मॅगी… मॅगी
गंधर्व चौकातली साई निवास इमारत. तीन मजली. इमारतीच्या तळाशी फूटपाथवर नूडल्सवाली गाडी. गाडीपाशी वर्दळ.
‘ दो प्लेट मॅगी ‘… ‘ एक प्लेट मॅगी ‘ … ‘ एक प्लेट मॅगी ‘…
गाडीला तीनही बाजूनी लोकांनी घेरलं होतं. गाडीवाला मोठ्या कढईत नूडल्स ढवळत होता. मधे मधे चिरलेला कांदा, गाजर आणि ढोबळी मिरची कढईत सोडत होता, ढवळत होता.
‘ दो मिनिट रुको. अभी तय्यार होगा.’ गाडीवाला गिऱ्हाइकांना थोपवून धरत होता.
फूटपाथवर वाटसरूंची वर्दळ होती. गाडीच्या भोवती नूडल्स खाणाऱ्यांचा गोतावळा वाटसरूना अडथळा करत होता. वाटसरू खादाडांना ढकलून पुढं सरकत होते.
रस्त्यावरून एक ट्रक जोरात गेला. ट्रकमधे इमारत दुरुस्तीत निघालेला राडारोडा होता. त्यातली माती हवेत उडाली. गाडीभोवती खात उभे असल्यांनी हात आपापल्या हातातल्या प्लेटांवर धरले. प्लेट झाकण्याचा प्रयत्न. हाताला टांग मारून बरीच धूळ नूडल्सवर. हवेतली धूळ कमी झाली. माणसं खाऊ लागली.
गाडीवाल्यानं कढईतल्या शिजवलेल्या नूडल्स काढल्या. डावानं प्लेटांत भरल्या. त्यात चमचे खोवले. खवैय्याना दिल्या.
‘ यु नो. डुडे आय कुड नॉट कॅरी माय टिफिन विथ मी. रोटीवाली बाई डिड नॉट कम. क्या करे. शी कम्स फ्रॉम कसारा. देअर मस्ट बी सम लफडा विथ दी ट्रेन. हर वीकमे एकाद बार तो ऐसा होता ही है. ये अपना गाडीवाला बंदा. फर्स्ट क्लास नूडल्स, पास्ता बनाता है. आय विल ईट सम हियर, टेक सम होम.’ एक स्मार्ट स्त्री.
गिऱ्हाईकांनी रिकाम्या केलेल्या प्लेट्स एक छोटा मुलगा गोळा करत होता. गाडीच्या बाजूला ठेवलेल्या एका पिंपातल्या पाण्यात बुचकळत होता.
पाण्यात तरंगणारे नूडल्सचे कण खाण्यात गुंतलेल्या माशा डिस्टर्ब होत. वैतागत. गाडीच्या भोवती घोंगावत. लोकांच्या हातातल्या प्लेटांकडं झेप घेत. खादाड माणसं त्यांना हाकलत.
तोवर मुलाचं प्लेट बुचकळून झालेलं असे. पाणी संथ होत असे.
माशा बॅक टू तरंगणारे नूडल्स.
‘ एक प्लेट.’ ‘ दो प्लेट ‘
‘ अरे आजकल मॅगी तो बंद होयेला है. तू कुठून आणतोस नूडल्स.’ एक माहितीचा भुकेला.
गाडीवाला कढईत झारा हलवत सांगतो-
‘ मी तर मॅगीच्या नूडल्स कधीच वापरत नव्हतो. कुठं परवडतात. मॅगीचं पाकीट दहा रुपयाला मिळत असेल तर त्यात जेवढ्या नूडल्स असतात तेवढ्या नूडल्स आम्हाला दोन रुपयात मिळतात. किलोच्या भावानं. मॅगीबिगी तुम्हा लोकांचे नखरे. आम्ही सुटे नुडल्स वापरतो.’
साई निवासच्या पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीत एक बाई येते. गॅलरीच्या खालीच नूडल्सची गाडी.
‘ नुडलवाले, तीन प्लेट मॅगी.’
येव्हाना गाडीवाल्यानं प्लास्टिकची नवी पिशवी फोडून त्यातून नव्यानं नूडल्स काढलेल्या असतात. गाडीच्या शेजारी फूटपाथवर एक बाई पाट घेऊन बसलेली असते. ती गाजरं आणि ढोबळी मिरच्या काढते. हाताशी असलेल्या बादलीत बुचकळते. पाटावर ठेवून कचाकचा चिरते. चिरून एका प्लास्टिकच्या प्लेटमधे ठेवते.
