रविवारचा लेख/स्कॉर्सेसे भेजाला चिमटे काढतात

रविवारचा लेख/स्कॉर्सेसे भेजाला चिमटे काढतात

किलर्स ऑफ द फ्लॉवर मून या चित्रपटात दिक्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसे अमेरिकेची घडण तपासतात. अमेरिकेचं राजकारण, अमेरिकन पोलिस व्यवस्था, अमेरिकन समाजात रुतलेलं शोषण इत्यादी गोष्टींवर हा चित्रपट भाष्य करतो.

 किलर्स ऑफ दि फ्लॉवर मून याच नावाच्या डेविड ग्रॅन यांच्या पुस्तकावर चित्रपट आधारलेला आहे. मूळ पुस्तक इनवेस्टिगेटिव रिपोर्टिंग या धाटणीचं आहे. फेयरफॅक्स नावाच्या ओसेज आदिवासी बहुसंख्य असलेल्या गावात खून होत असतात. ओसेजांच्या मागणीवरून या खुनांची चौकशी होते, खटला होतो. चौकशी, खटला यामधून समोर आलेल्या माहितीवर प्रस्तुत पुस्तक आधारलेलं आहे. कागदपत्रांच्या अभ्यासावर लिहिलेलं पुस्तक. घटना घडून गेल्यानंतर कित्येक वर्षानी लिहिलेलं. वातावरण समजून घ्यावं यासाठी लेखक त्या गावामधे फिरला.

फेयरफॅक्स गाव आणि तो काळ डोळ्यासमोर उभा रहातो.

पुस्तकावरून चित्रपट करणं हे एक किचाट असतं. शेकडो पानांचं पूर्ण पुस्तक दाखवायचं तर शेकडो तासांचा चित्रपट करावा लागतो.चित्रपट फार तर तीन तासांचा हवा. दिक्दर्शक त्यातला निवडक भाग निवडतो. निवड  कठीण असते. पुस्तकात अनेक मुद्दे असतात, अनेक सूत्रं असतात. त्यातून मोजके मुद्दे व सूत्रं घ्यावी लागतात. हे कां घेतलं, ते कां घेतलं नाही, यावर जोर दिला, त्यावर जोर द्यायला हवा होता, हेहे कल्पित आहे इत्यादी मुद्दे समीक्षक कुटतात. बोंबाबोंब होते. लेखक म्हणतो की त्याच्या पुस्तकावर अन्याय झालाय.  

  चारपाचशे पानांचा मजकूर सुमारे पन्सास शंभर पानांच्या पटकथेत आणायचा म्हटल्यावर हे सारं अटळ असतं.

स्कॉर्सेसे ‘नुवार’ चित्रपट परंपरेतले. या शैलीत सेक्स आणि हिंसेचं अस्वस्थ करणारं चित्रण असतं. फेयरफॅक्समधे हिंसा आणि सेक्स दोन्ही होतं.  खून. रहस्यमय खून.  मग काय विचारता.

ओसेज समाज जाणून घेण्यासाठी स्कॉर्सेसे त्या गावात गेले, तिथल्या लोकांमधे मिसळले, त्यांच्या मुलाखती घेतल्या. ओसेज समाज आणि गाव स्कॉर्सेसे यांना वेगळं दिसू लागलं, त्यांचा कल बदलला. ओसेज चालीरीती, विधी दाखवल्या पाहिजेत असं त्याना वाटलं. ओसेजांवर झालेल्या अन्याय त्यांना महत्वाचा वाटला. आणि त्यातही गोरा अमेरिकन बर्कहार्ट आणि ओसेज महिला मॉली यांच्यातल्या प्रेमाकडं ते आकर्षित झाले. अमेरिकेतल्या गोऱ्यांचं राजकारणही त्याना दाखवावंसं वाटलं. चित्रपटाचा मुख्यबिंदू हिंसा-सेक्सकडून सामाजिक वास्तवाकडं सरकला.

