सिनेमा. ॲस्टरॉईड सिटी. पूर्णपणे कल्पित तरीही खऱ्या कथानकाचा विक्षिप्त धमाल चित्रपट
कॅन महोत्सवात वेस अँडरसनचा ॲस्टरॉईड सिटी सादर झाला.
अँडरसनचा हा बारावा चित्रपट.
अँडरसनच्या चित्रपटांचं खूप कौतुक होतं, चर्चा होते, कधी कधी नामांकनंही मिळतात पण ऑस्कर लाभत नाही.
यु ट्यूबवर अँडरसनच्या चित्रपटाबद्दल खूप बोललं जातं, तो चित्रपट कसे करतो यावर व्हिडियो असतात. आपण त्याचे चित्रपट चारचार वेळा पाहिलेत असं सांगणारे तरूण ट्यूबवर व्हिडियो टाकतात. अनेकांचं तसं मत असतं. कारण त्याचे चित्रपट सरळ नसतात, सरळ रेषेत सरकणारे नसतात, कळायला कठीण असतात. वरवर विनोदी आणि विक्षिप्त वाटतात, पण त्या विक्षिप्तपणाच्या थराखाली अनेक गंभीर विचार असतात, बोचणारं वास्तव असतं. शिवाय मांडणीही हेलकावे खालणारी असते.प्रत्येक दोन दृश्यांमधे काय संबंध आहे यावर विचार करेकरे पर्यंत तिसरं दृश्य येतं. पण एकूणात जाम म्हणजे जाम मजा असते.
दोन वर्षांपूर्वी त्याचा फ्रेंच डिस्पॅच नावाचा चित्रपट येऊन गेला. अमेरिकेतल्या प्रसिद्ध न्यू यॉर्कर या साप्ताहिकाची प्रचंड फिरकी म्हणा, खिल्ली म्हणा, थट्टा म्हणा, होती. पण त्यातून सावकाशीनं त्या साप्ताहिकाचं वेगळेपण, थोरपणा दिसत होता. साप्ताहिकाचा संपादक, त्यातले बातमीदार आणि स्तंभ लिहिणारे, प्रत्येक अंकातले विषय.
फ्रेंच डिस्पॅच पहाताना नवख्या प्रेक्षकाला हे कळतं की प्रकरण हिलॅरियस आहे, धमाल आहे. पण ही धमाल काय आहे ते कळत नाही. त्यासाठी न्यू यॉर्कर हे साप्ताहिक माहित असायला हवं. सिनेमा पाहिल्यावर त्या साप्ताहिकाचे दहा पाच अंक चाळावे लागतात मगच सिनेमाचा अर्थ समजतो.
तसंच या ॲस्ट्रॉईड सिटी या चित्रपटाचं आहे.
चित्रपट सुरु होतो काळ्या पांढऱ्या रंगात. १९५० च्या दशकातला टीव्ही पडद्यावर दिसतो. त्या टीव्हीत एक लेखक टाईप रायटरवर लिहितांना दिसतो. मग त्या दशकातला एक अँकर येतो आणि म्हणतो की अमूक एक लेखक ॲस्ट्रॉईड सिटी नावाचं नाटक लिहितोय. त्या नावाचं शहर प्रत्यक्षात नाहीये आणि सगळं कथानकच कल्पित आहे.
नाटककार दिसतो. तो कोपऱ्यात ढकलला जातो. आपल्याला मंचावर नाटकाची प्रॉपर्टी लावताना माणसं दिसतात. म्हणजे ते नाटक बसवलं जात असतं. नाटकात एक नायक असतो, काही पात्रं असतात. ती दिसू लागतात आणि अचानक ती काळीपांढरी न रहाता रंगीत होतात.
तिथून रंगीत सिनेमा सुरु होतो. नाटकातली पात्रं खरीखुरी पात्रं होतात आणि त्यांची गोष्ट सुरु होते.
सामान्यतः चित्रपटात पडद्यावरचं एक दृश्य संपतं आणि ते धूसर होऊन दुसरं दृश्य सुरु होतं. इथे दृश्य एकमेकात मिसळत नाहीत. फिरत्या रंगमंचावर जसा रंगमंच उजवीकडून डावीकडं जातो तशी, पडदा सरकवावा तशी दृश्यं सरकतात. डावीकडून उजवीकडं, उजवीकडून डावीकडं. कधी कधी दृश्य एकाद्या पेंटिंगसारखं स्थिर रहातं आणि आपण सरकतो.
प्रत्येक दृश्य हे रंगवलेल्या पडद्यावर असतं. जुन्या नाटकात जंगल दाखवणारा, महाल दाखवणारा किंवा रस्ता दाखवणारा पडदा असे आणि त्या पडद्यापुढं नट नट्या अभिनय करत. अँड्रॉईड सिटीमधे वाळवंट, गाव एका पडद्यावर रंगवलेलं असतं, तो पडदा मागं ठेवून पुढं पात्रं अभिनय करतात आणि कॅमेरा ती टिपतो.
