हाँगकाँगला लोकशाही हवीय
हाँगकाँगला लोकशाही हवीय
केवळ नागरी स्वातंत्र्य नव्हे आम्हाला लोकशाही हवीय असं म्हणत हाँगकाँगचे २० लाख नागरीक १२ जूनला रस्त्यावर उतरले.
चिनी संस्कृतीची गंमत. चीनच्या पेपरांतून, कम्युनिष्ट पक्षाच्या पेपरांतून, हाँगकाँगचं वर्णन सहोदर असं केलं जातं. सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटातून जन्मलेली मुलं. चिनी सोशल मिडियात आणि पेपरांत लोकांनी कळकळून लेख लिहिले. कर्तृत्ववान आईनं जन्म दिलेलं हाँगकाँग हे मूल काही काळ ब्रिटीशांनी दत्तक घेतलं होतं. ते आता आईकडं परत आलंय. पण मधल्या काळात ते बिघडलं. आता आईकडं परत आल्यावर मुलानं आईचं म्हणणं ऐकायला पाहिेजे, आई सांगेल तसं वागलं पाहिजे. ते तसं वागत नाही म्हटल्यावर आईला मुलाला शिक्षा द्यावी लागते. आईचा इलाज नाही, मुलांनी आईचं म्हणणं स्वीकारलं पाहिजे, स्वातंत्र्य वगैरे काही नाही.
हाँगकाँगच्या एकूण ७० लाख लोकांपैकी २० लाख लोकांनी स्थानिक विधानसभेसमोर त्यांनी निदर्शनं केली, पोलिसांनी लाठी चालवली, त्यात ७२ लोक जखमी झाले.
हाँगकाँगमधल्या आरोपींवर हाँगकाँगच्या कायद्यानुसार कारवाई न करता त्याना चीनकडं सोपवावं, चिनी कायद्यानुसार त्यांना शिक्षा होईल अशी तरतूद करणारा कायदा विधानसभेत पारित होणार होता, तो लोकांना नको होता. लोकाना चिनी कायदा नको होता.
चीनमधला कायदा जगातल्या लोकशाही देशांसारखा नाही. तिथं कम्युनिष्ट पार्टीचा कायदा चालतो. गुन्हा ठरवतांना पक्ष, पक्षाचे नेते यांच्याशी निष्ठा हाही एक महत्वाचा भाग असतो. गेल्या वर्षी हाँगकाँगमधल्या पुस्तकांच्या दुकानात चीनचे अध्यक्ष सी जिन पिंग यांच्यावर टीका करणारी पुस्तकं विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. एकाएकी त्या दुकानांचे मालक गायब झाले. एक मालक आजही गायब आहे. एक मालक अचानक बीजिंगमधे उगवला आणि त्यानं आपण फार गंभीर गुन्हा केला असं कबूल केलं. सत्ता, सरकार, सत्तेतली माणसं, पक्षातली माणसं यांच्यावर टीका करणं हाही चीनमधे धोर गुन्हा ठरू शकतो.
चीनमधे एकाद्या मोठ्या पुढाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवला जातो. तो आरोप एक तरफी पद्धतीनं कोर्टात सादर केला जातो. त्या आरोपांना प्रसिद्धी दिली जाते. पुरावे एक तरफी पद्धतीनं मांडले जातात. बचाव नावाची गोष्ट नसते. काही तासात, काही दिवसांत निकाल लागतो, आरोपी पाच पन्नास वर्षासाठी तुरुंगात जातो किवा फासावर जातो.
