मोदीशहा पार्टीची अपप्रचार मोहिम
मोदी-शहा पार्टीच्या वतीनं निवडणुकीची तयारी सुरू केलीय. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यात अपयश आल्यामुळं नाना मार्गांनी लोकांना वेडावण्याचे उद्योग मोदी-शहा पार्टीनं सुरु केलेत. मोदी हा एक थोर माणूस आहे असं लोकांना पटवणं हा त्यातला एक उद्योग. मोदींवर टीका करणारी माणसं वाईट्ट असतात असं मोदी-शहा पार्टी सतत सांगत असते. कार्यक्रम-मुद्दे यावरच्या चर्चेपासून दूर नेऊन लोकाना भावनांत गुंतवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
जनरल कर्णिक यांच्या नावानं एक वक्तव्य मिडियात फिरवलं जातय. त्याचा सारांश असा – मोदी हे थोर गृहस्थ असून लोक विनाकारण त्यांच्या विरोधात बोलत आहेत, मोदींनाच मतं देऊन निवडून आणलं पाहिजे. नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. मोदीनी देशद्रोह केलेला नाही. मोदी भरपूर मेहनत-काम करतात. मोदी शिस्तबद्ध काम करतात. मोदींवरची टीका हा भ्रष्ट,चोर लोकांनी रचलेला कट आहे. मोदी विरोधकांनी आजवर काँग्रेसला साथ दिली, काँग्रेसचा गैरव्यवहार सहन केला, देशद्रोह्यांना पाठिंबा दिला.
कर्णिकांच्या नावावर प्रसारित झालेल्या पत्रात लाल बहाद्दुर शास्त्री, शामा प्रसाद मुकर्जी, दीन दयाळ उपाध्याय, राजेश पायलट इत्यादी लोकांचे खून नेहरूवादी काँग्रेसच्या सरकारांनी केलेत असा आरोप आहे.
मोदी भ्रष्ट नाहीत.
व्यक्तिशः त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप अजून करण्यात आलेले नाहीत, सिद्ध झालेले नाहीत. ज्या नेहरूंवर टीका करण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत त्या नेहरूंवरही भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते. नेहरूंसोबत असलेली अनेक माणसं भ्रष्ट होती. तिथूनच जनतेला त्रास झाला.
अंबाणींनी पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या कंपनीला सरकार अब्जावधी रुपयांचं राफाएलच्या सुट्या भागाचं कंत्राट देतं. अंबाणीच्या केवळ कागदावर असलेल्या जिओ या शैक्षणिक संस्थेला दर्जेदार संस्था ठरवून त्या संस्थेला सरकार सवलती आणि पैसा देतं. याचा अर्थ उघड आहे.
अंबाणींची माणसं मोदीशहा पार्टीत असतात. मोदीशहा पार्टीतली माणसं सरकार तयार करतात. हे सरकार अंबाणींच्या भ्रष्ट व्यवहाराना प्रोत्साहन देतं. असं सरकार एक भ्रष्ट नसलेला माणूस चालवतोय असं सिद्ध करण्यासाठी मुख्यपदी भ्रष्टाचाराचे आरोप नसलेला माणूस नेमतं.
अशी असते भ्रष्टाचाराची साखळी.
गांधी, नेहरू, जयप्रकाश नारायण, अण्णा हजारे अशी माणसं राजकीय पक्षांनी आपले व्यवहार लोकांच्या गळी उतरवण्यासाठी वापरली. मोदींना त्या रांगेत बसवायचा प्रयत्न मोदी-शहांची प्रभावळ तयार करत आहे.
मोदी शिस्तीत कामं करतात, भरपूर कामं करतात.
कोण नाही करत? नेहरूही फक्त चार तासच झोपत, योगासनं करत. मोदींचे मित्रगुरु शरद पवारही शिस्तीत आणि भरपूर मेहनत करतात, कॅन्सर झाला असूनही ते दिवसाचे सतरा अठरा तास काम करतात. पृथ्वीराज चव्हाणही शिस्तीत मेहनत करतात.
