इचलकरंजीतलं वाचनालय, वय वर्षे १४९.
इचलकरंजीतल्या आपटे वाचन मंदिराच्या एका छोट्याशा खोलीत चित्कला कुलकर्णी भेटल्या. एका झोळीवजा पिशवीतली पुस्तकं त्यांनी पुस्तकालयात काम करणाऱ्या बाईंसमोर ठेवली.काही पुस्तकं परत करायची होती, काही वाचण्यासाठी घरी न्यायची होती.
इचलकरंजी या कापड उद्योगी रखरखीत गावात एकाद्या पुस्तकालयात पुस्तकांत गुंतलेली एकादी व्यक्ती पहाणं उत्सूकता चाळवणारं होतं. कुलकर्णी स्थानिक शाळेतल्या शिक्षिका. पाठ्यपुस्तकाच्या पलिकडं जाऊन मुलांशी ज्ञान शेअर करता यावं यासाठी त्या एकेक विषय घेऊन खोलात जाऊन अभ्यास करत. तशा अभ्यासाचा नादच त्याना लागला. शाळेतली नोकरी लवकर सोडून देऊन त्या पूर्णवेळ अभ्यास आणि संशोधनात गुंतल्या. दुनियाभर भटकणं आणि आपटे वाचनालयाच्या पुस्तकांचा उपयोग संदर्भासाठी करणं अशा दोन वाटांनी त्या अभ्यास करत.
त्यांनी पेपरात वर्षभर एक सदर लिहिलं. त्याचा विषय होता कापड, वस्त्र. माणसाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत माणसाला वस्त्राची साथ असते. हे वस्त्रं केव्हांपासून माणसाच्या जीवनात आलं याचा अभ्यास त्यांनी केला. जगातल्या सर्व संस्कृतीत वस्त्रं कशी सापडतात ते त्यांनी अभ्यासलं.
नंतर त्यांनी भांडी या विषयाचा अभ्यास केला. भांड्याच्या निर्मितीचा इतिहास त्यांनी मोहंजो दडो, हराप्पा, ग्रीक इत्यादी संस्कृतीत सापडलेल्या भांड्यांपासून सुरू केला. साहित्यात, इतिहासात, दररोजच्या जगण्यात भांड्यांचे कसकसे उल्लेख येतात याची माहिती त्यांनी नोंदली.
कधी तरी त्यांच्या लेखांचं पुस्तक तयार होईल, त्या पुस्तकाचा वापर अभ्यासक करतील.
त्यांची उत्सूकता आटत नाही. त्या आता नद्या, वनस्पती, फुलपाखरं या विषयांचा अभ्यास करत आहेत. त्यासाठी त्यांनी आंबेघाटात एक छोटंसं जंगल तयार करायचं योजलंय. खर्च स्वतःचा. आपल्याला मिळणारं पेन्शन केवळ पोट भरण्यासाठी नाही, अभ्यास आणि ज्ञानासाठीही आहे असं त्याना वाटतं. नुकत्याच त्या अॅक्टिवा या स्कूटीवरून मध्य प्रदेशात ८०० किमीचा प्रवास करून आल्या, जंगल आणि नदीचं निरीक्षण करत.
पुस्तकालयं, अभ्यास आणि संशोधन यांचा असा संबंध असतो.
रामभाऊ आपटे या वकीलांनी आपटे वाचन मंदिर १८७० साली सुरु केलं. त्या वेळी त्याचं नाव होतं नेटिव जनरल लायब्ररी.
इचलकरंजीचा इतिहास सांगणारं पुस्तक वासुदेव वामन खरे यांनी १९१९ साली लिहिलं आणि पुण्यातल्या आर्यभूषण छापखान्यात छापून प्रसिद्ध केलं. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत खरे लिहितात ” इचलकरंजीचा इतिहास म्हणजे मराठी राज्यांतल्या अंतःकलहांचा व विशेषेकरून इचरकरंजी व करवीर संस्थानांमधल्या कलहाचा इतिहास होय. असले कलह वर्णन करण्याचे काम फारसे उत्साहजनक नसते….”
१६७७ मधे शिवाजी राजेंनी संताजी घोरपडेंना त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल इचलकरंजी इनाम दिले. तिथून इचलकरंजी संस्थानचा इतिहास सुरु होतो. संताजींनतर संस्थान नारो महादेवांकडं आलं. तिथून नारो महादेवांच्या कुटुंबातल्या, दत्तक, दत्तक, दत्तक, अशा मंडळीनी हे संस्थान चालवलं. एकदा या संस्थानाचं वर्षाचं उत्पन्न ४० हजार रुपये असताना ते राखण्यासाठी संस्थानानं शेजारच्या करवीर संस्थानाशी तीन वर्षं लढाया केल्या आणि त्यात ५ लाख रुपये खर्च केले.
राजकारण आणि त्यात नको त्या गोष्टीवर खर्च असा रोगच एकूणात आपल्या संस्कृतीला दिसतो. सतराव्या अठराव्या शतकात इचलकरंजीत जे घडलं ते थेट आजवर चालू आहे. मेहनती लोकांनी दूरवरून येऊन घरातल्या घरात कापड तयार करायला सुरवात केली, पुढं कापड उद्योग विस्तारला. परंतू या विस्तारात गावाचा विकास झाला नाही. गावातली माणसं राजकारणात फार गुंतली. एक शिवाजीचा पुतळा हा मारामारीचा एक विषय एकेकाळी फार महत्वाचा होता आणि फार पैसा या पुतळ्यावर खर्च झाला. गावातली घाण कमी झाली नाही, गावातल्या लोकांना शुद्ध पाणी काही मिळालं नाही.
एकूणात अशा या गावामधे कोण्या उत्साही माणसानं वाचनालय, पुस्तकालय सुरु केलं. हे पुस्तकालय २०१९ सालीही शिल्लक आहे, हळूहळू वाढतंय. इमारत वाढतेय, पुस्तकं वाढताहेत.
महाराष्ट्रातले थोर लेखक, कवी, विचारवंत या वाचनालयात वाचून गेलेत. त्यांनी वाचनालयाच्या बुकात त्यांची निरीक्षणं नोंदलीत. वाचनालय वाढत जातंय, विकसित होतंय असं ही माणसं सतत म्हणत आलीत. १९७८ साली वाचनालयात २० हजार पुस्तकं होती. आज २०१९ साली ती संख्या ८७ हजार झालीय. एक वर्षाच्या काळात सुमारे १००० पुस्तकांची भर पडलीय. पुस्तकांची ही संख्या फार मोठी आहे अशातला भाग नाही. परंतू लाख ते अडीच लाख लोकवस्तीच्या गावात, कारखान्यांच्या गावात, इतकी पुस्तकं असतात हे विशेष. तिथं कोणीतरी येतं आणि संशोधन करतं.
तर्कतीर्थ, पुल देशपांडे इत्यादी माणसं आपटे वाचन मंदिरात गेली होती. पुल, पुभा, बाभ, विवा इत्यादी माणसांनी या पुस्तकालयाचं कौतुक केलं. तेव्हां इंटरनेट नव्हतं, कंप्यूटर आणि सेलफोनवर पुस्तकं वाचण्याची सोय नव्हती. कागदावर छापलेली पुस्तकंच उपलब्ध होती.
काळ बदलला. कागदावर छापलेली पुस्तकंच वाचली पाहिजेत अशी आवश्यकता उरली नाही. एका परीनं पुस्तकं, कपाटं, ती ठेवण्यासाठी बांधलेली इमारत या गोष्टी अडगळीसारख्या झाल्या.
तशातही आपटे वाचन मंदिर टिकून आहे, नाही, वाढतंय.
हे कसं काय जमलं?
पुस्तक आणि पुस्तकं ठेवण्याची जागा या भोवती एक मोठं जग असतं, असायला हवं. पॅरिसमधे एक दोनेकशे वर्षं जुनं पुस्तकाचं दुकान आहे. पुस्तकांनी खच्चून भरलेलं आहे. फार मोठं नाही. फ्रेंच आणि इंग्रजी साहित्यिक त्या दुकानात येजा करत असतात. या दुकानात अनेक इवेंट घडतात. पुस्तकांच्या गर्दीत दाटीवाटनं बसून माणसं पुस्तकांवर, दुनियाभरच्या विषयांवर चर्चा करतात. फार तर वीस पंचवीस माणसं असतात. पण मन लावून चर्चा करतात, टिपणं काढतात, नंतर एकमेकांच्या संपर्कात असतात. दुकानात आणि इंटरनेटवर. अशा छोट्या बैठकांतून अनेक पुस्तकं आकाराला येतात. पॅरिस रिव्ह्यू, लंडन रिव्ह्यू, न्यू यॉर्क रिव्ह्यू इत्यादी नामांकित दर्जेदार नियतकालिकांमधले विषय आणि संशोधन इथं आकाराला येतं.
लंडनच्या ब्रिक्सटनमधे रेलवे स्टेशनाजवळच्या गल्लीत, गजबजलेल्या बाजारात असंच एक छोटंसं दुकान आहे. तिथं वेळी अवेळी माणसं गोळा होतात. पुस्तकांच्या लाकडी खोक्यावर बसून चर्चा करतात. या दुकानात कपाटं कमी आणि खोकी जास्त. सामान्यतः गवगवा झालेली पुस्तकं या दुकानात नसतात. कठीण कठीण पुस्तकं संख्येनं जास्त असतात. मालक म्हातारा, या दुकानातून त्याला नफा होत नाही. चुरगळलेली पँट आणि छोटीशी छिद्रं असणारा स्वेटर घातलेला पांढऱ्या दाढीचा मालक त्याच्याकडं येणाऱ्या वाचकांमधे गुंतलेला असतो.
आपटे वाचन मंदिरात या ना त्या निमित्तानं व्याख्यानमाला घडवल्या जातात. कोणाकोणाची पुस्तकं पुरस्कारासाठी निवडली जातात आणि त्या पुरस्काराचा समारंभ पार पडतो.महाराष्ट्रातले नामांकित आणि दर्जेदार लेखक वगैरे लोक त्या निमित्तानं तिथं जातात. समोर भले शेदोनशे माणसं असतील, पण लेखक तिथं मनापासून बोलतो. चार दोन मंडळींना ते मोलाचं असतं, लेखक-विचारवंताला तिथं व्यक्त होता येतं. एकूण ज्ञान व्यवहारात व्यक्त होणं आणि शेअर होणं हे फार महत्वाचे घटक आहेत. इचलकरंजीत ते घटक सांभाळले जातात.
बजाज नावाच्या कुटुंबानं नुकतेच या वाचनालयाला भरघोस पैसे दिले. त्यातून वाचनालयानं एक सभागृह बांधलं. तिथं गाणं बजावण्यापासून ते वाचनापर्यंतचे नाना समारंभ घडवून आणले जातात. माणसं या निमित्तानं आपले पोटापाण्याचे व्यवहार दूर सारून एकत्र येतात. गाणारी माणसं स्थानिक असतात, भाषण करणारी माणसं स्थानिक असतात. आपापल्या परीनं ती व्यक्त होत असतात. किती छान.
आपटे वाचनालयात पुस्तकं आहेत आणि असतील. कोणी तरी बजाज सारखा माणूस उद्या कोटीभर रुपये देईल आणि पिकासो, बर्वे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवेल. कोणी तरी बजाज कधी तरी कोटीभर रुपये देईल आणि जगभरातल्या उत्तमोत्तम फिल्मा, बर्गमन-तारकोवस्की-रे इत्यादी, दाखवायची सोय करेल, त्या फिल्मांवरची पुस्तकं उपलब्ध करून देईल. कोणी तरी माणूस कोटीभर रुपये देऊन ऑडियो पुस्तकं, ऑन लाईन पुस्तकं उपलब्ध करून देईल.
लंडनमधल्या म्युझियमला भेट द्यायला, तिथं अभ्यास करायला जगभरचे लोक जातात. अलेक्झांड्रियातल्या लायब्ररीत आणि नालंदाच्या लायब्ररीत जगभरातून माणसं अभ्यास करायला जात. कोण जाणे उद्या आपटे वाचन मंदिरही तसंच होईल.
।।