रविवारचा लेख/इसरायलची हेरयंत्रणा कां फेल झाली?

रविवारचा लेख/इसरायलची हेरयंत्रणा कां फेल झाली?

 गाझाभोवती इसरायलच्या लष्करानं कडं केलं होतं. कुंपणं होती. चौक्या होत्या. चौक्यांमधे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. प्रत्येक चौकी दुसऱ्या चौकीशी जोडलेली होती. सर्व चौक्या एक केंद्रीय चौकीला जोडल्या होत्या. चोविस तास गाझाभोवतालच्या तटबंदीवर इसरायलच्या लष्कराचं लक्ष असे.

  नेटफ्लिक्स इत्यादीं ओटीटी फलाटांवर  इसरायलच्या हुशारीच्या वेब मालिका दाखवल्या जातात. त्यात इसरायली खबरे (ते गाझाची अस्सल भाषा बोलतात, शंभर टक्के गाझामधे विरघळलेले असतात) कसे चौकाचौकात आणि रस्त्यारस्त्यावर अरबांची बित्तंबातमी मिळवतात इत्यादी दाखवलेलं असतं. जगात मोसादचा पहिला नंबर आहे असं म्हणतात. भारतात रॉ स्थापन करत असताना मोसादची मदत घेतली होती असं म्हणतात.

इतकी चकडबंद व्यवस्था असूनही मोटार सायकली आणि चार चाक्यामधून पंधराशे गनीम इसरायलमधे घुसले. ग्लायडरचा वापर केला. हद्दीला लागून असलेल्या किबुत्झ, वस्त्या, घरांत घुसले. मानवता वगैरेची पर्वा न करता दिसेल त्याला मारत सुटले.घुसता घुसता त्यांनी इसरायलची टेहळणी व्यवस्था उध्वस्थ केली. त्यामुळं काय घडतंय ते कळायला लष्कर आणि सरकारला खूप वेळ लागला.

अजूनही हमासवाले इसरायलमधे कसे घुसले ते कळलेलं नाही. इसरायल सरकार आणि लष्कर त्यावर बोलायला तयार नाही. एक बारीक अंदाज मिळतो. इसरायलचे माजी हेरप्रमुख काही दिवस आधीपासून पंतप्रधान नेतान्याहूंवर टीका करत होते, लष्कर ढिलं झालंय, सुरक्षाव्यवस्थेबाबत चालढकल होतेय असं ते जाहीरपणे म्हणाले होते. नेतान्याहूंवर टीका करतात म्हणजे ते देशद्रोहीच असले पाहिजेत असं सरकार समर्थक म्हणाले आणि ती टीका त्यांनी उडवून लावली.

टेहळणी यंत्रणा, हेरयंत्रणा फेल गेली?

हे कसं शक्य आहे?

एक शंका निरीक्षकांनी व्यक्त केलीय. सुरक्षा यंत्रणा फेल गेली नाही, हा डाव मुद्दामच नेतान्याहू यांनी टाकला होता असं निरीक्षक दबक्या आवाजात म्हणतायत. गाझाचा प्रश्न लष्करी कारवाई करून कायमचा सोडवून टाकायचं नेतान्याहूनी ठरवलं होतं आणि त्यासाठी त्यांनी केलेली ही व्यूह रचना होती. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊन बुडाखालची गादी जाण्याची शक्यता होती म्हणूनही हे नाटक लिहिलं होतं.हमास रॉकेटं गोळा करतंय हे सुरक्षा यंत्रणेला माहित होतं. काही महिने या कारवाईची तयारी चालली होती हेही लष्कराला माहित होतं. उलट पक्षी इसरायली हस्तकांनीच हमासला उचकवलं होतं. सुरक्षा यंत्रणा ढिली पडलीय असं नाटक इसरायलनं केलं आणि हमासला चिथावणी दिली.

नाटकाची संहिता तयार होती. संहितेनुसार नाटकाचा पहिला अंक पार पडला. हमासनं हल्ला केला.

दुसरा अंकही संहितेनुसारच चाललाय. 

गाझा जमीनदोस्त होतंय. हजारो गाझावासी मारले गेलेत. लाखो स्थलांतरीत झालेत. गाझाचा उत्तर भाग जमीनदोस्त झालाय, निर्मनुष्य झालाय. तिथं कोणीही गाझावाला येणार नाही याची व्यवस्था झालीय. गाझातून इसरायलमधे कामाला येणाऱ्या ८० हजार पॅलेस्टिनींचा कामाचा परवाना रद्द झालाय. कामच नाही म्हटल्यावर कोण गाझात राहील? 

रिकाम्या झालेल्या गाझाच्या उत्तर भागात इसरायलच्या वसाहती धडाधड उभ्या रहातील. या वसाहतीच्या भोवती पंधरा फूट उंचीच्या भिंती असतील आणि भिंतीला लागून असलेल्या आतल्या व बाहेरच्या रस्त्यावर लष्करी गाड्या गस्त घालत फिरतील.

इसरायलचा विस्तार होईल.

१९४८ पासून, नव्हे १९१८ पासून इसरायल असंच पॅलेस्टाईनमधे विस्तारत गेलंय.

रहाता राहतो मुद्दा नेतान्याहूंनी हे कसं घडवलं.

इतिहासात असं अनेक वेळा घडलंय.

१९५४ मधे २ जुलैला कैरोच्या पोस्ट ऑफिसात बाँबस्फोट झाला. नंतर १४ जुलै रोजी कैरो आणि अलेक्झांड्रिया इथल्या अमेरिकन कॉन्सुलेटमधे स्फोट झाले. २३ जुलैला कैरोत सिनेघर, पोस्ट ऑफिस,रेलवे टर्मिनसवर स्फोट झाले. 

