हेन्री किसिंजर.९९ व्या वर्षी लिहिलेलं पुस्तक.

हेन्री किसिंजर.९९ व्या वर्षी लिहिलेलं पुस्तक.

निक्सन एक वादग्रस्त पण दृष्टा पुढारी.

साडेपाचशे पानांच्या या पुस्तकात किसिंजर यांनी जर्मनीचे चॅन्सेलर कोनरॉड ॲडेनॉर, फ्रान्सचे प्रेसिडेंट चार्ल्स डि गॉल, अमेरिकेचे प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन, इजिप्तचे प्रेसिडेंट अन्वर सादत, सिंगापूरचे पंतप्रधान सी कुआन यू आणि ब्रिटीश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची राजकीय चरित्र रेखली आहेत.

हेन्री किसिंजर हारवर्डमधे इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवत. तिथूनच त्यांचा डेमॉक्रॅट रॉकफेलर यांच्याशी राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत संपर्क झाला. नंतर ते अमेरिकन सरकारला विविध मुद्द्यांवर सल्ला मसलत करू लागले. नंतर ते प्रे.निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री होते. 

१९७३ साली त्यांना वियेतनाम समझौता करण्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालं आहे.

संशोधन, सल्ला मसलत, प्रत्यक्ष राजनीती आणि पुस्तक लेखन या प्रांतांत त्यांनी यशस्वी विहार केला आहे. राजनीतीवर लिहीलेली पुस्तकं, संस्मरण आणि थेसिस मिळून त्यांची ३० पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

लीडरशिप हे पुस्तक लिहितांना त्यांचं वय आहे ९९.

।।

किसिंजर यांनी रेखाटलेल्या सहा व्यक्तिमत्वांत प्रे. रिचर्ड निक्सन यांचं चरित्र महत्वाचं आहे. कारण किसिंजर यांच्या कारकीर्दीतला निक्सन यांच्याबरोबरचा काळ हा परमोत्कर्षबिंदू होता. निक्सन आणि किसिंजर दोघेही अनेक कारणांसाठी त्या काळात गाजले.

निक्सन जगाच्या मनावर ठसले ते वॉटरगेट प्रकरणामुळं. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या  वॉटरगेट या इमारतीतील ऑफिसात निक्सन यांच्या सांगण्यावरून दरोडेखोरी झाली. ऑफिस फोडून पक्षाबद्दलची गुप्त माहिती चोरण्यात आली. निक्सन यांनी यात आपला हात होता हे प्रथम लपवून ठेवलं.नंतर वॉशिंग्टन पोस्टनं प्रकरण लावून धरलं आणि निक्सन यांची न्यायालयीन चौकशी सुरु झाली.त्या चौकशीतही त्यांनी हस्तक्षेप केला. दरोडेखोरी आणि न्यायालयीन कामात हस्तक्षेप हे दोन मोठ्ठे गुन्हे त्यांनी केले होते. इंपीचमेंट होणार आणि ठपका बसणार हे लक्षात आल्यावर निक्सन यांनी अध्यक्षपदाचा राजिनामा दिला.

हे लक्षात ठेवायला हवं की ऐतिहासिक असं बहुमत मिळवून निक्सन दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले होते. अध्यक्षपदाची दुसरी निवडणुक जिंकण्यासाठी त्यांनी वॉटरगेट दरोडेखोरी केली होती.

निक्सन यांच्यावर वीसेक चित्रपट झाले आहेत. कोणाही राजकीय नेत्यावर येवढे सिनेमे झाले नसतील. वर्तमानपत्रांतील प्रसिद्धी आणि हे चित्रपट यामधून निक्सन यांचं एक दंडेली करणारा, हुकूमशहा असं चित्रं उभं रहातं.

किसिंजर यांनी लिहिलेल्या सुमारे १६४ पानांच्या व्यक्तिचित्रणांत वेगळेच निक्सन दिसतात. निक्सन यांच्याजवळ एक आंतरराष्ट्रीय राजकीय विचार होता आणि विचारपूर्वक किसिंजरनी १९६८ नंतर जागतीक सत्तेचा समतोल नव्या रीतीनं तयार केला हे किसिंजर या पुस्तकात तपशीलात जाऊन मांडतात.

दुसऱ्या महायुद्दानंतर जगात एक शीतयुद्ध सुरु झालं होतं. अमेरिका-युरोपीय देशांचा एक तट झाला होता. दुसरा तट होता कम्युनिष्ट रशियाचा. रशिया पोलादी पडद्या आड होता आणि चीन बांबूच्या पडद्याआड. चीन वेगळा पडला होता. चीन, रशिया आपापलं राजकारण शीत युद्धाच्या रुपात करत होते, दोघांमधे संवाद नव्हता. तसं पाहिलं तर जगाच्या पातळीवरच देशांमधे संवाद नव्हता. प्रत्येक देश, प्रत्येक गट आपापलं घोडं पुढं दामटवत होता. त्यामुळं एक तणाव जगात तयार झाला होता, देशांमधलं वितुष्ट धुमसत होतं, तोंड फुटत नव्हतं.

