प्रिन्स पुतळा
आपल्याला प्रिन्स फिलिप माहितच आहेत. राणी एलिझाबेथ यांचे पती. ते १९७७ ते २०११ येवढा काळ केंब्रिज युनिव्हर्सिटीचे चॅन्सेलर होते. तर त्यांच्या स्मरणार्थ केंब्रिज पालिकेनं एक पुतळा करून शहराच्या एका मोक्याच्या जागी बसवायचं ठरवलं. तसा ठराव झाला, उरुग्वेतले एक शिल्पकार पाब्लो एच्युगेरी यांना कंत्राट दिलं. १.५० लाख पाऊंड मेहेनताना देण्यात आला. २०१४ साली पुतळा चौकात बसवण्यात आला.
पुतळा केंब्रिजमधे पोचला आणि बसवण्यात आला तेव्हांच केंब्रीज पालिकेचा कला या विभागाचा अधिकरी नाराज होता. त्यानं नोंद केली की या पुतळ्याचा दर्जा चांगला नाहीये, तो लोकांसमोर येणं मला योग्य वाटत नाही.
मग पालिकेत कागदं हलत राहिली. ब्रिटीश पद्धतीनं चर्चा होत राहिल्या. त्या काळात प्रिन्स फिलिप जिवंत होते. पण हा मामला त्यांच्याकडं गेला होता की नाही ते कळायला मार्ग नाही.
पालिकेत चर्चा झाली. पुतळा ‘कुरूप’ आहे असं काहींचं मत पडलं. मग काय करायचं. महत्वाच्या मोक्याच्या चौकात असा पुतळा ठेवणं म्हणजे शहराच्या सौंदर्याला बाधा येते असं वाटल्यावरून हा पुतळा २०१४ नंतर कधी तरी शहरातल्या एका लोकवस्तीतल्या चौकात बसवण्यात आला.
पण तिथंही गोंधळ झाला. काही लोकांनी तक्रार केली की तो पुतळा विद्रूप आहे आणि लहान मुलं तो पाहून घाबरतात. त्यांनी पुतळा आमच्या चौकात नको अशी तक्रार केली.
चर्चा. चर्चा. मग लोकांनी पत्रं लिहिली, पेपरात प्रतिक्रिया दिली. काही लोक म्हणाले की पुतळा विद्रूप वगैरे नाहीये, तो आधुनिक शिल्पकलेचा नमुना असल्यानं तसंच आपण समजून घ्यायला हवं. मग पुतळा हटवा, हटवू नका असे दोन गट झाले.
शेवटी परवा म्हणजे २०२४ च्या मार्च महिन्यात केंब्रिज पालिकेनं तो ताबडतोब हटवायचा निर्णय घेतला आणि तो कुठं तरी टाका (डंप करा) असा आदेश पाडकाम करणाऱ्या विभागाला दिला.
झालं. पुन्हा वादावादी. पालिकेत लेबर पक्षाची सत्ता आहे. २०१४ साली पुतळा आला तेव्हांही लेबर पार्टीच सत्तेत होती. लोक म्हणाले की हे लेबरवाले सवंग भूमिका घेतात, त्यांचा राजवाड्याशी खुन्नस आहे म्हणून तो पुतळ्याचे धिंडवडे काढत आहेत. अलीकडं इतिहासात वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तींचे पुतळे पाडण्याची फॅशन आलीय, त्याचा हा भाग आहे असं काही लोक म्हणाले. त्यात कंझर्वेटिव पक्षाचे लोकही होते आणि पक्षाशी संबंध नसणारे लोकंही होते.
जे असेल ते असो आता आदेश निघालाय की एप्रिलच्या शेवटल्या आठवड्यापर्यंत पुतळा काढून टाका, पुतळ्याचा चौथराही मोडून टाका. कोणी कोर्टात गेलं नाही तर पुतळा हलणार असं दिसतंय.
काय लोचा असेल बरं.
पुतळ्याकडं पहा.
चेहरा माणसासारखा दिसत नाही. डोळे दिसत नाहीत, नाक पसरलंय. गालाच्या जागी खोलगट भाग. जपानी नाटकांमधे असतो तसा मुखवटा वाटतो. डोक्यावरची टोपी, कपडे इत्यादी गोष्टीही व्यवहारात जशा असतात तशा नाहीत, शिल्पकारानं कल्पिलेले आकार आहेत.
हाडीमाशी प्रिन्स फिलिप आणि पुतळ्यातले प्रिन्स यात तसं साम्य नाही.थोडक्यात बोलायचं तर हे प्रिन्स फिलिप यांचं हुबेहूब रूप नाही. काही लोकांना ते पसंत नाही, त्यांना कदाचित हुबेहूब फिलिप हवे असावेत.
कलाकार पोर्ट्रेट करतो किंवा शिल्प करतो तेव्हां त्या माणसाचं अंतरंग, त्या माणसाचा ईसेन्स, त्या माणसाचं व्यक्तिमत्वही शिल्पात आणायचा त्याचा प्रयत्न असतो. शिल्पकार कधी कधी त्या व्यक्तीमोर बसून शिल्प तयार करतो, कधी कधी त्या व्यक्तीचा फोटो समोर ठेवून शिल्प करतो. व्यक्ती समोर बसली असताना त्याला जशी समजली किंवा फोटोतून जशी समजली तशी ती नंतर शिल्पकाराच्या प्रतिभेनुसार शिल्पात उतरते. शिल्पकार त्या व्यक्तीचा सखोल अभ्यासही करत असतो, तो अभ्यासही शिल्पकाराच्या डोक्यात असतो.
अशा खटपटीतून होणारं शिल्प आणि ती व्यक्ती यांच्यात कधी कधी पुसटसं कां होईना साम्य असतं आणि ते सामान्य माणसाला समजतं. पण साम्य नसेल तर सामान्य माणूस बाचकतो. सामान्य माणूस त्याच्या परीनं शिल्प समजून घेण्याचा प्रयत्नही करतो. पण सामान्य माणसाची समज आणि शिल्प यात कायच्या काय अंतर असेल तर मात्र सामान्य माणसाला ते शिल्प पसंत पडत नाही.
प्रिन्स फिलिप यांचं प्रस्तुत चित्र आणि फिलिप यात साम्य नाही ही गोष्ट नागरिकांना बुचकळ्यात पाडू शकते. जे नागरीक आधुनिक शिल्पकलेशी परिचित आहेत त्यांना कदाचित वरील पुतळा आवडणार नाही पण म्हणून ते नागरीक पुतळा नाकारणार नाहीत. शिल्पकार कमी पडला, शिल्पकाराची शैली तितकीशी बरी नाही असं म्हणून जाणकार नागरीक शिल्पाचा स्वीकार करतील.
काही वेळा शिल्पकार हुबेहूबपणा इत्यादींचा विचारही न करता शिल्प तयार करतो, पोर्ट्रेट करतो. अशी कलाकृती सामान्य माणसाच्या आणि कधी कधी कलेकडं मोकळेपणानं पहाणाऱ्याच्याही समजुती पलिकडची असते. अशा कलाकृती सार्वजनिक ठिकाणी ठेवणं योग्य ठरत नाही, या कलाकृतींचं स्थान आर्ट गॅलऱ्या, म्युझियम इत्यादी ठिकाणं असतात.
शिल्प असो वा चित्र सार्वजनिक ठिकाणी ते दाखवायचं असेल तर सामान्य माणसाची समजूत लक्षात घेऊनच ते प्रदर्शित करायचं असतं.
अर्थात ज्या समाजात असं प्रदर्शन होतं त्या समाजाची व्यापक कलाविषयक जाणीव हाही भाग लक्षात ठेवावा लागतो. फ्रान्समधे जी शिल्प आणि चित्रं सहज पाहिली जातील ती जगात इतरत्र स्वीकारली जातील याची खात्री नाही.
रामकिंकर हे भारतातले फार मोठे शिल्पकार मानले जातात. त्यांनी गांधीजींचं एक पोर्ट्रेट शिल्प केलं होतं. ते एक ऐतिहासिक सुंदर शिल्प मानलं जातं.
सुरवातीला या शिल्पाला काही गांधी प्रेमी नागरिकांनी विरोध केला. सामान्य माणसाला ते शिल्प काहीसं अपरिचित असलं तरीही त्यातले गांधीजी लोकांना दिसले आणि कालांतरानं त्या शिल्पाचा स्वीकार लोकांनी केला.
रामकिंकर सिमेंटचा वापर करून शिल्पं तयार करत. ती एक नवीच शैली होती. ब्राँझ इत्यादी माध्यमापेक्षा सिमेंट हे माध्यम वेगळं होतं आणि नवं होतं.
हे नाविन्य राजकीय नेत्यांना सहन झालं नाही. त्यांनी गांधीजींच्या पुतळ्याला चांदीरंग दिला. लोकांना रामकिंकर यांच्या शैलीचा परिचय व्हायला आवश्यक काळ आसाममधल्या राज्यकर्त्यांनी दिला नाही आणि पुतळा विद्रूप केला.
रोदाँ या विख्यात शिल्पकारानं एकदा बाल्झॅक या फ्रेंच लेखकाचं एक शिल्प केलं होतं. शिल्पात बाल्झॅक यांचा चेहराच दिसत होता, बाकीचा पूर्ण पुतळा म्हणजे बाल्झॅक यांचं वस्त्रात गुंडाळलेलं शरीर होतं. या शिल्पात खरं म्हणजे बाल्झॅक यांच्या साहित्यातलं चैतन्य पुतळ्यात दिसतं. परंतू फक्त चेहराच दिसतो ही गोष्ट फ्रेंच जनतेला आवडली नव्हती. जनतेनं विरोध केला, तो पुतळा सार्वजनिक ठिकाणावरून उचलावा लागला. खुद्द रोदाँ यांनीच निराश होऊन पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला. परंतू कालांतरानं लोकमत बदललं आणि तो पुतळा सन्मानानं पॅरिसमधे बसवण्यात आला.
अर्थात कधी कधी नेमकं उलटंही होत असतं.
अमेरिकेत न्यू यॉर्कमधे लुसिली बॉल या गाजलेल्या अभिनेत्रीचा डेविड पॉलिन यांनी तयार केलेला पुतळा उभारण्यात आला होता. तो पुतळा लोकांना आवडला नाही.
लोक त्या पुतळ्यातल्या लुसिली बॉलला धडकी भरवणारी लुसिली म्हणत. लोकांनी आंदोलन करून तो पुतळा हटवला. मग कॅरोलिन पाल्मर यांनी दुसरा पुतळा तयार केला, लोकांना तो आवडला, तो पुतळा बसवण्यात आला.
तिथं एक गंमतच झाली. लोकांनी पॉलिन यांना येवढं ट्रोल केलं की त्यांनी शिल्पकारीच सोडून दिली.
तर हे सारं सुरु झालं प्रिन्स फिलिप यांच्या पुतळ्यापासून. त्यात गंमत अशी की ही खळबळ झाल्यानंतर शिल्पकार पाब्लो एच्युगेरी यांनी जाहीर करून टाकलं तो वादग्रस्त पुतळा आपण केलेलाच नाही.
नवीनच भानगड उपटली.
मग केंब्रिजच्या पालिकेनं कंत्राट कोणाला दिलं होतं? केंब्रिजचे लोक कोणाला भेटले? पुतळा कोणी पाठवला? एकादं भूत वगैरे होतं काय? की एच्युगेरी यांचा तोतया पुतळा करत होता? की कोणी तिसऱ्याच माणसानं पुतळा केंब्रिजच्या गळ्यात घालून पैसे मिळवले?
बहुदा आता केंब्रिज आणि युकेच्या सरकारला एकादी समिती नेमून चौकशी करावी लागेल; पुतळ्याचा कलात्मक दर्जा दूर राहील आणि एक नवं स्कँडल बाहेर येईल.