पुस्तकं. नट ते राष्ट्रपती, टीव्ही स्टुडियो ते उध्वस्थ इमारती.

पुस्तकं. नट ते राष्ट्रपती, टीव्ही स्टुडियो ते उध्वस्थ इमारती.

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं लंडनवर ५७ दिवस बाँब वर्षाव केला. इंग्लंडच्या इतर भागावरही ९ महिने बाँब टाकले. चर्चिलनी घणाघाती भाषणांनी इंग्लीश माणसाचा आत्मविश्वास जागवला, त्याला युद्धाचे घाव सोसायला तयार केलं. असं म्हणतात की चर्चिलनी इंग्लीश शब्दकोष युद्धात उतरवला होता.

आज युक्रेनच्या युद्धाला ११ महिने होताहेत. जवळपास १२ हजार युक्रेनी नागरीक रशियानं मारले. त्यात नवजात अर्भकं होती, वृद्ध होते. जवळपास दीड कोटी माणसं बेघर-परागंदा झाली. वीज निर्मिती केंद्र उध्वस्थ करून पुतीननं युक्रेनला गोठवलं, वीज आणि पाण्याविना तडफडायला लावलं.

युक्रेन हार मानायला तयार नाही. उध्वस्थ शहरात रहाणारी माणसं शरण जायला तयार नाहीत, म्हणतात की आपण शेवटपर्यंत लढू.

वोलिदिमिर झेलेन्सकी या माणसानं हे घडवलं. चर्चिलनंही कबरीतून सलाम करावा असं झेलेन्सकीचं कर्तृत्व आहे.

स्वाभाविकच आपल्याला झेलेन्सकी हा माणूस कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सूकता आहे.  आज बाजारात एकच पुस्तक झेलेन्सकींबद्दल काही माहिती पुरवतं. Zelensky. A Biography. हे Sejhii Rudenko यांनी लिहिलेलं एकच छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे.

मूळ पुस्तक मुळात युक्रेनी भाषेत लिहिलंय आणि प्रस्तुत पुस्तक हे इंग्रजी भाषांतर आहे. मजकूर गप्पा मारल्यागत लिहिला आहे. ते सुसूत्र नाही, प्रोफाईल किंवा चरित्र लिहायचं ठरवून पुस्तक रचलेलं नाही. वेळोवेळी लिहिलेला मजकूर एकत्र करून पुस्तक घडवलंय. लेखक रुडेंको पत्रकार आहे, राजकीय भाष्यकार आहेत. २४ फेब्रुवारीला रशियाची युक्रेनवर स्वारी सुरु झाली आणि १७ एप्रिलला लेखकानं पुस्तक लिहून पूर्ण केलं.

पुस्तक घाई घाईनं लिहिलं गेलंय, युद्ध सुरु झाल्यावर युक्रेनी जनतेसमोर काही तरी ठेवलं पाहिजे या भावनेनं पुस्तक रचण्यात आलंय. लेखकानं झेलिन्सकीचा २०१८ च्या निवडणुकीचा काळ जवळून पाहिलाय आणि त्याच भांडवलावर पुस्तक रचलंय. २०१८ आणि आधीचे झेलेन्सकी काय होते याची माहिती आणि विश्लेषण लेखकाच्या हाती नसल्यानं पुस्तक एका अर्थानं वरवरचं झालेलं आहे.

पण सध्या तरी तेवढं एकच पुस्तक दुकानात सापडेल.

झेलिन्सकीचे वडील सायबरनेटिक्स आणि कंप्यूटक हार्डवेअर या विषयाचे प्राध्यापक होते, आई इंजिनियर होती. मंगोलियात झेलिन्सकी वाढले. ज्यू घरात जन्मलेले (१९७८) वोलिदिमीर झेलेन्स्की आपल्यासारखेच इंजिनियर व्हावेत अशी त्यांच्या इंजिनियर आई वडिलांची इच्छा होती.वोलिदिमीर नाटकात रमलेले असत. त्यांनी कायद्याची पदवी घेतली. कॉलेजात असल्यापासून ते नाटकं आणि सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम करत हिंडत असत. आपल्या शाळा-कॉलेजपासूनच्या सोबत्यांना घेऊन १९९८ साली Kvartal 95 ही संस्था स्थापन केली. त्यांची संस्था युक्रेन, रशियात, मनोरंजनाचे कार्यक्रम करत असे.

२०१५ साली Servant Of The People ही टीव्ही मालिका झेलेन्सकीनी  लिहिली, प्रदर्शित केली.Vasyl Holoborodko हा इतिहासाचा शिक्षक या मालिकेचा नायक होता. स्वतः झेलिन्सकी ती भूमिका करत.

