सेक्रेड गेम्स. दाहक वास्तवाचं प्रत्यकारक चित्रण
सेक्रेड गेम्स ही मुंबईतील गुन्हे जगावर आधारलेली मालिका नेटफ्लिक्सवर रुजू झालीय. विक्रम चंद्र यांच्या २००६ साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीवर ती बेतलेली आहे. पहिल्या मालिकेचे आठ भाग प्रसारीत झाले आहेत. भारतात आणि परदेशात ही मालिका खूप पाहिली जातेय, चर्चेत आहे. जगभरच्या पेपरांनी या मालिकेची दखल घेतलीय. मुंबईत सेक्रेड गेम्सच्या महाकाय जाहिरातीत सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दिकी या प्रमुख नटांची चित्रं दिसतात. माध्यमं या मालिकेनं भयचकित झाली आहेत. क्वचित ठिकाणी मालिकेवर टीका झालीय.
कथानकात आहे मुंबईतलं गुन्हे जगत आणि राजकारण. गुन्हेगार पुढाऱ्यांना मदत करतात आणि पुढारी गुन्हेगारांना मदत करतात. पोलिस मध्यस्थ असतात. हे वास्तव वेळोवेळी जनतेला समजलं आहे. कथा कादंबऱ्या, चित्रपट यातून हे कथानक वेळोवेळी नागरिकांनी पाहिलं आहे. सेक्रेड गेम्समधे कथानकाच्या हिशोबात नवीन असं काहीच नाही.
तरीही सेक्रेड गेम्स पाहिली जातेय याचं कारण ती सर्वसामान्य देशी चित्रपटांपेक्षा अधिक बोल्ड आहे. त्यात सेक्सची भरमार आहे, संभोगदृश्यं आहेत. संभोगदृश्यात भारतीय स्त्री पुरुष दिसतात. आजवर संभोगात फक्त परदेशी माणसं भाग घेताना दिसत. भारतीय पात्रांनी घेतलेलं एकादं चुंबनही पडद्यावर दिसलं की प्रेक्षक चवताळत. इथं तर धडधडीत आणि दणादण संभोगदृश्यं, बराच काळ चालणारी, संख्येनंही बरीच. परदेशी प्रेक्षक खेचून घेण्यासाठी ही आयडिया वापरली गेलीय अन्यथा इतक्या संभोगदृश्यांना तसा संदर्भ दिसत नाही, त्यांच्या वाचूनही कथानक पुढं सरकलं असतं.
पोलिस आणि गुन्हेगार यांच्यात हात मिळवणी असते, पोलिस आणि पुढारी यांच्यात गूळपीठ असतं. पण उघडपणे ते मान्य करण्याची प्रथा भारतात नाही. भारतीय पोलीस कर्तव्यदक्ष आणि थोर असतात असं सर्रास सांगितलं जातं, त्यांचं कौतुक केलं जातं. कधी कधी पोलिस दलाच्या कर्तव्य कुचराईची बातमी आली किवा त्यांच्या बेकायदेशीर वर्तनाची घटना समोर आली लोक म्हणतात की तो अपवाद आहे, तसं व्हायला नको. एनकाऊंटर हा भीषण प्रकार राजकारणी माणसं आणि पोलिसांनी आपापली पापं लपवण्यासाठी कायम वापरला आहे. पण या गोष्टीची वाच्यता टाळण्याचीच प्रवृत्ती दिसते. सेक्रेड गेम्स मधले पोलिस सॉलिड भयानक दिसतात, वागतात. कदाचित पोलीस खातंही या मालिकेवर खटला भरेल आणि पोलिसांची प्रतीमा डागाळली जातेय असा आरोप केला जाईल.
