१९०९ सालचा दिवाळी अंक, मनोरंजन.

१९०९ सालचा दिवाळी अंक, मनोरंजन.

१९०९ साली प्रसिद्ध झालेल्या मनोरंजन या मासिकाच्या दिवाळी अंकाच्या काही प्रती सध्या पार्ल्यातल्या मॅजेस्टिक बुक डेपोत मिळत आहेत.

काशीनाथ रघुनाथ मित्र हे मनोरंजनचे संपादक प्रकाशक.  संपादक म्हणतात की मनोरंजनची ही१५ वी दिवाळी आहे. १९२ पानांचा मजकूर आणि २७ पानांची जाहिरात आहे.

 

अनेक मोठ्या लेखकांचे लेख यायचे राहिले, अनेकांचे लेख आले पण कंपोज व्हायचे राहिले, अनेकांचे लेख कंपोज झाले पण छपाईच्या वेळापत्रकात न बसल्यानं प्रसिद्ध करता आले नाहीत असं संपादकांनी लिहिलंय. निर्णय सागर, कर्नाटक प्रेस आणि बाँबे वैभव प्रेस या तीन छापखान्यांत अंकाची छपाई करावी लागली कारण इतक्या प्रती (म्हणजे किती ते कळत नाही) छापायच्या होत्या पण छापखान्यांची तितकी क्षमता नव्हती. तीनही छापखाने अपुरे पडले इतकी छपाईची ऑर्डर होती.

अंकाची किमत आहे एक रुपया. रजिस्ट्रेशन क्रमांक आहे Reg.No.B.165. हे रजिस्ट्रेशन मासिकांचं असावं. मनोरंजनच्या आधी १६४ नियतकालिकं रजिस्टर झाली असावित.

अंकात फोटो छापले आहेत. ते अशा माणसांचे. महाराष्ट्रातले कर्ते पुरुष, वृत्तपत्रकार, सुपुत्र, महिला, राजे आणि संस्थानिक, अस्पृश्य मानलेली मंडळी, ग्रंथकार, कवि, प्रमुख संस्थांचे पदाधिकारी, प्रसिद्ध वकील, प्रसिद्ध डॉक्टर,   ग्रंथप्रकाशक, प्रसिद्ध गृहस्थ, नाट्यकलेतील काही प्रसिद्ध गृहस्थ. महाराष्ट्रातली त्या काळातली मोठ्ठी मंडळी या चित्रांत दिसतात.

१९०९ च्या सुमारास महाराष्ट्रात काय घडत होतं याचा अंदाज दिवाळी अंकातल्या मजकुरावरून येतो. कविता सोडता बाकी सर्व मजकुरात तत्कालीन परिस्थिती आणि प्रश्नांचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. स्वातंत्र्य चळवळ सुरु झाली होती. ब्रिटिशांनी आणलेल्या विद्येचा प्रभाव जनतेवर पडला होता. मुलींचे अल्पवयीन विवाह, विधवा विवाह, जाती प्रथा, स्वदेशी, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा या विषयावर लेख आहेत. सुधारणांची मागणी करतांना इतर देशांकडं पहा असा सूर दिसतो. विशेषतः ब्रीटनकडे बोट दाखवलं जातं.

१९०९ च्या अंकात जागोजागी प्लेगचा संदर्भ येतो. विधवा विवाह झाले पाहिजेत या सुधारणेचा आग्रह करणाऱ्या लेखात वर्णन येतं ते प्लेगमुळं मेलेल्या तरूण माणसांचं. तरूण मेले आणि त्यांच्या अल्पवयीन किंवा तरूण बायका विधवा झाल्या. हज्जारोंच्या संख्येनं. मोठाच प्रश्न उभा राहिला. त्या काळात विधवा मुलगी घरी बाळगायला माणसं तयार होत नसत, अनेक कारणांसाठी. तेव्हां त्यांची लग्न करावीत अशी मागणी झाली. विधवाविवाहाला विरोध तर होताच.  विरोध धर्मशास्त्रानुसारही कसा चुकीचा आहे इत्यादी गोष्टी लेखामधे मांडण्यात आल्या आहेत. अंकात एक वधुवर सूचक मंडळाची जाहिरात आहे. त्यात म्हटलंय की प्लेगच्या साथीमुळं माणसं प्रवास करायला घाबरतात. त्यामुळं सोयरीक शोधण्यासाठी फिरणं बंद झालय आणि त्यामुळं लग्नही जमत नाहीयेत. यातून मार्ग असा की मंडळाकडं लोकांनी वधू आणि वराची माहिती कळवावी.