मोदी देशद्रोही नाहीत. मोदी देशभक्त आहेत.
संघ परिवारानं देश, देशप्रेम, देशद्रोह या कल्पनांच्या व्याख्या फारच सुळसुळीत, पसरट केल्या आहेत. सोशल मिडियातून, माध्यमातल्या बावळट स्वार्थी लोकांकरवी त्या व्याख्या जनतेत पसरवल्या आहेत. या व्याख्यांनी सारा देश वेठीस धरलाय. त्या व्याख्यांनुसार बहुदा मोदी, शहा आणि भागवत (या क्रमानं) येवढेच लोकं देशप्रेमी ठरतील, देशद्रोही नाहीत असं ठरेल. बाकीची माणसं उतरत्या क्रमानं देशप्रेमी किंवा देशद्रोही ठरत जातील.
माणूस स्वच्छ असणं, मेहनती असणं केव्हाही चांगलंच. पण तेवढंच पुरेसं नसतं.
दोन उदाहरणं.
खोमेनी. अंगावरचे कपडे. चटई. पाण्याची सुरई. ट्रांझिस्टर रेडियो. पुस्तकं. मुलगी प्रोफेसर. तिला अवाजवी, अयोग्य फायदे द्यायला नकार. करोडो माणसं मारली.
ओसामा. वडिलोपार्जित आणि स्वतः इंजिनियरिंग व्यवसाय करून मिळालेला पैसा. अधिक जिहादसाठी मिळालेला पैसा. सर्व पैसा जिहादसाठी वापरला. स्वतः साधे, मितव्ययी. कुटुंबियांना सार्वजनिक पैसा वापरू दिला नाही. मुलानं पैसे मागितले. त्याला सांगितलं का शेजारी असलेली जमीन कस, त्यातून पैसे मिळव. हजारो माणसं मारली, उत्पात केला.
राजकीय माणसाचं कर्तृत्व मोजावं. त्याचं व्यक्तिगत चारित्र्य हा भाग साहित्याचा किंवा तात्वीक-अकॅडमिक चर्चेचा विषय असावा. राजकारण करणाऱ्या माणसाला पक्ष, निवडणुका, सत्ता चालवायच्या असतात. त्या खटाटोपात त्याला पुस्तकं, शहाणी माणसं, विचार, चिंतन या घटकाचा सहवास लाभत नाही. सत्ता सांभाळण्यात तो अडकतो. त्याच्या पलिकडं जाण्यासाठी राजकारणी माणसाला विशेष प्रतत्न करावे लागतात. सत्तेच्या तात्कालीक गरजांच्या पलिकडं जाऊन, आपला विचार किती योग्यअयोग्य आहे याचं भान ठेवून सार्वजनिक माणसाला पावलं उचलायची असतात.
नोटबंदी हा एक फार महत्वाचा निर्णय होता. मोदींनी नाट्यमय रीत्या तो निर्णय जाहीर केला आणि त्याचा सतत नाट्यमय पाठपुरावा केला. दहशतवाद संपेल, काळा पैसा संपेल आणि देशाची आर्थिक परिस्थिती एकदम सुधारेल असं त्यांनी सांगितलं. या पैकी काहीही झालेलं नाही असं सारी दुनिया (मोदी-शहा पार्टी व्यतिरिक्त) लोकं म्हणत आहेत. त्यासाठी त्यांनी पुरावेही दिले आहेत. असा निर्णय कसा घेतला गेला याचाही सखोल विचार व्हायला हवा.
पण मोदींच्या निर्णयावर टीका करणारे देशद्रोही ठरत आहेत. मूल्यांकनात मोदी कमी पडतात असं कोणी म्हणालं तर त्यांना लगेच चोर, भ्रष्ट आणि देशद्रोही असं म्हणणं योग्य नाही.
