देश विकत घ्यायला निघालेला प्रेसिडेंट
ग्रीनलँड हा डेन्मार्कचा एक स्वायत्त प्रदेश विकत हवाय, विकता काय, असा प्रश्न डोनल्ड ट्रंपनी डेन्मार्कच्या पंतप्रधानाला विचारला. काश्मिर किंवा महाराष्ट्र किंवा गुजरात हा प्रदेश विकत घ्यायचा आहे अशी ऑफर भारतीय पंतप्रधानाला देण्यासारखा हा प्रकार.
हा प्रश्नही केव्हां काढला? जेव्हां ट्रंप यांचा अनेक महिन्यापासून ठरलेला डेन्मार्कचा दौरा काही दिवसांवर आला होता. डेन्मार्क आणि अमेरिकेचे संबंध चांगले, मैत्रीचे आणि सहकार्याचे आहेत. ते संबंध बळकट करण्यासाठी वरील दौरा आखण्यात आला होता. अमेरिकन अध्यक्षाचा दौरा हे फार कटकटीचं प्रकरण असतं. त्यांच्या सुरक्षेची फार कडेकोट व्यवस्था करावी लागते. अमेरिकन अध्यक्ष स्वतःची बीस्ट ही कार घेऊन आणि स्वतःचे सुरक्षा रक्षक घेऊन प्रवास करत असतात. शेकडो माणसं त्यांच्यासोबत असतात. त्यांची व्यवस्था हा अब्जावधी डॉलर खर्चाचा मामला असतो. ग्रीनलॅंड सारख्या फक्त ५६ हजारांची लोकसंख्या असलेल्या वैराण बर्फाळ प्रदेशाला तो खर्च परवडत नसतो. तरीही तो दौरा आखण्यात आला होता.
ग्रीनलँड विकता काय असं विचारल्यावर डेन्मार्कच्या पंतप्रधान फ्रेडरिकसन वैतागल्या. त्यांनी ट्रंप यांच्या प्रस्तावाचं वर्णन absurd अशा शब्दात केलं. अॅबसर्ड या शब्दाचं मराठीत भाषांतर हास्यास्पद, बिनडोक असं होतं. दोन्ही शब्द ट्रंप यांच्या बाबतीत लागू पडत असल्यानं ट्रंप संतापले. त्यांनी डेन्मार्कचा दौराच रद्द करून टाकला. तोही ट्रंपी पद्धतीनं, ट्वीट करून. ट्रंप ट्वीटले ” फ्रेडरिकसन यांना असं म्हणता आलं असतं की आम्ही विकू शकत नाही, त्यांनी अॅबसर्ड हा शब्द वापरायला नको होता. त्या ट्रंपचा नव्हे तर अमेरिकेच्या अध्यक्षाचा अपमान करत होत्या. म्हणून मी दौरा पुढं ढकलत आहे.”
ग्रीनलँड आणि डेन्मार्क या दोन्ही देशांत संतापाची लाट उसळली. दोन्हींच्या पंतप्रधानांनी आपली नाराजी प्रकट केली. पण ट्रंपी भाषेत नाही. तर सभ्य भाषेत. दोघांनी पत्रक काढून म्हटलं ” अमेरिकेशी आमचे दीर्घकाळापासून मैत्रीचे संबंध आहेत. आम्हाला ते टिकवायचे आहेत. ट्रंप यांच्या निर्णयानं अाम्हाला दुःख होत आहे.”
डेन्मार्कच्या पंतप्रधानाला पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखून बोलावं लागलं. तसं बंधन डेन्मार्कचे माजी परदेश मंत्री विली सॉवनल यांच्यावर नव्हतं. ते म्हणाले ” सर्कशीतल्या विदुषकानं तसं वक्तव्य केलं असतं तर ते समजण्यासारखं आहे कारण विदुषक मनोरंजनासाठी तशा गोष्टी करत असतो. परंतू ते वक्तव्य जगातल्या एका शक्तीशाली देशाच्या राष्ट्रपतीनं केलं आहे. ….ट्रंप हे मूर्ख आहेत असं आजवर अनेक बाबतीत लक्षात आलं आहे, त्यांच्या मूर्खपणाचा आणखी एक पुरावा या वक्तव्यानं मिळाला आहे. ट्रंप हे स्वमग्न मूर्ख आहेत.”
ट्रंप मूर्ख आहेत कारण त्यांच्या लेखी ते जन्मले तेव्हांपासूनच जगाचा इतिहास सुरु होतो. ते जन्मायच्या आधी कित्येक शतकं जगात काय काय घडून गेलं, त्यातलं घातक काय होतं आणि उपकारक काय होतं इत्यादी गोष्टी त्याना माहितच नाहीत.
एकेकाळी जगात साम्राज्यं होती. साम्राज्यं ही सम्राटाची खाजगी मालमत्ता असे, तिची कशीही विल्हेवाट लावण्याचा अधिकार सम्राटाकडं असे. साम्राज्यातला प्रदेश हा भूभाग असे, त्यात माणसं रहात असत, त्या माणसांना एक स्वतंत्र अस्तित्व असतं हे सम्राटाला मान्य नसे. १८६७ मधे अलास्का नावाचा एक प्रचंड बर्फाळ निर्जन भूभाग रशियन सम्राटाच्या मालकीचा होता. त्या भूभागावर ब्रिटीश सम्राट कबजा करू पहात होता. ब्रिटीश सम्राट-सम्राज्ञीशी लढणं रशियन सम्राटाला शक्य नव्हतं. म्हणून त्यानं तो भाग अमेरिकेला विकला. ७२ लाख डॉलर ही किमत मोजून.