हाँगकाँगमधे एक विधानसभा आहे. या विधानसभेसाठी चीनधार्जिणे लोक उभे रहातात, सहज निवडून येतात. हाँगकाँगची स्वायत्तता, लोकशाही या मागण्या करणाऱ्या उमेदवारांचं काय होतं? एक उमेदवार निवडून आला, विधानसभेत शपथ घ्यायला गेला. तो फार संथपणे शपथ घेत होता असा निर्णय देऊन सभापतीनी त्याला सभासदत्व नाकारलं. एका निवडून आलेल्या उमेदवाराचे उच्चार ठीक नव्हते असा निर्वाळा देत त्यालाही सभासदत्व नाकारण्यात आलं. हाँगकाँगमधे कम्युनिष्ट सोडता इतर पक्षांना मान्यता नाही. लोकशाहीची मागणी करणाऱ्या लोकांचाही पक्ष नसतो, ते गट म्हणून, संस्था म्हणून निवडणूक लढवतात. या ना त्या कारणानं उमेदवारांना तुरुंगवासही घडवला जातो.
हाँगकाँग ही ब्रिटीशांची वसाहत होती. १९८४ साली ब्रीटननं हाँगकाँगवरचा हक्क सोडायला मान्यता दिली, १९९७ साली हाँगकाँग चीनला सुपूर्द करण्यात आलं. त्या वेळी करार झाला आणि २०४७ सालापर्यंत हाँगकाँग हा स्वायत्त प्रदेश ठेवला जाईल, तो चीनच्या कायद्याखाली येणार नाही असं करारात नमूद करण्यात आलं. ब्रिटीश वसाहत असल्यानं हाँगकाँग एक भांडवलशाही लोकशाहीवादी देश होता, तिथं मुक्त व्यापार चालत असे, हाँगकाँग हे जगातलं चवथ्या नंबरचं आर्थिक व्यवहाराचं केंद्र होतं. कम्युनिष्ट चीनला हाँगकाँग स्वायत्त नको होतं. परंतू स्थानिक जनतेचा विरोध आणि हाँगकाँग असण्यानं मिळणारे आर्थिक फायदे मिळावेत यासाठी चीननं हाँगकाँगला स्वतःच्या कायद्यानुसार वागायला परवानगी दिली. एक देश दोन व्यवस्था असं सूत्र चीननं अवलंबलं, चीनला स्वतंत्र व्यवस्था.
चीनला फायदा झाला. चीनमधे बाहेरून येणारी आणि चीनतर्फे बाहेर होणारी गुंतवणुक यातली ६० टक्के गुंतवणूक हाँगकाँगमधून होत असते. १९९७ साली चीनच्या एकूण उत्पन्नातला १८ टक्के भाग हाँगकाँगचा होता. चीनचा एक भाग चिनी कम्युनिझमला अंगठा दाखवत प्रगती करतो ही गोष्ट चिनी कम्युनिष्टाना त्रास देत असे. हाँगकाँगची स्वायत्तता नष्ट करा अशी मागणी सतत कम्युनिष्ट नेते करत असत. १९८९ मधे तियेनानमेन चौकात तरुणानी लोकशाहीची मागणी करून चीनचं नाक कापल्यावर चिनी कम्युनिष्ट पक्ष अधिक वैतागला. हाँगकाँगच्या लोकशाही मागणाऱ्या लोकांना छळण्यासाठी चीनचं सरकार सतत काही ना काही तरी कायदे करत राहिलं आणि हाँगकाँगमधल्या लोकांनी त्यांना विरोध केला.
हाँगकाँगमधली माणसं दर वर्षी तिएनानमेन दिवस साजरा करतात. चीननं २००३ मधे देशद्रोह नियंत्रण कायदा हाँगकाँगवर लादण्याचा प्रयत्न केला. देशद्रोह म्हणजे लोकशाहीची मागणी करणं. पाचेक लाख लोक त्यावेळी रस्त्यावर आले. २०१४ साली पुन्हा लाखो तरूण पिवळ्या छत्र्या घेऊन रस्त्यावर उतरले. चीननं निवडणूक सुधारणा विधेयक विधानसभेत आणलं होतं. लोकशाहीची थट्टा करणाऱ्या त्या विधेयकाला तरूणांचा विरोध होता. पिवळ्या छत्र्या कशासाठी? हाँगकाँगचे पोलिस निदर्शकांवर तिखट फवारत. त्यापासून बचाव करण्यासाठी छत्र्या. या अभिनव आंदोलनानं साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. २०१७ साली पुन्हा एकदा लाखो लोक रस्त्यावर उतरले. अमेरिकेतल्या ऑक्युपाय वॉल स्ट्रीट या धर्तीवरचं ते ठिय्या आंदोलन होतं. हाँगकाँगमधले महत्वाचे चौक आणि रस्ते आंदोलकांनी व्यापले.
