सिनेमा. सोवियेत बस स्टॉप.
सोवियेत बस स्टॉप्स.
माहितीपट.
आपला अनुभव. गावाच्या बाहेर, हमरस्त्याच्या कडेला एक बस स्टॉप असतो. परगावी जाणारी बस तिथं थांबते. गावातून बऱ्याच अंतरावर माणसं स्टॉपवर येतात. काही काळ तिथं सामान घेऊन थांबायचं. बस आली की जायचं. एक छप्पर, आडोशासाठी भिंत, येवढं पुरेसं असतं, करायचीय काय त्यासाठी एकादी वास्तू.
१९९० पूर्वीच्या सोवियेत युनियनची गोष्टच वेगळी आहे. तिथं बस स्टॉप म्हणजे एक कलात्मक वास्तू होती. विचारपूर्वक, मेहनतीनं केलेलं बांधकाम. एकाद्या गावात नव्हे तर गावोगाव. सोवियेत युनियनच्या पंधरा राज्यांत असे किती तरी कलात्मक बस स्टॉप आहेत, त्यांची मोजदादही झालेली नाही.
ख्रिस्तोफर हरविग या कॅनडियन छायाचित्रकाराला, कल्पना केली नसताना, एक बस स्टॉप, भटकंती करताना दिसला. तो चाट पडला. त्याचं कुतुहुल जागृत झालं. काय आहे हे प्रकरण असं समजून ध्यायची इच्छा जागी झाली. हरविग कारनं हज्जारो किमीचे रस्ते तुडवत फिरला. वाटेत सापडतील त्या बस स्टॉपचे फोटो त्यानं काढले. गावात जाऊन त्या स्टॉपचा इतिहास काढला, तिथल्या लोकांशी बोलला. सात वर्षं त्यानं हा उद्योग केला, एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक गाजलं. मग कोणाला तरी वाटलं की या छांदिष्ट माणसाच्या उद्योगावर एक फिल्म करावी. एक माहितीपट तयार झाला. तो मुंबईत आर्किटेक्ट लोकांनी भरवलेल्या महोत्सवात नुकताच पहायला मिळाला.
माहितीपटात दिसलेले काही बस स्टॉप असे.
एक काँक्रीटचा पक्षी. त्यानं पंख पसरलेत. पंखाच्या सावलीत प्रवाशांचा निवारा. आगगाडीच्या इंजिनाचा आकार, लाकडी खेळण्यातल्या इंजिनासारखा, त्या इंजिनाला एक डबा म्हणजे बस स्टॉप. एक पाच पन्नास फूट लांबीचा अजगर, त्याच्या विळख्यात बस स्टॉप. कोळ्याचे चार पाय, त्या पायांमधे लाकडी फ्रेममधे बस स्टॉप. किल्ल्याचा बुरूज. बुरूजात जा, बसची वाट पहा. एक लांबरूंद मशरूम, मशरूमच्या छत्रीखाली बस स्टॉप. मासा. गरूड. एका स्टॉपच्या बाजूला एक पुतळा. एका स्टॉपच्या छपरावर रथाचं शिल्प, योद्धा हेल्मेट चिलखत घालून रथ हाकतोय. भिंतींवर मोझाईकची म्युरल्स तर सतत दिसतात. एका वीस बाय दहाच्या म्यूरलमधे आकाशात झेप घेणारा एक माणूस. एक स्टॉप म्हणजे आकाशात निघालेलं रॉकेट. सिनेमात (फक्त) एका स्टॉपवर लेनिनचा बस्ट पुतळा दिसतो. एका स्टॉपच्या भिंतीवर स्टालीनचं चित्रं दिसतं पण ते तीक्ष्ण हत्यारानं खरवडलेलं दिसतं.
कोळी या कीटकाच्या आकाराचा बस स्टॉपचे दोघे निर्माते दिसतात. आसपास अगदी दूरपर्यंत चिटपाखरूही दिसत नाही. फकाट. त्या मोकळ्या अवकाशात हा बस स्टॉप. अलीकडं फार वर्षं झाली, हा स्टॉप वापरात नाही. सार्वजनिक बसेस कमी झाल्यात, लोक खाजगी कार वापरत असावेत. दोघे सांगत होते की गावातल्या लोकांनी एकत्र येऊन हा स्टॉप बांधायचं ठरवलं. दोघेही व्यावसायिक इंजिनियर नाहीत की आर्किटेक्ट. बांधकामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी. त्या जोरावर हा स्टॉप त्यांनी बांधला.
