महाराष्ट्रात गायबैल मारण्यावर बंदी

महाराष्ट्रात गायबैल मारण्यावर बंदी

  महाराष्ट्रात गायीबैल मारण्याला बंदी करणारा कायदा झालाय. गायीबैलांचं मांस खाणं हा गुन्हा ठरला आहे.
भारतात हिंदूना गायी प्रिय आहेत. गायींना धर्मात देवतेचं स्थान आहे. गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात असं हिंदू मानतात. महाभारतात, पुरातन सािहत्यात गायींचे अनंत उल्लेख आहेत. 
मागं जाऊन कल्पना करा. उद्योग नव्हते. आजच्या तुलनेत अन्न, वस्त्र, निवारा या अगदी प्राथमिक पातळीवरच्या गोष्टी मिळवत माणूस जगत होता.  गाय दूध देई, दुधापासून तयार होणाऱ्या गोष्टी माणसाला मिळत.  गायी आणि बैलांना गाय जन्म देई. बैल शेतीच्या कामात उपयोगी पडत.  अन्न निर्मितीत बैलाचा वाटा  मोठा. गायीचं शेण, गोमुत्र यांचाही वापर केला जाई. गायीचं वर्णन गोधन अशा शब्दात केलं जाई. बक्षीस म्हणून गाई द्यायच्या, शिक्षा झाली तर दंड म्हणून गाई द्यायच्या, राजानं दुसऱ्या देशावर आक्रमण करून तिथल्या गायी पळवायच्या, राजांनी आपापल्या राज्यातल्या गायींचं रक्षण करायचं. गाय हे चलन होतं, संपत्ती होती. खरं म्हणजे म्हणूनच ती महत्वाची होती.
जग बदललं. बैलांच्या जागी शेती करण्यासाठी यंत्रं आली. शेणखताची जागा रासायनिक व इतर खतांनी घेतली. गोवऱ्यांची जागा कोळसा केरोसीननं घेतली. दूध देणाऱ्या गायींची जागा दूध देणाऱ्या म्हशींनी घेतली. माणसाचं एकूणच जीवन इतकं बदललं की गाय आणि गोवंश यांचा वापर, स्थान मर्यादित झालं. 
एके काळी भारतात सर्रास गोमांस खाल्लं जात असे. मुसलमान किवा ख्रिस्ती धर्म जन्मायच्या किती तरी आधी. वेदांमधे तसे उल्लेख आहेत. ज्याला हिंदू धर्म असं म्हणतात ती घटना घडलेली नसतांनाची ही गोष्ट आहे. कधी तरी हिंदू ( म्हणजे हिंदू या व्यापक चौकटीत असणारे संप्रदाय, पंथ इ.) लोकांनी ठरवलं की गाईबैलांचं मांस खायचं नाही. एकादी गोष्ट करावी किवा करू नये असं सांगताना ती देवाच्या नावावर खपवण्याची पद्धत भारतात आणि जगात आहे. त्यामुळं गाय ही देवता करून गायीचं मांस वर्ज्य करण्यात आलं.
आज भारतात कित्येक म्हणजे कित्येक हिंदू गोमांस खातात. नेपाळ या हिंदू देशात सर्रास गोमांस खाल्लं जातं. कित्येक हिंदू गोमांस खात नाहीत, केवळ सवयीमुळं. परंतू गोमांस खाण्याला त्यांचा विरोध नाही. गोमांस हे इतर कुठल्याही प्राण्याच्या मांसाप्रमाणंच आहे असं त्यांचं म्हणणं असतं. चिकन खातो, बोकड खातो, मासे खातो, ससे खातो, तितर खातो, डुक्कर खातो मग गाईबैलांचं मांस खाण्यात काहीही वावगं नाही असं त्यांचं मत आहे. अर्थात गोमांस खाल्लंच पाहिजे असा त्यांचा आग्रह नाही. कुठलं मांस खायचं आणि कुठलं नाही, की कुठलंच मांस खायचं नाही हे ज्यानं त्यान ठरवायचं असं फार म्हणजे फार हिंदू लोकांचं मत आहे.