खरं म्हणजे १९९७ साली ज्यांनी आधीच्या हाँगकाँगचं स्वातंत्र्य अनुभवलं होतं ते प्रौढ लोकं आता कमीच शिल्लक आहेत. ज्यांनी ते स्वातंत्र्य अनुभवलेलं नाही अशा तरूणांची आज आंदोलनात बहुसंख्या आहे. चीनमधल्या तरुणांना जसं ऐश्वर्याबरोबर लोकशाहीही हवी आहे तसंच हाँगकाँगी तरूणांचं म्हणणं आहे. तुरुंगवास, त्रास इत्यादी सहन करायची त्यांची तयारी आहे. बुजुर्ग म्हणतात की चिनी कम्यूनिष्ट सत्ता कधी तरी तुमच्या बोडक्यावर बसणारच आहे, ते अटळ आहे, तरीही तुम्ही कशाला ही भानगड करताय. तरूणांना वाटतं जसं चीननधले तरूणही चिनी कम्युनिष्टी छळवादाला तोंड देत आहेत, ते जसे आशावादी आहेत तसेच आम्ही आहोत.
हाँगकाँगच्या आंदोलनाला पश्चिमी जगाचा, अमेरिका आणि युकेचा पाठिंबा होता. एका परीनं या आंदोलनाला पाठिंबा देणं म्हणजे चीनवर जिव्हारी टीका करणंच होतं. चीननं आंदोलनाचा वार पचवला. आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी पेपरांमधे दोन बातम्या शेजारीशेजारी होत्या. एकीत युकेची टीका आणि दुसरीत चीनचे पंतप्रधान आणि युकेचे अर्थमंत्री यांनी केलेला ६३ कोटी डॉलरचा व्यापार करार.
चीननं आज तरी आर्थिक हिताला प्राधान्य दिलंय. अमेरिकेनं, अमेरिकेच्या काँग्रेसनं हाँगकाँग लोकशाही आंदोलनाला पाठिंबा दिला आहेच. परंतू ट्रंप यांनी चिनी मालावर जकात लादून व्यापार युद्ध सुरु केलंय. चीनसमोर पेच निर्माण झाला आहे. जकातीचा परिणाम चिनी निर्यातीवर होणार आहे. अमेरिकी मालावर जकात मारायची की इतर काही उपाय योजायचे यावर चीन विचार करत आहे. अशा व्यापारी संकटाच्या काळात हाँगकाँग ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापणं चीनला परवडणार नाही. युके बरोबर व्यापारी करार करून आपण समजुतीनं घ्यायला तयार आहोत हे चीननं दाखवून दिलंय.
म्हणूनच १२ तारखेच्या आंदोलनानंतर हाँगकाँगच्या प्रशासकानी प्रस्तावित विधेयक तात्पुरतं मागं घेतलं आहे.
२०४७ म्हणजे अजून २७ वर्षं आहेत. मधल्या काळात जगात काय बदल घडतील ते कोणी सांगावं? बर्नी सँडर्सची सरशी झाली तर अमेरिकेत समाजवाद येईल. चीनमधल्या तरुणांची सरशी झाली तर चीनमधे भांडवलशाही येईल. अर्थव्यवस्था कशीही असो, लोकशाही असेल की नाही हा महत्वाचा मुद्दा.
हाँगकाँगचे तरूण आशावादी आहेत.
।।