जनरल कर्णिक यांच्या नावे प्रसिद्ध झालेला मजकूर खरोखरच कर्णिकांनी लिहीलाय कां? की त्यांच्या नावावर हा मजकूर खपवला जातोय? मिडियातल्या त्यांच्या नावावरच्या मजकुराशी कर्णिक सहमत असतील तर त्यांची कीव करणं, त्यांच्या म्हणण्याचा प्रतिवाद करणं येवढंच शक्य आहे.
अलिकडं मिडियात जे काही येतं त्याकडं जरा काळजीपूर्वक पहावं लागतं. ते त्याच माणसानं लिहिलंय की त्याच्या नावावर खपवलं जातंय ते पहावं लागतं. बरेच वेळा कुठल्या तरी गटानं मुद्दाम खोटेपणानं प्रचाराचा भाग म्हणून मजकूर प्रसृत केलेला असतो. या प्रकारचा अपप्रचार राजकीय पक्ष सामान्यपणे नेहमी करत असतात. निवडणुक आली की तो वाढतो.
माणसं आपला राजकीय निर्णय आपल्या परिसरातून घडवतात. वर्तमानपत्रं, शेजारी पाजारी, मित्र, सभोवतालची माणसं, पुढाऱ्यांची भाषणं यावरून माणसं मतं तयार करतात. आता या घटकात सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमाची भर पडलीय. राजकीय पक्ष या दोन माध्यमांवरच जास्त भर देताना दिसतात.
पारंपरीक माध्यमं, अमळ सावकाशीनं विचार करणारी, मागं पडलीत. छापील पेपरात विश्वास ठेवावेत असे पेपर आता अपवादात्मक. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचीही तीच गत. एकूणच माध्यमं उथळ झालीत, निर्रथक करमणुकीची साधनं झालीत. या पोकळीत अपप्रचारी सोशल मिडियानं प्रवेश केलाय. आज घडीला इतर पक्षांच्या तुलनेत संघ परिवारानं या अपप्रचारी माध्यमाचा अधिक वापर केला आहे.
सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमं, तिथला उथळ विचारच माणसांना प्रभावित करताना दिसतोय. कर्णिकांचं पत्र हे त्यातलं एक उदाहरण.
ताक फार फुंकून फुंकून प्यावं लागणार.
कार्यक्रम. व्यवहार्य आहेत की नाहीत. त्यातून समाजाचं हित साधणं शक्य आहे की नाही. त्याच्या फायदे तोट्याचा हिशोब. त्याच्या लाभ नुकसानीचा हिशोब. जाणकार काय म्हणतात. इत्यादी गोष्टींकडं अधिक लक्ष द्यावं.
।।
4 thoughts on “मोदीशहा पार्टीची अपप्रचार मोहिम”
Sir
If RBI is supposed to be non-partisan entity, how do you support this report published only yesterday in The Times Of India and Economic Times:
https://www.business-standard.com/article/economy-policy/people-returned-98-96-of-demonetised-rs-500-and-rs-1-000-notes-rbi-117083001197_1.html
Frankly, I Too believed that Noabandi was a failure and almost 99% of the black money found entry to Govt coffers from the back doors of most banks whose managers were Thugs. Do you mean Jetli and Modi are liars?
Comparing Mr Modi with Khomeni and Osama ????
निळूभाऊ,
मी स्वत: अहमदाबादला १० वर्ष वर्तमानपत्रात काम करत होतो. मराठवाडा दैनिकासारख्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्याला सामाजिक जाणीव जागृत असतेच.
मुख्यमंत्री असतांना मोदींनी गुजरातचं काय पानदान केलं हे गुजरातच्या पत्रकारांना षंढ केल्यावरुन समजतंच. नंतर केंद्रात जाऊन ‘Media’ चं कसं खुळखुळा केलं हे जनतेच्या लक्षात आलंय. बाळ रडलं कि खुळखुळा वाजवायचा.