 ओक्लाहोमा या राज्यात फेयरफॅक्स या गावात तेल सापडलं. पटापट न्यू यॉर्क इत्यादी ठिकाणचे धनिक तिथं पोचले. तेल जमिनीतून काढण्याची यंत्रणा सिद्ध झाली. गाव भरभराटलं. जमिनीचे मालक म्हणून स्थानिक ओसेजना भरपूर पैसे मिळाले. स्थानिक ओसेजनाच मालकी व पैसे मिळावेत अशी कायद्यातली तरतूद होती. गोऱ्या अमेरिकन लोकांनी ओसेज स्त्रियांशी,पुरूषांशी लग्न केली. नंतर ओसेजांचे खून केले. अनेक ओसेज स्त्री पुरुषांना विषप्रयोग करून ठार मारलं. ओसेज माणसं मेली आणि त्या घरात लग्न केलेल्या गोऱ्यांना आपोआप वारसाहक्कानं जमिनीची मालकी आणि तेलाचे पैसे मिळाले.

गोऱ्या अमेरिकन लोकांच्या तुलनेत ओसेज अशिक्षित होते, भाबडे होते. गोऱ्या डॉक्टरांनी दूषित औषधं पाजली, ओसेजांनी ती भाबडेपणानं घेतली. बभ्रा झाला. चौकशी झाली. पेपपरात बातम्या छापून आल्या. बऱ्याच काळानं काही गोऱ्या अमेरिकन लोकाना कोर्टात शिक्षा झाल्या.

नेमकं हेच युरोपीय गोऱ्यांना स्थानिक रेड इंडियन लोकांच्या बाबतीत १५व्या शतकात केलं. फ्रेंच आणि इंग्रज अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोचले. जागा बळकावल्या. वसाहती स्थापन केल्या. नंतर पश्चिमेकडं सरकू लागले. स्थानिक इंडियन लोकाना त्यांच्या जमिनीवरून बेदखल केलं. त्या जागी आपल्या वसाहती स्थापन केल्या. या खटाटोपात लक्षावधी इंडियनांना मारलं, त्यांचा छळ केला, त्यांना गुलाम केलं.

स्थानिक इंडियन लोकांवर अन्याय आणि अत्याचार करून अमेरिका वसली आहे, समृद्ध झाली आहे. १९६०-१९७० च्या दशकात अमेरिकेत युवकांनी बंड केलं, चळवळी केल्या, स्थानिक इंडियन आणि काळ्या आफ्रिकन लोकांवर केलेल्या अत्याचाराला वाचा फोडली. त्या युवक चळवळीत मार्टिन स्कोर्सेसे वाढले. वियेतनाममधे अमेरिकेनं केलेल्या उद्योगांवरही विद्यार्थी चळवळ तुटून पडली.

स्कोर्सेसे यांच्या चित्रपटांत सर्व अमेरिकन माणसं पूर्ण काळीकुट्ट दिसत नाहीत. त्यांच्यातल्या छटा दिसतात,चांगली अमेरिकन माणसंही दिसतात. पण चार चांगली अमेरिकन माणसं होती म्हणून एकूणात अमेरिकेत झालेले अत्याचार झाकून ठेवायला स्कोर्सेसे तयार नसतात. 

किलर्स ऑफ द फ्लॉवर मून हा चित्रपट मनोरंजक आहे, चित्रपट या माध्यमाची वैशिष्ट्यं स्कोर्सेसे ठळकपणे वापरून चित्रपट रंजक करतात. अमेरिकेचा अन्यायकारक पाया ते ठळकपणे दाखवतात पण चित्रपट बटबटीत राजकीय भाष्य होत नाही. स्कॉर्सेसे विचारानं बंडखोर आहेत,  सिनेमा करताना बंडखोरी हा त्यांचा केंद्रीय मुद्दा नसतो, चांगला चित्रपट हा मुख्य मुद्दा असतो. दोषावर बोट ठेवायचं पण कंठाळी आणि बटबटीत पद्धतीनं संदेश द्यायचा नाही. 

स्कॉर्सेसे धाडसी आहेत. स्कॉर्सेसे राजकीय, धार्मिक, सांस्कृतीक मुद्दे चित्रपटातून हाताळतात.