गायी भाकड होत. शेतकरी तरीही गायीचं पालन करत. एकाद दोन गायी पाळणं शेतकऱ्याला जड जात नसे. काहीच नाही तरी शेणमूत तर मिळतंच असे. सामान्यतः गाय भाकड झाल्यानंतर तिला मारून तिचं मांस खाण्याचा प्रश्न  भारतात आला नाही कारण हिंदूंच्या लेखी गाय पवित्र होती. अत्यंत भीषण दुष्काळात लोकांनी गायी मारून खाल्याचे उल्लेख सापडत नाहीत. चीनमधे दुष्काळांच्या नोंदी आहेत, त्यामधे गावातले यच्चयावत प्राणी मारून खाल्ल्याची नोंद आहे. गावात हाल चाल करू शकणारा एकही प्राणी, पक्षी शिल्लक रहात नसे. अगतीकतेतून घडणारी घटना. भारतात अर्वाचिन काळात तसं घडल्याची नोंद नाही. कारण गाय हा नुसता पशू नसून ते एक धार्मिक प्रतिक आहे.
इतर देशांत, इतर समाजांत, इतर धर्मियांत  गाय पवित्र नसल्यानं गोमांस खायची पद्धत आहे. कोंबडी, मासे, ससे, हरणं इत्यादींसारखंच गाय-बैसाचं मांस. इस्लामी माणसं डुकराचं मांस खात नाहीत. कारण त्यांच्या लेखी डुक्कर हे धार्मिक प्रतीक आहे. सीरियातले अलवाईट सशाचं मांस खात नाहीत.
  गोमांस खायला परवानगी असणारी   माणसं भारतात आली आणि गोची झाली. ख्रिस्ती आणि मुसलमान.  गोमांस खाल्लंच पाहिजे असा आग्रह त्यांच्या धर्मानं धरलेला नाही. गोमांस हा त्यांच्या आहाराचा भाग झाला आहे.  त्यामुळं गोमांस तयार करणारा उद्योग भारतात तयार झाला.
गोमांस तयार करणं आणि खाणं यावर बंदी घालण्याचा अर्थ या देशातले जे नागरीक गोमांस खाऊ इच्छितात किंवा उद्योग म्हणून गोमांस तयार करतात त्यांचं स्वातंत्र्य आणि जगणं हिरावून घेणं.  अनेक   हिंदूना त्यांची पवित्र गाय मारली जाणं आणि खाणं (जे कधी काळी या देशात घडत असे) आज पसंत नाही. हे खरं असलं तरी गोवंशातल्या प्राण्यांच्या हत्त्येवर बंदी घालायची मागणी सर्वच हिंदू करत नाहीत. काही गांधीवादी संस्था आणि सामान्यतः संघाच्या परिघात वाढलेले राजकीय हिंदू यांचीच ही मागणी आहे असं दिसतंय. बाकीच्या हिंदूंना बंदी घालावी असं वाटत नाही आणि समजा बंदी घातली तरी ते अहमहमिकेनं या बंदीला विरोध करतील असंही नाही. साधारणपणे असं म्हणता येईल की बंदी आणि बंदीला विरोध या दोन्ही गोष्टी राजकारणी लोकांच्या आहेत, सामान्य हिंदू माणसांच्या भावना या प्रकरणी तीव्र आहेत असं वाटत नाही. राजकीय हिंदूंची  भावना महाराष्ट्रात कायद्यात रूपांतरीत झाली असून गोवध बंदी लागू करण्यात आली आहे. बाय द वे भारतात ब्रिटीशांना घालवण्याचा, राजकीय स्वातंत्र्याचा विचार सुरु झाला त्या वेळी या देशात राजकीय हिंदूत्व असा एक पंथ तयार झाला. 
जैनांना तर कोणताच प्राणी मारावासा वाटत नाही. तत्वतः ते कुठलंही मांस खात नाहीत. उद्या समजा एकाद्या भूगोलात जैनांची बहुसंख्या झाली तर तिथं असणाऱ्या इतर समाजांना कोणतंही मांस खायला बंदी केली जाऊ शकते किंवा मांस निर्मितीचे उद्योग बंद केले जाऊ शकतात. इस्लामी बहुसंख्य असणाऱ्या देशात तंबाखू आणि अल्कोहोलच्या निर्मितीवर आणि वापरावर बंदी आहे. 
