सिनेमे /मेगॅलोपोलिस
मेगॅलोपोलिस
फ्रान्सिस कोपोलाचा मेगॅलोपोलिस कॅन्झमधे नुकताच प्रदर्शित झालाय.
इसवीपूर्व ६० सालचं कथानक. रोम. सिसेरो (विन्स्टन चर्चील यांचा आवडता हीरो) हा राज्यकर्ता. कॅटालिना हा नेता त्याचं राज्य उलथवून टाकण्याचा कट रचतो. कॅटालिनाचं म्हणणं की सिसेरोचं राज्य लुटारूंचं आहे. कॅटालिनानं सिसेरोचं राज्य उलथवून त्या ठिकाणी गरीबांचं राज्य आणण्याचा प्रयत्न केला.
फ्रान्सिस कोपोला या नामांकित दिक्दर्शकानं वरील कथानक २१ व्या शतकातल्या अमेरिकेत आणून ठेवलंय. न्यू यॉर्क उध्वस्थ झालंय. एक आर्किटेक्ट न्यू यॉर्क एकविसाव्याच्याही पलिकडल्या शतकात शोभेल असं न्यू यॉर्क वसवायचा प्रयत्न करतो. हा आर्किटेक्ट म्हणजे इसवीपूर्व कॅटालिनाचा अवतार.
भरगच्च एलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स. भविष्याची कल्पना कोपोलानं केली आणि ती कल्पना पडद्यावर उतरवली.
न्यू यॉर्कमधली एक आकाशाला टेकलेली इमारत. इमारतीच्या टोकावर उभा असलेला माणूस. क्लोजअप दिसतो पण परिसरही दिसतो. माणसाला नैसर्गिक रीत्या दिसतं त्यापेक्षा विपरीत. दूरचं आणि जवळचं सारखंच स्पष्ट. पिकासोनंही माणसाच्या डोळ्याला न दिसणाऱ्या मिती चित्रात आणल्या होत्या. तसं. चित्रपट म्हणजे झमझमाट, चकचकाट, कडकडाट आहे.
दृश्यांचं चित्रीकरण काहीसं जुन्या काळातलं जुनं तंत्र वापरून केलं आहे. म्हणजे स्टुडियोत मागं एक चित्र रंगवलेला पडदा. प्रचंड. त्या पार्श्वभूमीवर चित्रीकरण. आपलं जुन्या तंत्रावरचं प्रेम कोपोला यांनी हट्टानं या चित्रपटात वापरलंय.
कॅन्झ महोत्सवात शो झाला तेव्हां चित्रपटातलं एक पात्र जिवंत होऊन पडद्यालमोर आलं.त्यानं त्याचं म्हणणं थोडक्यात सांगितलं, पुन्हा पडद्यात गेला. कोपोलाचा हा एक प्रयोग होता. चित्रपट आणि वास्तव यातलं अंतर संपवण्याचा; इसवी पूर्व ६३ आणि इसवी २०२४ मधील अंतर संपवण्याचा. कॅन्झमधे ठीक आहे. जगभर हज्जारो ठिकाणी जेव्हां चित्रपट पडद्यावर असेल तेव्हां काय होईल?
चित्रपट सुरु होतो तो व्हॉईस ओव्हरनं. मागून बोलणारा माणूस प्रेक्षकांना पंतोजीसारखा इशारा देतो ‘ अमेरिकन माणूस इतिहासातून शिकला नाही तर जुन्या रोममधे झालं तसं अमेरिकेचं होईल, अमेरिकन रिपब्लिक नष्ट होईल’
म्हणजे कोपोलाला काही तरी घनगंभीर संदेश द्यायचाय. कोपोलानं तो संदेश चित्रपटात तर दिलाच पण पत्रकारांसमोर बोलतानाही दिला. सध्याचं अमेरिकेतलं राजकारण ज्या रीतीनं चाललंय ते पहाता आपण आपली लोकशाही गमावणार आहोत असं कोपोला म्हणाला.
गंमत म्हणजे असा संदेश द्यायचं कोपोलानं चाळीस वर्षांपूर्वीच ठरवलं होता. या चित्रपटाची कल्पना त्यानं तेव्हांपासूनच केली होती. कोपोला कथा रचत होता, मोडत होता, रचत होता, दुरुस्त करत होता असं चाललं होतं. शेवटी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यानं आपल्या पदरचे १२ कोटी डॉलर या चित्रपटात घातले, आपली काहीशी मालमत्ताही विकली. चित्रपट प्रदर्शित होताना कोपोला ८४ वर्षाचा आहे.
