शुक्रवार/ पुरोहिताच्या हातात बंदुक?
माँक अँड द गन
माँक अँड द गन या चित्रपटाला मुंबईतल्या मामी महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचं बक्षीस मिळालंय; ऑस्करच्या स्पर्धेतही तो चित्रपट आहे.
तुम्ही कधी गेला आहात भूतानमधे?
जरूर जा.
जगातला सर्वात स्वच्छ देश. प्रदुषण नाही. अख्ख्या देशात सिगारेट प्यायला परवानगी नाही. दारू नाही. बंदुक सापडली तर कित्येक महिने तुरुंगवास.
आपण भारतीय असू की अमेरिकन, भूतानमधे गेलं की प्रकृती बिघडण्याची शक्यता. इतक्या स्वच्छ आणि नीरव वातावरणात रहायची आपल्या शरीराला आणि मेंदूला सवयच नाही.
अशा भूतानात आपण दी माँक अँड दी गन या चित्रपटातून शिरतो. चित्रपटाच्या सुरवतीलाच आपल्याला एक भिक्षू दिसतो. त्याच्या खांद्यावर गॅसचा सिलिंडर आहे. टेकडी चढतोय. मठाकडं निघालाय.भवताल निर्मनुष्य, नीरव, अगदी हलक्या आवाजात संगीत, झाडं झुडुपं सोडून काहीही नाही.
लाकडं, गोवऱ्या यावर भूतानचं भागत होतं. झाडं तोडायची, झाडं लावायची. निसर्गाचं चक्र अशा रीतीनं चालत होतं की झाडं कधी कमी झालीच नाहीत. आता हा भिक्षू सिलिंडरमधल्या गॅसवर शिजवलेलं अन्न खाणार.
सिलिंडर आलाय. सिलिंडर सोबत इंटरनेट आलंय. इंटरनेटनं टीव्ही आणलाय. टीव्हीनं सभोवतालची दुनिया आणलीय.जगभर निवडणुका होतात. लोकशाही हा धर्म लोकप्रिय झालाय. तोही टीव्हीनं भूतानमधे आणलाय.
प्रस्तुत चित्रपटाचा काळ आहे २००६. त्या वर्षी भूतानच्या राजानं राजगादी त्यागली आणि जनतेला लोकशाही दिली. इथून पुढं लोकांनी निवडून दिलेले लोक राज्य करतील असं त्यानं सांगितलं, स्वतः बाजूला झाला.
गंमत पहा. आठवा एडवर्ड हा ब्रीटनचा राजा राजगादी सोडून परदेशात गेला होता. कारण त्याला एका घटस्फोटित स्त्रीबरोबर लग्न करायचं होतं. ब्रिटीश परंपरेनुसार असं लग्न केलेल्या माणसाला राजमुकुट डोक्यावर घेता येत नाही. प्रेम की गादी या पेचावर त्या राजानं प्रेम पत्करलं होतं.
इकडं हा राजा काहीही न मागता आपली गादी सोडायला निघालाय.
भूतानच्या जनतेला लोकशाही माहित नव्हती.
राजानं लोकांना लोकशाही शिकवायचं ठरवलं. निवडणूक,मतदान, उमेदवार, पक्ष, विधी मंडळ, मंत्रीमंडळ या लोकांच्या गावी नसलेल्या गोष्टी लोकांना शिकवायची मोहिम राजानं काढली.अभ्यासवर्ग घेतले. अभिरूप न्यायालय असतं तशी अभिरूप निवडणुक योजली.
या मोहिमेचा घटनावृत्तांत या चित्रपटात आहे.
उमेदवार. स्पर्धा. ते आपसात भांडतात. उमेदवारांच्या पाठिराख्यांमधे भांडण. एका घरात नवरा एकीकडं, बायको दुसरीकडं. एका घरात सासू एकीकडं जावई दुसरीकडं. शांत असलेली घरं अशांत झाली.
प्रचारादरम्यान आरोप करावेच लागतात असा जणू लोकशाहीचा नियम आहे. आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली. माणसं एकमेकांशी उद्धपणानं वागू लागली.
एक नवीच वस्तूकेंद्री संस्कृती आकाराला आली. शेजाऱ्याकडं माझ्या टीव्हीपेक्षा मोठा टीव्ही येतो यावरून वितुष्ट सुरू झालं. शेजाराच्या घरावर टीव्हीचा अँटेना दिसल्यावर घरची कारभारीण हट्ट करू लागली की आपल्याकडंही टीव्ही हवा.
टीव्ही आला. जेम्स बाँडचे सिनेमे आले. चित्रपटातल्या एका दृश्यात चहाच्या दुकानात माणसं जेम्स बाँडचा क्वांटम ऑफ सोलेस पहाताना दिसतात. बंदुका. बाँबस्फोट. खून. अंग कमीत कमी झाकणाऱ्या स्त्रिया. चार चौघांसमोर पाप्या घेणं. हे सगळं लोकशाहीसोबतच भूतानमधे आलं.
