बेलिंग कॅट
सत्य आणि सत्ता यांना आव्हान देणारं ” वृत्तपत्र “
बेलिंग कॅट म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणं. सध्या खोट्या बातम्या, खोटी माहिती नावाचा बोका मोकाट सुटलाय. या बोक्यापासून सावध रहा, तो तुमचं दूधलोणी फस्त करणार आहे असं बेलिंग कॅट नावाची माध्यमसंस्था सांगतेय. खोटी माहिती प्रतिष्ठा धारण करत असताना बेलिंग कॅट खरी माहिती, इन्फर्मेशन लोकांसमोर ठेवतंय.
प्रस्तुत We Are Bellingcat: An Intelligence Agency for the People हे पुस्तक बेलिंग कॅट संघटनेने केलेले उद्योग वाचकांसमोर ठेवतं.
बेलिंग कॅटचं ध्येय, बोधवाक्य आहे, ” सत्य शोधा, तपासून पहा, प्रसार करा.”
बेलिंगकॅट या संघटनेनं अॅलेक्सी नेवालनी या पुतीनना विरोध करणाऱ्या रशियन नेत्याला झालेल्या विषबाधेचा छडा लावला. नोविचोक हे विष त्याना मारण्यासाठी वापरण्यात आलं होतं. बेसिंगकॅटच्या कार्यकर्त्यांनी अनेक महिने तपास करून विष कशा प्रकारे देण्यात आलं याचे तपशील जाहीर केले.
अर्थातच पुतीन भडकले. त्यांनी बेलिंगकॅटचं नाव घेऊन सांगीतलं की सगळी माहिती आणि आरोप खोटे आहेत. आपला, आपल्या सरकारचा याच्याशी काहीही संबंध नाही, रशियाविरोधी लोकांनी रचलेलं हे कुभांड आहे असं ते म्हणाले.
परंतू बेलिंग कॅटनं पुराव्यासहित सिद्ध केलेले रशियन गुन्हे लक्षात घेतले म्हणजे पुतीन यांच्या वक्तव्यातला खोटेपणा कळायला वेळ लागत नाही.
२०१८ साली स्क्रिपाल या रशियन एजंटचा खून सॅलिस्बरी या इंग्लंडमधल्या गावात झाला होता. तीन रशियन खून करण्यासाठी सॅलिस्बरीत गेली आणि स्क्रिपाल यांच्या दारावर विष फवारलं. त्या विषाच्या स्पर्षानं स्क्रिपाल आणि त्यांची मुलगी मरण पावले.
रशियन लष्करात २९१५५ या क्रमांकाचं एक युनिट होतं. त्यात सुमारे ३०० सैनिक आणि ३० अधिकारी होते. नोविचोक सारखं महाघातक विष तयार करणारी रसायन निर्माण करणारा कारखाना या युनिटशी जोडला गेला होता. या युनिटमधून माणसं विषप्रयोग करण्यासाठी निवडली जात. ती विषाची कुपी बरोबर घेऊन जगभर रशियाला नको असलेल्या किंवा पुतीनना त्रासदायक असणाऱ्या माणसाचा काटा काढत. फवारा मारणारी कुपी त्यांच्याजवळ असे.
या माणसांची मूळ ओळख पुसून टाकलेली असे. खोट नाव, खोटा पत्ता, खोटी कामाची जागा, खोटा पासपोर्ट इत्यादी गोष्टी त्यांच्यासाठी तयार केलेल्या असत.
तर वरील युनिटमधले तिघे लंडनमार्गे सॅलिस्बरीला पोचले आणि काम फत्ते करून गेले. लोचा असा झाला की त्या तिघांच्या पासपोर्टचा नंबर एकच होता. विशेष लोकांना पासपोर्ट देणाऱ्या रशियन विभागानं ही चूक केली होती.