गाडीवाला नूडल्स कढईत टाकतो. गाडीच्या खाली एक पिंपं असतं. त्यातून एका टमरेलानं पाणी काढतो आणि कढईत ओततो. एक पत्राचा डबा तिरपा करून त्यातून मसाला कढईत सोडतो.
खाली बसलेल्या बाईनं सरकवलेल्या प्लेटमधून गाजर-ढोबळी मिरची कढईत सोडतो.
‘ ही जैन मॅगी. या मॅगीत कांदा नाही. गॅलरीतल्या बाईचा ऑर्डर.’ अधीर होऊन आपली नूडल्स केव्हां तयार होतेय याची वाट पहाणाऱ्या खादाडांना गाडीवाला सांगतो.
दोनच मिनिटात मॅगी तयार. गाडीवाला नूडल्स एका प्लास्टिकच्या पिशवीत भरतो. पिशवीला गाठ मारतो. गॅलरीतली बाई दोरीला बांधलेली टोपली खाली सोडते. गाडीवाला टोपलीतले पैसे काढून घेतो आणि मॅगीची पिशवी टोपलीत ठेवतो. बाई दोरी ओढून टोपली हस्तगत करते. खोलीत निघून जाते.
इकडं जमलेली गर्दी अस्वस्थ. त्यांना कांद्याची मॅगी हवी असते.
‘ दुकानात ती ब्रँडेड मॅगी मिळते ना, ती बंडल असते. त्यात कांदा नसतो. लसूण नसते. हा गाडीवाला लय भारी मॅगी करतो. कांदा, लसूण, आलं आणि त्याचा खास मसाला. अशी मॅगी जगात कुठंही खायला मिळणार नाही. मी परळला काम करते. रहाते बोरिवलीला. मधे उतरून याच्याकडं येते, मॅगी खाते, घरीही नेते. ‘ कांदा लसुणवाली मॅगी मिळण्याची वाट ती पहात असते. पुढली गाडी पकडायची असल्यानं बाई अस्वस्थ असते.
गाडीवाला अजीजीनं त्या बाईला आणि इतरांना धीर धरायला सांगत असतो.
‘ आणि ऐक. जरा झणझणीत कर. तिखट जास्त घाल.’ बोरिवलीवाली बाई.
गाडीवाला मॅगीत मिरचीचा ठेचा घालतो. ही त्याच्या मॅगीची आणखी एक गंमत.
संध्याकाळ झालेली असली तरी गरमी कमी व्हायला तयार नाही. मुंबईच ती. मुंबईची हवा. पावसाळ्यातला उन्हाळा, हिवाळ्यातला उन्हाळा, उन्हाळ्यातला उन्हाळा. सध्या उन्हाळ्यातला उन्हाळा असल्यानं अमळ जास्त गरमी आणि घाम.
भाजी कापणारी बाई कपाळावरचा आणि गळ्याखालचा घाम हातानं पुसते. हात साडीला पुसते. कांदे चिरायला घेते.खुल्या हवेत कांदे चिरण्याचा एक फायदा. डोळ्यात पाणी येत नाही.
‘ तुम्हारी मॅगी कहांसे आती है ? कोण आणतो?’ मॅगी खाऊन हायहुय करत एक खवैया विचारतो.
‘ जवळूनच. धारावीत कारखाना आहे. ‘ गाडीवाला.
वारा येतो. गाडी आणि खाणाऱ्यांना प्रकाश देणारा झाडावर टांगलेला दिवा जोरात हलतो. विझतो. रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश आणि शेजारी असलेल्या दुकानातून येणाऱ्या प्रकाशात माणसं खात रहातात.
गाडीवाला एका स्टुलावर चढतो. वायरशी काही तरी खुडबुड करतो. दिवा चालू होतो.
आता रस्त्याच्या कडेला एक करड्या रंगाची जीप येऊन उभी रहाते. जीप माणसांनी भरलेली. जीपमधला एक माणूस ओरडतो ‘ सहा प्लेट. ‘
गाडीवाल्याच्या कपाळावर आठ्या पडतात.
‘ किती वेळ लावतोस. दे लवकर. ‘
‘ होय साहेब. देतो. तुमची स्पेशल मॅगी ना, वेळ लागणारच. ‘
‘ चोंबडेपणा करू नकोस. धंदा करायचाय की नाही.’
ही महापालिकेची गाडी. आत बसलेले लोक म्हणजे पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी. खाणावळी, बार, जिमखाने इत्यादि ठिकाणी स्वच्छता आहे की नाही, तिथले पदार्थ चांगले आहेत की नाहीत ते पहायची यांची जबाबदारी असते. खाण्याच्या पदार्थांचे नमुने तपासणे हे यांचं काम.
गाडीवाल्याजवळ मिनरल वॉटरच्या बाटल्या असतात. त्यातल्या पाण्यानं तो प्लेटा साफ करतो. नूडल्स त्यात भरतो. गाडीतल्या लोकांना देतो.
गाडीच्या उजव्या हाताला फूटपाथवरच एक सिमेंटचा बेंच. कोणातरी माणसानं आपल्या आईच्या स्मरणार्थ दान केलेला. एका बाजूचा पाय मोडल्यानं बेंच कललेला. त्यावर उन्हाची वेळ सोडता दिवसभर म्हातारे बसलेले असतात. रस्त्यावर घडणाऱ्या घटनांचे ते साक्षी असतात. कोण माणसं केव्हां बाहेर पडतात, कोणत्या दुकानात काय खरेदी करतात, खरेदी करतांना घासाघीस कशी करतात इत्यादी गोष्टी या म्हाताऱ्याना चांगल्या परिचयाच्या. तो त्यांच्या दररोजच्या टवाळकीचा विषय.
पालिकेची गाडी आल्यावर म्हाताऱ्यांनी एकमेकांना टाळ्या दिल्या.
‘आले. फुकटे आले.’ एका आवाजात तिघंही म्हातारे बोलले.
‘ मॅगीवर धाडी घालून बंदी घालणारे आणि पालिकेचे हे लोक यात काय फरक आहे? दोघेही पैसे खाऊन नंतर हळूच परवानग्या देणार. ‘
‘ मॅगीत शिसं सापडलं आणि काय ते एमएसजी सापडलं. त्याचं काय करणार?’
‘ सोप्पं आहे. काही दिवस जाऊ देत. मॅगी मोठ्या जाहिराती करत बाजारात येईल. नव्या मॅगीमधे शिसं नसेल, एमएसजी नसेल, व्हिटॅमिन्स असतील, लोह असेल. नवी मॅगी खाल्ली की मुलं एकदम पहेलवान होतील, हुशार होतील असं जाहिराती सांगतील. झालेलं सारं नुकसान मॅगी भरून काढेल. कोका कोलाला यांनी घालवलं होतं. कोका कोला परत आलं.’
‘ अरे बाबा पैशाचा खेळ आहे. कोणाला तरी या भानगडीत पैसे मिळणार आहेत. राजकारण करायला पैसे लागतात. आमदार, खासदारांच्या मालमत्ता उगाचच नाही पटापट दुप्पट तिप्पट होत.’
नूडल्सच्या प्लेट्सची दुसरी खेप पालिका गाडीत गेली.
‘ सरकारला जनतेच्या आरोग्याचा पुळका आलाय. मुंबईत रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थात किती जंतू असतील याचा विचारच करवत नाही. तेल खराब. तेलात भेसळ. भाज्या गटाराच्या पाण्यावर वाढलेल्या. दुधात युरिया. धूळ आणि माती. मॅगीतलं शिसं कमी करून काय होतंय. इतर अनंत गोष्टी शरीरात जात आहेत. त्याची माहिती आणि पर्वा आपल्याला नाही. फूटपाथ असोत की रेस्टॉरंट्स असोत. किती घातक आणि दुषित गोष्टी ते खायला घालतात. त्यांच्यावर कारवाई होणार?’
एक म्हातारा जोरात हसला. ‘ अहो रस्ते आणि हॉटेलावर कारवाई करायचं ठरवलं तर हज्जारो लॅब्ज उघडाव्या लागतील आणि घातक अन्न विकणाऱ्यांसाठी महाराष्ट्रात दोन पाचशे तुरुंग उघडावे लागतील.’
सगळे हसले.
पालिकेची गाडी नूडल्स फस्त करून निघून गेली.
गाडीवाल्यानं तीन नूडल्स प्लेट बेंचवरच्या म्हाताऱ्यांसमोर आणल्या. दररोजची सवय.
नूडल्स खाता खाता एक म्हातारा म्हणाला ‘ अरे, दोन प्लेट बांधून दे. मॅगी मिळाली नाही म्हणून नातीनं गोंधळ घातलाय. तिच्यासाठी. ‘
।।
One thought on “मॅगी… मॅगी”
मस्त, हेच वास्तव आहे भारताचे!