मालिकेत पुढारी, राजकीय पक्ष, जात, धर्म यांचे थेट उल्लेख आहेत. कोणीही साधारण माणूस खरं म्हणजे दैनंदिन जीवनात तसे उल्लेख करत असतो, जाहीरपणे तसं बोलत नाही येवढंच. सामान्य माणूस खाजगीत जे बोलतो ते मालिकेत पडद्यावर उघड बोललं जातं. भारतीय माणसाला असं काही ऐका वाचायची सवय नाहीये. समाजात काही वाईट गोष्टी भले असतील पण त्या साहित्य आणि कलेच्या प्रांतात उमटता कामा नयेत असं एकूणात भारतीय मन आहे. मराठी भाषेतले श्लील अश्लीलतेवरून झडलेले वाद आठवून पहावेत. भले नाना फडणवीस कसेही असतील आणि भले समाजात हिंसा असेलही. म्हणून ती नाटकात दाखवायची काय असा सवाल नैतिकतेची दुकानदारी करणाऱ्यांनी केला होता आणि समाजानं तो उचलूनही धरला होता. पूर्वी होऊन गेलेल्या पुढाऱ्यांच्या व्यक्तिगत जीवना बोट ठेवण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. शेवटी माणूस कधीच पूर्ण परफेक्ट नसतो. परंतू भारताय माणसाला नेत्यांची बोचरी बाजू मांडलेली आवडत नाही. थोडक्यात काय तर साहित्य आणि कलेमधे सारं काही गोडगुलाबीच दिसलं पाहिजे असं भारतीय वाचक प्रेक्षकाला वाटतं. ही बंधनं नेटफ्लिक्सवर पडत नाहीत. नेटफ्लिक्सची निर्मिती भारतात झालेली नाही, तिचा विकास भारतात झालेला नाही. त्यामुळं मालिका दाखवण्यात नेटफ्लिक्सला स्वातंत्र्य मिळतं. नैतिकतेच्या दुकानदारांची जराशी पंचाईत आहे. याच इंटरनेटवरून नैतिकतेचे दुकानदार त्यांचे अनैतिक विचारही पसरवत असल्यानं त्यांची अडचण आहे. त्यामुळं सेक्रेड गेम्स जगभर पहायला मिळतो.
सेक्रेड गेम्स ही भारतीय विषयावरची नेटफ्लिक्सवरची पहिली मालिका. या आधी वाईल्ड वाईल्ड कंट्री ही आचार्य रजनीशांवरची डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली. परंतू त्या डॉक्युमेंटरीचा काळ आणि प्रदेश अमेरिकन होता, रजनीशांचं अमेरिकेतल्या ओरेगन येथील वास्तव्य हा त्या डॉक्युमेंटरीचा विषय होता.
अनुराग कश्यप हे सेक्रेड गेम्सचे एक दिद्गर्शक आहेत. हिंसा हे जीवनातलं वास्तव त्यांनी हिंदी चित्रपटात आजवर कधीही नव्हतं तितक्या प्रभावीपणे हिंदी चित्रपटात दाखवलंय. परंतू शेवटी भारतात एक सेन्सॉर बोर्ड असतं, राजकीय पक्ष आणि केव्हांही कोणतीही गुंडगिरी करायला तयार टोळ्या असतात. भारतीय माणसाच्या कला आणि स्वातंत्र्य विषयक जाणीवाही फार भावनाचिंब असतात. त्यामुळं अनुराग कश्यपनाही त्यांची कला सादर करतांना सावधगिरी बाळगावी लागते, सांभाळून रहावं लागतं.असतात. नेटफ्लिक्स हे आंतरराष्ट्रीय माध्यम असल्यानं त्यामुळं कश्यप यांना वाव मिळाला.
नेटफ्लिक्सनं मुळातच एक नव्या कलाप्रकाराला जन्म दिलाय. विना जाहिराती सलग अनेक तास एकादा विषय पहायची सवय नेटफ्लिक्सनं लावलीय. पडद्यावर भरपूर वेळ मिळत असल्यानं कादंबरीत जसा निवांतीनं विषय मांडता येतो तसा विस्तृत पट नेटफ्लिक्सवर मांडता येतो. त्यामुळं थरार ही गोष्ट सविस्तर पहाता येते. थराराची बारीक सारीक अंगंही चित्रपटात दाखवता येतात.
मार्को पोलो आणि नार्कोज या दोन मालिका नेटफ्लिक्सवर तुफ्फान गाजल्या. इतक्या की चित्रपट सृष्टीत गॉडफादरला जे स्थान आहे ते या मालिकांना लाभलं. मार्को पोलोमधे कुब्लाई खानानं निर्माण केलेल्या मंगोल साम्राज्याचं चित्रण आहे. सत्ता, सत्तेसाठी असणारी चढाओढ, सत्तेपुढं रक्ताची नातीही मातीमोल असणं, सत्तेचं क्रौर्य, सत्तेचा पसारा, सत्तेचा थरार, माणसाच्या विशेषतः सम्राटाच्या व्यक्तिमत्वाचे अनंत पदर इत्यादी गोष्टी मार्कोपोलोमधे दिसतात. नार्कोजमधला पाब्लो एस्कोबार हा ड्रग तस्कर. त्याचंही एक मोठं साम्राज्य होतं. कुब्लाई खानाचं साम्राज्य उघड होतं, एस्कोबारचं साम्राज्य भूमिगत होतं. परंतू दोन्ही साम्राज्यांचे परिणाम मात्र उघडपणे दिसत. एस्कोबारच्या बोटावर देशातलं सरकार, पोलिस, लष्कर, न्यायसंस्था, राजकारण चालत होतं. कुब्लाई खान आणि एस्कोबार यांची गोष्ट तासादोनतासात सांगण्यासारखी नाही. त्यातला थरार अनुभवण्यासाठी बराच वेळ खर्चावा लागतो. तो नेटफ्लिक्सनं प्रेक्षकांना मिळवून दिला.
थरार ही प्रेक्षकांना आवडणारी गोष्ट असते. थरार या गोष्टीला भाषा आणि देशाच्या सीमा नसतात. नार्कोज दक्षिण अमेरिकेचा राहिला नाही आणि मार्को पोलो मंगोलियाचा राहिला नाही. दोन्ही मालिका साऱ्या जगानं पाहिल्या. थरार ही एक स्वतंत्र शैलीच. या थरार मालिकेत नार्कोजच्या पाठोपाठ एल चापो हा आणखी एक ड्रग तस्कर नेटफ्लिक्सनं प्रेक्षकांना दाखवला. अगदी काल परवा या थरार शैलीला आणखी एक वळण फौदा या मालिकेनं दिलं.
फौदा (अराजक, गोंधळ) या मालिकेत आहे इस्रायलच्या लष्करामधला एक खास विभाग. तो गुप्तपणे, कळीच्या, मोठ्या, शत्रूव्यक्तींचे काटे काढतो. अगदी मोजकी प्रशिक्षित आणि धाडसी माणसं या विभागात काम करतात. लष्कराची आणि इस्रायलच्या सरकारची या विभागानं केलेल्या कामगिरीला छुपी मान्यता असते. या विभागातली माणसं पॅलेस्टाईनमधे जाऊन तिथल्या दहशतवादी म्होरक्यांचा खून करतात. दहशतवादीही त्यांच्या पद्धतीनं इस्रायली नागरीक आणि अधिकाऱ्यांचे खून करत असतात. दोन्ही गोष्टी व्यवस्थित नियोजन करून अगदी क्रूरतेनं पार पाडल्या जातात. त्याचं थरारक चित्रण फौदामधे पहायला मिळतं. इस्रायल बेकायदेशीर, अनैतिक वागतं असं दाखवल्याबद्दल इस्रायलच्या माध्यमांत तक्रार झाली नाही. पॅलेस्टिनी लोक दहशतवादी असतात असं अशी तक्रार अरब देशांनी केली नाही. लोकांनी मालिकेतला थरार अनुभवला.