मोसादची १३ माणसांची एक टीम हे उद्योग इजिप्तमधे करत होती. टीममधले लोक कैरोतले इसरायलचे हस्तक होते, त्यांचा एक स्लीपिंग सेल इजिप्तमधे होता. लोचा असा झाला की नंतर स्फोट करायला निघालेल्या हस्तकाजवळ असलेल्या डिटोनेटरचा स्फोट झाला, तो हस्तक पकडला गेला.

  शेवटल्या स्फोटाची खबर इजिप्शियन पोलिसाना मिळाली होती. एक इसरायलचा हेर फितूर झाला होता. 

सारा प्रकार उघडकीला आला.

इजिप्तमधे नासर यांचं सरकार होतं. नासर यांचं सरकार काम करत नाही, त्यांना देश नियंत्रणात ठेवता येत नाही अशी हवा निर्माण करण्यासाठी इसरायलनं हे स्फोट घडवून आणले होते. अशी हवा झाल्यावर अमेरिका आणि ब्रीटन इजिप्तला मदत करणार नाही असं इसरायलचं नियोजन होतं. हा उद्योग अशा रीतीनं करायचा होता की त्याचं खापर मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेवर फोडलं जावं. ब्रदरहूड आणि नासर यांच्यात वाकडं होतं.

अगदीच पोरकट असा डाव होता. तो उघडा पडला. इसरायलचे हेर पकडले गेले, फाशी गेले, जन्मठेपेत गेले. इसरायल सरकारनं चौकशी केली. चौकशीचे अहवाल प्रसिद्ध झाले नाहीत. माध्यमांनी सारं प्रकरण दाबून टाकलं.

हे सगळं घडलं तेव्हां लेवन हे मंत्री हेरयंत्रणेचे प्रमुख होते. त्यांना राजीनामा द्यावा लागला.पण नंतर चौकशी समित्या नेमून त्याना निर्दोष ठरवण्यात आलं. बेन गुरियन हे इसरायलचे निर्माते आणि पंतप्रधान लेवनच्या हात धुवून पाठी लागले होते.

   बेन गुरियन यानी असले अनेक उद्योग थेट १९४८ पासून चालवले होते. जगभर खळबळ माजावी आणि ज्यूना सहानुभूती मिळावी म्हणून खुद्द गुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली इसरायलमधे यायला निघालेल्या बोटींवर गुरियन यांनी स्फोट घडवले, बोटींवरच्या निष्पाप ज्यूंचा बळी दिला. असंच एक प्रकरण बगदादमधेही घडलं. बगदादमधल्या ज्यू वस्तीमधे बाँबस्फोट झाला आणि शेकडो ज्यू मारले गेले. स्फोट मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेनं केला असं लोकांना भासवायचं; परिणामी इराकी ज्यूंच्या झुंडी इसरायलसाठी रवाना होतील; असा डाव होता. काहीही सिद्ध झालं नाही.

इसरायलचं सरकार, इसरायलमधले नेते, इसरायलचे लष्करी अधिकारी यांच्या मते हे डावपेच होते. या डावपेचात भले शेपाचशे ज्यू नागरीक मरतील, पण शेवटी इसरायलबद्दल सहानुभूती निर्माण होऊन इसरायल स्थापन व्हायला मदत होईल असं या रणनीतीकारांचं म्हणणं होतं.

१९५४ मधे इजिप्तमधे स्फोट केले पण त्यानंतर अनेक युद्ध झाली आणि इसरायलला खूप मोठी किंमत मोजावी लागली.

तसंच सध्याच्या इसरायल हमास संघर्षात घडतंय.

इसरायलचा विस्तार होईल. पण काय किमत मोजावी लागेल ते इसरायलच्या लोकांना किंवा कोणालाही आज सांगता येत नाही.

इसरायल कधी नव्हे इतकं असुरक्षित झालं आहे. इसरायलमधले आणि जगभर पसरलेले ज्यू यांना दुर्दैवानं जीव मुठीत धरून जगत रहावं लागणार आहे. इसरायलचे नागरीक त्यासाठीच आता नेतान्याहूंचा राजिनामा मागत आहेत. हमासनं हल्ला करून फार भयानक चूक केली. गाझावरचे अमानुष हल्ले ही त्यापेक्षा भयानक चूक आहे असं जगभरचे ज्यू आणि तटस्थ लोक म्हणत आहेत.

दहशतवादी कोण नव्हतं? इरगुन या ज्यूंच्या संघटनेनं दहशतवाद नाही केला? हॅगाना ही ज्यूंची संघटना दहशतवादी कारवाया करत नव्हती? ज्यूना स्वतःच्या अस्तित्वासाठी दहशतवाद करावा लागला हे मान्य करायचं असेल तर पॅलेस्टिनी स्वतःच्या अस्तित्वासाठी दहशतवाद करू शकतात हे अमान्य करण्यात काय मतलब आहे?

 अरबांसह रहायचं आहे; ते कसेही असले तरी आपले शेजारी आहेत; हे लक्षात घेऊन इसरायलनं सहजीवन स्वीकारायला हवं.  

 इसरायल नावाचा देश आपल्याला नको असला आणि कितीही अन्यायकारक रीतीनं तयार झाला असला तरी ते एक वास्तव आहे हे पॅलेस्टिनीनी लक्षात घ्यायला हवं.

हमासबद्दल लोकांचं चांगलं मत नाही.

हिटलरच्या छळामुळं जमा झालेली सहानुभूती  ज्यूनी  गमावलेली आहे.

।।

Comments are closed.