कोपोला हा चित्रपट व्यवसायातला बंडखोर माणूस.जुनं मोडीत काढणारा.
१९७२ साली त्यानं गॉडफादरचा पहिला भाग केला, पाठोपाठ दोन वर्षांनी दुसरा भाग केला. दोन्ही चित्रपट चित्रपटाच्या इतिहासातले मैलाचे दगड झाले, दोन्ही भागांसाठी कोपोलाला ऑस्कर मिळालं. (गॉडफादर कसा केला ते सांगणारी १० भागांची ऑफर ही मालिका अवश्य पहावी). गुन्हेगारी जग आणि अमेरिकेतलं राजकारण कोपोलानं दाखवलं, गुन्हेगार आणि राजकारणी यांचा दबाव धुडकावून.
नंतर १९७९ साली त्यानं अपोकलिप्स नाऊ हा चित्रपट केला. काही दशकं आधी कांगो या देशात झालेली राजकीय उलथापालथ त्यानं वियेतनाममधल्या युद्धखोरीवर चिकटवली. एका दुष्ट माणसाचा खून करायला निघालेल्या एका माणसाचा जंगल, नद्या यातून केलेला प्रवास. चित्रपटानं दोन ऑस्कर्स मिळवली.
हे अगदीच खरं आहे की संदेश कसा द्यावा, गोष्ट कशी सांगावी हे सांगणारा हा सूपर दादा माणूस. गॉडफादर आणि अपोकॅलिप्स नाऊ; दोन्ही चित्रपट अमेरिकन समाजाची कठोर तपासणी करतात. पण ही तपासणी चित्रपटाच्या भाषेत होती. मार्लन ब्रँडो, रॉबर्ट दुवाल, मार्टिन शिन ही गॉडफादरची गँग अपोकलिप्समधे होती.
कोपोलाची चित्रपट माध्यमावर जबरदस्त पकड आहे. वय झाल्यावर ती पकड सुटली असावी. दुवाल, डी निरो, अल पचिनो इत्यादी लोक आता हाताशी नाहीत, तेही पूर्वीचे राहिलेले नाहीत. आपल्या थोरवीच्या आठवणींच्या जोरावर मेगॅलोपोलिस करायचा प्रयत्न कोपोलानं केला.
मेट्रोपोलिस या शीर्षकाचा चित्रपट १९१७ साली फ्रिट्झ लँग या जर्मन दिक्दर्शकानं केला होता. लँग आधुनिक चित्रपट तंत्राचा जनक होता. हॉलिवूडनं चित्रपट कला लँककडून आणि जर्मन एक्सप्रेशनिस्टांकडून उचलली. लँगचा मेट्रोपोलिस पहाताना आजही चकीत व्हायला होतं. आधुनिक औद्योगीक आणि नागरी जग कसं असेल यावरचं भाष्य त्या चित्रपटात होतं.कायच्या काय मोठे सेट होते, कायच्या काय मोठ्या संख्येनं माणसं पडद्यावर, सेटवर आणली होती. तेव्हां एआय नव्हतं. चार सैनिक बोर्डावर तयार करायचे आणि त्यांच्या कॉप्या चिकटवून हजारो सैनिकांची लढाई दाखवायची या तंत्राची कल्पनाही त्या काळात होणं शक्य नव्हतं. एक भव्य कल्पना लँगनं अमलात आणली. त्या तंत्राला जुनं तंत्र म्हणता येईल.
कोपोलानं त्या तंत्राचा हट्ट धरला. सिनेमॅटोग्राफर, सुतार, चित्रकार इत्यादी सहकाऱ्यांनी सांगितलं की नवं तंत्र वापरा, जुनं आता जमणार नाही. भांडणं होत. सेटवरची भांडणं कोपोलाला नवी नव्हती. गॉडफादरचा सेट उभारत असताना डिझायनरशी वाद झाले, डिझायनर वैतागून सिनेमा सोडून गेला होता. पण कोपोलानं बाबापुता करून त्याला परत आणलं तेव्हां गॉडफादर झाला. २०२२ साली कोपोला हट्टी झाला.
चित्रपट ही एक स्वतंत्र कला आहे, ती एक पूर्ण स्वतंत्र भानगड आहे. भलेभले अनेक वेळा ते विसरतात. मेगॅलोपोलिस हा चित्रपट म्हणून सामान्य आहे. पुढं त्याचं काय व्हायचं ते होईल.
।।