भारतात सु-शिक्षितपणा हा त्यांच्या अभ्यासक्रमातला ‘सामाजिक जाणीव’ हा विषय “एेच्छिक” स्विकारला. नसता शिकलेला मुलगासुध्दा शाखेमध्ये आपलं मन मोकळं करुन शाखाचालकाला प्रश्न विचारुच शकत नाही कारण “आदेश” असल्याने प्रभोधन केलं जातं.
नाहीतर व्यक्त्तिच्या वर्तणूकीचा, त्याच्या मानसिकतेचा आणि ‘उपसकांचा’ राजकारणाच्या “संख्याबळात” कसा वापर केला जाऊ शकतो हे प्रभोधन झालेल्या व्यक्त्तिला हे ज्ञान कळणार कसं कि आपण “प्यादं” म्हणून संख्याबळ वापरलं जातंय.
“नमो” ची सुरुवात कशी झाली आणि नरेंद् मोदींची प्रगती कशी झाली हे त्यांच्या सामाजिक प्रगतीवरुन कळतंच. फौज उभी करतांनी प्यादेच काम करतात हे माझ्या असं लक्षात आलं कि मंत्रीमंडळ पगारी ठेवायचं, पण त्यांना दिलेल्या पदांचा अधिकारच बोथट करायचा. अधिकाराचं अस्तित्वच नाहीसं करायचं. देशात महत्त्वाचं पद गृहमंत्री कुणाला माहिती आहे ? नांव ? ब्र कधी उघडली असेल तर काय मजाल त्याची ? देशीत प्रशासन दोन व्यक्त्ती चालवतात ना ?
फक्त्त एक साधा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री किती ? (पगाराचे पैसे नाही विचारत) ४ वर्षात केलेल्या कामाचा आढावा त्यांनी स्वत:हाच बघावा. (खाली मान घालावी) किंवा मोदी(सरां)नी निवडणूकी पुर्वी काय उच्चारलं त्यातलं एक तरी आपण करुं शकलो का ते पाहावं. नाहीतर भ्रष्टाचाराचा नावाखाली नोटा रद्द करुन, गोळा करुन, नवीन (रंग न सुकलेल्या) नोटा बाजारात आणून, बळींची संख्या आणि मुल्य न मोजता नोटांची संख्या मशिन असुन आणि मुल्यमापनासाठी सोप्प गुणाकार भागाकार ही पद्धत शाळेत शिकूनही दोन वर्षाहून अधिक काळ लावला. कदाचित नोटा मोजण्यापेक्षा ते कर्म झाकण्यासाठी “सुशिक्षीत फौज” उभं करण्यात वेळ घालवला असणार.
निवडणूकीसाठी नवीन फौजच कामाला येईल ना !
|| नमो नमो ||
भारतात मोदी भक्त आणि विरोधक भावनेच्या आहारी जाऊन भांडतात. मोदी म्हणजे देव नाहीत. त्यांनी पण चुका केल्या आहेत. पण त्यांना बडवताना त्यांनी काही चांगल्या गोष्टी पण केल्या असतील याचं भान ठेवायला हवं.नोटाबंदी;बँकांचे राष्ट्रीयीकरण ;air india चे राष्ट्रीयीकरण कॉंग्रेसच्या काळात पण झाले . त्याचे द्रुश्य परिणाम लोकांसमोर आहेत. नोटाबंदी करतना ६ महिन्यांची नोटीस देणार का ? त्यांना नोटाबंदी राबवता आली नाही पण वरकरणी त्यामागचा हेतू चुकीचा वाटत नाही. भारतात एव्हढे वेगवेगळे लोक गट पंथ धर्म आहेत की सगळ्यांना रुचेल असं कोणीही सत्ताधीश काहीच करू शकत नाही. मोदींनी किमान एव्हढे तरी करायचा निर्णय घेतला हे ही काही कमी नाही.