झाऊ एनलाय यांचं ताजं चरित्र

⚛️

पुस्तक      Zhou Enlai : A Life

लेखक       Chen Jian

प्रकाशक    Harvard

⚛️

झू एनलाय (पूर्वी चाऊ एन लाय म्हणत) यांचं एक नवं चरित्र प्रकाशित झालं आहे. झू (१८९८-१९७६) माओ झेडाँग (पूर्वी माओ त्से तुंग म्हणत) यांचे सहकारी होते, चीनचे पंतप्रधान आणि परदेश मंत्री होते. चीनमधलं सिविल वॉर, स्वातंत्र्य लढा, कम्युनिष्ट पक्षाची स्थापना आणि चळवळ, माओ झेडाँग यांची राजवट या सर्व घटनाचक्रामधे झू सक्रीय होते. तो सर्व काळ लेखकानं पुस्तकात मांडला आहे, अर्थात झू यांना केंद्रस्थानी ठेवून.

झू यांचं जीवन असं पुस्तकाचं शीर्षक असलं तरी पुस्तकाचा मुख्य मुद्दा माओ झेडाँग आणि झू एनलाय यांच्यातले संबंध हे आहे. 

झू जपानमधे असताना १९१९ साली  कम्युनिष्ट झाले. १९२२ साली ते माओंसोबत काम करू लागले. १९७६ च्या जानेवारीत झू निधन पावले आणि त्याच साली सप्टेंबरमधे माओचं निधन झालं. १९२२ ते १९७६ या काळात माओ आणि झू एकत्रच वाढले.

माओनी चिनी कम्युनिष्ट पार्टी जन्माला घातली, तिचे ते चेअरमन झाले, नंतर ते चीनचे चेअयरमन होते, सर्वोच्च पदावर होते. चीनचं सरकार, चीनचं लष्कर आणि चिनी कम्युनिष्ट पार्टी या तीनही संघटनांचे माओ प्रमुख होते. त्यांच्या कारकीर्दीत शेवटपर्यंत झू माओसोबत होते.

माओ कंप्लीट हुकूमशहा होते. क्रूर होते. पक्षात, सरकारात ज्यांच्याशी त्यांचं पटलं नाही ती बहुतेक माणसं तुरुंग,छळ आणि मरणाची वाटेकरू ठरली. त्यांच्या सत्तेला आव्हान दिलं की माणूस खल्लास. झू यांचे विचार आणि व्यक्तिमत्व माओपेक्षा वेगळं होतं, तरीही झू कसे जिवंत राहिले? आपले शत्रू हुडकण्यायासाठी माओनी शंभर फुलं फुलू द्यात अशी मोहिम काढली. त्यात पक्षातल्या प्रत्येक व्यक्तिनं स्वतःतले दोष शोधायचे, मान्य करायचे, जाहीर करायचे अशी कल्पना होती.  

काही बावळट कार्यकर्ते गंडले, त्यांनी आपले दोष कबूल केले, माओनी त्यांचा काटा काढला. झू यांनाही कबूली द्यावी लागली. माओनी त्यांची बदली करून एक छोटीशी शिक्षा दिली, पण तेवढ्यावरच थांबलं.

लिऊ शाओची हे माओचे जवळचे समर्थक होते. त्यांचा काटा माओनी काढला. झू यांनी ते मान्य केलं, माओचं चुकतंय असं माओना सांगितलं नाही, एका परीनं त्या गुन्ह्यात झू सहभागी होते.

लिन बियाव माओचे अत्यंत निकटचे सहकारी, उपप्रधान मंत्री आणि सेनापती. माओ आणि लिन यांच्यात मतभेद झाले. लिन माओच्या मर्जीतून उतरले. आपलं खरं नाही हे लिनच्या ध्यानात आले, त्यांनी रशियात पळून जायचं ठरवलं होतं. लिन विमानानं प्रवास करत असताना विमानाचा स्फोट झाला. लिन खलास झाले. माओनी लिनचा काटा काढला.

लिनच्या मृत्यूनंतर झू ढसाढसा रडले. रडताना म्हणाले ‘ प्रकरण संपलेलं नाहीये, अजून बरंच बाकी आहे.’ बहुदा त्यांना म्हणायचं होतं की आता आपला नंबर आहे. 