नाटक आणि चित्रपट एकत्र. आलटून पालटून. नाटक आणि चित्रपटात स्वतंत्र वेगळ्या अभिनय शैली असतात. दोन्ही शैली अँड्रॉईड सिटीमधे पहायला मिळतात. अगदी मक्खं चेहरे ठेवून पात्रं संवाद म्हणतात.बस्टर कीटनची शैली. त्याची एक स्वतंत्र गंमत. कधी चेहरा महत्वाचा, कधी संवाद.
वेस अँडरसरन तर उघडपणे म्हणतोच ‘मी आधुनिक वगैरे नाही.मी जुन्या शैलीतला दिक्दर्शक आहे, मूकपटाचा काळ आणि त्यातली साधी टेक्नॉलॉजी आपल्याला आवडते. मला ऑपेरा आवडतो..’
चित्रपटात एक खाणावळ आहे. कॅनव्हासवर ती खाणावळ रंगवलेली आहे. ते रंगवलेलं चित्र आहे हे कळलंच पाहिजे अशा रीतीनं चित्रपटात ती खाणावळ दिसते, खोटी वाटावी अशी. मग पात्रं त्या खाणावळीच्या आत जातात, टेबलावर बसून जेवू लागतात. पात्रं खरीखुरी. पण त्या खाणावळीतला अंतर्भागही पेंटिंगसारखा रंगवलेला.
चित्रपटाचं मुख्य तत्व असं की समोर जे दिसतं ते कृत्रीम आहे हे
आपण विसरायचं असतं. अँडरसन हे तत्वच बाजूला ठेवतो, ते सारं रचलेलं आहे हे तो आपल्याला पदोपदी दाखवत रहातो. त्यातही ते नाटक आहे की सिनेमा आहे त्याचाही गोंधळ होत रहातो.
हा गोंधळ सिनेमाच्या कथानकातही आहे.
आकाश निरीक्षण करणाऱ्या आणि विज्ञानाचे प्रयोग करणाऱ्या मुलांना बक्षीसं देण्याचा समारंभ एका वाळवंटातल्या ८५ लोकसंख्या असणाऱ्या गावात. गाव नाही म्हणायचे, सिटी – शहर म्हणायचं.
गोळा होणारी माणसं सर्व मिळून फार तर पन्नास. तरीही लगेच पर्यटन आकर्षणं उभी रहातात. त्यातच जमीन विकणाऱ्या एका कंपनीचा माणूस तिथं पोचतो. जमीन नव्हे तर जमिनीची मालकी असलेल्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे. आणि तेही वेंडिंग मशीनमधे विकत मिळतात.
८५ लोकवस्तीच्या या गावात मालगाडी येते. मालगाडीतले दोन डबे फळांनी भरलेले. कोण खाणार इतकी फळं. एका डब्यात अण्वस्त्र लादलेलं एक रॉकेट. अण्वस्त्र उडवू नका असं त्या रॉकेटवरवर लिहिलेलं. गाडीच्या डब्याच्या खालच्या बाजूला एक माणूस आरामात पहुडलेला.
एक अवकाश यान आकाशातून उतरतं. त्यातून एक अवकाशयात्री उतरतो. जपून ठेवलेला उल्केचा तुकडा पळवून नेतो. ही बातमी फुटू नये म्हणून सरकार सेन्सॉरशिप लादतं, शहरावर क्वारंटाईन लॉकडाऊन लावतं. अचानक पुन्हा ते अवकाश यान पुन्हा येतं, अवकाशातला माणूस त्यातून उतरतो, उल्केचा तुकडा जमिनीवर ठेवतो, अवकाश यानात बसतो, अवकाश यान अवकाशात जातं.
हे सर्व चाललं असताना प्रेमं जुळतात. आत्महत्या होते. सासरा आणि जावई यांच्यातले तणाव दिसतात.
हे सारं अँडरसन अत्यंत रेखीव आणि सुंदर रीतीनं दाखवतो. पेस्टल रंग. अप्रतिम पेंटिंगसारखी दृश्यं. प्रत्येक पात्रंही पेंटिंगमधे असतं तसं अत्यंत रेखीव आणि देखणं. घरं, रंगमंच, प्रयोगशाळा, इत्यादी ठिकाणी त्या काळाचे फार बारीक बारीक तपशील.
सीजीआय या कंप्युटर वापरून तयार केलेल्या प्रतिमा अँडरसनला मंजूर नाही. मुकपटाच्या काळात जसं नेपथ्य स्टुडियोत उभारतात तसंच नेपथ्थ्य अँडरसन हट्ट करून उभारतो. सर्व चित्रपटात. चित्रपटातली ट्रेनसुद्धा मॉडेल केलेली ट्रेन आहे.
पडद्यावर जे जे दिसतं ते ते देखणं तर आहेच. प्रगंगी खळाळून हसू येतं. कधी बुचकळ्यात पडायला होतं. संवाद नाटकातल्या सारखे.
पहा. आनंद घ्या. अर्थ लावत बसा.पुन्हा पहा. अँडरसन हे उद्योग कां करतो ते समजण्यासाठी त्याची पुस्तकं पहा, त्याचे व्हिडियो पहा.
काय कटकट आहे यार. छान कटकट.
।।