मोदी पराजय आणि ममता जयाचा अर्थ
बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत मोदींची सपशेल हार झाली.
बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २१३ जागा आणि ४८ टक्के मतं मिळाली. भाजपला ७७ जागा आणि ३८ टक्के मतं मिळाली.
या निवडणुकीत तृणमूलची टक्केवारी आणि जागा दोन्ही वाढल्या. उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार ही वाढ तृणमूलच्या कर्तृत्वामुळं झाली आहे. तृणमूलनं सर्वसामान्य माणसाच्या हिताचे कार्यक्रम अमलात आणले, त्या कामाचं रुपांतर मतांमधे करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. पक्षाचे कार्यकर्ते गावोगाव फिरून कार्यक्रमाची अमलबजावणी करत होते आणि त्याची किमत मतांमधे मागत होते.
भाजपनं हिंदू-मुसलमान फूट आणि दोन समाजातील विसंवाद (त्यातला बराचसा भ्रामक) हा मुद्दा लोकांवर ठसवण्याचा प्रयत्न केला होता. तो त्यांचा हुकुमाचा एक्का होता. तृणमूलनं प्रचारातून आणि लोकांमधे पसरून लोकांना पटवलं की हिंदू-मुस्लीम विभागणी बंगालमधल्या लोकांच्या मनात नाहीये. ममतानी सतत सांगितलं की बंगालमधली संस्कृती ही मुख्यतः बांगला संस्कृती आहे, बंगाली भाषेवर आधारलेली आहे, त्यात हिंदू आणि मुस्लीम विभागणी नाही. भाजपचा हुकुमाचा एक्का तृणमूलनं बाद केला.
भाजपची आकडेवारी आणि जागा आधीच्या तुलनेत वाढलेल्या दिसतात. पण यात भाजपच्या कर्तृत्वाचा भाग कमी आहे, हा डावपेचा परिणाम आहे. निवडून आलेल्या ७७ लोकांमधे किमान ३० लोक तृणमूलकडून आणलेले आहेत. भारतात पक्षांतरं कशी होतात ते आपल्याला माहित आहे. धाकधपटशा,धाडी,खटले आणि पैसे या घटकामुळंच माणसं पक्षांतर करत असतात. विचार, धोरण इत्यादी गोष्टी आणि राजकीय पक्ष यांचा संबंध केव्हांच तुटला आहे. त्यामुळं जागांच्या हिशोबातला भाजपचा आकडा फसवा आहे.
भाजपाची मतं वाढली याचं कारण भाजपनं वरवर तृणमूलचं राज्य लोकांच्या हिताचं ठरलं नाही असा प्रचार केला पण अप्रत्यक्षपणे सगळा प्रचार हिंदूना उचकवणारा होता. बंगला देशातून येणारे मुसलमान, नागरीकत्वाच्या अटी पूर्ण न करणाऱ्या मुसलमानांचा बोजा, मुसलमान हा हिंदूंच्या विकासातला अडथळा आहे, तृणमूल (आणि एकूणच भाजपविरोधी पक्ष) मुस्लीम धार्जिणे आहेत या कुजबूज व्हॉट्सएपी प्रचाराचा प्रभाव मध्यमवर्गी सुखवस्तू हिंदू लोकावर पडला. तीच भाजपची वाढती मतं.
भाजपची रणनीती मोदीकेंद्री होती. मोदींचं गुजरात विकासाचं मॉडेल आणि मोदी मुसलमानांना धडा शिकवतात ही मोदींची प्रतिमा भाजपनं कौशल्यानं तयार केली, वाढवली, कानोकानी पसरवली. ही प्रतिमा २०१४ पासून जनमानसात ठसली होती. गुजरात मॉडेल हे मुळातच बोगस होतं. विकासाच्या कित्येक कसोट्यांवर देशातली इतर राज्यं गुजरातच्या पुढं होती, महाराष्ट्र तर नक्कीच पुढे होता. पण ढोल बडवून माध्यमांच्या सहाय्यानं एका सर्वसाधारण अर्थव्यवस्थेला असाधारण अर्थव्यवस्थेसारखं रंगवलं गेलं होतं.
मोदींच्या दुर्दैवानं त्यांचं आर्थिक विकास वगैरे प्रकरण बकवास आहे हे बंगाल निवडणुकीच्या काळात सिद्ध झालं. बंगाल प्रचार मोहिमेच्या काळात कोविडनं भारताच्या अर्थव्यवस्थेचं खरं रूप उघड केलं. विकास बिकास सोडाच पण अर्थव्यवस्थेचा पायाच खिळखिळा होता हे कोविडनं सिद्ध केलं. नोटबंदीसारख्या मूर्ख धोरणानं अर्थव्यवस्था धुळीला मिळाली होती आणि बँकिंग-गुंतवणूक-जीएसटी धोरणांनी अर्थव्यवस्थेचा पाया पार उखडून टाकला होता, हे कोविडच्या फटक्यानं लक्षात आलं.
वरील सत्य ममतानी ठळक केलं.ममतांनी मोदींच्या अपयशावर सतत प्रखर प्रहार केले, कोणताही न्यूनगंड न बाळगता त्यांनी मोदीशहांसारखीच तीव्र आक्रमकता दाखवली.
हिंदू मुसलान वितुष्ट हा मुद्दाच बंगालमधे नाही हे सत्य मोदीशहांनी लक्षात घेतलं नव्हतं. नसलेलं वितुष्ट व्हॉट्सएपी प्रचारानं आणि खोट्या गोष्टी सांगून आहे असं दाखवण्याचा प्रयत्न मोदीशहांनी केला. ममतांनी आक्रमक पद्धतीनं मोदीशहा प्रचार खोटा पाडला.
मोदींची प्रतिमा निप्ष्प्रभ होत असतानाच त्या प्रतिमेशी टक्कर घेऊ शकेल अशी ममतांची प्रतिमा तृणमूलनं उभी केली. स्त्रियामुलींना सायकली मिळाल्या, स्त्रिया कार्यक्षम झाल्या, स्त्रिया सुखी झाल्या, याला ममता कारणीभूत आहेत अशी प्रतिमा तयार झाली.
स्त्रियांनी दिलेली मतं हा ममतांच्या यशाचा मुख्य आधार झाला.
हिंदू-मुसलमान एकतेची कणखर समर्थक अशी ममताची प्रतिमा उभी राहिली. प्रतिमा ठसवण्यासाठी करावा लागणारा ठणठणाट जितका मोदी करत होते तितकाच गाजावाजा ममतानी केला. त्यामुळं शहरी हिंदू मद्यम वर्गाचीही मतं ममताना मिळाली.
माध्यमांचा पाठिंबा नसतानाही झंझावाती प्रचारानं ममतांनी माध्यमांवर मात केली. जेवढा थयथयाट मोदीशहा करत तेवढाच थयथयाट ममतानी केला.
२०१४ पासूनच्या निवडणुकांमधे भाजपला यश आलं कारण त्यांच्या विरोधात तीनपेक्षा जास्त उमेदवार उभे असत. सामान्यतः जिथं पाच पन्नास पक्ष असतात तिथं विरोधकांमधली फूट हेच सत्ता मिळवण्याचं मुख्य साधन असतं. भाजपनं सोळा सतरा पक्षांची आघाडी आपल्या बाजूला उभी केली आणि विरोधात असणाऱ्या सोळा सतरा पक्षांना आपसात झुंजत ठेवलं. भाजपविरोधी मतं विभागली. तीस बत्तीस टक्के मतं मिळूनही भाजपला सत्ता काबीज करता आली.
हिंदुत्वाच्या विकृत व्याख्येला बळी पडलेल्या मध्यमवर्गी जनतेला एकत्र ठेवायचं आणि बाकीची जनता विरोधी पक्षांकडं सोपवायची ही भाजपची रणनीती. एमआयएम हा ओवेसीचा पक्ष हे एक चांगलं उदाहरण आहे. तो पक्ष भाजपविरोधात असणाऱ्या पक्षाची मुसलमान मतं खातो.
भाजपच्या नागरीकत्व कायद्याला विरोध करणारे आसाम जातीय परिषद आणि रेजोरी दल या दोन पक्षांच्या उमेदवारांनी भाजपविरोधी मतं खाल्ली, त्यामुळं काँग्रेसचे किमान १५ उमेदवार पडले. ते लोक मैदानात नसते तर काँग्रेस आसाममधे बहुमत मिळवून सत्तेमधे जाऊ शकली असती.
प्रत्येक मतदार संघात अपक्ष उमेदवारांना उभं करणं ही सुद्धा एक प्रभावी रणनीती असते.
गावोगाव निवडणुक लढवायची खाज असणारे अनेक महाभाग असतात.त्यांची जात, पोटजात, कुटुंब, परिचित अशी मिळून चार दोन हजार मतं अशा उमेदवारांना सहज मिळतात. अशा उमेदवारांना नाना प्रकारे उद्युक्त केलं जातं. अशा उमेदवारांनी चार पाच हजार मतं खाल्ली तरी पक्षाचा उमेदवार निवडून आणणं शक्य असतं कारण विधानसभेत पाच सात हजारांच्या फरकानंच उमेदवार विजयी होत असतो.
गावगन्ना उमेदवार उभे करणं ही भाजपची रणनीती भाजपच्या यशाच्या चढत्या आलेखाला कारण होती. बंगालमधे ही मतं खाणं ममतांनी रोखलेलं दिसतंय. त्यामुळं भाजप-तृणमूल अशा थेट लढती झाल्या.
एक महत्वाची गोष्ट बंगालमधे घडलीय. काँग्रेस आणि मार्क्सवादी मतांचा टक्का खूप घसरलाय. दोन्ही पक्ष दीर्घ काळ सत्तेत होते.निवडणुकीच्या हिशोबात त्या दोन्ही पक्षाच्या मतदारांनी तृणमूल किंवा भाजपला मतं दिलेली दिसतात. तृणमूलला अधिक मतं मिळाली असण्याची शक्यता आहे. मोदींचा पक्ष नको, त्यासाठी मोदीविरोधी असलेल्या तृणमूलला मतं द्यायची असा निर्णय मतदारानी घेतलेला दिसतो.
भाजपविरोधी मतांची विभागणी झाली नाही, भाजप विरोधी मतं एकत्र झाली.
न डगमगता, आक्रमकपणे आणि प्रचंड मेहनत घेऊन ममतानी लढा दिला.
२०१४ नंतर भाजपेतर पक्ष हबकले होते, हतबल झाले होते. ममता हिमतीनं उभ्या राहिल्या. निवडणुक जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक घटकाचा पुरेपूर वापर ममतानी केला.
मामला निवडणुक जिंकण्याचा आहे. मामला प्रचार आणि प्रतिमेचा आहे. मामला लोकांमधे मिसळण्याचा आहे. मामला रणनीतीचा आहे. ममतानी ते ओळखलं, भाजपला धूळ चारली.
बस.
भारतीय समाज तीन चार हजार वर्षांपासून घडत आला आहे. हिंदू, मुसलमान, बौद्ध, जैन, शिख,ख्रिस्ती असे मोठे धर्म; प्रत्येक धर्मातले अगणीत पंथ; त्यातही अनंत भाषा आणि प्रादेशिक-भौगोलिक वैशिष्ट्य; अशी ही माणसं एकमेकांसोबत नांदत आली आहेत.
गेल्या दोन तीन हजार वर्षात बंगाली (आणि भारतीय) समाज घडला आहे. समाजात खूप विविधता असते, समाजगटात विसंवाद आणि दुरावा असतो, अज्ञानावर आधारलेले खूप गैरसमज आणि पूर्वग्रह असतात. त्यासकट जगणं हा भारतीय माणसाचा डीएनए आहे. मारामाऱ्या करतही एकत्र रहाण्याची सवय भारतीय समाजाला आहे. पाणवठ्यावर वचावचा भांडणं करणाऱ्या स्त्रिया कठीण प्रसंगी एकमेकाच्या मदतीला जातात ही भारतीय समाजाची सांस्कृतीक सवय आहे. भांडायचं पण नष्ट करायचं नाही ही भारतीय सांस्कृतीक सवय आहे.
तीन चार हजार वर्षाच्या इतिहास रेषेवर स्वातंत्र्योत्तर काळातलं राजकारण हा एक छोटासा बिंदू आहे. त्या बिंदूशी काय घडलं यावरून दीर्घ काळातच्या घडणीचं मूल्यमापन करण्याची घाई करू नये.
घडलय ते येवढंच की भाजप या पक्षाचा पराभव करून तृणमूल काँग्रेस हा पक्ष सत्ताधारी झालाय.
।।