बंदी हे प्रकरणं वांध्याचं असतं. ज्या गोष्टीसाठी बंदी घालायची असते ती गोष्ट बंदीनंतर साध्य होईल याची खात्री नसते, किंबहुना ती गोष्ट साध्य होत नाही. दारुबंदी करून लोकांचं दारू पिणं थांबवता येत नाही. बंदी घातली तर दारू अधिक वाढते, काळाबाजार सुरु होतो. अमेरिकेत  काही काळ दारुबंदी होती. वाट लागली. दारु पिण्यानं विकृत वळण घेतलं. काळा बाजार प्रचंड झाला. अनंत पुढारी या काळ्याबाजारातल्या पैशावर अमेरिकन संसदांत निवडून जाऊ लागले. शेवटी बंदीचं खूळ सरकारला सोडावं लागलं.  गांधीजींचा दारूवर राग होता त्या खातर गुजरातेत दारूबंदी लागू करण्यात आली. गुजरातेत माणसं दणादण दारू पितात, प्रचंड प्रमाणावर दारू खपते. सर्वांना हे माहित आहे, पोलिसांनाही याची सवय झालेली आहे. कुठलीही दारू गुजरातेत मिळते. फक्त चोरून. पकडलं गेलं तर लाच दिली की भागतं.
भारतात नाना धर्माची, संस्कारांची माणसं आहेत. अशा परिस्थितीत एकाद्या मोठ्या जनसमूहाचं जगणं ढवळून काढणारे कायदे करणं कितपत व्यवहार्य ठरेल?  
  गाय आणि बैल. माणसाच्या जगण्याचा ते एक भाग असतात, माणसं त्यांच्यात भावनेनं गुंतलेली असतात. त्यामुळं गायींना मारायला शेतकरी मनानं तयार नसतो.  गाय पाळणं जड जातं तेव्हां दुःखानं, नाईलाजानं काही हिंदू गायी खाटकाला विकतात.पण काही हिंदू मरेपर्यंत गायींचं पालन करतात हेही खरं आहे.
इथुन पुढल्या जगात नाना सांस्कृतीक, धार्मिक सवयींची माणसं देशांच्या चौकटीत एकत्र होणार आहेत. शहर, जिल्हा, देश अशा भूगोलात आता फार वेगवेगळ्या प्रकारची माणसं रहाणार आहेत. धर्म, जाती, भाषा, संस्कृती, खानपान, कपडेलत्ते, नटणंथटणं, खिसे. देश कायद्यानं चालतात. कायदा लोकशाहीत बहुसंख्य माणसांचे प्रतिनिधी ठरवतात. पण बहुसंख्य म्हणजे कोण? इथून पुढं धर्म, भाषा, रंग, संस्कृती, मुळ देश इत्यादी कसोट्या लावल्यावर प्रत्येक स्वतंत्र कसोटीवर स्वतंत्र बहुसंख्य होणार आहेत. अमेरिकेत गोरे पन्नास टक्केपेक्षा कमी होतील; काळे-सावळे-पिवळे मिळून बहुसंख्य होतील. पण कुठल्याही एकाच रंगाची संख्या मोजायची झाली तर पांढरे, काळे, सावळे, पिवळे इत्यादी दहा वीस टक्के होतील. एकादा पंचवीस टक्के तर एकादा पस्तीस टक्के. पन्नास टक्केपेक्षा जास्त कोणीच असणार नाही. हेच धर्माच्या बाबतीत होणार आहे. भाषेच्या हिशोबात स्पॅनिश भाषा बोलणारे बहुसंख्य होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचं उदाहरण केवळ प्रातिनिधिक आहे. जिथं जिथं रोजगार विपुल असतील तिथं तिथं जगभरची माणसं गोळा होतील आणि जे अमेरिकेत होतंय ते साऱ्या जगात होईल.  
  लोकशाहीमधे लोक भाषा,संस्कृती,धर्म यासाठी मतदान करण्याची शक्यता कमी आहे. आर्थिक सुख, सुरक्षा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यासाठी मतदान होईल. या गोष्टी साध्य व्हाव्यात यासाठी कायदे होतील. तेव्हां भाषा, संस्कृती, धर्म इत्यादी साऱ्या गोष्टींचा विचार अमळ कमी तीव्रतेनंच करावा लागेल. बहुदा त्या गोष्टी दुय्यम ठरतील. भाषा, संस्कृती, धर्म या गोष्टीही त्यामुळं नव्यानंच परिभाषित होतील. 
हिंदूंना गोवंश इत्यादीं बाबींचा विचार बंदीच्या हिशोबात करून चालणार नाही. मुसलमानांना गाईचं मांस खाणं जितकं आहाराचा भाग आहे तितकंच डुकराचं मांस खाणंही आहाराचा भाग आहे, त्यात धर्म आणण्याचं कारण नाही असा विचार करावा लागेल.
अगदी अलीकडचीच एक गोष्ट. 
उंटांची.
