सायको

सायको

“ सायको”  चित्रपट  प्रदर्शित झाला त्याला आता ६० वर्षं झाली. आल्फ्रेड हिचकॉकच्या या चित्रपटानं एकूण जागतीक चित्रपटाला एक नवं वळण दिलं. चित्रपटाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना हा चित्रपट अभ्यासावा लागतो. आजही ज्यांना रहस्यपट, भयपट करायचे असतात ती मंडळी “ सायको” आणि हिचकॉकचे इतर चित्रपट पहातात, अभ्यासतात. नेटफ्लिक्सवर आजही “ सायको” पाहिला जातो.

गंमत म्हणजे आजची पिढीही हा जुना चित्रपट पहातांना गुंगते.

“ सायको” ब्लॅक अँड व्हाईट आहे. मोठ्या पडद्यावर नाही. त्यात तंत्रज्ञानाची करामत  नाही. मोेजकीच पात्रं आहेत. भव्यता अजिबात नाही. चित्रपट कलेच्या प्रत्येक प्रांतात आज जे काही उत्तम म्हणून गणलं जातं ते सायकोत नाही. तरीही “ सायको” पाहिला जातो, पहावासा वाटतो.

काय गंमत आहे पहा. “ सायको”नंतर फक्त १२ वर्षांनी म्हणजे १९७० साली गॉडफादर प्रदर्शित झाला. सायकोत जे जे नाही ते ते सारं गॉडफादरमधे आहे. गॉडफादर लांबलचक आहे. त्यात भरपूर आणि भरपूर महत्वाची पात्रं आहेत. गॉडफादर रंगीत आहे. गॉडफादरमधे तुफ्फान गोळीबार आहे आणि रक्तपात आहे. गॉडफादरमधे माणसांची गुंतागुंत आहे. सायको अगदीच काटकसरीनं तयार झाला आणि गॉडफादरवर खच्चून पैसे खर्च झाले.

आणि गॉडफादरसुद्धा आजही चवीनं पाहिला जातो. आणि गॉडफादरनंही चित्रपट जगताला एक जबरदस्त नवं वळण दिलं.

 हिचकॉक संथपणे चित्रपट सरकवतो. मेरियन नावाची एक बाई. तिचा मित्र. मेरियन ऑफिसात काम करते. बॉस तिच्याकडं  ४० हजार डॉलर सोपवतो. मेरियन म्हणते की ती नंतर पैसे बँकेत भरेल, डोकं दुखत असल्यानं आधी ती घरी जाईल. मेरियन घरी जाते. अचानक ती घराबाहेर पडते. पैसे घेऊन. गाडी घेऊन ती कुठं तरी जायला निघते. शेकडो मैलाचा प्रवास. वाटेत रात्र होते म्हणून ती रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करून झोपते. 

अरेच्चा,  काय चाललंय तरी काय? या बाईला करायचंय तरी काय? पैसे पळवणारसं दिसतंय. पण इतके पैसे घेऊन करणार तरी काय? 

बाई चाललीय. चाललीय. एका मोटेलमधे उतरली. लेजरमधे खोटं नाव लिहिलं. आता हे कशासाठी?

वीसेक मिनिटं हा सारा प्रकार चालतो. त्यातली कित्येक मिनिटं कानावर एकही शब्द पडत नाही.

वीसेक मिनिटानंतर मेरियन आंघोळ करत असताना काही सेकंदात तिचा खून होतो. अगदी निसटती दृश्यं. खून करणारा दिसत नाही. त्या आधी मोटेलचा मालक नॉर्मन बेट्स भिंतीवर टांगलेल्या फ्रेमच्या मागं असलेल्या छिद्रातून मेरियमला आंघोळ करताना पहातो येवढंच दिसतं.

नॉर्मन मेरियनचं प्रेत तिच्या गाडीत डंप करतो, प्रेताबरोबरच वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेले पैसेही. गाडी एका डबक्यात बुडवून टाकतो.

हं म्हणजे नॉर्मननं खून केला हे कळलं.

पण कशाला केला हा खून? तिच्याकडं पैसे आहेत हे तर त्याला माहित नाही. सेक्सचीही भानगड दिसत नाही.

मग मेरियनच्या  बॉसनं नेमलेला एक गुप्तचर तिला शोधत मोटेलमधे पोचतो. नॉर्मन त्यालाही मारून टाकतो.

हा खूनही दोन तीन सेकंदातच संपतो. 

म्हणजे दोन खून झाले.

आता मेरियनची बहीण तिचा शोध घेत या मोटेलमधे पोचते. तेव्हां एका स्त्रीचं जपून ठेवलेलं प्रेत आपल्या हृदयाचा ठोका चुकवतं.

कोण हा नॉर्मन, ते प्रेत कोणाचं, कशाला ते जपून ठेवलं होतं हे प्रश्न हिचकॉक आपल्या डोक्यात घुसवतो.

अगदी शेवटाला एक मनोचिकित्सक सगळ्या प्रकरणाचा उलगडा करतो. की नॉर्मन हा एक दुभंग मनाचा माणूस असतो. एक पुरुष नॉर्मन आणि दुसरी त्याची आई. नॉर्मननं आपल्या आईचा खून करून तिचं प्रेत जपून ठेवलेलं असतं. कधी नॉर्मन नॉर्मन असे, कधी आई असे. एक खून आई म्हणून केला होता आणि एक नॉर्मन म्हणून.

शेवटी अगदी मोजक्या मिनिटात हिचकॉक सगळा उलगडा करून दाखवतो.

घटना ताणत ताणत रहस्य कसं निर्माण करायचं आणि प्रेक्षकाला चकवून अनपेक्षीत रीतीनं रहस्याचा उलगडा कसा करायचं ते हिचकॉककडून शिकावं.

“सायको” खूप चालला. हिचकॉकनं एक आयडिया काढली होती. “सायको” चित्रपट सुरु होताना सिनेमाघराचे दरवाजे बंद केले जात. कोणालाही आत प्रवेश नाही. नंतर चित्रपट संपेपर्यत दरवाजे बंद. कोणालाही चित्रपट संपेपर्यंत बाहेर पडायला परवानगी नाही.

“सायको” मधे खून आहेत, “सायको” मधे विकृत माणूस आहे. परंतू खुनाची दृश्यं दीर्घकाळ चालत नाहीत, ताणलेली नाहीत. वारंवार केलेले चाकूचे वार दिसत नाहीत, रक्ताचा ओघळ लांबवर वाहताना वगैरे दिसत नाही. डिटेक्टिवचा खून तर दोन तीन सेकंदातच आटोपतो.

हिचकॉक म्हणत असे की गुन्हे- हिंसा हा अमेरिकन जीवनाचा अविभाज्य भाग सामान्य माणसाला स्वस्थपणे पहाता यायला हवा अशी रचना मी केलीय. हिंसेला, गुन्ह्याला हिचकॉकनं प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याला दिवाणखान्यात नेऊन बसवलं.

  “सायको” च्या आधी आणि नंतर गुन्हे आणि मारधाड अमेरिकन सिनेमात भरपूर दाखवली जात असे. साधारणपणे साठीच्या दशकात अमेरिका बदलली होती. सेक्स आणि श्रीमंत होण्यासाठी गुन्हे करणं ही एक सामान्य गोष्ट मानली गेली होती. वियेतनाममधली हिंसा आकारानं आणि रुपानं भयानक होती, पण राजकारणानं त्या हिंसेला गोडवा चिकटवला. सायकोत नायिकेचं एका परपुरुषाबरोबर संबंध असणं, त्या परपुरुषाचं लग्न झालेलं असणं, नायिका अविवाहीत असणं पण तरीही तिला सेक्सचा अनुभव असणं या गोष्टी अमेरिकन समाजाचं चित्रण करतात. 

हिचकॉक आणि सायको हे निव्वळ रहस्यपट किंवा भयपट नाहीत, ते अमेरिकन जीवनही चित्रीत करतात.

अमेरिकन समाजातला दंभ हिचकॉक सायकोमधे दाखवतो. अमेरिकन लोकांना म्हणे चित्रपटात कमोड दाखवणं आवडत नसे. सेक्स आणि बाथरूमचा संबंध आहे हे दाखवणं अमेरिकन लोकांना आवडत नसे. सायकोमधे हिचकॉकनं खून बाथरूममधे घडवलाय. सेन्सॉरवाले खवळले होते, ते परवानगी देईनात. हिचकॉक म्हणाला की ते दृश्य इतक्या कमी वेळात दाखवलं आहे की त्यावर आक्षेप होऊ नये.

हिचकॉकला चित्रपटातला जादूगार म्हटलं जातं. चित्रपट सुरु करतानाच त्याच्या डोळ्यासमोर असे, प्रत्येक दृश्य त्यानं कल्पिलेलं असे, सेटवर कोणालाही त्यात सूतभरही इकडं तिकडं करायला वाव नसे. सारं काही पटकथेत घट्ट लिहून ठेवलेलं असे.

हिचकॉकचा विशेष असा की तो प्रत्येक दृश्यं स्वतंत्रपणे कल्पीत असे, पटकथेत लिहीत असे आणि ते स्वतंत्रपणे चित्रीत करत असे. म्हणजे पटकथेच्या पातळीवरच त्यानं संकलन आटोपलेलं असे. बाथरूममधलं दृश्य मोजक्याच सेकंदाचं आहे पण हिचकॉकनं दोनशे पंधरा  तुकडे स्वतंत्रपणे कल्पिले आणि  चित्रीत केले.  कॅमेऱ्याची हालचाल आणि दृश्याचं संकलन या दोन गोष्टी अशा रीतीनं एकत्र आणणाला हिचकॉक हा पहिला जादूगार होता.

१९५० नंतर टीव्हीचा जमाना सुरु झाला होता. लोकं सिनेमाघरात जाऊन चित्रपट पाहीनासे झाले होते. टीव्हीतली दृश्य नाट्यमय असत, वेगवान असत, मुख्य म्हणजे टीव्हीत स्वस्तात आणि झटपट कथानकं तयार होतं. टीव्हीमुळं चित्रपट व्यवसाय संकटग्रस्त झाला होता, माणसं सिनेमाघराकडं जाण्याऐवजी टीव्हीसमोर बसत.

कमी पैशातही चांगला चित्रपट हिचकॉकनं करून दाखवला. अगदी तुटपुंज्या बजेटमधे “सायको” तयार झाला. अगदी कमी लोकेशन्स. दृश्याचं इंटेरियर अगदी सामान्य आणि स्वस्त. मेरियम कार चालवत असतानाची दीर्घ दृश्यं आहेत. ती रस्त्यावर चित्रीत केलेली नाहीत, स्टुडियोत बॅक प्रोजेक्शनचं तंत्र वापरून केलीत.  

“सायको” नं प्रेक्षकाला पुन्हा एकदा सिनेमाघरात ओढलं. 

हिचकॉकमुळं चित्रपटाची गणना कला अशा रुपात, साहित्याच्या बरोबरीनं होऊ लागली. 

“सायको” आणि हिचकॉक या दोन्ही गोष्टींचा अभ्यास अजूनही अपूर्णच आहे असं चित्रपटाचे अभ्यासक म्हणतात.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *