सिनेमे. पुअर थिंग्ज.
पुअर थिंग्ज.
यंदाच्या ९६ व्या ऑस्कर स्पर्धेत पुअर थिंग्ज या चित्रपटाला ७ नामांकनं होती, चार मिळाली. योर्गोस लॅंथिमोस या ग्रीक दिक्दर्शकाची ही आठवी फिल्म आहे. उत्तम अभिनेत्री, उत्तम कलादिक्दर्शन, उत्तम रंगवेषभुषा आणि उत्तम चित्रीकरण या वर्गाची पारितोषकं या चित्रपटानं मिळवली आहेत.
चित्रपटाच्या सुरवातीला पाठमोरी स्त्री गडद रंगाचा ड्रेस घालून उभी दिसते.अगदी जवळून, नंतर ती लहान लहान होत जाते आणि शेवटी पाण्यात उडी मारताना दिसते. पियानोच्या ठेक्यावर. नंतरच्या दृश्यात एक तरुण मुलगी दिसते, पियानो बडवत असते, कधी कधी पियानं पायानंही वाजवते. मुलगी पियानो शिकतेय असं आपल्याला कळतं. मग दिसतो एक माणूस. त्याचा चेहरा चारेक ठिकाणी शिवलेला आहे. तो माणूस जेवणाच्या भल्यामोठ्या टेबलासमोर बसतो. दुसऱ्या टोकाला ती मुलगी. ती टेबलावर हात आपटते. मग एक स्त्री तिच्यासाठी जेवण घेऊन येते. ती मुलगी जेवताना तोंडातले पदार्थ दणादण थुंकते. तिला पदार्थ आवडलेले नसतात. समोर बसलेला माणूस तिच्याकडं कौतुकानं पहात असतो.
पहिलं दृश्य गडद रंगात, नंतरची दृश्य काळीपांढरी. तिथून बराच काळ चित्रपट काळा पांढरा.
प्रेक्षकाच्या सहज लक्षात येतं की हा नॉर्मल चित्रपट नाहीये. पुढे दोन तास बाविस मिनिटं आपण पडद्यावर अकल्पित गोष्टी पहात रहातो. स्त्री पुरुष नग्नावस्थेत संभोग करताना दिसतात, संभोगही कामशास्त्रात सांगितलेल्या आणि खजुराहोत दिसणाऱ्या आसनांच्या रुपात दिसतात. कोणत्या काळात चित्रपट घडतो ते कळत नाही अशा तऱ्हेच्या इमारती, पूल, वाहनं, रस्ते, कपडे दिसत रहातात. एक काळ दाखवण्यासाठी काळीपांढरी फिल्म आणि दुसरा काळ दाखवण्यासाठी रंगीत. दोन काळातला फरक खरं म्हणजे केवळ काही दिवसांचाच. रंग भडक. कपडे भडक आणि अकल्पित. माणसांचे चेहरेही कुडीअट्टम किंवा काबुकी नाटकातल्या पात्रांसारखे, आखीव-रेखीव-रेषा आणि आठ्या नसलेले. पडद्यावर जे दिसतं ते पडद्याच्या कडेचा भाग आवळल्यासारखं. नॉर्मन लेन्स न वापरता फिश आय लेन्स वापरलीय, माशाला दिसेल तसं आपल्याला दिसतं.
एका स्त्रीची कहाणी दिक्दर्शक सांगतोय येवढं कळतं पण डोक्याला ताप होतो कारण अतर्क्य आणि अशक्य अशा गोष्टी दिक्दर्शक दाखवतो. उदा. फणस फोडून आतून गरे काढावे तसा चित्रपटाचा नायक स्त्रीची कवडी फोडतो, आतून मेंदू बाहेर काढतो, पोकळ कवटीत नंतर दुसरा मेंदू ठेवतो आणि डोकं शिवून टाकतो.
भारतीय माणसाला हा चित्रपट पहाताना गणपती या देवाची आठवण व्हायला हरकत नाही. पुराणात सांगितलेल्या कथेनुसार माणसाच्या धडावर हत्तीचं शिर बसवलं आणि गणपती झाला. पुअर थिंग्जमधे एक सर्जन माणसाची कवटी उघडून त्यात बकरीचा मेंदू भरतो. आपल्याला रांगणारा आणि झाडाची पानं खाणारा माणूस दिसतो, चित्रपट संपतो.