निक्सन यांनी गुप्तपणे चीनशी संबंध प्रस्थापित केला. वाटाघाटी करून प्रश्न सोडवले पाहिजेत या मुद्द्यावर त्यांनी चीनशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. चीन या जगापासून तुटलेल्या आणि अमेरिकेशी वितुष्ट असलेल्या देशात निक्सन गेले आणि माओ झेडाँग यांच्याशी वाटाघाटी केल्या हीच एक थरारक घटना होती.

समांतर पातळीवर शस्त्रास्त्रस्पर्धा कमी करणं, आटोक्यात आणणं या मुद्द्यावर त्यांनी रशियाशी वाटाघाटी केल्या आणि विविध करार घडवून आणले.

चीन आणि रशिया यांच्यात वितुष्ट निर्माण झालं असतांना दोघांनाही स्वतंत्रपणानं त्यांनी संवादाच्या प्रक्रियेत ओढलं.

तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे अशी चीनची भूमिका होता. तैवान स्वतंत्र देश आहे अशी अमेरिकेची भूमिका होता. दोन टोकाच्या भूमिका होत्या. त्यामुळंच चीन आणि अमेरिका यांच्यात संबंध प्रस्थापित होत नव्हते. निक्सन माओनी ठरवलं की तैवानबाबतच्या भूमिकेतून कधी वाट निघेल ती निघेल, परंतू त्यामुळं आपसात भेटणं, जगात शांतता नांदावी यासाठी एकत्र येणं आपण थांबवता कामा नये.

चीन जागतीक व्यवहारात खेचला गेला.

रशियाबरोबरही अनंत मतभेद होते. पण त्यासकट रशियाला निक्सननी आंतरराष्ट्रीय व्यवहारात आणलं.

रशिया, चीन आणि अमेरिका आपापलं देशहिताचं राजकारण करतच होते, एकमेकाच्या तंगड्या ओढत होते, प्रसंगी लढायाही करत होते. पण ते चालू असतानाच संवादाचे दरवाजे निक्सन यांनी उघडले.

हे करत असतानाच हलकेहलके अमेरिकेचंही स्थान त्यांनी जगाच्या व्यवहारात उंचावलं आणि पक्कं केलं.

मध्य पूर्वेत अरब देश आणि इसरायल यांच्यातला संघर्ष निक्सन यानी जागतीक युद्धाकडं जाऊ दिला नाही. जॉर्डन-इसरायल, इसरायल इजिप्त, इसरायल सीरिया यांच्यात संबंध जोडून त्यांना वेळोवेळी करार करायला लावून निक्सन यांनी रशिया, चीन यांना युद्धात घुसू दिलं नाही. अन्यथा तिसऱ्या महायुद्धाची शक्यता तिथं दिसत होती.

बांगला देश निर्मितीच्या वेळीही पुन्हा जागतीक युद्ध होईल की काय अशी स्थिती होती.पाकिस्तानच्या बाजूनं चीन आणि भारताच्या बाजून रशिया युद्ध करेल की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यात अर्थातच अमेरिका, जपान, कोरिया, युरोपीय देशही ओढले जाण्याची शक्यता होती. निक्सननी रशिया, चीन असं दोघांनाही रोखलं आणि बांगला देशाच्या निर्मितीला हातभार लावला. हे त्यांना मोठ्या खुबीनं केलं. बांगला देश हा स्वतंत्र देश आपल्याला निर्माण करायचा नाहीये, पण पूर्वपाकिस्तानला स्वायत्तता मिळाली पाहिजे असा मुत्सद्दी मुद्दा  निक्सननी लावून धरला. त्यातून शेवटी बांगला देश होणार हे निक्सनना माहित होतं आणि त्याला त्यांचा सूप्त पाठिंबाही होता. भारताला अंशतः पाठिंबा आणि अंशतः विरोध अशी भूमिका निक्सननी घेतली. इंदिरा गांधी पहिल्या दिवसापासून आक्रमक होत्या आणि बांगला देशाची निर्मिती हे ध्येय ठेवून त्यांनी सारी आखणी केली होती. निक्सनना ते दिसत होतं. इंदिरा गांधींशी वॉशिंग्टनमधे वाटाघाटी झाल्या त्यावेळीही निक्सनना ते समजलं होतं, इंदिरा गांधी पक्क्या होत्या. वॉशिंग्टनच्या वाटाघाटी संपल्या आणि काही दिवसातच भारतानं बांगला देशात सैन्य घुसवलं. हे सारं अर्थातच निक्सनना माहित असणार.

