लढाया, दंगली,हिंसाचार कव्हर करणाऱ्या महिला बातमीदार.
Our Women on the Ground या नावाचं पुस्तक पेंग्वीन प्रकाशनानं अशात प्रसिद्ध केलंय. इराक, सीरिया, लेबनॉन, जॉर्डन, तुर्की, सौदी इत्यादी अरब प्रदेशात जीव पणाला लावून पत्रकारी करणाऱ्या १९ अरब पत्रकार महिलांचे अनुभव, निबंध या पुस्तकात आहेत.
आपला अनुभव असा की प्रत्येक युद्धाच्या वेळी पत्रकार रकाने भरभरून युद्धाचा उन्माद निर्माण करतात. युद्धात माणसं मरतात हे भीषण वास्तव पत्रकार रम्य आणि उदात्त करून टाकतात. माणूस मेल्यावर स्वर्गात जातो, तो हुतात्मा होतो वगैरे गोष्टी युद्धात भाग न घेणाऱ्या लोकांना बोलायला सोप्या असतात. पण प्रत्यक्ष युद्धातलं वास्तव, त्याचे सैनिकांना-सैनिकांच्या कुटुंबियांना बसणारे चटके ही गोष्ट मुळीच रम्य नसते. युद्ध,दहशतवाद, घातपात, त्याचे कुटुंबियांवर होणारे परिणाम इत्यादी दाहक गोष्टी पत्रकार महिला या पुस्तकात सांगतात.
हना अल्लम इराकमधील घरकलही युद्ध कव्हर करत असत. दररोज, दिवसांतून अनेक वेळा कारबाँब स्फोट होत असत. शेवटी शेवटी स्फोटांच्या बातम्या करकरून त्या कंटाळल्या. त्याना ठरवलं की ज्या स्फोटात २० पेक्षा जास्त माणसं मेली असतील त्याच स्फोटाच्या बातम्या द्यायच्या. हना यांना कधी गजराचं घड्याळ वापरावं लागलं नाही, गजर लावावा लागला नाही. स्फोटांनीच त्याना जाग येत असे.
स्फोट साधारणपणे सरकारी ऑफिसं, पोलिस कचेऱ्या इत्यादींसमोर होत असत. कामासाठी आलेली माणसं तिथं मारली जात, मरणारे पुरुष असत.दर दिवशी ८० पेक्षा जास्त पुरुष मरत.
प्रत्येक मेलेल्या पुरुषाबरोबर एक स्त्री विधवा होत असे. त्या स्त्रीला चार पाच मुलं असत. आधीच ओढगस्तीत चाललेला संसाराचा गाडा त्याना ओढायचा असे. नवरा मेला की दुसऱ्या दिवसापासून त्यांना अंगावरचं सोनं विकून, साठवलेले दागिने विकून कपडे, अन्न इत्यादी गोष्टी विकत घ्याव्या लागत. सोनं तरी किती दिवस पुरणार. एक दिवस असा येत असे की घरात अन्नाचा कण नाही.
स्त्रीनं नोकरी करणं, मजुरी करणं, सार्वजनिक ठिकाणी वावरणं समाजाला मंजूर नाही.
मग ती स्त्री कंत्राटी लग्न करत असे. श्रीमंत माणूस असे. तो महिना, वर्ष या काळासाठी लग्न करत असे. कागदोपत्री, करार करून लग्न. दर महिना १५ डॉलर, मुलांसाठी कपडालत्ता, महिन्याभराची शिधा. अशा लग्नाला इस्लाममधे परवानगी आहे.
