सिनेमे/ ‘महाराज’ एक हिंदू सिनेमा

सिनेमे/ ‘महाराज’ एक हिंदू सिनेमा

महाराज. 

सिद्धार्थ मल्होत्रानं केलेला महाराज हा चित्रपट एका परीनं धाडसी आहे. महाराज स्फोटक आहे. एका हिंदू पंथाच्या महाराजावर तो बेतलेला आहे. हा महाराज गुन्हेगार होता. त्यानं स्त्रियांना उपभोगलं आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांना त्यानं ठार मारलं, छळलं. त्याचं वागणं कायदा मोडणारं होतं.

हा महाराज कृष्णभक्तांच्या वैष्णव पंथातल्या एका उपपंथाचा महाराज होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर वैष्णव पंथियानी चित्रपटावर बंदीची मागणी केली. चित्रपट ओटीटी फलाटावर, नेटफ्लिक्सवर असल्यानं दंगा करणं तर अशक्य होतं.  निर्मात्यानं हुशारीनं हा चित्रपट सिनेघरात दाखवलाच नाही. गुजरातेत तर नक्कीच दंगा होऊ शकला असता.

चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. 

कथानक काल्पनिक नाही, खरीखुरी गोष्ट आहे, घडलेली गोष्ट आहे. म्हणजे हा चित्रपट माहितीपटासारखा आहे, एक डॉक्युड्रामा आहे.

जदुनाथ हे ते महाराज. १८५५ पासून त्यांचा मुंबईतल्या हवेलीत मुक्काम होता. पुष्टीमार्ग या पंथाचे लोक आपल्या मुली-सुना लग्नापूर्वी या महाराजांच्या सेवेसाठी एक रात्र पाठवत. महाराज जे वीर्य त्या स्त्रीमधे सोडत तो   प्रसाद असे, लोकांच्या मते तो फार पवित्र असे.

अलीकडं ज्यांना निसर्गतः मुलं होत नाहीत त्याना कृत्रीम रेतन पद्धतीनं दुसऱ्या पुरुषाचं वीर्य देऊन मूल जन्माला धालतात. जदुनाथ हा आपल्या  वीर्यापासून दररोज एक या प्रमाणं काही शेकडा मुलं जन्माला घालायचा कारखानाच म्हणायला हवा. असाच प्रयत्न हिटलरनं केला होता. प्युअर आर्य रक्ताच्या माणसांचीच लग्न व्हावीत आणि त्यांच्याच प्रजेनं पृथ्वीवर (म्हणजे जर्मनीवर) राज्य करावं अशी हिटलरची कल्पना होती.

जदुनाथ हा माणूस कल्पकच म्हणायचा.

 मुळजी करसनदास याची होऊ घातलेली पत्नी आपणहून, आई वडिलांच्या सांगण्यावरून महाराजांकडं जाते. तिथून कथानक सुरु होतं. या प्रथेच्या विरोधात मुळजी चळवळ चालवतो, पेपरात लेख लिहितो. मुळजी हा सुधारक असतो. जदुनाथ चलाखी करून मुळजीवर बदनामीचा खटला भरतो. खटल्यातले साक्षीदार जदुनाथ नाहिसे करतो. खटला गाजतो. खालच्या कोर्टात मुळजीची सुटका होते. वरच्या खटल्यात मुळजीला दंडाची शिक्षा होते.

चित्रपटाचं निर्मितीमूल्य काही खास नाही. सेट कृत्रीम आहेत, गंगुबाई काठियावाडीसारखा चित्रपट पहात आहोत असं वाटतं. चित्रपटात दोन गाणी आहेत. उगाचच टाकलेली आहेत. कामं ठीकठाक. एकूणात चित्रपटाबद्दल लिहावं असं निर्मितीमधे काहीही नाही.

पण असा चित्रपट करणं आणि या चित्रपटाची आशयशैली हे दोन मुद्दे विचारात घ्यावेसे वाटतात.

भारतीय-हिंदू समाजाचं फोटोसारखं हुबेहूब आशयचित्र या चित्रपटात आहे.

कुठल्या धर्मग्रंथात किंवा महाभारताच्या आवृत्तीत अशा रीतीनं स्त्रीला लग्नापूर्वी महाराजांकडं सोपवा असं सांगितलंय? कुठंही नाही. चित्रपटात हा मुद्दा मुळजी हे पात्र ठळकपणे सांगतं.  कोणी तरी माणसानं ही आयडिया काढली आणि स्त्रियांचा उपभोग घेतला.

जदुनाथ महाराज जबरदस्ती करत होता काय? नाही.  आडून आडून कृष्णाचे अनेक स्त्रियांशी संबंध होते असं जदुनाथ सांगतो. म्हणजे आडून आडून आपण इतक्या स्त्रिया उपभोगतो म्हणजे कृष्णाचेच अवतार आहोत असं जदुनाथ महाराज सुचवतो.

असा उद्योग करणारी माणसं भारतात खूप म्हणजे खूपच आहेत.