नकोच असली लोकशाही असं भूतानी म्हणाले. आमचा राजाच बरा. शेवटी लोकशाही कल्याणासाठीच तर आहे ना. राजा आमचं कल्याण करत असताना कशाला ही लोकशाही असं भूतानी विचारतो.
एका भूतानी माणसाला लोकशाही म्हणजे काय तेच कळत नाही. तो विचारतो ‘हा कुठला डुकरांचा नवा रोग आहे?’
एक जण विचारतो ‘हां. आम्ही टीव्हीवर भारत पाहिलंय. तिथं लोक लोकं एकमेकावर खुर्च्या फेकतात, मारामाऱ्या करतात, भ्रष्टाचाराचे आरोप करतात. तीच लोकशाही तुम्ही म्हणताय कां?’
तर अशी लोकशाहीची धावपळ चालली असताना खांद्यावरून सिलिंडर घेऊन जाणाऱ्या भिक्षूला, ‘ताशी’ला, त्याचा लामा सांगतो की मला एक बंदूक आणून दे. मतदानाच्या दिवसासाठी ती मला हवीय.
ताशी कोरा करकरीत. लामाला बंदुक कशाला हवीय? ताशी प्रश्न विचारत नाही. तो गावात फिरून कोणाकडं बंदुक आहे काय याची चौकशी करतो. तर चक्क एका लामाकडं बंदुक सापडते. ती लामाकडं कशी आली? कोणी तरी अमेरिकन पर्यटक भूतानमधे आला होता, त्यानं ती लामाला भेट दिली.
ती रायफल अमेरिकन सिविल वॉरमधे वापरली गेलेली अँटिक रायफल असते. तिची किमत लक्षावधी रुपये असते. ती मिळवायला एक अमेरिकन माणूस भूतानमधे आलेला असतो.
आता तो अमेरिकन आणि भुतानी भिक्षू-लामा यांच्यात स्पर्धा लागते.
मग धमाल.
लामाला रायफल कशाला हवीय ते लोकांना आणि आपल्याला कळत नाही. ते एक रहस्य होतं. हा लामा निवडून आलेल्या कोणाचा खूनबीन करणार आहे काय अशी शंका आपल्याला येते. काही काळ हिचकॉकनं काढलेला विनोदप्रधान चित्रपट पहातोय की काय असं वाटलं.
अभ्यास वर्गात एक जण अमेरिकन लोकशाहीचं उदाहरण देतो. एक भूतानी नागरीक निरागसपणे म्हणतो ‘अमेरिका म्हणजे जेएफ केनेडी आणि अब्राहम लिंकन यांचा देश ना?’
लिंकन आणि केनेडी या दोघांचेही खून झालेत.
म्हणजे तो लामा थेट अमेरिकन पद्धतीची लोकशाही आणून खून करणार काय?
शेवट काय होतो? त्या रायफलचं काय होतं?
ते रहस्य दिक्दर्शकानं कौशल्यानं निर्माण केलंय, खेळवलय आणि चित्रपटाच्या अगदी शेवटाला उघड केलंय.
चित्रपट भूतानमधे घडतो. नितांत सुंदर निसर्ग. मंद झुळुकीसारखं संगीत कानावर येत असतं. माणसं साधी आणि निवांत असतात. गावाकडं निघालात की वाटेत एक स्तुप लागतो. जाणारा येणारा प्रत्येक माणूस त्या स्तुपाला तीन प्रदक्षिणा घालूनच पुढं सरकतो. खांद्यावर सिलिंडर असो की बंदूक, तीन प्रदक्षिणा मस्ट आहेत, ती भूतानी संस्कृती आहे.
उरा हे गाव आणि भूतान दिक्दर्शक पावो दोरजी आपल्यासमोर उभं करतो. दोरजी भूतानी आहे. त्याचं शिक्षण अमेरिकेत झालं. आता तो तैवानमधे स्थायिक झालाय.
दोरजीला मुळात छायाचित्रणाची आवड. तिथून तो गोष्टी-पटकथा लिहायला लागला आणि मनात नसतांनाही दिक्दर्शक झाला. त्याची २०१९ सालची पहिलीच फिल्म ‘लुनाना. ए याक इन दी क्लासरूम.’ भूतानच्या सरकारनं ऑस्करला पाठवली होती.
यंदा परदेशी-हॉलिवूड बाह्य या वर्गात ८९ देशांनी फिल्मा पाठवल्यात. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या मामी महोत्सवात माँक दाखवण्यात आली. याच महोत्सवात ट्वेंटी डेज इन मारियुपोल हा युक्रेनची डाक्यूफीचर फिल्म दाखवण्यात आली. तीही ऑस्करच्या स्पर्धेत आहे.
२०१८ ही फिल्म केरळातल्या पुराला गावानं कसं तोंड दिलं ते दाखवते.
माँक शांत आहे. मरियुपोल हिंसेनं भरलेली आहे. २०१८ संकटावर माणूस कशी मात करतो ते दाखवते. तिन्ही फिल्मच्या शैली आणि वर्ग वेगळे आहेत.
पाहूया माँक, मरियुपोल आणि २०१८ यापैकी कोणाला बक्षिस मिळतं.
।।