सिनेमा. ॲटमबाँबचा हिचकॉकनं केलेला वापर

सिनेमा. ॲटमबाँबचा हिचकॉकनं केलेला वापर

सिनेमा. ॲटमबाँबचा हिचकॉकनं केलेला वापर

ओपनहायमरच्या ॲटम बाँबवर सिनेमा करायचं १९४५ साली आल्फ्रेड हिचकॉकच्या डोक्यात होतं. हिचकॉकच्या कानावर होतं की न्यू मेक्सिकोमधे अमेरिकन लष्करानं कसला तरी सॉलिड प्रोजेक्ट उभारलाय आणि त्यात ॲटम बाँब तयार करत आहेत. एका लेखक मित्रानं हिचकॉकला सांगितलं की तो प्रोजेक्ट इतका गुप्त आहे की कोणी एकदा का आत गेला की बाहेर येत नाही.

हिचकॉक या बाबत एका वैज्ञानिकाला भेटला, बाँबची चौकशी केली. वैज्ञानिक म्हणाला ‘कसलं काय बाँबचं घेऊन बसलात. अणूचा स्फोट करणं वगैरे गोष्ट शक्यच नाहीये…’

हिचकॉक बाँबची चौकशी करतोय हे पोलिसांना त्या वैज्ञानिकाकडून कळलं. तीन महिने पोलिसांनी हिचकॉकवर पाळत ठेवली.नंतर नाद सोडून दिला.

हिचकॉकनं हे बाँब प्रकरण वेगळ्या रीतीनं त्याच्या पिक्चरमधे वापरलं. पिक्चर होता ‘नोटोरियस’.

जर्मन लोकं बाँब करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी युरेनियन खाणीतून काढलंय. युरेनियमची माती वाईनच्या बाटलीत भरून रियो डी जानेरोमधे ठेवलीय. पिक्चरच्या नायकाला ते सारं शोधून काढायचंय. असं कथानक.  

ख्रिस्तोफर नोलननं अणुस्फोट हे निमित्त वापरलं; या घटनेभोवती ओपनहायमरचं व्यक्तिगत जीवन, त्याला सरकारनं दिलेला त्रास इत्यादी गोष्टी गुंफल्या.

हिचकॉकनं बाँबमधे वापरलेल्या युरेनियमच्या मातीचं निमित्त वापरलं आणि कॅरी ग्रँट, इनग्रीड बर्गमन आणि क्लॉड रेन्स यांच्या प्रेमाच्या त्रिकोणाची गोष्ट रचली. म्हणजे ओपनहायमरला बाजूला ठेवलं.

ओपनहायमर या फिल्मला नोलननं भव्यतेचं परिमाण जोडलं. हिचकॉकनं बाँबची रहस्यकथा केली, एक प्रेमाचा रोमँटिक त्रिकोण रचला, उत्तम चित्रीकरण साधून एक अत्यंत उत्कंठावर्धक आणि रंजक सिनेमा केला.

१९४६ साली पडद्यावर झळकलेला हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर पहायला मिळतो. प्रेक्षक आजही त्या चित्रपटात गुंततो, इतका  की तो चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट आहे हे लक्षातच येत नाही.

चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण तर आहेच पण इतरही अनेक गोष्टी हिचकॉकनं  दाखवल्यात.

कॅरी ग्रँटचं इनग्रीड बर्गमनवर प्रेम आहे. ग्रँट गुप्तचर पोलिस आहे,  त्याला हेरगिरीच्या धोकादायक कामामधे  त्याच्या प्रेयसीला लोटायचं आहे. कर्तव्य की प्रेम. आली भानगड. 

ग्रँटच्या प्रेमाशी पोलिसांना देणंघेणं नाही. हेरगिरी महत्वाची. ग्रँटची प्रेयसी भरडली गेली, तिच्याशी क्रूर खेळ झाला तर तो होवो, पोलिसांना त्याच्याशी घेणं नाही. एक क्रौर्य. 

जर्मन हेर क्लॉड रेन्स यानं युरेनियम लपवलंय. प्रेयसी इनग्रीड बर्गमननं त्याच्या प्रेमात खोटंखोटं पडावं आणि रहस्य शोधावं अशी ग्रँट आणि हेरखात्याची योजना. क्लॉड रेन्स इन्ग्रीड बर्गमनशी लग्नच करून बसतो. नंतर बर्गमन हेरखात्याची हस्तक आहे हे कळल्यावर तिला  विषप्रयोग करून मारून टाकायचा उद्योग आरंभतो. नवीच भानगड. प्रेमाच्या त्रिकोणाला एक ट्रॅजिक वळण. 

प्रेम, हेरगिरी, क्रौर्य यांचा गुंता. दोन देशांची सरकार युद्ध करायचं ठरवतात आणि त्यात मधल्या मधे काही माणसांचं भावजीवन उध्वस्थ केलं जातं. 

चित्रपट कला, चित्रपट निर्मितीचं कसब या अंगानं नोटोरियस हा चित्रपट हिचकॉकचा नंबर एकचा चित्रपट मानला जातो, चित्रपट इतिहासातही तो एक टप्पा मानला जातो. 