अंकात बालकवी आणि त्या काळातल्या गाजलेल्या कवींच्या कविता आहेत.ना गोखले,  रँगलर परांजपे, धोंडो केशव कर्वे, ना.वा.टिळक, न.चिं.केळकर, राजवाडे, श्रीपाद अच्युत कोल्हटकर, विठ्ठल रामजी शिंदे इत्यादी त्या काळातल्या समाजमान्य व्यक्तींचे लेख आहेत.

केळकर बाईंचा एक लेख आयांसाठी आहे. मुलं हल्ली कॉलेजात गेली रे गेली की भाषणं करू लागतात, चळवळीत भाग घेतात, प्रश्न विचारू लागतात, स्वातंत्र्याची मागणी करू लागतात हे लेखिकेला पसंत नाही. अशानं मुलं बिघडतात, तेव्हां त्यांना असले उद्योग आयांनी करू देऊ नयेत असं लेखिकेचं म्हणणं आहे. स्वातंत्र्याची, स्वदेशीची चळवळ सुरु झाल्यावर निर्माण झालेल्या वातावरणावरची ही एक प्रतिक्रिया आहे.

एका लेखाचा मुख्य विषय आहे थोरले रघोजी भोसले कधी वारले. इतिहासकार राजवाडे यांनी एका लेखात मृत्यूची तारीख ८ एप्रिल १७५३ अशी दिली होती. लेखकाच्या मते ती तारीख १४ फेब्रुवारी १७५५ अशी आहे. राजवाडे यांनी काही पुरावे दिले, त्यांचा उल्लेख  तीनेक ओळीत संपतो. लेखकानं दिलेले पुरावेही तीनेक ओळीत संपतात. म्हणजे फार तर फार सहा ओळी किंवा फार तर फार १०० शब्दांचा मजकुर असायला हवा. लेखकानं केवळ येवढ्या मुद्द्यात पाणी घालून सुमारे १७०० शब्दांचा लेख लिहिलाय. शिवाजी महाराज कसे थोर होते इथपासून लेखाची सुरवात होते. नंतर रघोजी भोसले आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यात कसे वितुष्ट होते व त्याचा परिणाम भारताच्या इतिहासावर झाला याबद्दलची लेखकाची मतं आहेत. राजवाडे हे कसे थोर इतिहासकार, लेखक, संशोधक, वक्ते आहेत इत्यादी गोष्टी त्यांनी शेकडो शब्दांत अशा रीतीनं दिल्या आहेत की त्यात राजवाडे यांचं कौतुक आहे की खडुसपणा आहे याचा गोंधळ होतो. तर असे हे महान राजवाडे चुकले, त्यांनी आपली चूक कबूल करावी असं लेखकाचं म्हणणं आहे. रघोजी भोसले हे थोर असल्यानं त्यांची जन्मतारीख अजिबात चुकता बिकता कामा नये, तारीख चुकणं म्हणजे अन्याय आहे अशी काहीतरी भावना या लेखात आहे. मूळ मुद्दा जन्मतारखेचा अचूकपणा, त्यात महाराष्ट्राचा इतिहास आणि राजवाड्यांची लायकी इत्यादी गोष्टी घुसडलेल्या.

अंकाचा एक विशेष म्हणजे पुस्तकातील जाहिरातीची २२ पानं.

दिवाळी अंकाच्या सुरवातीला, अजब ऐने महाल (८५० पृष्ठे)  आणि बहारदानीष अथवा बहराम जोहरा (२४० पृष्ठे), या कादंबऱ्यांची एक पानभर जाहिरात आहे.  या ११०० पृष्ठांच्या दोन पुस्तकांची किमत आहे ५ रुपये पण मार्गशीर्ष अखेर एकदम घेणाऱ्यास ती सव्वादोन रुपयास पडतील. व्हीपीनं २ रुपये १० आणे. ही पुस्तकं त्यातील अचाट कल्पनाशक्तीनं वाचकांचं मन वेधून घेतील, कधी वाचकांना सुखाच्या शिखरावर पोचवतील तर कधी संकटांच्या फेऱ्यात गेल्यासारखं वाटेल, तर कधी नीतितत्वांसारख्या विषयावर गंभीर चर्चा वाचतोय असं वाचकांना वाटेल तर कधी मौजेचे प्रसंग वाचून वाचक पोट धरधरून हसतील. … पुस्तक वाचून शेवटी न्याय्यपक्षाचाच विजय होतो, सन्मार्ग हाच सुखावह आहे, कुमार्ग दुःखपरिणामी आहे, इत्यादि अमोल नीतितत्वांचा ठसा आपल्या मुलामुलींच्या कोमल मनावर तुम्हास उमटवता येईल.

