सिनेमे/ किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
किलर्स ऑफ द फ्लॉवर मून.
अर्नेस्ट बर्कहार्ट (लिओनार्डो डीकॅप्रियो),पहिल्या महायुद्धात आचारी म्हणून काम केलेला जवान. अमेरिकेतल्या ओक्लाहोमा या राज्यातल्या फेअरफॅक्स या गावात उतरतो. नशीब काढण्यासाठी. त्या गावाचा सर्वेसर्वा विल्यम हेल हा धनिक माणूस (रॉबर्ट डीनिरो) अर्नेस्टचा काका आहे, त्यानंच अर्नेस्टला बोलावून घेतलं आहे.
फेयरफॅक्स या गावाच्या परिसरात तेल सापडलंय. या भागात स्थानिक ओसेज आदिवासी (रेड इंडियन) बहुसंख्य आहेत. जमिनी त्यांच्या आहेत. जमिनीची मालकी असल्यानं तेलाची मालकीही त्यांची आहे. ते लोक आता सॉलिड श्रीमंत झालेत.
हेल रँच चालवतो, म्हणजे गुराखी आहे. गुन्हे करून, आदिवासीना लुबाडून तो श्रीमंत झालाय.
साल आहे १९२१.
बर्कहार्टस ट्रेनमधून उतरतो तेव्हांच त्याचा काका हेल त्याला विचारतो ‘काय? युद्धातून गुप्तरोग आणलास की नाही? बायका आवडतात?’
पहिल्या झटक्यातच अमेरिकन युद्ध म्हणजे काय असतं याचा अंदाज धाडकन येतो.
बर्कहार्टनं ओसेज स्त्रीशी लग्न करायचं आणि कालांतरानं तिची संपत्ती हडप करायची असा हेलचा डाव असतो.
काकाचा डाव आणि योगायोग अशा दोन गोष्टी जुळून येतात. बर्कहार्ट मॉली नावाच्या सुंदर ओसेज मुलीच्या प्रेमात पडतो. तीही याच्या प्रेमात पडते. दोघं लग्न करतात.
सिनेमा ही त्या दोघांची प्रेम कहाणी होते.
पण नंतर त्या मॉलीच्या बहिणी मरतात, आई मरते, गावातली अनेक माणसं मरतात. त्यांचे खून होतात किंवा रहस्यमय आजार होऊन ती माणसं मरतात.
मॉलीला संशय येतो. ती वॉशिंग्टनला जाते, अमेरिकेच्या अध्यक्षाला भेटते. चौकशीची विनंती करते. अध्यक्ष दोन तपासनीस (इनवेस्टिगेटर) पाठवतात. त्या तपासनिसांचाही खून होतो.
आता हा गुन्हेपट होतो, रहस्यपटही होतो.
डेविड ग्रॅन या पत्रकारानं या प्रकरणाचा अभ्यास करून, कोर्टातही कागदपत्रं आणि साक्षी इत्यादींचा अभ्यास करून लिहिलेल्या याच नावाच्या पुस्तकावर चित्रपट आधारलेला आहे.
डीकॅप्रियो आणि डीनिरो हे कसलेले अभिनेते आहेत. त्यांचा अभिनय अभिजात या सदरात मोडणारा, कसलेला, असतो. दोघानीही ऑस्करं मिळवलीत.भव्य आसमंत आणि हे दोघे मिळून चित्रपट व्यापून टाकतात.
मॉलीचं काम करणारी लिली ग्लॅडस्टन वरील दोन्ही जायंट्सच्या बरोबरीनं भूमिका करते. ती नुसती सुंदर दिसत नाही. तिच्या मनातली खळबळ ती दाखवते. नवऱ्यावर प्रेम आहे, तो आपल्याला मारायचा प्रयत्न करतोय, त्यानं अनेक गुन्हे केलेत, ते तिला कळतंय की न कळतंय, आपल्याला प्रेक्षक म्हणून ते कळलंय पण तिला कळलंय की नाही याचा पत्ता लागत नाही. मॉलीचा चेहरा सुंदर पण संदिग्ध रहातो.अप्रतीम अभिनय आहे. ऑस्कर मिळायला हरकत नाही.
