सिनेमा ‘वध’. वध म्हणा की खून म्हणा. चित्रपट पहाण्यासारखा.

सिनेमा ‘वध’. वध म्हणा की खून म्हणा. चित्रपट पहाण्यासारखा.

वध.

सध्या थरारपटाचा जमाना आहे.

गुन्हा.  कथानक हळूहळू गुन्ह्याकडं सरकतं. गुन्हा होतो. शेवटी गुन्हा कसा आणि का झाला याची उकल. गुन्ह्याची मिनिटं थराराची. अलकडली पलिकडली मिनिटं गुन्ह्याचा तपशील आणि कारणं सांगणारी. 

 हिचकॉकनं थरारपटाचा फॉर्म्युला दिला. सायको या चित्रपटात एक नॉर्मन आहे. त्यानं त्याच्या आईचा खून केलाय. त्यातून त्याच्या व्यक्तिमत्वात एक गंड तयार झालाय. नॉर्मन कधी त्याची आई होतो कधी नॉर्मन होतो. जेव्हां नॉर्मन एकाद्या स्त्रीकडं आकर्षित होतो तेव्हां त्याच्या व्यक्तिमत्वातली आई जागी होते आणि ती त्या स्त्रीचा खून करते. दुभंग व्यक्तिमत्व, व्यक्तित्वाचं एक रूप सामान्य माणूस आणि दुसरं रूप गुन्हेगार.

१९६० सालच्या सायकोनंतर आता २०२३ साल उजाडलंय. हिचकॉकच्या फॉर्म्युल्यात बदल करून चित्रपट काढले जातातेत.

वध हा नेटफ्लिस्कवर आलेला ताजा थरारपट. 

ग्वाल्हेरमधला शाळेतला एक शिक्षक मिश्रा. निवृत्त झालाय. जवळचं सगळं विकून आणि १५ लाखाचं कर्ज काढून त्यानं मुलाला अमेरिकेत पाठवलंय. कर्ज घेतलंय एका गुंडाकडून. तो गुंड मिश्राला छळतो. मिश्राच्या घरातल्या एका खोलीचा वापर कोणीकोणी स्त्रिया उपभोगण्यासाठी करतो. पडद्यावरची ती दृश्य गलिच्छ आहेत, किळस आणतात. मिश्रा आणि त्याची पत्नी असहाय्य असतात, त्या गुंडाला दारु पिण्यासाठी ग्लास देतात, ताटलीत चखना देतात, बंद खोलीतले संभोगाचे आवाज सहन करतात.

मिश्राची ही अवस्था पहातानाच एक अंधुक शक्यता मनात घर करू लागते. हा मिश्रा काही तरी करणार. पण करून करून काय करणार? एक शामळू मास्तर काय करणार असं मनात येतं, एक उत्सुकता तयार होते. चित्रपट मिश्राच्या छळाचे नाना पैलू दाखवत पुढं पुढं सरकत रहातो. एका क्षणी वाटतं की आता पुरे झालं, कळलं आम्हाला, काही तरी निकाल लाव रे बाबा.

चित्रपट कंटाळवाणा होत असतो आणि एका अपेक्षित क्षणी मिश्रा त्या पांडे नावाच्या गुंडाचा खून करतो. पांडेच्या शरीराची विल्हेवाट. नंतर गोष्ट अनपेक्षीत वळणं घेते आणि शेवटी मिश्रावरचा खुनाचा आळ पांडेच्या बॉस गुंडावर जातो;  मिश्रा नीतीअनीती आणि कायदा यांच्या कचाट्यातून  मुक्त होऊन चित्रपट संपतो. 

फॉर्म्युला चित्रपट.पण पहावासा वाटतो. याचं एक कारण संजय मिश्रा या कसलेल्या कलाकाराचं शंभूनाथचं काम. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी संजय मिश्रा प्रेक्षकांनी अनेक चित्रपटात पाहिलेत. दम लगाके हैशा, न्यूटन, मसान इत्यादी. साध्या, कोणतेही चकाकणारे पैलू नसणाऱ्या माणसांच्या भूमिका मिश्रा अशा काही खुबीनं करतात की चित्रपटातली मुख्य पात्रंही प्रसंगी बाजूला पडतात. मसानमधे नायक आणि नायिका आहेत पण नायकाचा बाप म्हणून संजय मिश्रा चित्रपटाचा ताबा घेतात. हावभाव आणि बोलण्याची शैली यावर या माणसाचा विलक्षण ताबा आहे. 

