सिनेमा/ॲनॉटॉमी ऑफ ए फॉल

सिनेमा/ॲनॉटॉमी ऑफ ए फॉल

सॅम्युअल एक फ्रेंच लेखक आहे. सँड्रा एक जर्मन लेखक आहे. पतीपत्नी. त्यांना डॅनियल नावाचा मुलगा आहे. डॅनियल बारा वर्षाचा आहे, एका अपघातात चौथ्या वर्षी त्याची दृष्टी अधू झालीय. सॅम्युअलसोबत दुचाकीवरून जात असताना अपघात झाल्यानं सॅम्युअलला एक गुन्हागंड आहे, आपल्यामुळं त्याची दृष्टी अधू झाली असं त्याला वाटतं.तिघंही स्वित्झर्लंडमधे आल्प्स पर्वत प्रदेशात एका शॅलेमधे (विशिष्ट प्रकारचं लाकडी घर) रहात आहेत. सॅम्युअलला पुस्तक लिहायचंय, त्यासाठी तो नोकरी सोडून इथं आलाय.

शॅलेच्या तिसऱ्या मजल्यावरून सॅम्युअल खाली पडतो. मरतो.

खून केल्याचा आरोप सँड्रावर येतो. कोर्टात खटला चालतो. सँड्रा निर्दोष सुटते.

कथानक सोपं वाटतं ना?

पण तसं नाहीये. सॅम्युअलचं पडणं आणि मरणं यातल्या सर्व शक्यतांचा अभ्यास पोलीस करतात. एक कापडी सॅम्युअल तिसऱ्या मजल्यावरून वारंवार टाकून अभ्यास केला जातो. कसून. शेवटपर्यंत नेमकं काय घडलं याचा पत्ता  लागत नाही. प्रेक्षक म्हणून आपल्याला, कोर्टाला, पोलिसांना, कोणालाच निर्णायक कळत नाही की ती आत्महत्या होती, की खून होता, की अपघात होता. गोंधळ शिल्लक ठेवून कोर्ट सँड्राला सोडून देतं.

असा गोंधळ कां होतो? 

सॅम्युअल पडतो त्या वेळी तिथं ना मुलगा, ना पत्नी हजर असते. तिसरी कोणतीही व्यक्ती तिथं हजर नसते.

पोलिसच ते. काहीही करून निकाल करायचा असतो. पुरावे तर सापडत नाहीत.

पोलिसांना सॅम्युअल आणि सँड्रा यांच्यातल्या झालेल्या भांडणांचं रेकॉर्डिंग सापडतं. नवरा बायकोत तणाव असतात. कडाक्याची भांडणं झालेली असतात. सँड्राचं म्हणणं सॅम्युअल मुलाची काळजी घेत नाही. सॅम्युअलचं सँड्राबद्दल तेच मत असतं. सँड्रा यशस्वी लेखिका असते, सॅम्युअलला त्याचं पुस्तक पूर्ण करता येत नाही. सॅम्युअल मानसीक उपचार घेत असतो. सँड्रा बायसेक्सुअल असते. अशी किती तरी झेंगटं.

पत्नी बदफैली. पत्नी यशस्वी, नवरा अयशस्वी, त्यातून न्यूनगंड.म्हणून नवरा आत्महत्या करतो. किंवा नवरा त्रास देतो म्हणून पत्नी त्याचा खून करते.

निव्वळ पतंग उडवणं. वकील लोक यात वाकबगार असतात. याही चित्रपटातला सरकारी वकील अत्यंत नाट्यमय भाषणं करून सँड्राला अडकवत असतो. त्याची भूमिका छान आहे.

मुख्य मुद्दा सध्याच्या तणावांनी व्यापलेल्या जगात पतीपत्नीमधील दुरावा,संशय, भांडण.हा दुरावा फक्त पती पत्नीच निस्तरू शकतात. त्यांच्यातली केमेस्ट्री ते दोघं सोडून कोणालाही खरं म्हणजे कळत नसते. तरीही कोर्ट ती जबाबदारी घेवून प्रश्न निकाली काढतं. 

कोणी पाहिलेलं नाही. कोणी थेट ऐकलेलं नाही. तिसऱ्यानं काही तरी सांगितलेलं. तेही धड समजलेलं नाही. अशा ऐकीव गोष्टींवरचा खटला.

कोर्टात केस चालते म्हणून कोर्टरूम चित्रपट म्हणायचं. पण तसंही दिसत नाही. कोर्टाबाहेरच सारं घडत असतं.

फार गुंतागुंत. नवरा बायको संबंध. पोलिस नावाची संस्था. न्यायालय नावाची संस्था. पत्रकार. ऐकीव माहितीवर मतं तयार झालेले नागरीक.

दिक्दर्शक जस्टीन ट्रियेटनी साऱ्या गोष्टी छान गुंफल्या आहेत. पहिल्या पाच मिनिटातच उत्कंठा सुरु होते, चित्रपट संपेपर्यंत ती टिकते, उलगडा न होताच चित्रपट संपतो. पण या दरम्यान दिक्दर्शक अनंत मुद्दे आपल्यासमोर ठेवते.

सँड्रावर टेपर ठेवलेलं आहे. तीच दोषी आहे. पुरावे तर सापडत नाहीत. 

  तिनं लिहिलेली कादंबरी तपासा. हां. त्या कादंबरीतलं मुख्य पात्र सँड्रासारखंच आहे. त्या पात्रानं खून केलाय.

 सँड्राच्या अफेअर्स आहेत, ते सँड्राच कबूल करते.

 सँड्रा बायसेक्सुअल आहे, हेही सँड्रा कबूल करते.