गंमत पहा. माणसं आपणहून, राजीखुषीनं आपल्या पोरीसुना अशा महाराजांकडं सोपवतात. सोपवणारी माणसं सधन असतात, शिकली सवरलेली असतात,व्यावसायिक असतात. अक्कल असणारी असतात.

  जदुनाथचं हे वर्तन योग्य नाही, अनैतिक आहे असं मानणारी माणसंही होती, अनेक कारणांमुळं गप्प होती. चित्रपटात तीही दाखवलेली आहेत.

 वरील व्यवहार मानणारेही होते आणि अमान्य असणारेही होते.

मुळजी हा पत्रकार बंड करतो. आंदोलन करतो. तोही वैष्णवच  आहे. जो समाज मुली महाराजाकडं पाठवतो   त्याच समाजातून मुळजीलाही पाठिंबा मिळतो.

हे हिंदू समाजाचं प्रातिनिधीक चित्रं मानायचं? 

समाजात कुप्रथा निर्माण होतात. माणसाचं सदोष वर्तन असं या प्रथेचं  वर्णन करता येईल. त्या कुप्रथा धर्माच्या नावावर लोकांवर लादल्या जातात. (जदुनाथ महाराज नसता तर  लोकांनी त्याला बडवलं असतं. धर्माच्या नावावर त्यानं हे उद्योग केल्यानं त्याचे उद्योग पवित्र झाले.) लोक त्या प्रथांचं पालन करतात. पण या प्रथा चुकीच्या आणि घातक आहेत असं सांगणारे सुधारकही याच धर्मात निघतात. गंमत म्हणजे शेकडो वर्ष या प्रथा अजूनही शिल्लक आहेत आणि यांना विरोध करणारेही शिल्लक आहेत. अधे मधे परंपरा पाळणारे आणि परंपरांना विरोध करणारे एकमेकाशी झुंजतात. कालांतरानं समाज पुन्हा मागल्यासारखाच चाकोरीतून चालत रहातो.

यशराज फिल्म्स या निर्मात्यानं चित्रपटही त्याच हिंदू पद्धतीनं काढला आहे. जेजे ऊर्फ जदुनाथ स्वतःचं समर्थन करतो. मुळजी स्वतःच्या बंडाचं समर्थन करतो. गुन्हेगार हिदू, त्याला विरोध करणाराही हिंदू. चित्रपट म्हणजे एक गंमतच आहे. एकूण मसाला अशा रीतीनं मांडलाय की बोंब व्हावी, वाद व्हावा आणि चित्रपट पाहिला जावा, चार पैसे निर्मात्याला मिळावेत. समाजाचं काही कां होईना.

जदुनाथ प्रकरणाच्या सर्व बाजू त्यानं दाखवल्या आहेत. जदुनाथ हिंदू आहे, त्याचे भक्तही त्याच्याच पंथातले हिंदू आहेत आणि विरोध करणाराही हिंदू आहेतयातल्या प्रत्येकाचा दावा आपण हिंदूच आहोत असा आहे.

मागे एक स्पॉटलाईट नावाचा चित्रपट होऊन गेला. ख्रिस्ती पुरोहीत चर्चमधे काम करणाऱ्या छोट्या मुलांचं लैंगिक शोषण करत असत. (पण तो उद्योग पवित्र आहे, देवाच्या सांगण्यावरून करतोय असं मात्र ते पुरोहित म्हणत नसत) चर्च त्या पुरोहितांना शिक्षा करत नसे, दूरवर कुठं तरी नेऊन जपत असे. एका वर्तमानपत्रानं याचा छडा कसा लावला याचं चित्रण चित्रपटात आहे. दिक्दर्शकानं चर्चला सांभाळून घेतलं नाही. चर्चमधल्या लोकांचं वागणं धर्माशी ताडून पहायचा उद्योग दिक्दर्शकानं केला नाही. धर्मानं काय म्हणायचं ते म्हणावं, चर्चचं वर्तन अमानवी आहे हा मुद्दा चित्रपटानं सविस्तरपणे मांडला.

महाराजमधे जदुनाथच्या वर्तनाचा मुद्दा अधांतरी लटकत राहिला. तसा तो प्रत्यक्षातही अधांतरीच होता. ना कोर्टानं जदुनाथच वर्तन बेकायदेशीर ठरवलं ना पुष्टीमार्ग पंथियांनी त्याला फटके घातले.

चलता है. नाना पाटेकरी विचार. तुमचंही बरोबर, त्यांचंही बरोबर, सर्वांचं बरोबर, माझंही बरोबर. घ्या भडंग.

ही दिक्दर्शकाची चलाखी म्हणायची, सावधगिरी म्हणायची की दिक्दर्शक इत्यादी मंडळीही चलता है पंथीय म्हणायची.

पुष्टीमार्ग पंथ हा एका परीनं हिंदू-भारतीय वहिवाटीचा प्रातिनिधीक पंथही मानता येईल. 

चलता है.

सबकुछ चलता है. 

घ्या भडंग 

।। 

Comments are closed.