ऑस्ट्रेलियन सरकार सध्या उंटांची कत्तल करतय. तिथं सुमारे १६ लाख उंट आहेत. अठराव्या शतकात ब्रिटीशांनी ऑस्ट्रेलियाचा विकास करायला घेतला तेव्हां सामान वाहून नेण्यासाठी भारतातून   उंट नेले. कालमानानुसार उंटांची प्रजा वाढत गेली. कालांतरानं रस्ते सुधारले, रेलवे झाली, गाडी आणि ट्रकनं वाहतूक होऊ लागली. उंटांचा उपयोग होईनासा झाला. झाडंच्या झाडं नाहिशी करतात. उंट वाळवंटांतल्या वनस्पती फस्त करत असल्यानं वाळवंटांची संख्या आणि व्याप्ती वाढते. उंटांमुळं रोगही पसरतात. तेव्हा एकूणातच ते त्रासदायक आहेत हे ठरल्यावर ऑस्ट्रेलियानं ऊंट गोळा करून त्याना गोळ्या घालायला सुरवात केली.
कतारमधल्या अली सुलतान अल हाजरी या अरब माणसानं ऑस्ट्रेलियातली उंटांची कत्तल पाहिली. हेलेकॉप्टरमधून उंटांचा पाठलाग, त्यांना पळवत एकाद्या ठिकाणी नेणं आणि पाठलाग करणाऱ्या  जीपमधून त्यांना गोळ्या घालून मारणं. अली सुलतान दुःखी झाला. वाळवंटांत वाढलेल्या अलीनं वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत उंट वाढवले होते. त्याचं उंटावर प्रेम होतं. 
वाळवंटी प्रदेशात ऊंट म्हणजे देवच असतो. वाळवंटातली काटेरी झुडुपं खाऊन तो रहातो. एकदा प्यालेलं पाणी त्याला कित्येक दिवस पुरतं. त्याची कातडी त्याचं थंडी आणि ऊष्म्यापासून रक्षण करते. वाळूतून पळता यावं अशी पायाची रचना. कुराणात म्हटलंय ‘ पहा देवानं कशी उंटाची निर्मिती केलीय, किती उपकारक प्राणी.’ कित्येक अरब टोळ्यांमधे उंटाला सांस्कृतीक-धार्मिक स्थान आहे. उंटाचं दूध प्यालं जातं. उंटाची कातडी कपडे करण्यासाठी वापरली जाते. उंटाचं मूत्र औषध म्हणून वापरलं जातं. म्हणजे अगदी गायच.
तर अली सुलतान दुःखी झाला. तो ऑस्ट्रेलियात गेला. तिथल्या खासदार, मंत्र्यांना भेटला. ऊंट मारण्याचा कार्यक्रम त्यानं समजून घेतला. एकदा उंट मारले जातानाही त्यानं पाहिलं. दुःखी झाला. एकीकडं उंट हा केवळ एक उपयुक्त पण निरुपयोगी प्राणी मानणारे ऑस्ट्रेलियन आणि दुसरीकडं उंटावर प्रेम असणारा, उंटाला जवळ जवळ धार्मिक मानणारा अरब.
अली सुलताननं ऑस्ट्रेलियन सरकारला ऑफर दिली. ‘ आपण सर्वच्या सर्व उंट विकत घ्यायला तयार आहोत. त्यासाठी एकादा मोठ्ठा हजारो एकरांचा प्रदेशही घ्यायला तयार आहोत, विकत किंवा भाडेपट्टयानं. आपण उंटांचं पालन करू. त्याच्यामुळं पर्यावरणारी हानी होणार नाही, रोगराई पसरणार नाही याची काळजी घेऊ. उंट गोठ्यात पाळू. दूध, कातडी, मांस  इत्यादी उत्पादनं मिळवू आणि बाजारात विकू. उंट मारावे लागतील अशी स्थिती येईल त्या वेळी वैज्ञानिक शिस्त पाळून आरोग्यकारक पद्दतीनं त्याला मारू आणि त्याचं मांस इत्यादी उपयोगात आणू. हे सारं आपण उंटावर प्रेम असल्यानं करणार आहोत. ‘ 
प्रेम व्यक्त करण्याचा हा कतारी मार्ग. त्यात व्यवसाय आहे, व्यवहार आहे आणि प्रेमही आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचंही भलं आहे.
कतार, सौदी, बहारीन इत्यादी कुठं उंट मारण्याचा उद्योग असल्याचं ऐकिवात नाही. उंटांना पोसण्याचाही उद्योग ऐकिवात नाही. उंटांची ही एक नवीच व्यवस्था, नवाच उद्योग दिसतोय. 
अली सुलतानच्या ऑफरवर ऑस्ट्रेलियन सरकार विचार करत आहे.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *