राजदूताची कहाणी
विल्यम बर्न्स यांनी १९८२ साली अमेरिकेच्या परदेश नीती खात्यात प्रवेश केला. रोनाल्ड रेगन, मोठे बुश, बिल क्लिंटन, धाकटे बुश आणि बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेखाली परदेश खात्यात त्यांनी विविध पदांवर राहून डिप्लोमसी केली. शेवटी डोनल्ड ट्रंप यांची कारकीर्द सुरू होतांना २०१४ साली त्यांनी परदेश खात्याला रामराम ठोकला.
कॉन्सुलेटमधे लोकांना व्हिसे देण्यापासून सुरवात करून ते उप परदेश मंत्री या पदापर्यंत पोचले. वाटेत ते जॉर्डन आणि रशियात राजदूतही होते. ३२ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी छोटी मोठी कामं केली. २०१५ साली इराणशी केलेला अणू करार हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू होता.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरचे बलवान देश जगाची वाटणी करून आपापलं हित साधत होते. जगाची प्रामुख्यानं कम्युनिष्ट आणि भांडवलशाही-लोकशाहीवादी अशी विभागणी झाली होती. युद्धाच्या दाहक संघर्षानंतर नव्यानं सुरु झालेला संघर्ष थंडपणानं सुरु झाल्यानं त्या काळाला शीत युद्ध म्हणतात.
शीत युद्द अस्ताला जात असताना म्हणजे रेगन यांच्या काळापासून बर्न्स यांची कारकीर्द सुरु झाली.
चीनच्या आर्थिक प्रगतीची सुरवात झाली नव्हती. रशियाची अर्थव्यवस्था घसरत होती आणि अमेरिका व युरोप मात्र जोरात होतं. या स्थितीत रशियाला दमात घ्यायचं, रशिया आणि चीन यांच्यात फूट पाडायची असं अमेरिकेचं धोरण होतं. आता जगात आपणच एकटे बलवान उरलो आहोत अशा समजुतीत अमेरिका आक्रमक होऊन साऱ्या जगाशी वागत होतं.
बर्न्स यांचा संबंध रशियाशी अधिक आला. कोसळलेली अर्थव्यवस्था, लोकशाहीचा अभाव, अंतर्गत विसंवाद या घटकांचा परिणाम होऊन सोवियेत व्यवस्था कोसळली, घटक देश मोकळे झाले आणि रशियात काहीसं अराजक माजलं. गोर्बाचेव हे त्या व्यवस्थेला गती देणारे नेते होते. आधीच खलास झालेलं युनियन आणि त्यानंतर तुकडे झालेला रशिया यामुळं रशियाची अवस्था आणखीनच बिकट झाली. रशिया दुखावला. गोर्बाचेवनंतर काही काळ येल्तसिन आले आणि नंतर येल्तसिनना बाजूला सारून पुतीन देशप्रमुख झाले. गोर्बाचेव ते पुतीन या काळात बर्न्स सक्रीय मुत्सद्दी होते.
राजदूत म्हणून आपले कागदपत्रं सादर करायला अगदी पहिल्या प्रथमच बर्न्स पुतीनना भेटले ती घटना बर्न्स यांनी चित्रपटात शोेभेल अशी लिहीलीय. शेकडो फूट लांबरूंद, आकाशाला भिडेल इतकी छताची उंची, किल्ल्याला शोभतील असे महाकाय दरवाजे आणि अशी अनेक दालनं ओलांडत बर्न्स एका दालनात पुतीन यांची वाट पहात थांबले. आपणही शक्तीशाली आणि महान आहोत हे पुतीननी दाखवलं.प्रचंड दरवाजा किलकिला करून बराच वेळ वाट पहायला लावून पुतीन आले. रशिया केवढा मोठा आहे ते तिथलं फर्निचर, झुंबरं इत्यादीतून दाखवलं जात होतं.
अशा आमच्या रशियाशी तुमचं वागणं बरोबर नाही असं चेहरा, हालचालीनी दाखवत पुतीन सामोरे झाले. भेटल्या भेटल्या कागदपत्रं घ्यायच्याही आधी त्यानी सांगून टाकलं की अमेरिकेनं जरा इतरांचाही विचार करायला शिकावं, रशियाशी नीट वागावं, नाही तर अमेरिकेचं काही खरं नाही.
त्यानंतर बर्न्स यांच्या पुतीन यांच्याशी कित्येक भेटी झाल्या. प्रत्येक वेळी ते आक्रमक असत, पाय पसरून बसत, कधी तुटक तर कधी बोचक बोलत. रशियाचं दुखावलेपण नेहमी त्यांच्या वागणुकीतून ठळकपणे दिसत असे.
बर्न्स वेळोवेळी पाठवलेल्या खलित्यातून रशियाची ही परिस्थिती समजून घ्यावी आणि रशियाशी आक्रमक रीतीनं वागणं सोडून द्यावं असं प्रेसिडेंटांना सुचवलं. रेगन, बुश, बुश, क्लिंटननी बर्न्स यांची निरीक्षणं दूर सारली. ओबामा यांनी मुळातच आपलं लक्ष रशिया आणि चीनपासून दूर नेलं होतं. परिणामी रशिया आणि अमेरिका यातले संबंध सतत दुखरेच राहिले. रशियाविरोधी करारामधे रशियातून फुटलेल्या देशांना नॅटो या रशियाविरोधी संघटनेत अमेरिका सामिल करत राहिलं, आज पर्यंत. बर्न्स यांनी सल्ला दिला की तसं करू नका, रशियाला अधिक दुखवू नका, रशियाशी जुळवून घ्या.बर्न्स यांचा सल्ला जर्मनीनं मानला, अमेरिकेनं मानला नाही.
एकविसाव्या शतकात जग बदललं. तंत्रज्ञानानं जगाचा ताबा घेतला. सैन्य आणि लढायानी नव्हे तर देशांचे बाजार काबीज करून देश जिंकावेत असा विचार प्रवाह सुरु झाला. हा घडा चीननं बरोब्बर घेतला. पण अमेरिकेचा पीळ येवढा की अजूनही अमेरिकेला तो प्रवाह समजत नाहीये. प्रतिस्पर्धी देशांना अंकित करण्याची राजनीती सोडून समंजसपणे जगासोबत रहायला शिकायचं अशी नीती ओबामा अवलंबू पहात होते. त्यांनी तो धडा कदाचित अंगेला मर्केल यांच्याकडून घेतला असावा. ओबामा अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मर्केल यांच्याशी तासनतास फोनवर बोलत, त्यांच्याकडून सल्ला घेत.
ओबामा सीरिया आणि अफगाणिस्तानात अडकून पडले. लष्कराचा वापर करायच्या ऐवजी ड्रोनचा वापर करून सीरियात दहशतवाद्यांचा सामना करत राहिले. परंतू असद यांच्यावरच कारवाई करण्याकडं त्यांचं दुर्लक्ष झालं. सीरियातलं जमिनीवरचं वास्तव ते विसरले, विरोधकांना बळकट करण्याकडं त्यांनी लक्ष दिलं नाही आणि नको तिथं वाटाघाटी करत राहिले. आसद यांनी विषारी वायू वापरून निष्पाप माणसांना मारलं तेव्हां आसद यांना ठोकून काढायच्या ऐवजी ते रशियाला बरोबर घेऊन मुत्सद्देगिरी करत राहिले. अफगाणिस्तानाच्या चिखलात ते रुतून पडले. ना सगळे अमेरिकन सैनिक मागे घेतले ना अफगाण जनता व संस्था बळकट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
ओबामांच्या कारकीर्दीत दोन मोठ्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे ओसामा बिन लादेनचा खातमा. मुत्सद्देगिरी, पाकिस्तानला विश्वासात घेणं, रशियाशी बोलणं, सौदीची मदत घेणं असला घोळ ओबामानी घातला नाही. विश्वास ठेवण्यालायक माहिती पटापट जमवून, धोका पत्करून, अगदी चटचट त्यांनी ओसामा संपवला. ओसामा संपला पण इस्लामी दहशतवाद संपला नाही याचा दोष ओबामांना देता येणार नाही.
ओबामांची दुसरी मोठी कामगिरी म्हणजे इराणबरोबर केलेला अणुकरार. इराणनं चालवलेली अण्वस्त्रांची तयारी थांबवावी आणि त्या बदल्यात इराणवर टाकलेले आर्थिक निर्बंध दूर करावेत, इराणला आर्थिक मदत करावी अशा विचार अमेरिका व जर्मनी, रशिया, युके, फ्रान्स इत्यादी देशही करत होते. परंतू इराण सरकार हटवादी होतं. मुत्सद्देगिरी साधत नव्हती. इराणमधले अंतर्गत राजकीय गट, सर्वेसर्वा खामेनी आणि अहमदीनेजाद इत्यादी पुढारी अडेलट्टू झाले होते. या स्थितीत ओमानच्या सुलतानानं पुढाकार घेतला आणि विल्यम बर्न्स यांनी करार घडवून आणला.
बर्न्स आठ महिने कराराची पार्श्वभूमी तयार करत होते. या घटनाचक्राचा वृत्तांत थरारक चित्रपटासारखा बर्न्स यांनी लिहिला आहे. ओमानच्या सुलतानांच्या एका बिझनेसमन मित्रानं पुढाकार घेतला. सलमान त्याचं नाव. तो कितीपत विश्वासार्ह आहे, तो खरोखरच करार करू पहातोय की स्वतःचं उखळ पांढरं करू पहातोय ते कळत नव्हतं. मुळात ओमानचा सुलतानच का पुढाकार घेतोय तेही कळत नव्हतं. आखातातल्या इतर अरब देशांवर मात करण्यासाठी तर तो ही खटपट करत नाहीये ना असाही एक मुद्दा होता. सुलतानानं एक खाजगी फोन करून बर्न्स यांच्याशी संपर्क साधला आणि तिथून घटना मालिका सुरु झाली.