मुलांना हे लग्न आवडत नसे. त्यांना वाटे की हे शरीर विकणं आहे, हा वेश्याव्यवहार आहे. शेजारपाजारची बाया माणसं तसंच बोलत. त्यामुळं मुलांना आईचा राग, घृणा येत असे, ती आईशी भांडत. आई म्हणे की तुम्हाला जगवण्यासाठी मला काय काय करावं लागतंय ते पहा. लग्नाचा करार करताना त्या बाईचे हात थरथरत असत, चेहरा काळा पडलेला असे. पण इलाज नव्हता. कंटाळा आला की तो पुरुष हे कंत्राट संपवून दुसऱ्या स्त्रीशी करार करत असे. बेकार झालेली ही स्त्री मग नवा नवरा शोधत असे.
हना अल्लम लिहितात की इराकी स्त्री शूर आहे कारण तिला खूप सोसावं लागतं. युद्ध, घरकलही युद्ध इत्यादी गोष्टी पुरुषांना ठीक आहेत, शेवटी सारा त्रास स्त्रियांना सहन करावा लागतो, त्यातूनच या स्त्रिया कणखर होतात.
इमान हेलाल ही स्त्री सर्वसाधारण इजिप्शियन घरातली. कैरोत जन्मली, वाढली. घरातलं वातावरण सनातनी, स्त्रीनं बुरखा-अबायात वावरावं, पुरुष सांगतील तसंच वागावं. इमान हेलालचे वडील वारल्यानं तिचा मोठा भाऊ घराची जबाबदारी सांभाळतो, त्याचा जाच तिला सहन करावा लागतो. इमाननं फोटोग्राफी आणि पत्रकारीचं प्रशिक्षण घेतलं असल्यानं तिला पेपरात काम करावं लागणार ही गोष्ट तिच्या आईला, भावाला मंजूर नाही. ते इमानला घराच्या बाहेर पडू देत नाहीत.
त्याना न जुमानता इमान एका कैरोतल्या दैनिकात काम करते. तिथले पुरुष सहकारी आणि संपादक तिची हेटाळणी करतात. इमान त्याची पर्वा करत नाही. २०११ मधे अरब स्प्रिंग आंदोलन सुरु होतं. कैरोतला तहरीर चौक युद्धभूमी होतं. लक्षावधी माणसं तिथं स्वातंत्र्याची मागणी करत गोळा होतात. इमान तरहीर चौकात जाते, आंदोलनात भाग घेते, फोटो काढते. ते फोटो छापून यावेत यासाठीही इमानला झगडावं लागतं.
तहरीर आंदोलन संपल्यावर इमान स्त्री स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेते. आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्तानं तहरीरमधे निदर्शनं करण्यात ती पुढाकार घेते. फोटो काढते. अरब स्प्रिंग आणि स्त्रीचे अधिकार या दोन्ही निदर्शनांचे फोटो काढताना इमानला आसपासचे बघे पुरुष आणि पोलिस पुरुष त्रास देतात, अश्लील हावभाव करतात, अयोग्य वागवतात. एकदा पोलिस तिला बडवून काढतात, तिचा कॅमेरा मोडून टाकतात. सुजल्या चेहऱ्यानं ती घरी जाते तेव्हां सारं घर खवळतं. कुटुंबीय कैरोबाहेर सुरक्षीत ठिकाणी जातात. आईनं दाराला कुलूप लावून चावी स्वतःकडं ठेवलेली असते. नोकरी जाईल अशी भीती घालून इमान काढता पाय घेते, दैनिकात हजर होते.
इजिप्शियन समाजातला स्त्रीद्वेष, स्त्री म्हणजे मुलांना जन्म देणारं जनावर, स्त्री म्हणजे घर चालवणारं एक यंत्र असा इजिप्शियन समाजाचा दृष्टीकोन इमानला त्रास देतो. ती आपले, स्त्रीचे अधिकार व स्वातंत्र्य हा विषय घेऊन लढत रहाते. पुरुष रस्त्यावर स्त्रीची अवहेलना कशी करतात, स्त्रीसमोर कसं अश्लील वागतात याचे फोटो इमान काढते आणि त्यातून ती जस्ट स्टॉप नावाचं एक फोटो आंदोलन उभी करते.
रुकिया ही तरूण सीरियन मुलगी. ही रूढार्थानं पत्रकारी करत नव्हती. म्हणजे असं की ती कुठल्याही पेपरसाठी लिहीत नव्हती. पण सभोवताली जे दिसतं त्याचं वर्णन ती फेसबुक पोस्टमधे करत असे. तिची पोस्ट म्हणजे एक बातमीच असायची. अरब स्प्रिंगमधेच सीरियातले तरूण बशर आसद यांच्या हुकूमशाहीविरोधात उभे राहिले. रुकिया राक्का या गावात रहात असे. तिथं तरूण काय करत आहेत याची खबर ती फेसबुकवर टाकत असे. एकूण सांप्रदायीक आणि यादवीत आयसिस नावाचं एक लचांड उपटलं. आयसिसनं राक्काचा ताबा घेतला, तिथं त्यांची इस्लामी राजवट उभारली. रुकिया आयसिसच्या अत्याचाराच्या बातम्या देऊ लागली. दररोज अनेक पोष्टी ती टाकत असे.
राक्काचा ताबा आयसिसनं घेतल्यावर रुकियानं पोस्ट टाकली “ सीरियात जीवन आणि प्रतिष्ठा या दोन गोष्टी म्हणजे समांतर रेषा आहेत, त्या कधीच एकमेकाला भिडत नाहीत.”
रुकिया निस्सान इब्राहीम या टोपण नावानं पोस्टी टाकत असली तरी तिच्या फोटोंवरून ती कोण आहे हे लोकांना, म्हणजे दहशतवादी आणि आम जनता यांना, कळत असे. तिला लाखो अनुयायी होती. तिच्या धाडसाबद्दल लोकांना चिंता वाटत असे, लोक तिला सांगत की फोटो टाकू नकोस, जरा सांभाळून पोस्टी टाकत जा. रुकियानं जुमानलं नाही.
२० जुलै २०१५ रोजी रुकियानं पोस्ट टाकली “ आयसिस मला मारण्याच्या धमक्या देतंय.ते माझं मुंडकं उडवणार आहेत. पण प्रतिष्ठा जाण्यापेक्षा मुंडकं जाणं मी पत्करेन.” यानंतर तिच्या पोस्ट येणं बंद झालं. तिला ठार मारण्यात आलं होतं. पण ते तरी सिद्ध कसं झालं? २०१६ च्या जानेवारीत तिच्या कुटुंबियांना एक पत्र आलं. पत्रं दहशतवादी संघटनेनं लिहिलं होतं. आम्ही रुकियाला मारलंय असं संघटनेनं कबूल केलं होतं. परंतू रुकियाचा मृत देह त्यांनी कुटुंबियांना सोपवला नाही.
पुस्तकात अनुभव लिहिणाऱ्या स्त्रिया लेबनीज, इराकी, सीरियन, सौदी आहेत. घरून विरोध असतानाही त्यांनी विचारपूर्वक पत्रकारी पेशा पत्करला आहे. प्रस्तावनेत क्रिस्तियान अमानपूर यांनी त्यांच्या एका सहकारी फोटोग्राफरची हकीकत सांगितली आहे. फोटोग्राफर मार्गरेट मॉथ सारायेवोत फोटोग्राफी करत असताना मारली गेली. मरण्याच्या आधी काही दिवस तिच्यावर स्नायपरनी गोळीबार केला होता. त्यात तिचा अर्धा जबडा, अर्धी जीभ आणि एक डोळा निकामी झाला होता. अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार झाल्यावर ती बरी झाली आणि लगोलग सारायेवोतलं सांप्रदायीक युद्ध कव्हर करायला गेली. मोटार सायकलच्या मागल्या सीटवर बसून गोळीबारातून वाट काढत जाणारी महिला पत्रकार या पुस्तकात वाचायला मिळते.
।।