सिनेमे/नेपोलियन

सिनेमे/नेपोलियन

नेपोलियन.

दिक्दर्शक रिडली स्कॉट.

प्रमुख नट जोकिन फीनिक्स आणि व्हेनेसा किरबी

 नेपोलियन नावाचा एक फ्रेंच राजा होऊन गेला. तो  महापराक्रमी होता, खूप लढाया जिंकला. त्याला जोसेफाईन नावाची राणी होती. बहुतेक मराठी माणसांच्या पदरी नेपोलियनबद्दल येवढंच ज्ञान असतं. अशा नेपोलियनवर त्याच नावाचा सिनेमा थेटरांत आलाय. 

सिनेमात नेपोलियन त्याच्या लष्करी पोषाखात दिसतो. तो घौडदौड करताना, तलवार चालवतांना दिसतो. आघाडीवर सैनिकांसोबत दिसतो. त्यानं केलेल्या काही लढाया सिनेमात दिसतात. त्या लढाया, नेपोलियनचा पोषाख, सारं काही देखणं आहे. दिक्दर्शक आणि कला दिक्दर्शकानं तो काळ आणि त्या काळाचे कपडलत्ते उत्तम दाखवले आहेत.

नेपोलियनची पत्नी जोसेफाईन दिसते, जोसेफाईनबरोबरची नेपोलियनची भांडणं आणि संभोग करणाऱ्या कुत्र्यांची आठवण व्हावी अशी संभोगदृश्यं चित्रपटात दिसतात.

साधारणपणे येवढंच सिनेमात दिसतं. नेपोलियनचे काही पैलूही दिसतात. त्याला मूल हवं असतं आणि ते जोसेफाईनकडून होत नाही यावरून त्यानं घातलेला गोंधळ आणि जोसेफाईनवरचं रासवट प्रेम दिसतं. स्वतःला देश मानण्याची वृत्ती दिसते. लोकांनी लढायचं, मरायचं, देशासाठी. सम्राटपद मात्र नेपोलियन भोगणार.

अन्यथा साताठ ओळीत मावणारा नेपोलियन दिक्दर्शक रिडली स्कॉट पाच पन्नास ओळीत पसरवतो, आपल्याला माहीत नसलेल्या काही गोष्टी दाखवतो. 

नेपोलियन जगज्जेता कसा झाला? युद्धातलं त्याचं कौशल्य कोणतं? एक लष्करी अधिकारी सम्राट कसा झाला? युद्धात त्याची रणनीती कशी असे? सिनेमा पहाताना ते कळत नाही. कोणी फ्रेंच माणूस म्हणाला की चला आपण मराठी माणसाला आपल्या महान फ्रेंच व्यक्तीची ओळख करून देऊया आणि हा सिनेमा दाखवला तर वांधाच होईल? ही कसली महान व्यक्ती असं मराठी माणूस विचारेल.

एक समीक्षकानं वरील मुद्दा फार गमतीनं मांडलाय. तो म्हणतो की दिक्दर्शकानं नेपोलियनला बरोब्बर मापात बसवलंय.

ज्याची जरब होती, ज्याच्यामुळं नागरीक आणि सैनिक प्रेरित होत तो नेपोलियन या सिनेमात अगदीच दगडू वाटतो. आता तो तसा वाटतो याचं कारण पटकथा वाईट आहे की नेपोलियनचं काम करणारा जोकिन फिनिक्स हा एक जबरी नट कमी पडला? की जोकिन फिनिक्स या नटाची निवडच चुकीची ठरली? जोकिनला जोकर या चित्रपटासाठी ऑस्कर मिळालं होतं.जोकीनचं ग्लॅडियेटरमधलं काम ऑस्करच्या लायकीचं होतं. त्याचं व्यक्तिमत्व काहीसं पडखाऊ माणसाचं आहे. जग जिंकणारा पराक्रमी माणूस, त्यातही लष्करी माणूस आक्रमक असतो, मुरब्बी असतो, त्यातलं काहीही या नटाकडं नाही. केवळ त्याचं नाव मोठं आहे म्हणून त्याला निवडलं की काय?

बायोपिक-चरित्रपट काढणं फार बेक्कार काम. ९० टक्के जनता ऐतिसाहासिक व्यक्तीबद्दल एकलक्षांश भागही जाणत नसते. ती व्यक्ती थोर आहे येवढंच प्रेक्षकाला माहीत असतं. प्रत्यक्षात ती व्यक्ती फार गुंत्याची असते. ती व्यक्ती नाना विसंगती, नाना दोष, नाना लोचे आणि पराक्रम अशांचं मिश्रण असतं. गुणांना तरी केंद्रात ठेवावं किंवा दोषांवर जोर द्यावा असा मोह दिक्दर्शकाला होत असतो. त्यातलं काही केलं तरी एक तर तो वास्तवाला धरून नसतं आणि दुसरं म्हणजे शिव्या खाव्या लागतात. 

नेपोलियनच्या व्यक्तिमत्वात सेक्स हा एक फार प्रभावी घटक होता. नेपोलियन अहंमन्य होता, सत्तापिपासू होता. आपण म्हणजे फ्रान्स असं त्याला वाटत असे. त्यानं लढाया जिंकल्या हे खरं पण त्यानं तीसेक लाख सैनिक मारले हेही तितकंच खरं, त्यात क्रौर्याचा भाग होता. त्याचे अनेक लष्करी निर्णय चुकीचे होते. या सर्वासकट तो यशस्वी सेनानी आणि राजा होता. या सर्वांसकट त्यानं फ्रान्समधे विद्येला, शिक्षणाला, संशोधनाला प्राधान्य दिलं होतं. स्वारीवरून परतताना तो पुस्तकं घेऊन येत असे.

  नेपोलियनला न्याय द्यायचा असेल तर डॉक्युमेंटरीच्या अंगानं जाणारी शैली अधिक उपयुक्त असते. इतिहासात सापडणारे पुरावे, त्या व्यक्तीबद्दलचे इतरांना आलेले अनुभव, व्यक्ती व कार्याबद्दल जाणकारांची मतं खुबीनं मांडून दिक्दर्शक रांगोळी भरगच्च करू शकतो.

रिडली स्कॉट हा भव्य चित्रपटांसाठी ओळखला जातो. ग्लॅडियेटर हा त्याचा गाजलेला ऑस्करं मिळवलेला चित्रपट. नेपोलियनमधे भव्यता आहे. युद्धाची दृश्यं अत्यंत प्रभावी आहेत, त्यांची परिणामकारकता ध्वनीमुळंही आली आहे. 

ग्रँजर नावाची एक गोष्ट असते. राजवाडा, जेवणाची भव्यं टेबलं, नाचगाणी, इमारती, दागिने, कपडे, झुंबरं, पोषाख, कानातले डूल, गळाहार, सजवलेले घोडे, रजवाडे आणि सेनानी यांचे पोषाख. सारा मामला ऐश्वर्याभोवती फिरणारा. दिमाख. नजाकत. काळ १७८० नंतरचा. क्रॉसमन या कलादिक्दर्शकानं वरील साऱ्या गोष्टी बारीकसारीक तपशिसह उभ्या केल्या आहेत.

नेपोलियन एक फेल्टची बायकॉर्न हॅट वापरत असे. ही हॅट नेपोलियन जसजसा मोठा होत गेला तसतशी मोठी होत गेली आणि जास्त सुशोभित होत गेली.सैनिक होता तेव्हां ती हॅट साधी होती, सम्राट झाला तेव्हां त्या हॅटला सोनेरी किनार आली, तिच्यावर किमती खडा लटकला. क्रॉसमननी दुनियाभर फिरून त्या हॅटचा अभ्यास केला, त्या बदलत्या हॅट चित्रपटात दिसतात.

जोसेफाईनची भूमिका व्हेनेसा किरबी या नटीनं केलीय. जशी जोकिन या नटाची काही एक नैसर्गिक ठेवण आहे तशीच किरबी हिच्या व्यक्तिमत्वात काही नैसर्गिक घटक आहेत. नेपोलियनमधे तिला पहात असताना सतत दी क्राऊनमधली प्रिन्सेस मार्गारेट डोळ्यासमोर येत होती. मार्गारेट प्रचंड मादक आहे, आक्रमक आहे, प्रियकराला ती इतक्या आवेगानं ओढून घेते की त्याचा नाईलाजच व्हावा, ती बंडखोरही आहे. सारं किरबीच्या देहबोलीत दिसतं. तेच जोसेफाईनच्या भूमिकेतही दिसतं.

१८२१ साली नेपोलियनचं निधन जालं. आणि आज २०२३ साली त्याच्यावरचा चित्रपट प्रदर्शित झाल्याझाल्या ८ कोटी डॉलर कमावतोय. 

वॉटर्लूमधे नेपोलियनचा पराजय झाला, त्याच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. लढाईच्या धामधुमीत नेपोलियनची हॅट पडली. ती म्हणे कोणाला तरी सापडली होती. ती हॅट २०१४ साली लिलावात २० लाख डॉलरला कोणीतरी विकत घेतली. हा सिनेमा बाजारात येता येता एक हॅट ८ लाख युरोला विकली गेलीय. नेपोलियम म्हणजे दर वर्षी दोन हॅट शिवून घेत असे. एक विरली की दुसरी वापरायची. नवं वर्षं पुन्हा दोन नव्या हॅट. अशा नेपोलियनच्या म्हणे १२० हॅट आहेत. 

नेपोलियनवर १९२७ साली एक फिल्म होऊन गेली. तो मूकपट होता. चित्रपटाच्या इतिहासात तो एक मैलाचा दगड होता, तो एक अभिजात चित्रपट मानला जातो. चित्रपट साडेपाच तासांचा होता.

ऐतिहासिक माणसं कधी संपत नाहीत हेच खरं.

।।

Comments are closed.