झूचा नंबर आला नाही. ते टिकले.

 माओंनी ग्रेट लीप फॉर्वर्ड ही आर्थिक क्रांतीची मोहिम चालवली. त्यात लाखोंचा बळी गेला, तो एक मूर्खपणा होता. माओनी सांस्कृतीक क्रांती काढली. त्यात लाखोंचा बळी गेला. ती एक सत्तांध खेळी होती. झू माओसोबत त्या साऱ्यात सहभागी झाले. लेखक असं सुचवतो की वेळोवेळी झू यांनी माओना त्यांच्या चुका दाखवल्या होत्या, तात्विक मुद्द्यावर मतभदही दर्शवले होते. 

प्रश्न असा पडतो की एकूण माओंची कीर्ती पहाता त्यानी झूना सहन कां केलं? 

  झू यांच्याकडं वाटाघाटींचं कौशल्य होतं, त्यांच्यात डिप्लोमसीचं कौशल्य होतं, आंतरराष्ट्रीय स्थितीचा चांगला अंदाज झू याना होता. रशियन कम्युनिष्ट नेते, राष्ट्रवादी नेते चँग कै शेक अशा शत्रुवत लोकांशी बोलण्याची पाळी येई तेव्हां झू उपयोगी पडत. अमेरिका या शत्रूशी जुळवून घेण्याचं माओनी ठरवलं, किसिंजर शिष्टाईनं माओ आणि निक्सन यांच्यात वाटाघाटी घडवून आणल्या. जगाचा राजकीय तोल बदलून टाकणारी ही जागतीक महत्वाची घटना घडू शकली कारण झू सूत्रं हलवत होते. झू कसाही असला तरी त्याच्याशिवाय चालणार नाही या जाणीवेनं माओनी झूना जपलं.

माओना करिश्मा नव्हता. त्यांच्या व्यक्तिमत्वात भारून टाकणारं असं काहीही नव्हतं. लळा लागावा असं माओमधे काही नव्हतं. मग प्रश्न असाही पडतो की झू एन लाय कां अपमान सहन करत राहिले, दोन नंबरच्या स्थानावर का  राहिले, माओच्या दुष्कृत्यांकडं काणाडोळा  कां केला?

लेखक सुचवतो की माओनं तयार केलेलं नरेटिव भारी होतं, क्रांतीकारी होतं. निरंतर क्रांती, चीनचं जगाच्या नकाशावरचं केंद्रीय स्थान पुन्हा प्रस्थापित करणं हे दोन मुद्दे फार भारी होते. त्या मुद्द्यांचं, त्या नरेटिवचं गारूड चीनवर होतं, झू यांच्यावर होतं. त्या खाली झू दबले होते.

प्रस्तुत पुस्तकात आधुनिक चीनचा धावता इतिहास सापडतो. माओ आणि झू ही दोन अत्यंत गुंत्याची, ताकदीची ऐतिहासिक व्यक्तिमत्व समजायला पुस्तकाची मदत होते. एकादा देश घडवणारी माणसं, त्यांचे आपसातले गुंत्याचे संबंध समजायला पुस्तकाची मदत होते.

भिंतीवरच्या तस्वीरीत पुढारी दिसतात, देव्हाऱ्यात पुढारी दिसतात.   प्रत्यक्षात ती माणसं  वेगळी असतात, गुंत्याची असतात, त्यांना लावण्यात आलेली विशेषणं उराशी बाळगून त्यांचा विचार करणं   खरं नसतं हे या व अशा पुस्तकातून कळतं.

लेखक मूळचे चिनी असून सध्या शांघायच्या विद्यापीठात शिकवतात. गेली २० वर्षं ते प्रस्तुत पुस्तकासाठी संशोधन करत होते. China’s Road to Korean War (१९९५) आणि Mao China and Cold War (२००१) ही लेखकाची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. लेखकाची पीएचडी अमेरिकेतली असून अमेरिकन विद्यापीठात ते इतिहास शिकवत असत, आजही शिकवतात.

पुस्तक ८०० पानांचं आहे.

।।

Comments are closed.