सायलेन्स हा स्कॉर्सेसे यांचा एक गाजलेला, वादाच्या भोवऱ्यात सापडलेला चित्रपट.या चित्रपटाच्या शेवटी एक दृश्य आहे.एका जेझुइट प्रचारकाला जपानी पोलिस ख्रिस्ताची प्रतिमा पायदळी तुडवायला सांगतात. ज्याची पूजा करतो त्याची प्रतिमा पायदळी तुडवायची? मोठ्ठंच धर्मसंकट. प्रचारक   प्रतिमा पायदळी तुडवतो  आणि चित्रपट संपतो.

त्या काळातले जपानी राज्यकर्ते ख्रिस्ती धर्माच्या विरोधात होते. ख्रिस्ती माणूस हुडकला जाई, त्याला धर्म सोडायला सांगितलं जाई, धर्म सोडला नाही तर त्याला हाल करून ठार मारलं जाई. हे सारं जाहीरपणे करत जेणेकरून लोकांमधे दहशत निर्माण होईल. माणूस ख्रिस्ती आहे हे कसं हुडकायचं? त्यासाठी माणसाला ख्रिस्ताची प्रतिमा पायदळी तुडवायला सांगितली जाई. 

कट्टर जेज्विटानं आपली श्रद्धा सोडून दिली काय? की जीव वाचवण्यासाठी असं करणं स्वाभाविक आहे? की अत्याचाराला शांतपणे तोंड द्या या ख्रिस्ताच्या संदेशालाच अनुसरून तो प्रचारक वागला? असे अनेक श्रद्धाविषयक प्रश्न चित्रपट अनुत्तरीत ठेवतो.

या चित्रपटावर टीका झाली, अनेक ठिकाणी प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली, पोप रहातात त्या व्हॅटिकनमधे आजही हा चित्रपट दाखवला जात नाही. ख्रिस्ती श्रद्धांची समीक्षा करणं अनेक ख्रिस्तीना आवडत नाही.

अगदी असंच स्कॉर्सेसे यांच्या दी लास्ट टेंप्टेशन ऑफ ख्राईस्ट या चित्रपटाबद्दल घडलं. कझांटकिस याच्या कादंबरीवर स्कोर्सेसे यांनी लास्ट टेंप्टेशन केला होता. त्यात एका दृश्यात ख्रिस्त मॅग्दालेनाशी सेक्स करताना दाखवलं होतं, ते एक स्वप्नदृश्य होतं. 

ख्रिस्ती लोक मानतात की ख्रिस्त अविवाहित होता. त्यांना ख्रिस्ताचा सेक्स कसा रुचणार? त्यांना वरील दृश्य हा धर्मद्रोह वाटला. लास्ट टेंप्टेशनवर खूप टीका झाली, बंदी आली.

स्कॉर्सेसेनी अनेक वेळा मुलाखतीत सांगितलंय की कॅथलिक असण्यात त्याना समाधान, कंफर्ट आहे. ख्रिस्ती धर्मातली प्रेम, करूणा, त्याग, ही तत्वं त्यांना आपलीशी वाटतात. स्कॉर्सेसे चर्चमधे जात नाहीत. पण सभोवतालचं वास्तव पाहिल्यावर ते अस्वस्थ होतात. जगातलं दुःख कां कमी होत नाही? अत्याचार कां कमी होत नाहीत? असे प्रश्न त्यांना पडतात.  ख्रिस्ती घरात वाढल्यामुळं त्यांच्यावर त्यांच्या नकळत ख्रिस्ती संस्कार झाले. पण जे पदरात पडलं ते पवित्र मानण्याची स्कॉर्सेसे यांची वृत्ती नाही. ते धर्मविरोधी झालेले नाहीत पण धर्माला प्रश्न विचारण्यायेवढं धाडस त्यांनी गोळा केलंय.

स्कॉर्सेसे अमेरिकन आहेत. त्यांना आपल्या देशाचा अभिमान आहे. अमेरिकेतली राज्यव्यवस्था, पोलिस आणि न्यायव्यवस्था याबद्दल त्यांना आपलेपणा आहे पण त्या व्यवस्थेतले दोषही त्यांना दिसतात आणि त्यावर बोट ठेवायला ते कचरत नाहीत.

स्कॉर्सेसे यांचे सिनेमे आपल्याला विचार करायला लावतात. स्कॉर्सेसे यांचं व्यक्तीमत्वही आपल्याला विचार करायला लावतं.

।।

Comments are closed.