मालिकेचं कथानक असं. शाळेत विषय शिकवत असताना होलोबोरोडको भ्रष्टाचारावर तिखट टीका करणारं एक भाषण करतो. वर्गातला एक विद्यार्थी हे भाषण रेकॉर्ड करतो आणि सोशल मिडियावर टाकतो.ते व्हायरल होतं. शिक्षक तुफ्फान लोकप्रीय होतो. एके दिवशी जाहीर करतो की तो राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला उभा रहाणार आहे. होलोबोरोडको निवडणुक लढवतो आणि राष्ट्रपती होतो.

युक्रेनी लोकांना २०१७-१८ या काळात ही मालिका आवडली कारण खुद्द युक्रेनमधे परिस्थिती निराशाजनक होती.

१९९१ साली सोवियेत युनियन मोडल्यावर युक्रेन स्वतंत्र झाला. पण युक्रेनची अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था सावरली नाही. भ्रष्टाचार, आर्थिक दुरवस्था आणि राजकीय अराजक निर्माण झालं. २००५, २०१० आणि २०१४ अशा तीन निवडणुकांत युश्चेंको, यानुकोविच आणि पोरोशेंको राष्ट्राध्यक्ष झाले. पण स्थिती बिघडतच गेली. अराजक माजलं होतं.२०१४ मधे पोरोशेंको निवडून आले होते. ते स्वतः भीषण श्रीमंत आणि भ्रष्ट होते. लोकांचा त्यांच्यावर राग होता. लोक रस्त्यावर उतरले. क्रांती झाली. लोकांना पोरोशेंकोना हाकलून दिलं. पोरोशेंकोना हाकलणाऱ्या सामान्य माणसाचा प्रतिनिधी लोकांना सर्वंट ऑफ दी पीपलमधे दिसला.

२०१८ मधे एकाएकी झेलिन्सकीनी जाहीर केलं की त्यांनी निर्माण केलेल्या नायकाप्रमाणंच ते आता निवडणुक लढवणार आहेत.

झेलेन्सकीची पत्नी लेखक होती,सहकारी होती, आहे. त्यांच्याच नाटकमंडळीत लिहायची. ती म्हणाली ‘खुळा झालाहेस’

टीव्ही मालिकेत शोभावं अशाच रीतीनं झेलेन्सकींनी निवडणूक लढवली. मालिकेतल्या लोकांना घेऊन ते देशभर फिरले आणि मालिकेतल्या एपिसोडसारखे कार्यक्रम त्यांनी केले. भडक भाषणं, आश्वासनं. एक चर्चा तर त्यांनी चक्क स्टेडियममधे घडवून आणली, मालिकेत जसा स्टुडियोत सेट लावतात तशी चर्चा.

झेलेन्सकीची भाषणं आणि मालिका कित्येक वेळा अशिष्ट असत. लिंगाचा बोटासारखा वापर करून पियानो वाजवण्याचं दृश्य झेलिन्स्कीनं एकदा दाखवलं होतं. लोकांनी ते दृश्य डोक्यावर घेतलं होतं.मालिका म्हणजे निव्वळ मनोरंज असतं हे तत्व पाळून झेलिन्सकी मालिका निर्माण करत असे.

अशिष्टपणा हे विनोदाचं एक जन्मजात अंग असतं. अशिष्टपणात माणसाची आणि व्यवस्थेची अंगं उघडी करता येतात, माणूस आणि समाज उघडा पाडता येतो. एकदा प्रतिस्पर्ध्यावर टीका करताना झेलेन्सकी म्हणाले  वेश्या जशी स्वतःचं शरीर विकते तसं पोरोशेंको देश विकत होता. जनतेला हे विधान पटलं. टीकाकार म्हणाले  की झेलेन्सकी देशाची तुलना वेश्येशी करतोय.

पाठीमागं राजकीय पक्ष नाही, संघटना नाही, प्रसिद्धी यंत्रणा येवढंच काय ते भांडवल झेलिन्सकीच्या हाती.टीव्ही मालिका करणारी मंडळी येवढाच काय तो स्टाफ.

भ्रष्टाचार आणि अराजकाला कंटाळलेल्या जनतेनं एका मालिका नटाला, मालिकेतल्या एका कॉमेडियनला ७३ टक्के मतं देऊन राष्ट्रपती केलं.

देशाचे प्रश्न सुटत नव्हते, परिस्थिती सुधारत नव्हती…अशा स्थितीत  २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पुतीननं युक्रेनवर हल्ला केला.

 त्या दिवशी झेलेन्सकीचा कायापालट झाला. बाँब वर्षाव सुरु असताना वैभवी राजप्रासादातून भाषण न करता खाकी पँट आणि टी शर्ट या पेहेरावात झेलेन्सकी भूमीगत मेट्रोच्या स्टेशनातून देशाशी आणि जगाशी बोलले. टीव्हीचा झगमगाट नव्हता. सभोवताली संकटांशी सामना करणारे नागरीक होते.मालिकेतला अशिष्ट आणि पोषाखी झेलेन्सकी लुप्त झाला होता. सामान्य नागरीकाप्रमाणंच क्लेष सहन करणारा नेता देशाला आणि जगाला दिसला. 

