश्चर्यानं टॉमकडं पहातो आणि  विचारतो ‘तुला कसं माहीत?’

‘माझ्या आईनं पाहिलंय.’ टॉम म्हणतो.

मन्रो हसतो.

‘आपल्या शूमधे खूप मौल्यवान खतं असतात. अशा मौल्यवान गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. मी ते खत लिंबाला घालतो.’ मन्रो.

वर्कशॉपमधलं एक पॉलिश करायचं यंत्रं घेऊन मन्रो नख कापत असतो. आपण नेहमी वापरतो तो नेल कटर तो वापरत नाही.

मोटारसायकलचा टायर मन्रो घासून गुळगुळीत करतो? टॉमला आश्चर्य वाटतं. मन्रो टॉमला इंजिनियरिंग समजून सांगतो. बाईक वेगात असते तेव्हां टायर गरम होतो आणि चाकाचं नुकसान करू शकतो. घर्षण कमी करण्यासाठी तो गुळगुळीत करायचा.

मन्रोला एक जुगाड करायचा असतो. त्यासाठी लागणारं हत्यार त्याच्याकडं नसतं. टॉमला तो त्याच्या किचनमधून एक मोठी सुरी आणायला सांगतो. आठवण होते, लुई पाश्चरनं प्रयोगासाठी वापरलेली भांडी त्याच्या किचनमधली होती.

मन्रो फार वेगानं बाईक चालवतो. एका रेसमधे तो सर्वाच्या शेवटी निघतो पण सर्वांच्या आधी पोचतो.वेगवान  बाईक घसरते, मन्रो जखमी होतो. 

टॉम  विचारतो ‘ तुला मरणाची भीती वाटत नाही. तुला डेंजरची भीती वाटत नाही?’

मन्रो त्याला सांगतो ‘अरे धोका हा जगण्याचा स्वाद आहे. धोका नसेल तर जगणं बेचव होईल.’

अगदी पहिल्या वेळी मन्रो अमेरिकेला जायला निघतो तेव्हां टॉम मन्रोला विचारतो ‘ तू रेस जिंकशील? माझे बाबा तर म्हणतात की तू नक्कीच जिंकणार नाहीस.’

मन्रो त्याला सांगतो ‘ उच्चांक गाठायचा हे माझं स्वप्न आहे. माणसानं स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे, नाही केला तर माणूस झाडपाला होतो.’

चित्रपटाचा सुरवातीचा जवळ जवळ भाग मन्रो आणि टॉम यांच्यावरच आहे. मन्रो निघतो. टॉमला गॅरेजची चावी देतो. टॉम विचारतो ‘तू गेल्यावर मी इथं काय काय करायचंय?’

मन्रो त्याला यादी सांगतो. कोंबड्यांची देखभाल कर. अंडी गोळा करून आईला दे. आणि हां. लिंबाला खत घालायला विसरू नकोस…’

चित्रपटाचा शेवटाला मन्रो  वेगाचा उच्चांक गाठतो आणि आपण जिंकलोय हे सांगायला टॉमला फोन करतो.

खरं म्हणजे जवळ जवळ अर्धा चित्रपट मन्रो अमेरिकेला जाण्याआधीच संपलेला असतो, अजून रेसचा पत्ताच नसतो.

तीच तर गंमत आहे. हा कुठं आहे खेळपट? ही तर मन्रो नावाच्या एका नादिष्ट, खुळ्या माणसाची गोष्ट आहे.

वेडा माणूस आहे. बारमधे जातो. तिथं माणसं दारू पीत धूर सोडत बसलेली असतात. हा तिथं जाऊन चहा मागतो. बार टेंडरला धक्काच बसतो.

‘बाहेर मरणाचं ऊन आहे, इथं बसून थंड बियर घ्यायची असते. तू तर गरम चहा मागतोस.’ बार टेंडर म्हणते.

‘ अरेरे. तुम्ही दारू पिताय हे वाईट करताय. दारूमुळं तब्येतीचा सत्यानाश होतो. आणि त्यात तूम्ही सिगरेटी फुंकताय. फुप्फुसाची वाट लावताय. नका रे असं करू.’ असा संदेश मन्रो बारमधे देतो. अमेरिकाभर फिरताना जागोजागी तो हा संदेश देतो.

मला तर क्षणभर पडद्यावर मन्रो दिसलाच नाही, अभय बंगच दिसले.

चित्रपटात खूप बारीक बारीक जागा आहेत. त्यात अमेरिका दिसते.

अँथनी हॉपकिन्सनं मन्रोची भूमिका केलीय. सॉलिड.

एकदा एका कार्यक्रमात मुलाखतकारानं हॉपकिन्सला विचारलं की तू हा चित्रपट कां केलास.  हॉपकिन्स म्हणाला ‘मला हा सिनेमा करताना खूप मजा आली. मला वाटत होतं की माझंच जगणं हा चित्रपट दाखवतोय.’

।।

Comments are closed.