शिवाजी महाराजांचं मोठं चित्रं असलेलं एक पुस्तक आहे, इतिहाससंग्रह. त्यात जुनी जुनी ऐतिहासिक कागदपत्रं आहेत. महेश्वर दरबारची बातमीपत्रं, तंजावरचे राजघराणे, परराष्ट्रांच्या दरबारातील मराठ्यांचे वकील, ऐतिहासिक चरित्रे, जुन्या ऐतिहासिक गोष्टी, ऐतिहासिक चर्चा, इत्यादी विषयांवर स्वतंत्र पुस्तकंही आहेत आणि ती एकत्रितपणे छापलेलीही आहेत.

धर्म आणि अद्यात्म या विषयावरील पुस्तकांच्या अशा जाहिराती. दोन वेदांत पुस्तकं, तीन रुपयात. दोन रुपयात ४ वेदांत ग्रंथ. तीन रुपयात २ धर्मग्रंथ. ५ रुपयात ३ तात्विक ग्रंथ. ६ रुपयात तीन ऐतिहासिक ग्रंथ.

ब्रिटिशांशी संपर्क झाल्यामुळं जगातलं ज्ञान इंग्रजीद्वारे भारतात आलं. ते ज्ञान लोकांना मराठीत मिळावं यासाठी राष्ट्रकथामाला प्रसिद्ध झाली. त्यात इराण, तुर्कस्तान, कार्थेज, फ्रान्स, स्पॅनिश मूर लोक, जर्मनी, आशिरिया, रोम या विषयावरची पुस्तकं आहेत. एका जाहिरातीत एक सूचना आहे-वरील आठ ग्रंथांची किमत १४ रुपये होते परंतू ते एकत्रितपणे मागवल्यास किमत फक्त बारा रुपये पडेल.

दीड रुपयात ४ शास्त्रीय ग्रंथ या व्यवस्थेत जिराईत शेती, बागाईत शेती, कांच तयार करणं आणि धातुविषयक माहितीवर पुस्तकं आहेत. स्वतंत्रपणे व्यापारी भूगोल नावाचं पुस्तक ३ रुपयाला आहे.

साबू तयार करणे, २ रुपये.  मेणबत्त्या तयार करणं, दीड रुपया. बटण तयार करणं ४ आणे.

बिलियर्डस या खेळाचं मराठी नाव आहे चौरंगगोट्यांचा खेळ. त्या खेळाची माहिती व नियम वगैरे देणाऱ्या पुस्तकाची किमत आहे १२ आणे.

झाशीची राणी, महाराणी जमनाबाई गायकवाड, रामदासस्वामी, तुकाराम , सयाजीराव महाराज, गॅरीबाल्डी, लॉर्ड मेकॉले, अमीर अब्दुल रहमान यांची चरित्रं आहेत.

पाश्चिमात्य पाकशास्त्रावरचं पुस्तकंही साडेचार रुपयाला उपलब्ध आहे.

आठ आण्यात दीड रुपये किमतीच्या तीन गोष्टी अशी एक जाहिरात आहे. त्या जाहिरातीतला मजकूर असा- न्यू यॉर्क शहरात ‘ डिटेक्टिव्ह टेल्स ‘ म्हणून गुप्त पोलिसांच्या चातुर्याच्या अद्भुत गोष्टी इंग्रजीत अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत, व त्याच्या लक्षावधी प्रति खपत आहेत. त्या गोष्टींचा लाभ मराठी वाचकांस थोड्यात व्हावा म्हणून खालील तीन गोष्टी फक्त आठ आण्यात देण्याची योजना केली आहे. छपविलेले द्रव्य, गुप्तपोलिसबहाद्दर, गोपनस्फोट अथवा गुप्त पोलीसांचे चातुर्य.