बर्न्स कोणत्याही खुणा नसलेल्या विमानानं प्रवास करत. मस्कतमधे लष्करी विमानतळाजवळच असलेल्या एका गुप्त ठिकाणी ते इराणच्या मुत्सद्द्यांना भेटत. इराणी मुत्सद्दी सतत बदलत, प्रत्येक गट प्रत्येक वेळी वेगळी भूमिका घेत असे. तासन तास, दिवसरात्र बैठका होत. बैठकीत तुंबळ वाद होत, टेबलांवर मुठी आदळत. माणसं रागावून बैठक सोडून निघून जात, नंतर थंड होऊन पुन्हा भेटत. इराणचा अमेरिकेवरचा राग, अमेरिकेचा इराणवरचा राग सतत उफाळून येत असे. किलो किलो कागद आणि रिपोर्ट चर्चेत असत. काही दिवस जात. चर्चा थांबे. दोन्ही बाजूची माणसं आपापल्या देशात जात. नंतर मस्कतमधे जमत.
बर्न्स यांच्या बरोबर आठ दहा लोकांची टीम असे. त्यात एक पुनीत तलवार नावाचा ज्युनियर मुत्सद्दीही असे. या लोकांच्या दौऱ्याचा उल्लेख कुठंही होत नसे. गुप्तपणे वेगळ्या नावांनी त्यांची तिकीटं काढली जात. प्रेसिडेंट ओबामा, परदेश मंत्री केरी आणि एकाद दोन लोक सोडले तर अमेरिकेत कोणालाही या प्रयत्नाची माहिती नव्हती. ओबामा मात्र चिकाटीनं पाठपुरावा करत होते, प्रोत्साहन देत होते.
शेवटी इराणी नेत्यांना वाटलं की देश वाचवायचा असेल तर करार करणं भाग आहे. करार झाला. करारावर अमेरिका, जर्मनी, युके, फ्रान्स, रशिया इत्यादी लोकांनी सह्या केल्या पण कराराची पुर्ण पूर्वतयारी बर्न्स व त्यांच्या टीमनं केली होती हे करार होईपर्यंत कोणालाही माहित नव्हतं. पेपरातल्या एक दोघांना कुणकुण लागली होती. काही तरी प्रयत्न होताहेत असं एकाद दोघांनी सूचित केलं होतं. परंतू त्या पत्रकारांना बर्न्स आणि ओबामा यांनी अंधारातच ठेवलं. त्यामुळं करार पार पडला.
मुत्सद्देगिरी म्हणजे काय असते याचा उत्तम वर्गपाठ इराण करारामधून मिळतो. बर्न्स आणि त्यांच्या टीमला आठ ते दहा महिने इतर सर्व कामं दूर सारून कराराचा अभ्यास करावा लागला. त्यात इराणचा सर्वांगिण अभ्यास आणि आखाती देशांचाही अभ्यास होताच. पर्शियन आणि अरबी भाषांचाही अभ्यास करावा लागला. वाटाघाटी करत असताना माणसं आपल्या कुटुंबापासून तुटलेली असत. घरच्या लोकांना चिंता असे की आपला बाप जातो तरी कुठ आणि करतो तरी काय. काही भानगड तर नाहीयेना असंही वाटत असे. मस्कतच्या बंद खोलीत तासनतास डोकेफोड करायची आणि एक इंचही पुढं सरकणं होत नसे. तरीही मनाचा तोल जाऊ न देता संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर फिरायला जायचं आणि तिथं पुन्हा विषय काढायचा. कधी चिमटे, कधी फटके, कधी फालतू विनोद. पण विषय सोडायचा नाही, निराश व्हायचं नाही.
करार झाला, श्रेय मिळालं त्या त्या देशांच्या प्रमुखांना. मुत्सद्दी आपापल्या जागी पुढल्या कामगिऱ्यांत मग्न झाले.
बर्न्स त्यांच्या पुस्तकात म्हणतात की ट्रंप यांची कारकीर्द सुरु झाल्यानंतर मुत्सद्देगिरीचा अंतच झाला आहे. ते स्वाभाविकच आहे. कारण बॉब वुडवर्डनी ट्रंप यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात म्हटलं आहे की ट्रंप काही वाचत नाहीत, कोणाचं ऐकत नाहीत, विविध खात्यानी तयार करून दिलेले खलिते वाचत नाहीत, टीव्हीचे त्यातही फॉक्स टीव्हीचे कार्यक्रम पहाताना त्यांना जे सुचतं तेच असतं ट्रंप यांचं परदेश धोरण. ते धोरणही ट्वीटरवर जाहीर होतं.
।।