 बस. हे पुरेसं आहे. अशी बाई  खून करू शकते.

 तिच्या अशा वागण्यामुळ मनस्वास्थ्य गमावलेला नवरा आत्महत्या करू शकतो.

 औषधाचा ओव्हर डोस झाल्यामुळंही अपघात होऊ शकते. 

बस. कोणत्याही शक्यतेला सँड्राच जबाबदार. 

कोर्टाची ही तऱ्हा ट्रियेटनं खुबीनं चितारलीय. 

घर आणि कोर्ट ही दोन मुख्य ठिकाणं आहेत.  पटकथा लिहितांना संवाद आणि व्यक्तीमत्वाचे कंगोरे अशा कौशल्यानं वापरलेत की प्रेक्षक खुर्चीला खिळून रहातो. तिन्ही मुख्य पात्रांच्या पूर्वायुष्यात चित्रपट फारसा जात नाही. आवश्यक तेवढंच पूर्वायुष्य फक्त संवादातूनच येतं. त्यामुळं दृश्यांची मर्यादा येते. ठराविक पात्रं आणि ठराविक जागा यातच चित्रपट रचावा लागतो. खून की अपघात की आत्महत्या हे कोडंच प्रेक्षकाला बांधून ठेवतं.

गुंताही कसा पहा. सँड्रा जर्मन आहे. ती आपलं घर सोडून फ्रान्स या परदेशात रहायला आलीय. तिला फ्रेंच येत नाही.

 सॅम्युअल  फ्रेंच, लिहिण्यासाठी तो आपल्या मायदेशातल्या पर्वतीय एकांतात आलाय. त्याला जर्मन येत नाही. 

दोघांमधली कॉमन भाषा इंग्रजी. म्हणून घरात इंग्रजी बोलली जाते. मुलाला जर्मन, फ्रेंच येत नाही. त्याला इंग्रजी येते. 

कोर्टात मन उघडं करणं केवळ मातृभाषेतच (जर्मन) शक्य असल्यानं सँड्रा अडखळते, तिला इंग्रजीचा आश्रय घ्यावा लागतो, ती पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही.

सँड्रा, सॅम्युअल आणि डॅनियल या चित्रपटातल्या मुख्य भूमिका. मिलो गार्नर या मुलानं डॅनियलची भूमिका केलीय. त्याची कोर्टातली साक्ष निर्णायक ठरते. त्याला कोर्टात उभं करणं योग्य की अयोग्य यावर वाद होतात. आई बापांमधली कडाक्याची भांडणं आणि त्यांचे एकमेकांवरचे आरोप त्याला ऐकवायचे की नाहीत यावर वाद होतात. मिलो शांतपणे सांगतो की ते सारं ऐकायची त्याची तयारी आहे. दीर्घ काळ लक्षात रहावी अशी भूमिका मिलोनं साकारलीय. डॅनियलला पहाताना, ऐकताना, गलबलायला होतं.

सँड्राची भूमिका सँड्रा हुलर या जर्मन नटीनं केलीय.सँड्राच्या व्यक्तिमत्वाचे सर्व गुंते हुल्लरनी हळुवारपणे उभे केलेत. हुल्लरचा चेहरा प्लास्टिक आहे, क्षणाक्षणाला होणारे बदल हुल्लरच्या चेहऱ्यावर प्रकट होतात. 

कथानक बुचकळ्यात पाडणारं आहे, आपल्याला काही कळत नाहीये असं हुल्लर दिक्दर्शक ट्रियेटला सतत म्हणत होती, काय करू असं विचारत होती. ट्रियेट म्हणायच्या की बाई गं, जे आहे ते असं आहे, ते कोणालाच उलगडणारं नाही, तरीही बोलकं आहे. तुझं तूच बघ कसा अभिनय करायचा. आणि तसंच हुल्लरनं केलंय. हुल्लरचा चेहऱ्यावर प्रचंड कंट्रोल आहे.

कॅन महोत्सवात ॲनाटॉमी आणि हुल्लर गाजत होत्या. सर्वांच्या तोंडी हुल्लरचं नाव होतं. याचं एक कारण त्याच महोत्सवात हुल्लरची प्रमुख भूमिका असलेला दी झोन ऑफ इंटरेस्ट हा जर्मन सिनेमा गाजत होता.

झोन ऑफ इंटरेस्टमधे हुल्लरनं नाझी छळछावणीच्या कमांडरच्या पत्नीची भूमिका (हेडविग) केली आहे. हुल्लर म्हणजे हेडविग एका सुंदर घरात रहात असते, आयुष्य एंजॉय करत असते. घराच्या भिंतीच्या पलीकडं छळछावणीत ज्यू मारले जात होते. जळणाऱ्या ज्यूंचा धूर हेडविगच्या घरातून दिसत असे, तो जीवघेणा वास तिच्या घरात असे. दोन दिवसांसाठी मुलीकडं आलेली तिची आई वास सहन न झाल्यानं निघून जाते. पण हेडविगवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

हेडविग खलनायिका नाही. एका नाझी अधिकाऱ्याची पत्नी असल्यानं तिला पत्नीची भूमिका पार पाडायची असते. बस. कसलेल्या गायकाची सुरावर जशी मांड असते तशी हुल्लर भूमिका धरून ठेवतात. ॲनाटोमीपेक्षा वेगळी भूमिका. अशा दोन भूमिका एकाच वेळी पहायला मिळाल्यावर प्रेक्षकांचे वांधे न झाले तरच नवल.

कॅन महोत्सवात ॲनाटोमीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं बक्षीस मिळालं. परंतू ऑस्करसाठी ही फिल्म सरकारनं पाठवली नाही.

।।

Comments are closed.