एका दीड रुपया किमतीच्या पुस्तकाचं नाव आहे शारदा नाटकातील पदांचे नोटेशन. जाहिरातीतील तपशील असा. गाणारास आणि वाजविणारास तालसुरात गातां वाजविता यावे अशा प्रकारची नोटेशन्स प्रो. मौलाबक्ष यांनी केले, त्या नोटेशनांत, मुंबईतील शाळेचे प्रिंसिपाल  मि.जोशी व चित्रे यांनी देवलकृत शारदा नाटकांची पद्ये बसविली आहेत. या पुस्तकाच्या योगाने पेटी, सतार, ताऊस, फिडल यात शारदा नाटकातील पद्ये सहज वाजविता येतात.

एक  जाहिरात   राजवैद्य नारायणजी केशवजी यांनी लिहिलेल्या  वैद्यविद्या नावाच्या पुस्तकाची. पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली आणि इंग्रजी भाषेत. या पुस्तकात पानं किती याचा उल्लेख नाही. टपालखर्च किंवा कोणतीही किंमत न घेता राजवैद्य हे पुस्तक लोकांना फुकट वाटतात. आयुर्वेदोदय औषधालय-जामनगर-काठेवाड अगर २८६ काळबादेवी रोड-मुंबई या ठिकाणी ही पुस्तकं मिळतील  असं जाहिरातीत म्हटलं आहे.

अंक वाचल्यानंतर ठळकपणे मनावर ठसलेल्या काही गोष्टी अशा.

दिवाळी केव्हां येते हे पंचांगातून एक हजार वर्ष आधीपासून कळू शकतं. तरीही अंकांचा मजकूर येईपर्यंत दिवाळी उजाडते. नीट ठरवून, अमुक तारखेपर्यंतचेच लेख छापायचे ते ठरवून व मजकूर वेळेवर गोळा करून वेळेवर भरपूर प्रती छापणं ही गोष्ट मराठी लोकांना जमत नाही हे मनोरंजनच्या संपादकांच्या निवेदनावरून दिसतं.

संत, देवादिक, धार्मिक ग्रंथ, कीर्तनकार, प्रवचनकार, आई बाप इत्यादींनी  सत्कर्म वगैरेंचा  प्रचंड मारा मराठी जनांवर साताठशे वर्षं केला. शिवाजी महाराज, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड अशा लोकोत्तर राज्यप्रमुखांचे आदर्शही किती तरी म्हणजे किती तरी वर्षं जनतेसमोर आहेत. तरीही १९०९ साली तेच विषय लोकांसमोर दिवाळी अंकातून मांडावे लागतात आणि २०१७ सालीही तेच विषय सांगावे लागत आहेत. मनोरंजनच्या अंकाला १०७ वर्षं झाली तरीही गावोगाव महाराज, बुवा, प्रवचनकार इत्यादी मंडळी आश्रमातून, वाऱ्यांमधून, टीव्हीमधून तेच संदेश देत आहेत.

गंमत म्हणजे लोकांना सत्कर्माचा संदेश देण्यासाठी फारसी ग्रंथही प्रसिद्ध करावे लागतात.

विषय सोडून, भावनांना हात घालून चर्चा कुटत बसायची महाराष्ट्राची सवय किती जुनी आहे याचा प्रत्यय १९०९ सालच्या दिवाळी अंकातून येतो.

।।

 

 

4 thoughts on “१९०९ सालचा दिवाळी अंक, मनोरंजन.

  1. Dear Nilubhau,
    I know you since over forty years. You usewd to write in Maha times, lokasatta etc. Your one friend, Panvalkar used stay in parle, navprabhat scty. where we stayed.
    My father was GM, raw materials. at MSSIDC. You had written an article on MSSIDC corruption. So Mr Ashok Panvalkar had called his brother and requested him to contact you. In 1977 my father resigned from the post. This caused a great change in our life.
    Any how, pleased to read your blog.

  2. Thanks sir for letting us know the social, political environment of that time.I firmly believe that those days were really great, people were simple and peace loving.My age is 28 and just imagining of that era feels wonderful.I always try to find such articles which are from these era’s. Although by seeing the Diwali ank, not many things have changed since then, I believe. Nevertheless thanks for the information

  3. Thanks for favourably considering my request to include my name. The articles are very informative and enable us to update.wish you All the Best and regards, S.G.Vaidya

  4. सर,तुम्ही १९०९ च्या मनोरंजन या दिवाळी अंकाबद्दल सविस्तर लिहून १९०९ सालात गेल्याचा भास झाला..
    छान वाटलं ..असचं लिहित रहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *