सद्दाम
सद्दाम हुसैन, इराक आणि अमेरिका.
❖
पुस्तक The Achilles Trap: Saddam Hussein, the United States and the Middle East
लेखक Steve Coll.
प्रकाशक Allen Lane
❖
सद्दाम हुसैन म्हटल्यावर त्याची शारीरिक छबी डोळ्यासमोर येईलच असं नाही, पण त्यांचं शब्दचित्र पटकन डोळ्यासमोर येतं. एक हुकूमशहा. एक क्रूरकर्मा. वयाच्या विसाव्या वर्षी सद्दाम हुसैनचा बाथ या राजकीय पक्षात प्रवेश झाला तोच मुळी एक असॅसिन, खुनी, म्हणून. पुढं इराकचा प्रेसिडेंट होण्यापर्यंतच्या वाटचालीत त्यानं किती माणसं मारली असतील ते मोजणंही कठीण.
असा हा सद्दाम हुसैन उत्तम वाचक होता. साहित्याचा चांगला वाचक होता. अरब आणि इंग्रजी साहित्याचं त्याचं वाचन होतं. अर्नेस्ट हेमिंग्वे हा त्याचा आवडता लेखक, हेमिंग्वेची सर्व पुस्तकं त्यानं वाचली होती. अमेरिकेचे रणगाडे बगदादमधे घुसले तेव्हां सद्दाम आपल्या घरात त्याच्या कादंबरीवर शेवटला हात फिरवत होता. ती त्याची शेवटली कादंबरी, नंतरची कादंबरी लिहायला तो जिवंत राहिला नव्हता.कवितेवर त्याचं प्रेम होतं. मरण्याच्या आधी काही दिवस तुरुंगवासात असताना, फाशी होणार हे नक्की असताना आणि फाशीची तारीख तेवढी पक्की होणं बाकी असताना, सद्दाम कविता वाचत होता, कविता करत होता; परदेशात असलेल्या मुलीकडून त्यानं इब्न खलदून या इस्लामी विचारवंताची पुस्तकं मागवून घेतली.
एकदा सद्दाम टीव्हीवरचा कार्यक्रम पहात होता. सादरकर्त्याच्या बोलण्यात व्याकरणाच्या चुका झाल्या. सद्दामनं प्रसारण मंत्र्याला फोन केला आणि त्या सादरकर्त्याला सहा महिन्यासाठी निलंबित करायला लावलं.
सद्दामनं काही कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्याची एक कादंबरी आत्मचरित्रपर होती. १९८० नंतर इराणशी युद्ध आरंभलं असताना त्याच काळात तो त्याच्या कादंबरीची प्रुफं तपासत होता.
सद्दामनं लिहिलेल्या साहित्याचं संकलन प्रसिद्ध आहे, त्याच्या साहित्याचे १८ खंड आहेत.
स्टालीन उत्तम वाचक होता, अनंत पुस्तकांमधल्या अमूक पुस्तकात अमूक पानावर अमूक मजकूर आहे असं तो धडाधड सांगत असे.
क्रूर आणि तरल असे दोन पैलू एकाच माणसात नांदत असतात हे आपल्याला समजतं तेव्हां आपली मती गुंग होते, टोटल लागत नाही. अशा माणसांपैकी सद्दाम हा एक.
प्रस्तुत पुस्तक सद्दाम हुसैनचं चरित्र नाही, पुस्तकाच्या ओघात त्याच्या चरित्राचे अनेक पैलू वाचकासमोर येतात.
प्रस्तुत पुस्तकाचा विषय सद्दामची राजवट आणि अमेरिकेचं धोरण यातला संबंध असा आहे. अमेरिकेला मध्यपूर्व आखाती प्रदेशाचं राजकारण करायचं होतं. त्या राजकारणात अमेरिका कोणाला जवळ करत असे, कोणाला दूर ढकलत असे. सद्दामच्या आधी सत्तेवर असलेली कम्युनिष्ट राजवट अमेरिकेला उलथवायची होती. ती उलथवण्यासाठी अमेरिकेनं बाथ पार्टीला मदत केली, त्या ओघात सद्दाम बाथचा नेता आणि प्रेसिडेंट झाला.
प्रसिडेंट झाल्या झाल्या सद्दामनं इराण विरोधात युद्ध आरंभलं. या युद्धाला अमेरिकेची चिथावणी होती. सीआयए इराकला इंटेलिजन्स पुरवत होतं, नंतर नंतर अमेरिकेनं सद्दामला शस्त्रंही पुरवली.
युद्धात प्रचंड मार खाल्ल्यावर सद्दामनं कुवैतवर आक्रमण केलं. सद्दामच्या हालचाली अमेरिकन मुत्सद्द्यांना दिसत होत्या. इराक इराण युद्धानंतर जगाचं राजकारण बदललं होतं, सोवियेत युनियन मोडलं होतं. अमेरिकेचा इराकमधला इंटरेस्ट कमी झाला. सद्दाम कुवैतवर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे याचा इंटेलिजन्स मिळूनही अमेरिकेनं दुर्लक्ष केलं. आक्रमण झाल्यावर अमेरिकेला कारवाई करणं भाग होतं, कारण कुवैत हा अमेरिकेचा मित्र देश होता, तेलाचं भांडार होतं.
१९८९ पर्यंत इराकला शस्त्रं पुरवली आणि १९९१ मधे त्याच इराकवर अमेरिकनं हल्ला केला, इराकचं कंबरडं मोडलं.
१९९१ नंतर अमेरिकेला साक्षात्कार झाला की सद्दाम हा हुकूमशहा आहे आणि तो अण्वस्त्रं तयार करतोय. तेव्हां सद्दामची राजवट उलथवली पाहिजे असं अमेरिकेनं ठरवलं. सद्दामनं हुशारीनं आधीच अण्वस्त्रं निर्मिती बंद केली होती, अणुवर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा बंद केल्या होत्या. तरीही अमेरिकेनं धोषा लावला की इराककडं संहारक शस्त्रं आहे. माणसं पाठवून तपासणी केली, काहीही सापडलं नाही.
निर्णय तर झाला होता की सद्दामची राजवट उलथवायची. ११ सप्टेंबरची घटना हे निमित्त मिळालं. अमेरिकेनं लष्करी कारवाई केली, इराक ताब्यात घेतलं, इराकवर आपलं बाहुलं बसवलं आणि सद्दामला फाशी दिली.
त्या खटाटोपात इराकचं सरकार बरखास्त केलं, इराकचं सैन्य बरखास्त केलं. त्यातून झालेल्या पोकळीत इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा उदय आणि विकास झाला. आक्रमण आणि नंतरच्या काळात २ लाख इराकी नागरीक मारले गेले, मेलेले सैनिक वेगळेच. खुद्द अमेरिकेचे ४४ हजार सैनिक मेले.
स्टीव कोल यांनी पुस्तकात इराकमधल्या कारवाईबद्दल खूप सविस्तर माहिती पुस्तकात मांडली आहे. कोल हे कसलेले पत्रकार आहेत. विषयाच्या खोलात ते जातात, विषयाच्या सर्व बाजू मांडतात. सरकारच्या दफ्तरात दडलेली माहिती ते वापरतात, सरकारं कशी चालतात याचा पत्ता वाचकाला लागतो.
एक उदाहरण. सद्दानं इराणशी युद्ध सुरु केलं तर त्याला आपला आक्षेप असायचं कारण नाही असं अमेरिकेचे संरक्षण सल्लागार ब्रेझिन्सकी आणि मावळते प्रेसिडेंट जिमी कार्टर यांना सांगितलं होतं. कार्टरनी मान डोलावली होती. ही नोंद मध्य पूर्व या विषयीचा फायलीत जाण्याऐवजी चीनच्या फायलीत गेल्यामुळं लपून राहिली.
कोल यांचे सरकारात खोलवर संबंध आहेत. मंत्री, लष्करी अधिकारी, राजदूत, प्रेसिडेंट त्यांच्याशी खाजगीत बोलतात. तिथून माहितीचे अनेक उगम त्यांना सापडतात. घोस्ट वॉर्स, डिरेक्टरेट, प्रायव्हेट एंपायर ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं. बिन लादेन यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं तपशीलवार चरित्र कोल यांनी लिहिलं आहे.
।।