सिनेमा माध्यमचळ, माध्यमचाळे. १९७४ सालची स्पीलबर्गची फिल्म

सिनेमा माध्यमचळ, माध्यमचाळे. १९७४ सालची स्पीलबर्गची फिल्म

माध्यम चळ, माध्यम चाळे.

।।

डोनल्ड ट्रंप यांना न्यू यॉर्कच्या कोर्टात हजर रहायचं होतं. त्यासाठी त्यांना मारेलागो या त्यांच्या रहात्या जागेवरून फ्लोरिडा विमानतळावर जायचं होतं. तिथून ते विमानानं न्यू यॉर्क विमानतळावर पोचणार होते. तळावरून ते कोर्टात जाणार होते.

फ्लोरिडा तळावर विमान उभं. अनंत मिनीटं ते  च्यानेलानं दाखवलं. मग कधीतरी पाच सात गाड्या आल्या. आकाशातून त्या दिसल्या. कुठल्या गाडीतून ट्रंप उतरले ते कळत  नाही. विमान निघालं. विमानतून ट्रंपची दृश्यं. नंतर न्यू यॉर्कचा तळ. मग न्यू यॉर्क कोर्टाच्या बाहेरचा बंदोबस्त. तिथ जमलेले पोलीस, पत्रकार, निदर्शक. निदर्शकांपेक्षा पत्रकारच संख्येनं अधीक. 

हे सगळं सतत लाईव्ह टीव्हीवर दाखवत होते.

मुख्य मुद्दा काय आहे, खटला कोणत्या आरोपाखाली आहे, त्या कायद्याचा अर्थ काय याचा पत्ताच नाही. 

राज ठाकरेंची भाषणं अशीच दाखवतात. ठाकरे घराच्या बाहेर पडलेत, गाडीत बसलेत, निघालेत, सभेच्या जागी पोचणार आहेत, गाड्यांचा ताफा, पुढं मागं पोलिसच्या गाड्या, ठाकरे गाडीतून उतरलेत. ते गॉगल नीट करतात, खांद्यावरचा दुपट्टा/मफलर नीट करतात, एकदा सभोवताली नजर टाकतात, आसपासची माणसं आपल्यापासून काही फूट अंतरावर आहेत की नाहीत याची काळजी घेतात,  रिकामा मंच दिसतो, जनता ठाकरेंची वाट पहातांना दिसते,  ठाकरे पोचतात, ते गाडीतून उतरले, स्टेजकडं निघाले, स्टेजवरची लगबग, जयजयकाराच्या घोषणा,  ठाकरे रुमालानं नाक पुसतात, माईकसमोर उभे, लांबचक पॉज,  चाललंय,चाललंय. च्यानेल चाललंय.

टीव्हीवर  आपल्याला अनेक तास हे पहावं लागतं, जगातल्या इतर गोष्टी च्यानेलनं बाजूला ठेवलेल्या असतात. कॅमेरावाला, अँकर, संपादक या मंडळींची जशी कुवत, जशी समजूत, तसं आपल्याला दिसणार. आपल्याला निवड करणं शक्य नाही. च्यानेल बंद करणं येवढाच पर्याय आपल्यासमोर असतो.

तसंच सिनेमाघरातही होतं. समोर पडद्यावर कॅमेरा नाचत असतो.  पहाताना थेटरात खरेदी केलेला दोनशे रुपयांचा समोसा खा आणि पेलाभर गार पेय दीडशे रुपये देऊन प्या. हातातला सेल फोन उघडा. त्यावरच्या  व्हॉट्सअपमधे डोकं घाला. समोरचा सिनेमा कधी संपतो ते कळत नाही. सगळे मिळून साताठशे रुपये खर्च करून थेटराच्या बाहेर पडा.

किंवा.  यातलं काहीही करू नका. झक मारली आणि सिनेमा पहायला आलो असं म्हणा. पाच दहा मिनिटातच बाहेर पडा.

ट्रंप, ठाकरे दर्शन चाललं असताना एकदम आठवला म्हणून संग्रहातून  १९७४ सालचा स्टीवन स्पीलबर्गचा शुगरलँड एक्सप्रेस चित्रपट काढला. 

लू पॉपलीन नावाची एक तरूण बाई. तिला दोन वर्षाचा लँग्स्टन  नावाचा मुलगा आहे. ती त्याला पोसू शकत नाही. कारण ती बेकार आहे. पोसू शकत नाही कारण तिचा नवरा तुरुंगात शिक्षा भोगतोय. लूला मुलाचा ताबा हवाय. त्यासाठी तुरुंगाधिष्ठीत नवऱ्याची मदत तिला हवीय. ती तुरुंगात येते, क्लोविस या नवऱ्याला कपडे बदलून बाहेर काढते, एका म्हाताऱ्या जोडप्याला शेंडी लावून त्यांच्या गाडीत घुसून शुगरलँड या गावाकडं निघते. वाटेत एक पोलिस कारचं त्यातल्या पोलिसासह अपहरण दोघं करतात. त्यांचा प्रवास सुरु होतो. 

या जोडप्याचा पाठलाग. पोलिसांच्या अनेक गाड्या. मग टीव्ही च्यानेलांच्या गाड्या. टीव्ही-रेडियोवरून लाईव प्रसारण. मग जनताही आपापल्या गाड्यांतून या पाठलाग मिरवणुकीत सामील. गाड्या एकमेकावर आपटतात. गोळीबार. जळणाऱ्या गाड्या. थरार. थरार. 

 बाहेर धमाल चाललीय आणि च्यानेलचा अँकर आपला मेकअप ठीक करतांना दिसतो. 

या शोभा यात्रेचं दर्शन घेणारे रिकामटेकडे नागरीक.

टीव्हीवरचं लाईव चित्रण पहाणारे रिकामटेकडे नागरीक.

एक पळवलेली गाडी आणि त्यातली तीन माणसं यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेकडो कार, शेकडो पोलिस, शेकडो बंदुका, हेलिकॉप्टर.  

  स्पिलबर्ग स्केचेस केल्यागत प्रसंग टिपतो, प्रसंग शिवतो, चित्रपट तयार करतो. 

क्लोविस कारमधे बसलाय. पोलिसाच्या कानशिलाला बंदुकीची नळी लावून क्लोविस गाडी चालवायला लावतोय. गाडीतलं पेट्रोल संपतं. क्लोविस आणि इतर पोलीस गाड्या पेट्रोल पंपात घुसतात, पेट्रोल घेतात आणि पैसे न देता निघून जातात.

क्लोविसची कार चढणीवर बंद पडते. कोल्विस लाऊड स्पीकरवरून पाठच्या पोलीस गाडीला सांगतो, गाडी माझ्या गाडीला टेकव आणि ढकल. 

क्लोविस या गुन्हेगाराची गाडी पोलीस चालवतो. याच पोलीसगाडीला दुसरी पोलीस गाडी धक्का देत पुढं नेते. 

मजा मजा चालते.

स्पीलबर्गला एक व्यापक भान आहे. क्षितीजापर्यंत पसरलेली शेतं, त्यांची कुंपणं. त्यात मधेच कुठं तरी रस्ता असतो. प्रचंड लँडस्केपमधे ठिपकागत एक कार. कारला समांतर प्रेक्षक सरकत जातो.  

या चित्रपटाच्या सुरवातीला अशीच एक बस दुरून येते. चौरस्त्यावर थांबते. एका रस्त्यावर एक अपघातात मोडून पडलेली कार असते.

मोडलेला, नादुरुस्त समाज. रिपेरीची आवश्यकता.

पहिल्या दहा मिनिटातच कळतं की एक बाई आपलं मूळ मिळवायच्या खटपटीत आहे, त्यासाठी जाम डेस्परेट आहे.  अमेरिकन लोकांना कार एकमेकावर आदळतांना पाहून बरं वाटतं. कार उलट्या पालट्या होत्यात, त्यांना आग लागते. स्पीलबर्गच्या अगदी ताज्या फेबलमन्स चित्रपटातही अशी दृश्य आहेत. फेबलमन्स हे स्पीलबर्गचं आत्मकथन आहे, त्यात एका आगगाडीचा अपघात आणि त्या गाडीच्या आड येणाऱ्या कार उलथणं दिसतं.  

उत्सुकता रहाते की पुढं काय होणार? लूला तिचा मुलगा मिळायला हवा. त्या दिशेनं चित्रपट सरकतो. पण शेवट होतो तो क्लोविस मरण्यावर. लूच्या मुलाचं काय झालं ते स्पीलबर्ग दाखवत नाही. चित्रपट संपल्यावर नामावली सुरु होण्याआधी स्पीलबर्ग सांगतो की काहीशी अशीच गोष्ट घडली होती आणि त्या कथेतल्या नायिकेला नंतर तुरुंगात जावं लागलं होतं.

बोनी अँड क्लाईड हा चित्रपटही पाहून घ्यावा. त्यातही एक गुन्ह्यात बुडालेल्या युगुलाला समाज हीरो करताना दिसतो, त्याची वरात समाज काढतो. बॉनी अँड क्लाईड १९६७ साली प्रसिद्ध झाली होती.

टीव्ही ऐन भरात येण्याचा तो जमाना होता. प्रत्येक गोष्टीचा इवेंट टीव्ही करू लागलं. निवडणूक ही लोकशाहीतली महत्वाची प्रक्रिया टीव्हीनं इवेंटमधे बदलली. उघडा नागडा सेक्स, गुन्हे टक लावून पहाणं; माणसं संभोग करताना चळावणारी दृश्य पॉप कॉर्न खात डोळ्यांनी उपभोगणं; खून होत असतो, रक्त वहात असतं तेही डोळ्यांनी उपभोगणं; टीव्हीनं आणि चित्रपटांनी (सर्वच नव्हे) ही विकृती लोकांमधे रोवली. 

 बॉनी अँड क्लाईड, शुगरलँड एक्सप्रेस या चित्रपटांनी त्या विकृतीवर बोट ठेवलं.

स्पीलबर्ग हा एंटरटेनर आहे. त्याला प्रेक्षकाची नाडी समजलीय. कठीण सामाजिक, राजकीय विषयही तो लोकांन रुचतील अशा रीतीनं मांडतो. ड्युएल ही स्पीलबर्गची पहिली टीव्ही फिल्म १९७१ साली झाली. त्यानंतर १९७४ साली स्पिलबर्गनं शुगरलँड एक्स्प्रेस तयार करून चित्रपटा व्यवसायात  पदार्पण केलं.

अगदी पहिलाच चित्रपट असा दमदार झाल्यावर त्यांची एकूण चित्रपट करियर कशी होऊ शकते याची कल्पना येते.

।।

Sugarland Express.

1974.

Steven Spielberg.

Comments are closed.