एके काळी जर्मनांचा पराभव अमेरिका-ब्रीटन इत्यादी लोकं कसा करतात त्याची थरारक गोष्ट हॉलिवूडच्या चित्रपटात सांगितली जात असे. हिटलर आणि जर्मनी अगदीच मामा आहेत असं हॉलिवूडचे सिनेमे पहातांना वाटायचं. जर्मन जनता रागावली नाही, त्यांनी ते सिनेमे मजेत पाहिले, आपल्या देशाचा अपमान होतोय असं कोणी म्हटलं नाही.
अलिकडं बोर्जियाज नावाची एक मालिका नेटफ्लिक्सनं दाखवलीय. त्यात पोप कसे अनैतिक, अमानवी, क्रूर, लालसी असतं याचं चित्रण आहे. व्हॅटिकननं किंवा ख्रिस्ती जनतेनं मोर्चे काढले नाहीत, कोर्टात धाव घेतली नाही.
देश, धर्म आणि संस्कृती या फार कातर आणि हळव्या गोष्टी असतात. या गोष्टींना संदर्भ आणि मर्यादा असतात. पाकिस्तान दहशतवादी आहे असं कोणी पाकिस्तानात म्हटलं त्याला पाकिस्तानची जनता शिल्लक ठेवणार नाही. परंतू पाकिस्तानाबाहेर जगात कुठंही पाकिस्तानवर टीका केली तर चालते. इस्लामबद्दल पाकिस्तान आणि इराणमधे टीकेचा शब्द काढलात तर मेलात. अमेरिका, ब्रीटन, जर्मनी, फ्रान्स इत्यादी ठिकाणी इस्लामवर टीका करता येते. राजकारणाच्या बाबतीत तर पश्चिमी जगात जनता आजीमाजी कोणत्याही पुढाऱ्याचे कपडे सर्रास उतरवत असते. धर्म, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार यांचे पश्चिमी जगात सर्रास वाभाडे काढले जातात. माध्यम, इंटरनेट, चित्रपट हे एक नो मॅन्स लँड आहे, तिथे देश-धर्म-संस्कृती यावर असणाऱ्या भूगोलाच्या मर्यादा लागू होत नाहीत. इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे आभासी जग. बदनामी हा उद्देश न ठेवता कथानकाचा भाग म्हणून देश-धर्म-संस्कृती या गोष्टी वास्तव म्हणून पहाणं या आभासी जगात जमतं, जमू शकतं.
सेक्रेड गेम्स, फौदा, नार्कोस, बोर्जियाज इत्यादी मालिकांनी थरार ही शैली वापरली आणि त्या नादात देश-संस्कृती-धर्म या मर्यादांचा जाच कमी केला. या मालिकांमधून स्वतंत्रपणे ते ते देश आणि तिथली माणसं पहाता येतात. मुंबईचं एक वास्तव आहे. अभिमानाच्या पांघरुणाखाली ते दडवलं तरी ते नाहिसं होत नाही. जसं राजकारण हे वास्तव आहे तसंच पोलिस हेही एक वास्तव आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे जरी पोलिसांचं कर्तव्य असलं तरी चांगल्यांचं रक्षण पोलिस करतातच असं नाही आणि खलांचा निःपातही करतात असंही नाही. पोलिसांत सत् असतील पण खलही असतात. त्यामुळं ते पहायला काहीच कहीच हरकत नसावी. पुढाऱ्यांची काय लायकी आहे हेही आता जनतेला चांगलंच समजलं आहे. त्यामुळं त्यांचंही वास्तव चित्रण व्हायला हरकत नाही. भारतीय समाज छापील माध्यमात किंवा टीव्हीवर तसं चित्रण करू देणार नाही, गुंडगिरी करून प्रसारण बंद पाडेल. त्यामुळं नेटफ्लिक्समधे ते पहायला मिळतं ते बरंच म्हणायला हवं.
।।
One thought on “सेक्रेड गेम्स. दाहक वास्तवाचं प्रत्यकारक चित्रण”
थरार , नेमक चित्रण आवडला, मालिका व लेख आवडला,