बेलिंगकॅट या संघटनेच्या लोकांनी रशियातल्या आणि युरोपातल्या पाच पन्नास कार्यकर्त्यांच्या मदतीनं ती तीन माणसं मुळातली कोण होती आणि त्यांनी काय काय केलं होतं याचा छडा लावला. कंप्यूटर, ईमेल, सेलफोन, व्हॉट्सअॅप, विविध सरकारी रेकॉर्ड, विमानाची तिकीटं, फोनवरची संभाषणं इत्यादींचा अभ्यास करणारे कसबी कार्यकर्ते बेलिंगकॅटला मदत करतात. पुसटसा फोटो हे कार्यकर्ते तपासतात, तो फोटो पेपरात कधी आला होता, कुठल्या समारंभात त्या फोटोतला माणूस दिसला होता, सैन्यातल्या लाखो लोकांमधे कोणत्या सैनिकाशी तो फोटो जुळतो, कोणी कधीतरी सहज काढलेल्या फोटोमधे तो माणूस दिसतो का याचा शोध घेण्याच्या नादात या कार्यकर्त्यांनी हज्जारो फोटो तपासले आणि ही माणसांच्या मुळाशी ते पोचले.
तिघांपैकी एक जण यांचा नेता, संयोजक होता. तो वायफाय शिवाय फोन वापरत असे, टेलेग्राम इत्यादी अॅप वापरत असे. पण शेवटी फोन हा फोनच असतो, अनेक ठिकाणी तो फोन फिरतो, ती ती ठिकाणं कळतात, कोणाशी बोलणं होतं हे नोंदलेलं असतं. बेलिंगकॅटमधे कंप्यूटर, फोन इत्यादींमधे घुसणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी त्या संयोजकाच्या दोन वर्षातल्या सर्व हालचाली, कोणाशी केव्हां बोलला, कुठं कुठं गेला इत्यादी सर्व डेटा मिळवला.
काही महिने मेहनत केल्यानंतर खून घटनेचा सर्व तपशील बेलिंगकॅटनं गोळा केला, तपासला, सिद्ध केला आणि जाहीर केला. माहिती गोळा करतांना असंख्य नागरिकानी गोळा करून पाठवलेल्या माहितीचा वापर केला.
सारं काही स्पष्ट झालं.
बेलिंगकॅट या पुस्तकात लेखक एलियट हिगिन्स यांनी बेलिंगकॅट या संघटनेची माहिती दिलीय आणि ही संघटना कसं काम करते याचा तपशील दिलाय.
एलियट हिगिन्स शिक्षणात रमले नाहीत. त्यांना पत्रकार व्हायचं होतं, पण त्याचं शिक्षण घ्यायलाही त्यांना जमलं नाही.एका ठिकाणी कारकुनीसारखं काम करत असत. पण त्यांना बातम्या पहाण्याचा जाम नाद होता. कामाच्या ठिकाणी आणि घरी पोचले की लॅपटॉवर फेसबुक, ट्वीटर, बातम्यांची पोर्टल पहात असत.
२०११ साली अरब स्प्रिंग आंदोलनाच्या बातम्या पहात असताना अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमधून चालणारा नॅशनल पब्लिक रेडियो एलियटन ऐकला. अँडी कार्विन दिवसाचे अठरा तास आंदोलनाच्या बातम्या नाना उगमांतून मिळवत होता आणि त्या एकत्र करून आंदोलनाचं चित्र श्रोत्याच्या डोळ्यासमोर उभं करत होता.
एलियटच्या डोक्यात ट्यूब पेटली. एलियटनं लिबियावर लक्ष केंद्रित केलं. लॅपटॉपवर बसून तो लिबियातल्या आंदोलनाच्या बातम्या गोळा करू लागला. ट्विटर, फेस बुक यावर कार्यकर्ते, नागरीक, सरकार, संस्था माहिती टाकत असत. यू ट्यूब वर तर क्लिपचा पाऊसच पडत असे. ही सर्व माहिती गोळा करून, ती संगतवार लावून, आपल्या परीनं त्यातला खरेखोटेपणा तपासून एलियटनं गार्डियनच्या ब्रेकिंग न्यूज ब्लॉगवर पोस्ट टाकायला सुरवात केली. लोक त्या पोस्ट वाचू लागले. नंतर यथावकाश त्यानं स्वतःचा ब्राऊन मोझेस हा ब्लॉग लिहायला सुरवात केली.हा ब्लॉग पहाणाऱ्यांची संख्या १० हजारच्या पलिकडं पोचली.
२१ ऑगस्ट २०१३ रोजी सीरियातल्या घुटा या गावात सीरियन सरकारनं बाँबमधून सारीन वायू सोडला. फार घातक वायू, त्यावर बंदी आहे. मुलं, माणसं, कुत्रे, तोंडातून फेस येत धपापत मेली.
