१९३० सालचा चित्रपट. आजही आवडतो.

१९३० सालचा चित्रपट. आजही आवडतो.

‘ऑल दी क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट ‘  १९३०.

हां. विषय  २०२३ साली ऑस्कर मिळवलेल्या ‘ऑल दी क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट ‘ चा नाहीये.

विषय आहे  १९३० साली झालेल्या ‘ऑल दी क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट’ चा. दोन्ही फिल्मचं कथानक एकच आहे. ज्या पुस्तकावरून चित्रपट रचलाय ते पुस्तकही एकच आहे. फक्त चित्रपटाला दिलेली ट्रीटमेंट वेगळी आहे, चित्रपटाची हाताळणी आणि शैली वेगळी आहे.

पॉल, कॅट व इतर तरूण राष्ट्रवादानं भारून जातात, युद्धावर जातात. पॉल, कॅट (व इतर १.७ कोटी माणसं) अतोनात हाल सहन करून मरतात. २०२३ चा चित्रपट पॉलचं मरण दाखवून संपतो.

 १९३० च्या चित्रपटात पॉल युद्धावरून सुटीसाठी घरी परततो. परतल्यावर तो गावातल्या लोकांना युद्ध किती भयानक आणि अमानुष असतं ते सांगतो, युद्ध नको असं म्हणतो. गावकरी त्याला भ्याड आणि पळपुटा ठरवतात. त्यांना युद्धज्वर झालेला असतो. गावकरी त्याला पुन्हा युद्धात लोटतात. हा भाग २०२३ च्या चित्रपटात दाखवलेला नाही.

१९३० च्या चित्रपटात युद्धाची दृश्यं आहेतच. २०२३ मधल्या चित्रपटातली हेलावून टाकणारी दृश्य १९३० च्या चित्रपटातही आहेत. 

 १९३० च्या चित्रपटात बरीच वेगळी दृश्य आहेत.

माणसं युद्धाबद्दल बोलताना दिसतात. झाडाखाली बसून, बराकीत, खंदकात सैनिक बसलेले असतात, बोलतात, त्यातून युद्धाचा अर्थ समजतो. समजा युद्ध दाखवलंच नसतं आणि ही संभाषणं दाखवली असती तरी चाललं असतं इतकी ही संभाषणं बोलकी आहेत.

झाडाखाली सैनिक बसलेत. त्यांना प्रश्न पडलाय की युद्ध कां होतं?

संवाद असा.

एक देश दुसऱ्या देशाचा अपमान करत असावा.

म्हणजे एका देशातला डोंगर दुसऱ्या देशातल्या शेताचा अपमान करतो की काय?

नाही नाही. राजाला युद्ध हवं असतं.  कारण युद्ध केलं की तो फेमस होतो.

नाही नाही. युद्ध उद्योगपतीना हवं असणार. कारण युद्ध झालं की त्यांनी तयार केलेल्या वस्तू खपतात.

मला वाटतं की युद्ध हे तापासारखं अचानक उपटतं.

पण युद्ध करण्यासाठी माणसांना मारण्याची काय आवश्यकता आहे. माझ्या डोक्यात एक उपाय आहे. एक मोठ्ठं मैदान घ्यावं. त्याला एक कुंपण घालावं.  राजे, त्यांची मंत्रीमंडळं, त्यांचे मंत्री, त्यांचे सेनापती इत्यादींना त्यांच्या अंडरवेअरवर  मैदानात कोंबावं, त्यांच्या हातात सोटे द्यावे. त्यांनी मारामारी करावी. कोणी तरी जिंकेल. कोणी तरी हरेल. झाली लढाई. कशाला त्यासाठी लाखो लोकांना मारायचं?

एका तरुण सैनिकाला लढाईच्या पहिल्याच दिवशी पँटमधे सू होते. सीनियर सैनिक सांगतो ‘अरे प्रत्येकावर हा प्रसंग येतो. माझंही तसंच झालं होतं. उद्या अधिक अंडरवेअर घेऊन ये.’

पॉल हा सैनिक. युद्धावरून परततो. आपल्याच शाळेतल्या मुलांना सांगतो की युद्ध ही काही फार चांगली गोष्ट नसते, सैनिकाला तिथं फार सहन करावं लागतं. तरूणांच्या डोक्यात देशप्रेम घुसलेलं असतं, त्यांना पॉल पळपुटा आणि घाबरट वाटतो. 

एका बारमधे पॉलला नागरीक भेटतात. युद्धामुळं गावात वस्तूंचा तुटवडा झालेला असतो. नागरीक पॉलला सांगतात की तुम्हा सैनिकांची मजा असते, तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं मिळतात. पॉल सांगतो की आम्हाला कित्येक दिवस उपाशी रहावं लागतं, चिखलात माखलेला पाव खावा लागतो. त्यावर नागरीक म्हणतात की काळजी करू नकोस आता सैनिकांना अधिक चांगल्या वस्तू मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तू आघाडीवर जा. पॅरिस काबीज कर.