हेही खरं आहे की अमेरिकेनं १८५४ साली मेक्सिको या देशाला १ कोटी डॉलर देऊन त्यांची २६ हजार चौ.मै. जमीन खरेदी केली.
अमेरिकन व्यवहारात दिसणारा एक मुद्दा म्हणजे बाजारप्रेम, पैसा हे व्यवहाराचं मुख्य मूल्य. अलास्काची जमीन स्वस्तात मिळतेय, तिथं लोकसंख्याही कमी आहे, तिथल्या नैसर्गिक साधनांचा उपयोग करून श्रीमंत होता येईल हा हिशोब अमेरिकेनं केला. त्या काळात अमेरिकेत लोकशाही होती. त्यामुळं अलास्का खरेदीवर टीकाही झाली.
अमेरिकन व्यवहारातला दुसरा मुद्दा म्हणजे अमेरिकेचा स्वतःचा साम्राज्यवाद. ब्रिटीश साम्राज्यातून सुटका करून अमेरिका स्वतंत्र झाली खरी पण स्वतःच्या आर्थिक विकासासाठी साम्राज्यं उभी करायची असतात हा तत्कालीन इतिहासाचा धडा अमेरिकाही गिरवू लागली. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकनं आपणच जगाचे त्राते असल्यानं जगावर आपला ताबा असायला हवं असं मानलं आणि जगात नाना ठिकाणी आपलं वर्चस्व बसवलं. जसजशी जनजागृती होऊ लागली तसतसे देश आणि समाज परकीय जोखड अमान्य करू लागले, साम्राज्य कोसळू लागली, त्यात अमेरिकेचंही पूर्वकडं साम्राज्य विरघळत गेलं.
पैसे देऊन किंवा इतर वाटेनं एकादा समाज विकत घेता येत नाही, त्या त्या समाजाला ते मान्य होत नाही हे इतिहासाचं आधुनिक वळण ट्रंप यांना ते अक्षरशत्रू असल्यानं माहितच नाही. त्यामुळंच ते बेधडक ग्रीनलँड विकत घेण्याची भाषा करू लागले.
सार्वजनिक क्षेत्रात माणसानं कसं वागावं, देशाच्या प्रतिनिधीनी कसं वागावं याचे काही संकेत काळाच्या ओघात तयार झाले आहेत. जगातले इतर देश, इतर बाजार आपल्याला उपकारक ठरावेत असं प्रत्येक देशाला वाटत असतं. एकेकाळी देश आणि बाजार लष्करी बळानं ताब्यात घ्यायची प्रथा होती. कालांतरानं लष्कराचा उपयोग थांबला. तंत्रज्ञान, भांडवलाची पेरणी, आर्थिक मदत या वाटांनी इतरांना आपलंसं करण्याची प्रथा रूढ होतेय. मुत्सद्देगिरी आणि गोडगोड भाषा यांचा वापर या व्यवहारात होत असतो. चीनला भारताचा बाजार हवा असतो, अमेरिकेला चीनचा बाजार हवा असतो. पण चीन आणि भारत सभ्य भाषेत बाजारासाठी बोलणी करतात. परस्पर सहकार्यानंच आपला विकास होऊ शकतो अशी सुळसुळीत वाक्यं देशप्रमुख आणि मुत्सद्दी वापरत असतात. खटपट अशक्ताला नमवण्याचीच असते, बकरे पकडण्याचीच असते परंतू रीत सभ्य असते, शब्द सभ्य असतात.
पण अगदी अलीकडच्या रीती काय आहेत हेही ट्रंप यांना कळत नाही. कारण ते काहीही वाचत नाहीत, फॉक्स न्यूजवरची स्वतःचीच भाषणं ऐकत असतात आणि स्वतःच्या होयबा वर्तुळातल्या माणसांमधेच वावरत असतात. व्हाईट हाऊस नावाची एक प्रचंड यंत्रणा आहे याचाही विसर त्याना पडलेला आहे, आपल्या बेडरुममधे बसून सेलफोनवर अनियंत्रीत ट्वीट करणं हीच राज्यकारभाराचे निर्णय घेण्याची त्यांची पद्धत आहे. त्यांना कशातलं काही कळत नाही, त्यांचा कोणाशीही संबंध नाही, धार्मिक परिभाषेत बोलायचं तर ते एक स्वयंभू देव आहेत.
व्हाईट हाऊस, परदेश विभाग, व्यापार विभाग यांच्याशी चर्चा करून ग्रीनलँडशी सहकार्य करून आपला फायदा कसा करून घेता येईल असा विचार ट्रंप करत नाहीत. कदाचित ग्रीन लँड कुठं आहे तेही त्याना माहित नसेल. ट्रंपना न्यू यॉर्कच्या रस्त्यावरच्या फेरीवाल्यासारखाच धंदा करणं माहित आहे.
गंमत म्हणजे अशा माणसाला अमेरिकेचे नागरीक निवडून देतात आणि त्याचं कौतुक करत असतात. अमेरिकेची अर्थव्यवस्था स्वतंत्रपणे चालली आहे, ट्रंपच्या धटिंगणगिरीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही हे सत्य लक्षात न घेता ट्रंपमुळंच अमेरिकेचं बरं चाललं आहे असं म्हणतात. नागरीक आणि मतदारांची ही अवस्था असेल तर ट्रंप यांच्यासारखा नेता त्याना मिळणं अटळ दिसतंय.
।।