चित्रपटाचा काळ आहे १९२० चं दशक. तो काळ चित्रपटात दिसतो. त्या काळात नुकतीच सुरु झालेली ट्रेन दिसते. नुकताच लोकप्रीय झालेला गॉगल दिसतो. त्या काळातल्या मोटारी दिसतात, बग्ग्या दिसतात. फेयरफॅक्स या गावामधे लोकांना पूल या खेळाची लागण झालीय. पूलचं टेबल दिसतं, बाजूलाच न्हावी दिसतो. फेयरफॅक्समधली दुकानं दिसतात, बार दिसतात, आतून घरं दिसतात.
निर्मितीचं सीजीआय हे आधुनिक तंत्र मार्टिन स्कोर्सेसे यानी वापरलेलं नाही. फेयरफॅक्स हे गाव कसं होतं, तिथली माणसं कोणते कपडे घालत होती, त्यांचे विविध सामुहीक-धार्मिक विधी कोणते होते याचा तपशीलवार अभ्यास दिक्दर्शक आणि कलानिर्देशक जॅक फिक्स यांनी केला. ते सारे तपशील उभे केले, एक गावच्या गावच उभं केलं. फिक्स हा माणूस कला दिक्दर्शक आहे खरा पण तो हाडाचा सुतार आहे. चित्रीकरणासाठी गाव उभा करत असताना त्याची रेखाटनं फिक्सनं तयार केली आणि सुताराना सोबत घेऊन प्रत्येक खिळा ठोकत असताना फिक्स तिथं हजर होता.
लोक सामान्यतः छायाचित्रकाराचं कौतुक करतात. छायाचित्रकारानं जे दाखवलं ते कोणीतरी उभं केलेलं असतं हे लोकांच्या लक्षात येत नाही. कलानिर्देशकानं कल्पक मेहनत केली असेल तरच कॅमेऱ्यात ते सारं दिसणार ना?
मूळ पुस्तक पत्रकारी शैलीतलं आहे, त्याच तपासनीस आणि कोर्टातला खटला या गोष्टी आहेत. गुन्हे आणि राजकारण पुस्तकात आहे. पटकथा तयार करत असताना कथेला प्रेमकथा आणि थरारकथा असं रूप ठेवाव असं स्कॉर्सेसे यांच्या डोक्यात होतं.कथानक घडतं ते स्थळ आणि ती माणसं पहायला स्कॉर्सेसे ओक्लाहोमात गेले. स्थानिक ओसेज लोकांचं जगणं आणि विचार त्यांना कळले. ओसेजांवर झालेला अन्याय त्यांना दिसला. स्कॉर्सेसेनी चित्रपटाचा मुख्य मुद्दा बदलला. पटकथेला त्यांनी ओसेज संस्कृती या धाग्याभोवती गुंफलं. प्रेमकथा, ओसेज चालीरीती आणि नंतर गुन्हे अशा महत्वक्रमानं कथा रचली.
चित्रपट तीन तास वीस मिनिटं चालतो, त्यात ओसेज चालीरीती आणि विधी दाखवणारी दृश्यं आहेत. ती लांबतात. ती कां लांबतात, ओसेजेतर लोकांना ती कां कंटाळवाणी वाटतात याचं स्पष्टीकरण दिक्दर्शकाच्या हाताळणीत सापडतं. स्कॉर्सेसेला ओसेज धार्मिक विधी, त्यांचे पेहराव आणि वागणं यांचे तपशील दाखवायचे होते. चित्रपटाच्या शेवटी स्वतः दिक्दर्शक स्कॉर्सेसे येतात आणि चित्रपटाबद्दल बोलतात.
चित्रपटात माहितीपटाची शैली मिसळलेली आहे. फेयरफॅक्स या गावातल्या काही घटनांची क्लिप्स काळ्यापांढऱ्या रंगांत आहेत. त्या काळातल्या काही बातम्याही चित्रपटात दाखवलेल्या आहेत. टीव्हीवर किंवा नाटकात सूत्रधार वक्तव्य करतो तसं चित्रपटात ‘इतके खून झाले पण एकाचाही तपास झाला नाही’ असं वक्तव्य येतं. माहितीपटाच्या छटेचा एक परिणाम असा की जे दिसतंय ते वास्तव आहे असं सुचवलं जातं. चित्रपटाची गोष्ट रचलेली असली तरी त्यात सत्यांश आहे असं या शैलीमुळं जागोजागी जाणवत रहातं. स्कोर्सेसे यांच्या अनेक चित्रपटात ती शैली दिसते.
स्कॉर्सेसे इतिहासात रमतात. लास्ट टेंप्टेशन ऑफ ख्राईस्ट या चित्रपटात ते ख्रिस्ताच्या काळात गेले, रोमन साम्राज्यात माणसं कसं जगत होती याचं चित्रण त्यांनी लास्ट टेंप्टेशनमधे केलं. कुंदुन या चित्रपटात त्यांनी दलाई लामांचा काळ चितारला. प्रस्तुत चित्रपटात अमेरिकेच्या घडणीचा, पहिल्या महायुद्धानंतरचा काळ आहे. हुबेहूब. त्या काळातल्या वास्तू, वस्तू, पोषाख, केशभुषा इत्यादी वापरून स्कॉर्सेसे आपल्याला त्या काळात घेऊन जातात. ओसेज स्त्रिया आणि पुरुषांच्या अंगरखे-शर्टाची बटनंही काळजीपूर्वक त्या काळातली निवडलेली आहेत. ही खटपट महागात पडते, त्यावर फार पैसे खर्च करावे लागतात. सीजीआयचा वापर केला की सारा मामला बंद खोलीत एका शक्तिशाली कंप्यूटरच्या वापरातून साधता येतो. स्कॉर्सेसे तसं करत नाहीत हे आपल्याला पुन्हा एकदा किलर्समधे दिसतं.
स्कॉर्सेसे साधारणपणे १९६०-१९७० या काळात घडले. स्टुडियो पद्धत म्हणजे स्टुडियोच्या मालकांनी सांगितलेलं ऐकणं या पद्धतीनं चित्रपट करण्यापासून स्कॉर्सेसे यांनी फारकत घेतली. बंडखोर. स्वतंत्रपणे आपल्या मर्जीनुसार ते चित्रपट करू लागले. इनारिटू, अलमोदोवार, मिरेलेस हे दिक्दर्शक त्याच पंथातले. विषयाची निवड आणि हाताळणी हे दिक्दर्शक स्वतः निवडतात, नट कोणता हवा आणि चित्रीकरण कसं व्हावं हेही तेच ठरवतात. पैसे देणाऱ्या माणसाचं जोखड यांच्या मानेवर नसतं. अलीकडं नेटफ्लिक्स-ॲपल टीव्ही अशा कंपन्याही स्वतंत्र दिक्दर्शकांच्या चित्रपटात पैसे ओतायला तयार होतात.
किलर्स या चित्रपटाच्या शैलीचं दीर्घकाळ विश्लेषण होईल इतक्या शैल्या त्यांनी या चित्रपटात वापरल्या आहेत.
चित्रपट ऑस्करच्या रांगेत आहे. डिपार्टेड या त्यांच्या चित्रपटाला पूर्वी ऑस्कर मिळून गेलं आहे.
१९६७ पासून त्यांच्या चित्रपट दिक्दर्शनाची कारकीर्द सुरु झाली. प्रस्तुत किलर्स ऑफ द फ्लॉवर मून ही मार्टिन स्कॉर्सेसे यांची २७ वी फीचर फिल्म आहे.
।।