घुटामधल्या नागरिकांनी फेसबुकवर, यू टयूबवर या घटनेच्या क्लिप्स टाकल्या. एलियटनं या क्लिप्स पासून त्या टाकणाऱ्या नागरीक आणि कार्यकर्त्याशी संपर्क साधला.रॉकेटचे फोटो मागवले, घटनेची वर्णन मांगवली. स्वतंत्रपणे हे रॉकेट कुठं तयार झालं होतं, ते सीरियात कसं पोचलं याची माहिती काढली. ही माहिती विविध कागद, मॅन्यूअल्स, लष्करी पुस्तकं इत्यादींशी ताडून पाहिली. शेकडो तज्ञ आणि साक्षीदार यांच्याकडून माहिती गोळा करून ती माहिती एकत्र लावली.
त्यातून एलियटनं निष्कर्ष काढला की रासायनिक हल्ला झाला होता. कोणतंही सरकार ते मान्य करायला तयार नव्हतं. पण एलियटची माहिती इतकी अचूक होती की शेवटी जगभरच्या सरकारांनी आणि लष्करांनी रासायनिक हल्ला झाल्याचं मान्य केलं.
एलियट हिगिन्स मान्यता पावला.
एलियट हिगिन्स रॉकेटमॅन म्हणून ओळखला जाऊ लागला.
न्यू यॉर्क टाईम्स, वॉशिग्टन पोस्ट, सीएनएन, बाबीसी यानी हिगिन्सचा मजकूर वापरायला सुरवात केली.
हिगिन्सच्या कामाचा पसारा वाढला. अनेक प्रकरणं तपासासाठी येऊ लागली. कार्यकर्तेही मिळू लागले. पण या अनौपचारीक कामाला काही एक औपचारीकता आवश्यक होती.
१४ जुलै २०१४ रोजी बेलिंगकॅटची स्थापना झाली.
बेलिंगकॅट म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणं.
स्थापना झाली आणि तीनच दिवसांनी अॅम्स्टरडॅमहून कौलालंपूरला जाणारं विमान युक्रेनच्या आकाशात पाडण्यात आलं.
बेलिंगकॅट कामाला लागलं. रशियानं बक नावाचं क्षेपणात्र युक्रेनच्या रशियाधार्जिण्या बंडखोर गटाला दिलं होतं. त्यांनी गाढवासारखा प्रवासी विमानावर क्षेपणास्त्रं फेकलं आणि ते पाडलं. विमानातली सगळी माणसं मेली.
रशियानं या घातपाताची जबाबदारी युक्रेनवर टाकली. शेकडो कार्यकर्ते, कंप्यूटर जाणकार, फोटोग्राफर्स इत्यादींच्या मदतीनं बेलिंगकॅटनं कुठल्या गाडीवरून,कोणत्या गावातून ते क्षेपणास्त्र सोडलं ते जाहीर केलं. सर्व पुरावे बेलिंगकॅटनं जाहीर केले. माहिती गोळा करतांनाही ती माहिती लोकांकडून जाहीरपणे मागवली, जाहीरपणे तपासून घेतली.
हे प्रकरण म्हणजे एक रहस्यकथाच आहे. प्रस्तुत पुस्तकात ती सविस्तर मांडलेली आहे.
हिगिन्स म्हणतो We are not exactly journalists, nor human-rights activists, nor computer scientists, nor archivists, nor academic researchers, nor criminal investigators, but at the nexus of all those disciplines.
हिगिन्स युद्धविरोधी आहे, लोकशाहीवादी आहे. जगात शांतता नांदावी आणि जग प्रदूषणविरहीत व्हावं असं त्याला वाटतं. त्यासाठीची खटपट त्याला करायची आहे. त्यातलं सत्य त्याला शोधायचं आहे.
बेलिंगकॅटची कोणाशीही स्पर्धा नाही. जगात असत्य फार वेगानं पसरत असल्यानं आता नागरीक, कार्यकर्ते आणि वर्तमानपत्रं यांनी एकत्र येऊन सत्य सांगितलं पाहिजे असं बेलिंगकॅटचं म्हणणं आहे.
प्रस्तुत पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. पत्रकारी करणाऱ्यांना हे पुस्तक फार म्हणजे फार गोष्टी सांगतं
।।
We Are Bellingcat: An Intelligence Agency for the People.
Eliot Higgins
Bloomsbury Publications.