इस्रायल-लेबनॉन तणाव

इस्रायल-लेबनॉन तणाव

 गोलन हाईट्स या इसरायली विभागात, मजदाल शाम्स या शहरात, सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी एक रॉकेट कोसळलं. शहराच्या दाटीवाटीच्या वस्तीत असलेल्या खेळाच्या मैदानात. मुलं खेळत होती. 

रॉकेट येताय असं सांगणारा सायरन वाजला. सायरन वाजला की पळायचं, सुरक्षित ठिकाणाचा आश्रय घ्यायचा हे मुलांना माहित होतं. मुलं साधारणपणे १० ते १६ वर्षं या वयोगटातली होती.

मैदानाला तीन पुरुष उंचीचं जाळीचं कुंपण होतं. त्यातून बाहेर पडून जवळ असलेल्या इमारतींमधे जावं लागणार होतं. काही मिनिटं सहज लागली असती.काही मुलांनी पळायची तयारी केली. काही मुलं कदाचित सायरनकडं दुर्लक्ष करून रेंगाळली. अनेक वेळा सायरन वाजतो पण रॉकेट येतंच नाही असाही अनुभव अनेक वेळा आलाय.

सायरन वाजतोय, थांबतोय तेवढ्यात रॉकेट कोसळलं. 

आसपासची माणसं धावली. काही मुलं जिवंत असणार, विव्हळत किंवा बेशुद्ध. त्यांना हॉस्पिटलात नेलं गेलं. संख्या? कळलेली नाही.

१२ मुलं मेली.

रॉकेट आलं लेबनॉनमधून.

रॉकेटं इराणी बनावटीचं होतं.

हेझबुल्ला या संघटनेच्या प्रमुखानं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

#

गोलन टेकड्या हा इसरायलचा विभाग उत्तरेला आहे. त्याच्या उत्तरेला लेबनॉन आहे आणि पूर्वेला सीरिया आहे. लेबनॉन आणि सीरिया हे इसरायलचे शत्रू आहेत. या दोन शत्रूना इराण हा शत्रू मदत करत असतो. इराणचे हस्तक, पैसे, शस्त्रं लेबनॉन आणि सीरियात आहेत. पैकी सीरिया सध्या थंड आहे पण लेबनॉन आणि इसरायल यांच्यात सतत हाणामारी चाललेली असते. 

हेझबुल्लानं जबाबदारी नाकारली खरी पण ते खरं नाही, हेझबुल्लाच्याच लोकांनी वरील रॉकेट गोलन टेकडीत सोडलं होतं. हेझबुल्ला ही शिया संघटना आहे, ती निवडणुका लढवते आणि दहशतवादी उद्योगही करत असते. हेझबुल्लाला इराणची मदत असते.  

गोलन टेकड्या या उंचीवरच्या भूभागातून खाली इसरायलवर बाँब-रॉकेट हल्ले करणं सोपं जातं.   १९६७ सालच्या युद्धात इसरायलनं सीरियाबरोबरच्या लढाईत हा विभाग बळकावला, ताब्यात घेतला. वीसेक गाव वस्त्या या भूभागात आहेत. १९८१ साली इसरायलनं गोलन टेकड्या इसरायलचा भाग करून टाकल्या. आपल्या संरक्षणासाठी हा भाग आपल्या ताब्यात असल्या पाहिजे असं इसरायलचा दावा होता. सीरिया आणि लेबनॉन या टेकड्यांवरून नेहमी इसरायलवर हल्ले करत असत.

इसरायलच्या या कारवाईला जगात कोणीही मान्यता दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय नियमानुसार तो भाग सीरियाचा आहे. अलीकडंच ट्रंपनी आपल्या अध्यक्षीय अधिकारात गोलन हाईट्स हा इसरायलचा विभाग असल्याचं जाहीर केलं. पण ही अध्यक्षीय कारवाई आहे, अमेरिकन लोकसभेनं त्यावर शिक्का मोर्तब केलेलं नाही.

मजदाल शाम्स आणि इतर वीसेक खेडी अरब आहेत. ड्रुझ पंथाचे इस्माइली अरब या खेड्यांत रहातात. इसरायलनं अनेक ज्यू नागरीक तिथं नेऊन वसवले आहेत. बाहेरून माणसं पेरून व वसवून तो विभाग इसरायली करून टाकण्याचं इसरायचं धोरण आहे. ड्रुझ लोकांपैकी अनेकांनी इसरायलचं नागरीकत्व घेतलं आहे. ज्यू धर्माचं वैशिष्ट्य असं की तो धर्म इतर कुठल्याही ज्यू नसलेल्या माणसाला कोणताही विधी करून स्वीकारता येत नाही. त्यामुळं ड्रुझ माणसं इसरायलची नागरीक झाली तरी ज्यू नसतात, इसरायलला परकी असतात.

  इसरायल आणि लेबनॉन यांच्यातलं वितुष्ट बरंच जुनं आहे. २००६ साली लेबनॉननं गोलन टेकड्यांवर  हल्ला केला होता. सुमारे १०५ इसरायली नागरीक मेले. इसरायलनं प्रतिहल्ला केला आणि १५०० लेबनीज मारले.

७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासनं इसरायलमधे घुसून माणसं मारली, ओलिस ठेवली, इसरायलनं गाझा कारवाई सुरु केली. त्यानंतर गाझातल्या कारवाईचा निषेध म्हणून लेबनॉन इसरायलवर रॉकेटं फेकत असतं. रॉकेटं आणि ड्रोन. परंतू लेहनॉनच्या वरील शस्त्रांमधे अचूकती नाही आणि ती अगदीच जेमतेम प्रभावी असतात. त्या मानानं इसरायलची शस्त्रं आणि निरोधक यंत्रणा किती तरी अधिक प्रभावी आहे. त्यामुळं लेबनॉनकडून होणारे हल्ले माफकच ठरतात. 

हा हल्ला झाला तेव्हां नेतान्याहू अमेरिकेत होते. अध्यक्ष बायडन, संभाव्य अध्यक्ष कमला हॅरिस, माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांच्याशी बोलण्यासाठी नेतान्याहू अमेरिकेत पोचले होते. त्यांच्यासमोर आणि अमेरिकेच्या संसदेसमोर नेतान्याहूना इसरायलची भूमिका मांडायची होती आणि त्या सर्वांकडून मान्यता मिळवायची होती. 

 हा दौरा सुरु असतानाच मजदालची घटना २७ जुलै रोजी घडली. 

एका परीनं मजदाल घटना ही गाझामधल्या २५ जुलै रोजी घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होता. त्या दिवशी गाझातल्या खान युनूसमधल्या एका भागात इसरायलनं कारवाई केली. पायी चालणारे सैनिक, रणगाडे, चिलखती गाड्या आणि हेलिकॉप्टर्स यांचा संयुक्त वापर करून इसरायलचे सैनिक एका जागी पोचले. तिथं खाली २२० मीटर लांब आणि २० मीटर खोल भुयार होतं, त्या भुयारात अनेक खोल्या बांधलेल्या होत्या. त्या खोल्यांत हमासनं ओलीस लपवून ठेवलेले होते.

भुयारापर्यंत पोचत असताना वाटेत आडवे आलेले गाझाचे सैनिक आणि नागरीक यांच्यावर सैनिकांनी गोळीबार केला. वाटसरू, रूग्णवाहिका, कोणालाही सैनिकांनी सोडलं नाही. या खटाटोपात गाझातली १७ माणसं मेली. इसरायलचं म्हणणं की मेले ते लोक हमासचे दहशतवादी होते. पण मृतांचे फोटो सांगतात की त्यात काही छोटी मुलंही होती. 

इसरायली सैनिकांनी पाच ओलीस बाहेर काढले. इसरायलमधे नेले. पाचही जण मृत होते. ते आधीच मेलेले होते की कारवाईच्या दरम्यान मेले ते कळलेलं नाही.

दोन्ही घटना घडल्या तेव्हां नेतान्याहू अमेरिकेत होते. त्यांनी संसदेसमोर सांगितलं की हमास पुर्ण संपवल्याशिवाय आणि सर्व ओलीस ताब्यात घेतल्याशिवाय कारवाई थांबणार नाही. एकूण सुमारे २५० ओलीस मिळवण्यासाठी २५ जुलैपर्यंत गाझामधे इसरायलनं ३९ हजार १७५ माणसं मारलीत. 

नेतान्याहू पत्रकारांशी बोलत होते तेव्हां त्यांच्यासमोर अमेरिकेत वास्तव्य असणारे काही ज्यू निदर्शनं करत होते. त्यांच्यापैकी काही व्यक्तींचे नातेवाईक अजूनही हमासच्या ताब्यात होते. नेतान्याहूनी हमासशी वाटाघाटी करून उरलेल्यांची सुटका करावी अशी मागणी ते करत होते. युद्ध थांबवा ही त्यांची मागणी होती. 