आणखी एक माणूस भेटतो. स्थूल. वयस्क. निवांत. घरातल्या स्टुडियोत पेंटिंग करत बसलाय. त्यानं त्यांच्या बस स्टॉपवर मोझाईक म्युरल केलंय, त्यानंच रंगवलंय. ते म्यूरल आपल्याला दिसतं. स्टॉप मोडकळीला आलाय, मोझाईकचे काही तुकडे निखळलेत, पण मोझाईक अजून दिसतंय.
हरविग एका गावातून दुसऱ्या गावात जात असताना मधेच त्याला शहरं लागतात. शहरातल्या इमारतींचं ओझरतं दर्शन घडतं. ठोकळा इमारती. साच्यात तयार केलेल्या भिंती, छपरं, दरवाजे आणि खिडक्या एकाला एक चिकटवून उभ्या केलेल्या इमारती. कसलं आलंय डिझाईन आणि कसलं काय. कम्युनिष्ट नेत्यांना काहीही करून लोकांना एक घर द्यायचं होतं, स्वस्तात.
एकीकडं कलात्मक स्टॉप दिसतात, दुसरीकडं या रूप नसलेल्या इमारती. रशियात कलाकार होते की नाही? तर रशियाला कलेचा दीर्घ इतिहास आहे. चित्रकला, संगीत, शिल्पं आणि चित्रपट या सर्व प्रांतात रशिया आघाडीवर होता. स्टालीन इत्यादींनी लावलेला कम्युनिझमचा अर्थ; कम्युनिझम बेचव,बेरंग,बेरूप होता. कलाकार सोवियेत युनियन सोडून इतरत्र गेले. युरोपात गेले, अमेरिकेत गेले. तिथं त्यांनी कामं केली, ती चांगलीच होती. कादिन्सकी, मेलेविच, पोपोवा इत्यादी कलाकार राजकीय नव्हते, ते ना कम्युनिझमचे विरोधक होते ना कम्युनिझमचे समर्थक. स्टालीन, कम्युनिष्ट पक्षाची नोकरशाही, यांनी ठरवलेल्या साच्यांत काम करणं अशक्य झाल्यानं त्याना देश सोडावा लागला होता.
कला होती, कलाकार होते, घुमसट होती. शहरातले गाजलेले कलाकार सत्तेच्या नजरेत भरले; त्यांनी देश सोडला. खेड्यातले कलाकार सुदैवानं वाचले. मॉस्कोतल्या सरकारांचं लक्ष त्यांच्यापर्यंत पोचलं नाही. मॉस्कोतला साचा त्यांच्यापर्यंत पोचला नाही. ते जसे कसे होते, त्यांची जशी कशी कला होती, ती टिकली, तिनं बस स्टॉपचं रूप घेतलं.
रशियात शेकडो मैलांचे निर्जन पट्टे आहेत, थंडीचे महिने सूर्य नसतो, काळपट बर्फानं प्रत्येक पृष्ठभाग व्यापलेला असतो, वातावरण कुंद असतं. रशियाच्या अंतर्भागात फार कमी प्रवासी जातात,जाऊ शकतात. अशा त्या रशियाची झलक माहितीपटात मिळते. बर्फात थंड झालेलं समाजजीवन, वैराणपण, शुष्कपण. बस स्टॉपवरच्या मोझाईक डिझाईनमधे थोडासा लाल रंग दिसतो. तेवढाच रंग. बाकीचा अवकाश बर्फाळ काळपट हिरवा.
कसं जगत असतील माणसं?
जगणं किती कठीण असेल याचा अंदाज हरविगच्या प्रवास धाडसात दिसतो. त्याची कार बर्फात रुतते. ती टोचन आणून बाहेर काढावी लागते. मैलोन मैल दुकान नाही, पेट्रोल पंप नाही, माणसंच दिसत नाहीत. हरविगनं कसा केला असेल हा प्रवास?
याच वातावरणात जगणाऱ्या माणसांनी कला जगवली. बस स्टॉप ही त्यांनी जगवलेल्या कलेची खूण.
रशियातले बस स्टॉप या विषयावर केलेल्या काही छोटछोट्या क्लिप यू ट्यूबवर दिसतात.
।।