राजकारणात गोष्टी घडू द्यायच्या असतात, कधी त्यात सक्रीय रहायचं असतं, कधी आडून मदत करत गोष्टी घडवून आणायच्या असतात.

निक्सन निष्णात राजकारणी होते हे त्यांच्या कारकीर्दीवरून दिसतं. अर्थात हे सारं त्यांच्यात अचानक आलं नव्हतं. चार वर्षं ते आयझेनहॉवर यांच्या काळात अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट होते आणि अमेरिकेचं आंतरराष्ट्रीय धोरण ठरवण्यात, विशेषतः लष्करी धोरण ठरवण्यात त्यांचा त्या काळात मोठा वाटा होता. त्या काळात ते जगात हिंडले होते, कळी कशा फिरतात ते त्यांनी अनुभवलं होतं.

रशिया, चीन, युरोपीय देश, अमेरिका, जपान, कोरिया हे देश आता जगाच्या राजकारणात सक्रीय आहेत.ही स्थिती निर्माण करण्याचं श्रेय निक्सन यांना जातं.

इतका हुशार माणूस वॉटरगेट प्रकरणात इतका धटिंगणासारखा कां वागला? साऱ्या जगाला मॅनेज करणारे निक्सन आपल्याच देशातल्या राजकारणी, ब्युरोक्रॅट, प्रेसवाले यांना कां मॅनेज करू शकले नाहीत?

खरंच कोडं आहे.

कोडं एका विचित्र पद्धतीनं किसिंजर यांनी सोडवलं आहे.

किसिंजर यांनी निक्सनना जवळून पाहिलं आहे. निक्सन यांचं स्वभाव वर्णन या पुस्तकात त्यांनी अगदी काही ओळीत केलं आहे. ते योग्य वाटतं.

किसिंजर सांगतात की स्पष्टपणे काही न बोलण्याचा निक्सन यांचा स्वभाव होता. त्यांच्यात एक न्यूनगंडही होता, ते स्पष्ट बोलायला कचरत असत. नेता या नात्यानं ते स्पष्ट आदेश देत नसत, दिशा दाखवणारं असं काही तरी ते बोलत आणि मग त्यांचं बोलणं हाताखालच्या माणसांनी अमलात आणायचं.

त्यांचं बोलणं नीट समजलेला माणूस असेल तर मामला सुरळीत चालायचा. किसिंजर आणि निक्सन असं सूत चांगलं जुळलं होतं. त्यामुळं निक्सन यांच्या डोक्यात जे असे ते नीट अमलात येत असे.

व्हाईट हाऊसमधला त्यांचा सहकारी हाल्डमन हा हडेलहप्पी माणूस होता, त्याच्यात मुरब्बीपणा नव्हता. एकदा व्हाईट हाऊसमधे बैठक चालली असताना त्या डेमॉक्रॅट्सचा बंदोबस्त केला पाहिजे असं काही तरी निक्सन चिडून बोलले.

किसिंजर सूचित करतात की याचा अर्थ दरोडेखोरी करा असा हाल्डमननं घेतला, जो निक्सनना अभिप्रेत नव्हता. तिथून वॉटरगेट प्रकरण घडत गेलं.

निक्सन यांची धाडकन काही तरी बोलण्याची सवय त्यांच्या आंगलट आली हे काही अंशी ठीक आहे. पण प्रकरण पोलिसांच्या हाती पोचलंय, गंभीर होतंय हे कळल्यावर निक्सन यांनी माघार घेतली असतं तर प्रकरण मिटलं असतं. असं दिसतंय की प्रत्येक टप्प्यावर निक्सन अरेरावी करत गेले.

गंमत म्हणजे वॉटरगेटची अरेरावी चालली असतानाच निक्सन माओ, ब्रेझनेव, याह्याखान, इंदिरा गांधी, गोल्डा मेयर, आसद, राजे हुसेन, अन्वर सादत, इत्यादींना भेटत होते, खुबीनं त्यांना राजकीय पटावर आणत होते.

वॉटरगेट आणि आंतरराष्ट्रीय सामोपचार. एकाच माणसाचे परस्पर विसंगत असे दोन चेहरे,

निक्सन यांची व्यक्तिरेखा वाचत असताना जगाचा एक मोठ्ठा पट किसींजर वाचकासमोर पसरतात.

गंमत म्हणजे त्यात कुठंही आपली स्वतःची टिर्री किसिंजर यांनी बडवलेली नाही.

धोरणं माझीच असतात असं निक्सन पत्रकारांना खाजगीत सांगत असत. त्यावरून बरेच वादही झालेले आहेत. परंतू त्याचा मागमूसही या लेखनात नाही, जे काही घडलं त्याचं सारं श्रेय किसिंजर निक्सन यांना देताना दिसतात.

।।

लीडरशिप.

लेखक हेन्री किसिंजर.

Comments are closed.