  झेलेन्सकीनी पुतीनसमोर झुकायला नकार दिला, कितीही काळ लागो, आपण स्वातंत्र्य मिळवू, पुतीनला हरवू  असं झेलेन्सकी उध्वस्थ इमारतीच्या  नेपथ्थ्यावर बोलले. 

 अमेरिकेनं विचारलं ‘तुम्हाला सुरक्षीत जागी हलवू कां?’

झेलेन्सकी म्हणाले ‘मला पळून जायची सोय नकोय, मला दारुगोळा हवाय, I dont need ride, I need ammunition.’

पुस्तक हीसुद्धा मालिकाच आहे अशा शैलीत रुडेंको यांनी पुस्तकातले धडे ३८ एपिसोडमधे लिहिलेत.

खरं म्हणजे झेलेन्सकी अध्यक्ष  झाल्यानंतर झेलेन्सकींच्यावर खूप मजकूर लिहिला गेला. अमेरिकेतल्या आणि युरोपातल्या पत्रकारांनी झेलेन्सकी यांच्या कारकीर्दीवर खूप तपशीलात बातम्या दिल्या होत्या. झेलेन्सकी यांनी ट्रंप यांच्याशी फोनवर केलेल्या चर्चेचा तपशील पेपरांना छापला होता. तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमच्याकडूनच शिकलो आहे असं झेलेन्सकी ट्रंपना म्हणाले. झेलेन्सकी अगदीच हौशी नटाप्रमाणं वागत होते, त्यांच्यात अध्यक्षपदाचा लवलेश नव्हता.

  खालावलेली आर्थिक स्थिती सुधारणं हे मालिकेचे एपिसोड लिहिण्यासारखं सोपं काम नाही हे त्यांना कळलं. झेलेन्सकी राज्यकारभाराच्या बाबतीत अगदीच कच्चे होते. जर्मनी (अँजेला मर्केल) आणि फ्रान्स ( इमॅन्युएल मॅक्रॉन) यांच्यावर ते टीका करत सुटले. ट्रंप यांचं तोंडफाट कौतुक झेलेन्सकीनी केलं. असले उद्योग करून परदेशातून मदत मिळवून देश उभा रहात नसतो हे त्यांना माहित नव्हतं.

‘बोटीला खूप भोकं पडली आहेत. दोन हातांनी किती किती भोकं बुजवू?’ असं देशाच्या अवस्थेबद्दल ते पत्रकारांना म्हणाले. पत्रकारांनी विचारलं ‘म्हणजे बोट बुडतेय काय?’. झेलेन्सकी गोंधळले. मला तसं म्हणायचं नाहीये असं म्हणून त्यांनी वेळ मारून नेली. एकदा त्यांनी १४ तासांची मॅरॅथॉन पत्रकार परिषद घेतली, लोकांचं ध्यान आकर्षित करण्यासाठी.

अध्यक्ष झाल्यावर भ्रष्ट लोकांवर झेलेन्सकी यांनी कारवाई केली नाही याबद्दल लोकांना चीड होती.

२०२१ च्या डिसेंबर महिन्यात युक्रेनमधे एक जनमत चाचणी झाली, त्यात झेलेन्सकींच्या बाजूनं फक्त ३१ टक्के मतं मिळाली होती.

२०२२ मधे युद्ध सुरु झालं आणि झेलेन्सकींच्या बाजूनं ९० टक्के मतं पडली.

युद्ध झालं. एका नटाचा चर्चील झाला.

झेलेन्सकीमधे झालेल्या या बदलाची मीमांसा प्रस्तुत पुस्तकात सापडत नाही.

Zelensky: The Unlikely Ukrainian Hero Who Defied Putin and United the World हे पुस्तक  Andrew L. Urban, Chris McLeod यांनी लिहिलंय.पण त्या पुस्तकात युद्धाचा तपशील आहे, झेलिन्सकींची भाषणं आहेत, झेलिन्सकींची माहिती अगदीच नगण्य आहे.

Volodymyr Zelensky in His Own Words या Lisa Rogak and Daisy Gibbons यांनी संपादित केलेल्या पुस्तकात झेलिन्सकींची भाषणं संपादित केलेली आहेत. त्यातून झेलिन्सकीच्या राजकीय भूमिका कळतात. पण त्या भाषणात ना (चर्चीलची) भाषा आहे ना राजकीय परिपक्वता.

असो.

युद्ध काळातले आणि युद्दपूर्व काळातले झेलिन्सकी आपल्यासमोर यायची वाट आपल्याला पहायची आहे.

।।

Zelensky. A Biography. 

 Sejhii Rudenko

Comments are closed.