चित्रपटाला एक गोष्ट आहे. बॅक्स्टर नावाचा एक डॉक्टर, सर्जन. एका गरोदर स्त्रीचं प्रेत तो मिळवतो. स्त्रीच्या पोटातल्या गर्भाचा मेंदू तो काढतो आणि मेलेल्या स्त्रीच्या डोक्यात फिट करून त्या स्त्रीला जिवंत करतो. आता ती स्त्री शरीरानं मोठी पण मनानं/मेंदूनं एक अर्भक असते. ही स्त्री नंतर कशी वाढते याचा अभ्यास हा डॉक्टर करतो, त्या स्त्रीला स्वतंत्रपणे वाढू देतो. ती स्त्री शरीर म्हणजे काय,सेक्स म्हणजे काय इत्यादी गोष्टी निरागसपणे शिकत जाते. पुरूष स्त्रियांना कसं वागवतात, पुरुषांचा स्त्रीबद्दलचा दृष्टीकोन हे सारं ती अनुभवत जाते. अगदी निरागसपणे प्रत्येक गोष्टीला कां, कां, असंच कां असे प्रश्न विचारत जाते. यातून तिचं जे काही व्हायचं ते होतं, ती एक स्वतंत्र, प्रस्थापित जगावेगळी स्त्री बनते. ती अगदी सहजपणे शरीराचा वापर पैसे मिळवण्यासाठी लोकांना करू देते. त्यात तिला काहीच वावगं वाटत नाही.नंतर तिला कळतं की लोक अशा रीतीनं शरीरवापराला वेश्याव्यवसाय असं म्हणतात. हळूहळू तिला समजू लागतं की स्त्रीची योनी हेच पुरुषी जगाच्या दृष्टीनं एक महत्वाची गोष्ट असते, त्या योनीची मालकी आपल्याकडं रहावी असा पुरुषांचा प्रयत्न असतो.
स्त्री पुरुष संबंध, सेक्स इत्यादी बाबत प्रचलीत जगात कोणते विचार आहेत, ते कितपत योग्य आहेत इत्यादी प्रश्न दिक्दर्शकाला विचारायचे आहेत. पण ते तो सरळपणे विचारत नाही. ॲबसर्डिटी, विसंगती, विरूपता, अंगावर काटा येईल अशा दृश्यांमधून दिक्दर्शक ती गोष्ट आपल्याला सांगतो. ही एक नवी शैली आहे. माणसाला विचार करायला लावायचा, त्याला छळायचं, सरळ काहीही सांगायचं नाही.
चित्रपटात सैन्यातला वरच्या पदावरचा लष्करातला जनरल आहे. तो म्हणतो की प्रदेश काबीज करणं हे माझं कर्तव्य आहे. (सैन्याबद्दल, शौर्याबद्दल, देशप्रेम इत्यादीबद्दलच्या आपल्या कल्पनांचे तीन तेरा वाजतात). चित्रपटाची नायिका बेला हिला तो काबीज करतो, त्याच्या लेखी ती प्रदेश असते.
नायिका बेला त्या जनरलशी लढते. पुरुषानं स्त्रीची मालकी मिळवणं या गोष्टीलाच ती आव्हान देते. ती जनरलला गोळी धालते. त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याच्या डोक्यात बकरीचा मेंदू घालते.
दोन पुरुष बेलाला म्हणतात ‘तुम्हा स्त्रियांचा प्रॉब्लेम तुमच्या दोन पायांच्या मधल्या प्रदेशात आहे.’ जनरल बेलाची सुंता करायला निघतो.
चित्रपटाचा नायक आहे डॉक्टर बॅक्स्टर. तो राक्षस आहे. त्याच्या लेखी माणसं ही विज्ञानाचे प्रयोग आहेत, माणसं म्हणजे अनेक रसायनांचं एक मिश्रण आहे. त्याच्या वडिलांनी त्याला शिकवलंय की वेदनांचा डोस टोकाला नेला की माणसाला वेदना कळेनाशा होतात, त्याला आनंदच होऊ लागतो.
या राक्षसाला त्याची कन्या बेला देव म्हणते. देव हे राक्षसाचंच एक रूप.
दिक्दर्शक प्रस्थापित जगातल्या कल्पनांना धडका देतो. धक्के कथानकात आहेत, कथानकातल्या पात्रांत आणि चित्रपटाच्या शैलीतही आहेत. चित्रपटात पॅरिस, लिस्बन, अथेन्स ही शहरं सरियलिस्टिक चित्रांसारखी दिसतात. त्यात दिसणारी वाहनं,रस्ते, हॉटेलं, घरं, माणसांचे पेहराव इत्यादी सारं सरियलिस्टिक, बटबटीत.
काही तत्वज्ञ सध्याच्या जगाचं वर्णन पोस्टमॉडर्न असं करतात. म्हणजे जगात सारं काही व्यक्तिसापेक्ष असतं, जगातल्या घटनांना कोणताही तर्क लागू होत नाही, सारंच संशयास्पद आहे, काहीच खरं नाही इत्यादी इत्यादी. या विचाराचा प्रभाव दिक्दर्शकावर आहे.
थोडक्यात म्हणजे सवय नसलेल्या गोष्टी पहायच्या आणि शिणवून टाकणारा विचार करायचा. या शैलीशी परिचित असणाऱ्यांना हा चित्रपट आवडेल.
।।