पुस्तकं. मार्खेजची शेवटली, मरणोत्तर, कादंबरी.
Until August
Gabriel Garcia Marquez.
।।
मार्खेजची शेवटली, मरणोत्तर, कादंबरी.
Until August
Gabriel Garcia Marquez.
।।
गॅब्रियल गार्सिया मार्खेज २०१४ साली वारला. त्याची अप्रकाशित कादंबरी ‘अनटिल ऑगस्ट’ प्रसिद्ध झालीय.
१९९९ साली मार्खेजला कॅन्सर झालाय हे कळलं. कॅन्सर झाल्याचं समजलं तोवर मार्खेजचं डोकं नीट काम करत होतं. आठवणी आणि एक कादंबरी त्यानं करायला घेतली. २००२ मधे आठवणी प्रसिद्ध झाल्या आणि २००४ मधे त्याची मेमरीज ऑफ मेलंकली होअर्स ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
कॅन्सरचे उपचार सुरू असतानाच २००३ च्या सुमाराला मार्खेजला डिमेंशियाचा त्रास सुरु झाला. त्याच सुमाराला त्याची अनटिल ऑगस्ट ही कादंबरी आकार घेत होती. सातेक खर्डे तयार झाले होते. पण तोवर डिमेंशिया वाढू लागला होता. पात्रं, कादंबरीची रचना, वाक्यरचना या गोष्टींवरचा मार्खेजचा ताबा सुटू लागला होता. हे त्याच्या लक्षात येऊ लागलं होतं. २००४ च्या मध्यापर्यंत आपण केलेला शेवट ठीक नाहीये असं त्याला वाटलं. आता पुढं जायचं नाही असं त्यानं ठरवलं. कादंबरी गुंडाळली. लिहिणं बंद केलं.
या शेवटल्या खर्ड्यावर त्यानं लिहिलं- माझी ही कादंबरी प्रसिद्ध होऊ नये. ती नष्ट करा. ही त्याची सूचना त्याच्या वारसांसाठी, त्याच्या मुलांसाठी होती.
२०१४ साली मार्खेज वारला. त्याचं अप्रकाशित साहित्य,पत्रव्यवहार इत्यादी गोष्टी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्ससच्या हाती सोपवण्यात आल्या.
२०२१-२२च्या सुमाराला मार्खेजच्या मुलांनी कादंबरी वाचली. त्यांचं मत पडलं की कादंबरी कितीही कच्ची असली तरी मार्खेजच्या चाहत्यांना ती आवडेल, शेवटली कादंबरी हे ऐतिहासिक मोल असलेल्या कादंबरीला साहित्य मुकता कामा नये.
२०२४ साली ‘अनटिल ऑगस्ट’ प्रसिद्द झाली.
मार्खेज स्पॅनिशमधे लिहित असे, भाषांतरं होत असत. ‘अनटिल ऑगस्ट’च्या स्पॅनिश आवृत्तीला छापण्यापूर्वी २५ लाख प्रतींची मागणी होती.
मार्खेजनं १० कादंबऱ्या लिहिल्या, त्याचे ४ कथा संग्रह प्रसिद्ध झाले. त्याच्या ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ला नोबेल पारितोषिक मिळालं. या कादंबरीचे ३६ भाषात अनुवाद झाले आणि ३ कोटी प्रती संपल्या.
मार्खेजची कादंबरी म्हटल्यावर ‘अनटिल ऑगस्ट’वर चर्चा होणं तर अटळ होतं. पात्रांचा विकास, वाक्यरचना, शैली इत्यादी गोष्टीत बरेच दोष आहेत असं टीकाकार म्हणत आहेत. मार्खेजच्या साहित्याच्या हिशोबात कादंबरी सपक आहे, सामान्य आहे असं समीक्षकानी म्हटलंय. टीका करत असतांनाही शेवटी ही एका मास्टरची कादंबरी आहे, ग्रेट लेखकाची कादंबरी कितीही कमी प्रतीची असली तरी तिच्यातला ग्रेटपणा लपत नाही असं समीक्षक म्हणतात. पिकासोची सर्वच चित्रं काही ग्रेट नव्हती किंवा बर्गमनच्या सर्वच फिल्म्स ग्रेट नव्हत्या. पण शेवटी पिकासो,बर्गमन, जे काही पेश करतात ते त्यांचं असतं आणि असामान्य असतं.