चित्रपट पहावासा वाटतो याचं दुसरं कारण नीना गुप्ता यांचं मिश्राच्या पत्नीचं काम. ही गुणी नटी म्हटलं तर आता उतरत्या वयातली आहे. पण जोरात अभिनयात उतरली आहे. बघाई हो आणि शुभमंगल जादा सावधान या त्यांच्या अलीकडच्या गाजलेल्या फिल्म्स. धम्माल अभिनय आहे. वधमधे त्यांची भूमिका विनोदी अंगानं नाही. एक साधासुधा पापभिरू नवरा, त्याला खून करताना पहायचं, नंतर त्यानं खून कां केला ते कळल्यावर त्याच्याबद्दल कमालीचा आपलेपणा, नंतर त्याची साथ या गोष्टी गुप्ता यांनी सूक्ष्म छटांमधून दाखवल्यात.

चित्रपट पहावासा वाटतो याचं तिसरं कारण मिश्राचं घर आणि पोलिस स्टेशन या दोन वास्तू; ग्वाल्हेर शरातल्या वस्त्या आणि रस्ते. चित्रपट स्टुडियोत चित्रीत केलेला दिसत नाही. शंभूनाथ मिश्राचं जुनाट खर. लाकडी दरवाजे, त्याच्या कड्या. अरूंद खोल्या. कॉटखाली साठवलेल्या अनेक विसंगत वस्तू. खुंट्या. कोनाडे. या दाटीवाटीत होणारा माणसाचा वावर. घरातलं फर्निचर. सत्यजित रे यांच्या चित्रपटाची आठवण व्हावी असं कलादिक्दर्शन आहे. घरात असणारा नैसर्गिक प्रकाश आणि पिवळ्या रंगाचे बल्ब.

अशी घरं आता पहायला मिळत नाहीत. अशा घरात, अशा वस्त्यांत  माणूस एका पद्धतीनं घडत असतो. मिश्रा पांडेचे कपडे जाळतात. शेजारी ते पहातो आणि म्हणतो बरं झालं शेकोटी लावलीत, डासांचा त्रास कमी होईल. अलिकडं नेपथ्य या घटकाकडं दिक्दर्शक  लक्ष देताना दिसतात. 

हिचकॉकची चौकट वध मोडतो. चित्रपटात सामाजिक आशय वगैरे गोष्टी घालतो.

एका मध्यम वर्गीय माणसाचं जगणं चित्रपट दाखवतो. मरमर करून माणसानं मुलाला अमेरिकेत पाठवलं आणि तो मुलगा भारतातल्या आईबापांना नीट वागवत नाही, आपल्या अमेरिकेतल्या संसारात रमतो. बाप मुलावर वैतागलेला असणं आणि आईला मात्र मुलाची कणव असणं. शिक्षक प्रामाणिक असणं, पैशाच्या मागे लागलेला नसणं. शंभूनाथ आणि त्याची पत्नी यांचं घट्ट नातं. पोलिस अधिकारी, त्याची लफडी, त्याचे गुन्हेगारांशी असलेले संबंध. गुंडांचं समाजातलं स्थान आणि धंदे. चित्रपटाच्या ११० मिनिटात हे सारं येतं. म्हणजे समाजाची स्थिती काय आहे,शिक्षणाची स्थिती काय आहे, कौटुंबिक संबंध कसे विस्कटत चालले आहेत वगैरे वगैरे.

 हॉलिवूडचे सिनेमे वेगळे असतात. हिचकॉक खून दाखवतो, नॉर्मनचं दुभंग व्यक्तिमत्व दाखवतो. मामला खतम. स्कॉर्सेसे आयरिशमनमधे आणि कोपोला गॉडफादरमधे माफिया टोळ्या काय करतात ते दाखवतात. त्यातून नीतीमत्ता वगैरे दाखवण्याच्या भानगडीत पडत नाही. ते समाजानं स्वतंत्रपणे पाहून घ्यावं.

भारताची तऱ्हा वेगळीच. इथं प्रत्येक प्रश्न शेवटी नीतीमत्तेकडे, पापपुण्याकडं नेल्याशिवाय कोणत्याही कलाकृतीला कंफर्ट वाटत नाही. मग ती कादंबरी असो, कविता असो, चित्रपट असो की नाटक.नायकाचं वागणं या ना त्या वाटेनं कसं योग्य आहे ते दाखवणं. म्हणजे नायकानं खून केलेला असतो पण त्याला खून न म्हणता वध म्हणायचं कारण वध म्हणजे दुष्टाचा नाश. वध म्हणजे गुन्हा नसतो, वध म्हणजे एक धर्मकृत्य असतं. भारतातल्या चित्रपटांमधे नायकाला परिस्थितीवशात गुन्हे करावे लागतात असं फार वेळा दाखवलेलं असतं. त्यातूनच वाल्या कोळ्याचा वाल्मिकी कसा झाला असं एक मिथक तयार होतं.

गुन्हेपट, थरारपट, सेक्सपट, थट्टाविनोदपट असं काहीही स्वतंत्रपणे दाखवायचं नाही, त्यात काही तरी नीतीपाठ असलाच पाहिजे.

ते काहीही असो. चित्रपट पहावासा वाटतो हे खरं.

कळावे.

।।

Comments are closed.