तोफगोळे कोसळत असतात, सैनिक पत्त्यांचा जुगार खेळत असतात.

एका प्रसंगात जर्मन सैनिक फ्रेंच सैनिकाला भोसकून ठार मारतो, नंतर त्याला वाईट वाटतं. आपल्याला माहितही नसलेला माणूस आपला शत्रू होतो याचं त्याला वाईट वाटतं, त्या मेलेल्या सैनिकाची तो क्षमा मागतो.

दुसऱ्या प्रसंगात जर्मन सैनिक गोळी झाडतो. फ्रेंच सैनिकाला गोळी लागते. सैनिक हवेत उडतो आणि मरून पडतो. जर्मन सैनिक आनंदतो, किती छान मेला असं म्हणतो. जास्त सैनिक मारले की त्याला अधीक पदकं मिळणार असतात.

चित्रपट अशा छोटछोट्या प्रसंगांनी भरलेला आहे. प्रसंगांमधे माणसं बोलत असतात. संवाद असतात, संभाषणं असतात. अगदी सुरवातीच्याच दृश्यात शाळेतला एक मास्तर देशप्रेमाचं एक भाषण देतो. लांबलचक. सिनेमाच्या भाषेत इतकं दीर्घ बोलणं बसत नाही. पण एकोणीसशे तीसच्या जमान्यात दृश्यभाषेपेक्षा संवादातूनच गोष्ट लोकांपर्यंत पोचत असे.

चित्रपट हे माध्यम सुरु होण्याआधी समाजाला नाटक माहित होतं, लोकनाट्यं माहीत होती, लोककला माहित होत्या. तिथं संवाद असतात, माणसं बोलतात. दीर्घ स्वगतं असत, दीर्घ भाषणं असत. कारण लोकांना तीच कथनाची पूर्वापारपासून चालत आलेली पद्धत माहित होती. १९३० च्या चित्रपटावर त्या शैलीचा प्रभाव होता.

कॅमेऱ्यानं कथनामधे प्रवेश केला आणि कला कायच्या कायच बदलली. कथन बोलणं-संवाद याकडून दृश्याकडं सरकलं. असं म्हणता येईल की १९३० ही विभाजक रेघ होती. कारण त्याच वर्षी हिचकॉक पडद्यावर आला होता. त्याच वर्षी हिचकॉकची मर्डर ही फिल्म प्रदर्शित झाली होती. गाजली होती. हिचकॉकच्या चित्रपटात माणसं कमी बोलत असत, घटना दिसत.

‘ऑल दी क्वाएट’मधे संवाद आहेत, नाटकात असावीत तशी पाच सात माणसं एकत्र येऊन चर्चा करतात. पण तरीही चित्रपट कंटाळवाणा होत नाही.   प्रत्यक्ष युद्धापेक्षा त्यातल्या माणसांच्या वर्तनावरून युद्धाची भीषणता लक्षात येते.

युद्धावर गेलेल्या लोकांना मरायचं नसतं. त्यांना मरायला भाग पाडलेलं असतं. संदेशांचा इतका मारा त्या माणसावर केला जातो की शेवटी त्याला युद्ध आवडायला लागतं.

१९३० च्या चित्रपटात समूह दृश्यं अर्थातच आहेत. पण एक दोन माणसं, पाच दहा माणसांचा गट चित्रपटात दिसतात. जवळून दिसतात, आपल्या जवळ येऊन बोलतात. चिखलात पडलेली शेकडो प्रेतं दिसतात पण त्या बरोबरच दोन माणसांचे चेहरे अगदी जवळून दिसतात. या माणसांच्या बोलण्यातून, चेहऱ्यावरून युद्धाची भीषणता लक्षात येते. नाटकांच्या जमान्यात पाच सात पात्रं मंचावर उभी राहून बोलून जगाचं वर्णन करत. ते आपल्याला पुरेसं होतं. ते जितकं प्रभावी होतं तितकीच १९३० च्या चित्रपटातली संभाषणं प्रभावी आहेत.

ब्लॅक अँड व्हाईट चित्रीकरण. अगदी साधं. सरळ रेषेत जाणारं. त्यातलं सरळपण, त्यातलं साधेपण खिळवून ठेवतं.

मी हा चित्रपट लॅपटॉवर चार वेळा पाहिला. थांबवत थांबवत पाहिला. थांबून सबटायटल वाचत पाहिला. थांबवून सैनिकांचं रांगडेपण आणि बेरकीपण निरखत पाहिला.

साधेपणातही गंमत असते, ताकद असते असं राहून राहून वाटलं.

।।

All The Quiet On The Western Front.

1930.

Comments are closed.