सिनेमे. मतीमंदांबद्दलच्या कल्पनांना धक्का देणारा चित्रपट
सायमन ऑफ द माऊंटन
सायमन ऑफ द माऊंटन हा अर्जेंटाईन चित्रपट आहे.
सायमन हे चित्रपटातलं मुख्य पात्र आहे. सायमनचं चेहरा वेडावाकडा करणं, ॲनिमेटेड हालचाली करणं यावरून सायमन मतीमंद आहे हे जाणवतं. सायमनच्या घरात आई आहे आणि आईचा बॉय फ्रेंड आहे. सायमन मतीमंद मुलांच्या शाळेत जात नाही कारण त्याच्याकडं तो मतिमंद असल्याचं सर्टिफिकेट नाही. सायमन त्याच्या आईच्या बॉयफ्रेंडच्या वाहतूक व्यवसाय हमाली करतो.
सायमन घरात सुखी नाही. सायमनची गोची आहे. त्याचा पिता मेलाय. एक दुसराच पिता घरात आलाय. कदाचित ती आईची गरजही असावी. पण बहुदा सायमनला विश्वासात घेतलं गेलं नसावं. तो बेताल होत असावा. उपाय म्हणून त्याला काही गोळ्या दिल्या जात होत्या. त्याचाही परिणाम असावा. परंतू हे सारे आपले कयास असतात. चित्रपट याबाबत काहीही सांगत नाही.
प्रश्ण अनुत्तरीत राहिले की प्रेक्षक अस्वस्थ होते, पण तो विचार करू लागतो हे तितकंच खरं.
सायमनचा एकूण वावर तो मतीमंद आहे याचीही खात्री पटवत नाही. कधी तो एकदम नॉर्मल असतो कधी मतीमंद असतो.
एका मतीमंद शाळेतल्या वयानं वाढलेल्या मतीमंद मुलाशी, पुहेनशी, सायमनची गाठ पडते. पुहेन मतीमंद आहे तरीही वात्रट आहे. मतीमंद वात्रटही असतात, त्यांना विनोद बुद्धी असते. पुहेन सायमनला मतीमंद शाळेत घेण्यासाठी खटपट करतो. शाळेच्या चालकाना शेंडी कशी लावायची ते शिकवतो. सायमन मतीमंदांच्या शाळेत दाखल होतो. त्याच्या आईला ते माहित नाहीये.
सायमन शाळेत रमतो. तिथं धमाल उडवतो, आईच्या बॉयफ्रेंडची व्हॅन पळवतो आणि शाळेतल्या मुलांची एक सहल घडवून आणतो. सायमन कोलो नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. मतीमंद माणसं प्रेमातही पडतात.
पुहेनचंही एक प्रेम प्रकरण आहे. शाळेचा नियम असतो की शाळेतल्या मुलामुलींनी शारीरीक जवळीक करायची नाही. पुहेन जवळीक करतो, शाळा त्याच्यावर कारवाई करते. सायमन पुहेनच्या बाजूनं उभा रहातो.
नॉर्मल माणसांच्या दुनियेत जे धडतं तेच मतीमंदांच्याही जगण्यात असतं.
कोलो ही मुलगी. तिनं एक सिद्धांत तयार केलाय.चुंबन एक मिनीट लांब चाललं तरच ते खरं चुंबन. ती सायमनला चुंबन घ्यायला लावते. चुंबन एक मिनीट होण्याच्या आधीच संपतं. कोलो म्हणते ते चुंबन खरं नाही.
सायमनचं कोलोवर प्रेम आहे. कोलो सहलीला गेली असताना तळ्यात बुडते. सायमन जीव धोक्यात घालून तिला वाचवतो. मतीमंदांमधे प्रेम, आस्था, दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची भावना असते.
कोलो सायमनला अंथरुणात घेते. म्हणते सेक्स कर. पण सेक्स म्हणजे काय असतं ते बहुदा दोघांनाही कळलेलं नाही. हे दृश्य चित्रपटात अर्धवट ठेवलं जातं, पुढं त्यांच्यात सेक्स होतो की नाही ते दाखवलेलं नाही.
सायमनला त्याच्या आईचा बॉय फ्रेंड आवडत नाही. सायमन त्याच्याशी मारामारी करतो.
सुरवातीपासूनच आपल्याला कळलेलं असतं की चित्रपट मतीमंद मुलांवर आहे. आपल्याला वाटतं की आता त्यांच्याबद्दल कणव वाटावी अशी मेलोड्रॅमॅटिक दृश्य आपल्याला पहायला मिळतील. तसं होत नाही. मतीमंद मुलं भरपूर वात्रटपणा करताना दिसतात.
पुहेन आणि त्याची मैत्रीण बाथरूममधे एकत्र असतात. काय करत असतात ते आपल्याला दिसत नाही. ते नको त्या गोष्टी करत आहेत असा आरोप ठेवला जातो, त्यांना समज दिली जाते. पुहेनला शाळेचे प्रिन्सिपॉल विचारतात की तू काय करत होतास. पुहेन सांगतो ‘आम्ही शाळेसाठी रोमियो आणि ज्युलियेट हे नाटक करतोय. मी रोमियो आणि ती ज्युलियेट. आम्ही बाथरूममधे दार बंद करून तालीम करत होतो.
कुठल्याही चित्रपटाला सुरवात असते, एक मध्य असतो, एक क्रायसिस येतो, तो क्रायसिस नाहिसा होतो आणि चित्रपटाचा शेवट होतो. तसं या चित्रपटात काहीही नाही. एकामागोमाग एक घटना घडत जातात, त्यांच्यात काही तार्कीक संबंध दिसत नाही. पात्रंही पूर्ण रेखाटलेली नाहीत, त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला मिळत नाही.
तरीही चित्रपट घरातून बाहेर पडावंसं वाटत नाही.
फेडेरिको लुईसचा हा पहिलाच चित्रपट. त्याच्याजवळ पैसे नव्हते. साधा कॅमेरा हाताखांद्यावर घेऊन चित्रीकरण केलंय.
सायमनचं काम लॅारेंझो फेरो या नटानं केलय. मानेची आणि डोळ्यांची हालचाल विकलांग माणसासारखी केलीय. त्यानं अभिनय केलाय असं वाटत नाही. फेरो व्यावसायिक नट आहे. चित्रपटातला तो एकच व्यावसायिक नट आहे. बाकीची पात्रं व्यावसायिक नाहीत, माणसं जशी कशी होती तशी चित्रपटात वापरलेली आहेत.
पुहेन आणि कोलो या दोन भूमिका करणारे मतीमंद आहेत. त्यांना दिक्दर्शकानं फार कौशल्यानं आणि जबाबदारीनं हाताळलं आहे. दिक्दर्शक लुईसनं सोशल कम्युनिकेश या विषयात पदवी घेतलीय. विविध प्रकारच्या कमतरता असलेल्या मुलांच्या शाळेत काही काळ लुईस शिक्षक होता. त्या मुलांना संवाद कौशल्य लुईसनं शिकवलं होतं.तो अनुभव त्याला उपयोगी पडला असणार.
ध्वनीचा वापर. सायमनला कोलोनं एक कानाला लावायचं उपकरण दिलेलं असतं. खरं तर त्याला नीट ऐकायला येत असतं. उपकरण लावलं की आवाज बिघडत असे. समोरच्याचं ऐकायचं नसलं की सायमन उपकरण लावत असे. कानावर उपकरण असतांना आणि नसतांना येणारे वेगवेगळे आवाज, पत्रा थरथरल्यावर जसा ध्वनी येतो तसे, आपल्याला ऐकू येतात. हे सारं प्रतिकात्मक ठरतं. सुरवातीच्या दृश्यात मुलं टेकडीच्या माथ्यावर पोचली असतांना वादळ सुटतं, वारा भीषण घोंघावतो. त्यावेळी केलेला ध्वनीचा वापर थरारक आहे. ध्वनी आणि दृश्यं यांचं मिश्रण पहातांना प्रेक्षकाची उत्कंठा ताणायला लागते. कथानक अनिश्चित आहे याची चुणूक तिथंच सुरू होते.
कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला ज्यूरीनी पारितोषिक देऊन गौरव केला.
।।