बहुसंख्य इसरायली नागरीक म्हणतात की हमास हा मुद्दा बाजूला ठेवून आधी ओलीस सोडवावेत. कारण हमास संपणं शक्य नाही. हमास आणि इसरायलमधलं वितुष्ट खूप जुनं आहे. हमास आणि इसरायल दोघांनाही सार्वभौम आणि सुरक्षित देश हवाय. पण ते शक्य होत नाहीये. त्यामुळं हमास उद्योग करत रहाणार, इसरायल प्रतिहल्ले करत रहाणार, हे दुष्टचक्र सुरु रहाणार. काहीही करा पण ओलिसाना सोडवा असं बहुतांश इसरायलींचं म्हणणं आहे.

नेतान्याहू त्यांच्या देशात पेचात आहेत. लोकमत त्यांच्या विरोधात आहे. इसरायलचं संरक्षण महत्वाचं आहे, हमासशी लढलं पाहिजे याबद्दल लोकामधे दुमत नाही. पण नेतान्याहू दुराग्रही आहेत, गाझा कारवाई करून ते स्वतःचं राजकीय भविष्य सुरक्षित करत आहेत असं लोकांना वाटतंय. इसरायलच्या राजकारणात टिकायचं असेल तर उजव्या देशीवाद्यांचा पाठिंबा त्याना आवश्यक आहे. युद्ध करून उजव्यांचं सहकार्य मिळेल असं नेतान्याहूना वाटतंय.

परंतू त्यांच्याच पक्षातले मध्यम मार्गी आणि उदारमतवादी वेगळ्या मताचे आहेत. उदा. त्यांचे एकेकाळचे सहकारी माजी सरसेनापती गँझ. गाझा युद्ध थांबवलं पाहिजे आणि इसरायलचं भविष्यतालं धोरण स्पष्ट झालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. पण दोन्ही बाबतीत नेतान्याहू काही बोलायला तयार नाहीत. म्हणनच तर गँझ यांनी मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला.

अमेरिकेत बायडन म्हणत आलेत की अमेरिकेचा  इसरायलला भक्कम पाठिंबा राहील. पण गाझा कारवाई थांबवली पाहिजे असंही बायडन म्हणतात. बायडननी इसरायलला केला जाणारा शस्त्रांचा पुरवठा काही दिवस रोखून ठेवला होता, नेतान्याहूवर दबाव आणण्यासाठी. बायडन आता राष्ट्रपती रहाणार नाहीत, कदाचीत हॅरिस राष्ट्रपती होतील. हॅरिस नेतान्याहूंवर अधिक दबाव आणतील अशी एक शक्यता दिसतेय. 

   ट्रंप अध्यक्ष झाले तर? नेतान्याहू खुष व्हायला हवेत कारण त्यांचा नेतान्याहूना पाठिंबा आहे. पण ट्रंप बदलत आहेत काय याचाही अंदाज नेतान्याहू घेत आहेत. नेतान्याहू अमेरिकेत येण्याआधी काही दिवस ट्रंप यांनी फॉक्स या ट्रंप समर्थक वाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की अमेरिकेत आणि जगभर नेतान्याहूना विरोध वाढत चाललाय, नेतान्याहूनी यातून धडा घ्यावा आणि युद्ध लवकरच आवरावं.

ब्रीटनमधे स्टार्मर पंतप्रधान झाले आहेत. ते गाझा कारवाईच्या विरोधातच आहेत. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय कोर्टानं इसरायलची गाझातली कारवाई अमानुष होती असा ठपका इसरायलवर ठेवला आणि नेतान्याहूवर एक अटक वॉरंट (प्रतिकात्मक) काढलं. कोर्टाच्या या निर्णयाला स्टार्मर यांचा पाठिंबा आहे. इसरायलला दिली जाणारी शस्त्रं कदाचित स्टार्मर रोखतील अशीही चिन्हं आहे. जर्मनी, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स इत्यादी देशही युद्ध थांबवावं म्हणत आहेत.

अशा परिस्थितीत  स्थिती चाचपण्यासाठी नेतान्याहू अमेरिकेत गेले होते.

गोलन टेकड्यावरच्या हल्लयानंतर नेतान्याहूनी दौरा स्थगित केला आणि इसरायलमधे परतले. अमेरिकेचे मुत्सद्दी लेबनॉन आणि इसरायलला सांगत होते की गोलन टेकड्या हल्ल्यानंतर परिस्थिती चिघळू नये याची काळजी दोघानीही घ्यावी. पण नेतान्याहू इसरायलमधे परतले आणि लगेच लेबनॉवर इसरायलनं हल्ला केला. 

।।

Comments are closed.