कॅरी ग्रँटचा चेहरा हिचकॉक अगदी जवळून दाखवतो. क्षण असतो खलनायक क्लॉड रेन्सनं नायिका इनग्रीड बर्गमनला लग्न करण्याचा प्रस्ताव मांडल्याचा. तसा प्रस्ताव मांडला गेलाय हे बर्गमन कॅरी ग्रँटला सांगते. 

किती गुंता. आपली प्रेयसी खलनायकाच्या पलंगावर जाणार.

ती मनापासून जाणार की नाटक म्हणून जाणार.

शेवटी आपण हे सारं कर्तव्य म्हणून करतोय, तेव्हां ते स्वीकारलं पाहिजे.

खड्ड्यात गेलं कर्तव्य, आपली प्रेयसी हातून सुटतेय.

प्रेयसी आपल्याला सोडून खलनायकाबरोबर जाईल? आपण जसं तिचं लग्न कर्तव्य म्हणून स्वीकारतोय तसं तीही कर्तव्य म्हणून लग्नही प्रेमानं स्वीकारेल?

किती लोचे.

काही सेकंदात कॅरी ग्रँटच्या चेहऱ्यावर सारं झळकतं.

इनग्रीड बर्गमनचं सांगणं ऐकताना कॅरी ग्रँटचा चेहरा पडदाभर पसरलेला असतो, चेहऱ्यावरच्या अगदी सूक्ष्म हालचाली दिसतात. नाटक आणि सिनेमातला हा फरक. इथे कॅमेरा असतो. नटाला ते माहित असतं. नटाचा चेहरा आणि कॅमेरा यांची सांगड. 

हा शॉट, हा अभिनय हिचकॉकला अपेक्षीत.

गंमत म्हणजे संवाद दूरच रहातो, आपल्याला कॅरी ग्रँट दिसत रहातो.

अचाट अभिनय.

हिचकॉकला सिनेमासाठी कॅरी ग्रँटच हवा होता. तो इतर चित्रपटात गुंतला होता, त्याच्या तारखा मिळत नव्हत्या. इतर ठिकाणच्या कमीटमेंटमधून सुटायचं तर नुकसानभरपाई म्हणून त्याला पैसे मोजायला लागणार होते. हिचकॉकनं त्याला दिवसाला पाच हजार डॉलर या दरानं पैसे दिले. त्या काळाच्या हिशोबात हे पैसे फार होते, लोकांनी हिचकॉकला वेड्यात काढलं.

कॅरी ग्रँटच्या तोडीस तोड इन्ग्रीड बर्गमन. अभिनयातली सूक्ष्मता कॅरी ग्रँट येवढीच. अधिक तिचं सौंदर्य.

हिचकॉकला चित्रपट दिसत असे. कादंबरी,कथा,कल्पना वगैरे गोष्टी लोक शब्दात मांडतात. हिचकॉकला ते सारं दिसत असे. हिचकॉक मूकपटात जन्मला, वाढला. संवाद हे त्याला लचांडच वाटत असावं. दृश्य हीच चित्रपटाची भाषा असते असं हिचकॉक त्याच्या चित्रपटातून दाखवतो. शेवटी पडद्यावर जे दिसेल ते त्याला आधीच दिसत असे. त्यामुळं किती कॅमेरे लावायचे, ते कसे लावायचे व फिरवायचे इत्यादींच गणीत त्याच्या डोक्यात जन्मलेलं असे.

एक पार्टी चाललीय. अनेक माणसं. नायिका, नायक, खलनायक. नायिका खलनायकाची गळाभेट घेते. तिनं खलनायकाची पळवलेली किल्ली मुठीत धरलीय. अनेक लोक ते मुठीतली किल्ली. कॅमेरा पार्टीवरून सरकत किल्लीवर स्थिरावतो. हे हिचकॉकच्या डोक्यात. ओघानंच कॅमेरा क्रेनवर ठेवणं, तो अख्खी पार्टी दाखवत दाखवत नायिकेच्या मिठीपर्यंत जातो आणि किल्लीवर थांबतो. ही दृश्य रचना त्यातून तयार होते.

कॅरी ग्रँट आणि इन्ग्रीडचं चुंबन दृश्य. चुंबनातली उत्कटता. त्यात कुठंही अडथळा,खंड नको ही कल्पना. कॅमेरा दोघांच्या भोवती न थांबता फिरतो. दोनेक मिनिटांचं अखंड दृश्य.

 चित्रपटाचं व्याकरण इत्यादी गोष्टींशी प्रेक्षकाला देणंघेणं नसतं, असायचं कारणही नाही. त्याला चित्रपट पहायचा असतो. हिचकॉक प्रेक्षकाच्या डोळ्यानंच चित्रपट पहातो,तयार करतो. हिचकॉकनं कॅमेऱ्यासाठी उभारलेला लाकडी मनोरा प्रेक्षकाला दिसत नाही. नायिका इनग्रीड खलनायक क्लॉड रेन्सपेक्षा चारेक इंचानं उंच. हिचकॉकनं खलनायकाला  उंची वाढवणारे शूज  वापरायला लावले. याच्याशी प्रेक्षकाला देणं घेणं नाही. त्याला दिसत सारख्याच उंचीचं जोडप.

हिचकॉकच्या चित्रपट निर्मितीला ‘नोटोरियस’पासून एक नवं वळण मिळालं.

।।

Comments are closed.