प्रस्तुत कादंबरीत मार्खेजनं प्रयोग केला आहे, सिद्ध झालेल्या शैली आणि रचनेपासून दूर जाण्याचा प्रयत्न मार्खेजनं केलाय. मार्खेजच्या सर्व कादंबऱ्यांमधे अनेक स्त्रीपात्रं असतात. ही स्त्री पात्रं खूप वेगवेगळी असतात, जगाला फाट्यावर मारणारी असतात. ख्रिस्ती (इतरही) वाचकांच्या नीतीविषयक कल्पनांना धडका देणारी असतात. त्याच्या कादंबरीतल्या स्त्रिया चाकोरीबाहेर जाऊन लैंगिंक संबंध आणि उद्योग करतात. पण मार्खेज त्यांच्याकडं नीती या कसोटीनं पहात नाही. तटस्थपणे आणि उबदार आपलेपणानं तो त्यांच्याकडं पहातो.
प्रस्तुत कादंबरीतलं केंद्रीय पात्र आहे ॲना मॅग्देलिना. कादंबरीच्या केंद्रात स्त्री असणं हे मार्खेजच्या साहित्यात प्रथमच घडलंय. कादंबरी तिच्या भोवती फिरते. इतर कादंबऱ्यांमधे स्त्रिया पुरुषांच्या संदर्भात असतात, या कादंबरीत स्त्री मुख्य आहे, पुरुष तिच्या संदर्भात पहावे लागतात.
मॅग्देलिनाला एक समाजमान्यछान नवरा असतो. मुलंबाळं असतात. पण तो नवरा बिछान्यात बरा नसतो. मॅग्देलिना बिछान्यात एक पाहुणीमात्र असते.बिछान्याचा आनंद घेण्यासाठी मॅग्देलिना मित्र गोळा करते. पण तिथं तिला कळतं की बिछान्यात येणारे लोक आनंद घेतात आणि पैसे देतात. पहिल्याच अनुभवातला थरार तिनं अनुभवला, तो पुरुष निघून गेला पण जाताना मॅग्देलिना वाचत होती त्या पुस्तकाच्या पानांत २० डॉलर ठेवून गेला. ते पुस्तक होतं ब्रॅम स्टोकरचं ड्राकुल्ला.
नंतरची सर्व सेक्स साहसं म्हणजे रुटीन पैसे मिळवणं अशीच. सेक्स होत असे पण त्यात आनंद नसे.
प्रस्तुत कादंबरी २००० नंतरच्या काळात घडते. मार्खेजच्या कादंबऱ्यांतल्या काळ विसाव्या शतकाच्या सुरवातीचा किंवा त्याही आधीचा असतो. त्यातली पात्रं काल्पनीक असली तरी त्या काळातली असतात. मकोंडो हे स्थळ काल्पनीक असलं तरीही पुरतेपणानं ते एक कोलंबियातलं खेडं किंवा छोटं शहर असतं. प्रस्तुत कादंबरीत मोठं शहर आहे. या शहरात गगनचुंबी इमारती आहेत, इमारती काचांनी मढवलेल्या आहेत, ते ग्लास टॉवर्स आहेत.
मॅग्देलिना वावरते ते तारांकित हॉटेल आहे, तिथं आंतरराष्ट्रीय परिसंवाद, कार्यक्रम घडत असतात आणि अशा जगविहारी लोकांमधे मॅग्देलिना वावरते, खेड्यातल्या रांगड्या माणसांमधे नाही.
कादंबरी चित्रपटाच्या शैलीत लिहिली गेलीय. चित्रपटात गोष्टी पहायच्या असतात. कादंबरीत मॅग्देलिना ‘दिसते’. ती कपडे बदलतेय, ती ड्रिंक घेतेय, ती रस्त्यावर उभी राहून टॅक्सीला हातवारे करून बोलावतेय. मॅग्देलिना अर्नेस्ट हेमिंग्वेची ‘दी ओल्ड मॅन अँड दी सी’ वाचतेय. हे दिसतं. पण ती हेमिंग्वे किंवा काफ्का कां वाचतेय? ‘हे असलं’ साहित्य ती कां वाचते याचा खुलासा होत नाही. चित्रपट आभास निर्माण करतो, खोलात जात नाही.तसंच या कादंबरीत झालंय असं समीक्षकांचं निरीक्षण आहे.
समीक्षकांची निरीक्षणं हा एक भाग झाला. वाचक समीक्षकांच्या दृष्टीनं वाचत नसतात. वाचकांच्या गरजा आणि समजुती वेगळ्या असतात. एकादा खडा दाताखाली आला तरी जेवणारा ते जेवण चविष्ट असेल तर सहन करतो. खाणावळ परिचयाची आणि आवडती असेल तर पदार्थातले दोष खाणारा सहन करतो, थोडी कुरकूर करत पण आनंदानं जेवतो.
शेवटी काही झालं तरी मार्खेजची कादंबरी.
।।
।।