रविवार/ सलमान आणि फतवा, दोघेही जिवंत आहेत.

रविवार/ सलमान आणि फतवा, दोघेही जिवंत आहेत.

सलमान रश्दी 

१३ कादंबऱ्या. २ कथासंग्रह. ३ आठवणी.

सर्वाधिक गाजलेली कादंबरी-सेटॅनिक व्हर्सेस.

२०२४ मधलं ताजं पुस्तक-नाईफ.

सलमान रश्दीच्या शैलीचं वर्णन ‘मॅजिकल रिॲलिझम’ या शब्दांत केलं जातं. 

सेटॅनिक व्हर्सेसमधे दोघे जण मुंबईतून विमानानं लंडनसाठी निघालेले असतात. दोघे मुंबईतले स्ट्रगलिंग नट आहेत. इंग्लंडमधे जाऊन नशीब काढायचं असा त्यांचा विचार आहे.विमानात एक दहशतवादी असतो. त्याच्याकडं एक बाँब असतो. तो बाँब  चुकून फुटतो. विमान खलास होतं.  ते दोघे पॅराश्यूटनं खाली उतरतात. नंतर इंग्लंडमधे स्थिरावायच्या त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं चित्रपण कादंबरीत आहे. दोघांना पडलेली स्वप्नं हा कादंबरीचा फॉरमॅट आहे.  एक देवदूत होतो. दुसरा सैतान होतो. इस्लामची निर्मिती या एका सूत्राभोवती स्वप्नं आहेत. 

व्हर्सेसमधलं एकादं पात्र अमिताभ बच्चनसारखं वाटतं, एकादं खोमेनीसारखं वाटतं.अनेक पात्रांची नाव इस्लामी धर्माच्या इतिहासातल्या व्यक्तींची असतात.

पात्रांची नावं नॉर्मल नसतात. एका पात्राचं नाव ‘चमचा’ असतं.

पात्रं ‘मेरा जूता है जपानी, पतलून हिंदुस्थानी, सरपर लाल टोपी रुसी’ हे गाणं म्हणतात (अर्थात इंग्रजीत).

पात्रांचं इंग्रजी इंग्लंडमधलं नाही, मुंबईतलं नाही, कुठलंच नाही. ते इंग्रजी सलमान रश्दीचं आहे.

 वास्तव, कल्पनेतलं जग, वास्तव आणि फँटसी याचं मिश्रण रश्दी आपल्या कादंबऱ्यांत करतात. कथानकातून वाचकानं त्याच्या पद्धतीनं अर्थ काढावे. समजा त्याला कथानकात मर्गारेट थॅचर दिसली किंवा खोमेनी दिसले तर तो त्याचा प्रश्न आहे. रश्दींची कादंबरी अनेक पातळ्यांवर वावरते, वाचकाला त्याची भरपूर स्पेस देते.

कल्पित अकल्पिताचं अजब मिश्रण.

 रश्दींच्या पहिल्याच ‘मिडनाईट्स चिल्ड्रनमधे’ कुराणाच्या निर्मितीबद्दल मजकूर आहे. देवदूतानं प्रेषितांना दिलेला संदेश कोणी तरी भूर्जापत्रावर लिहिला, नंतर अबू बकर यांनी तो संपादित केला, पण अबू बकर यांची स्मृती डळमळीत असल्यानं जे लिहिलं गेलंय, म्हणजे कुराण,  त्याचा खरेपणा वांध्यात येतो असं कादंबरीत वाचायला मिळतं.

कादंबरी असल्यानं रश्दी लिहितात ते तसंच घ्यायचं असतं, ते काही इतिहासाचं तार्किक विश्लेषण नाही, त्यात खरेखोटेपणा शोधण्यात अर्थ नाही.

जे असेल ते असो पण कुराणाच्या सच्चेपणाबद्दल १९८१ सालच्या मिडनाईट्समधे आलेल्या मजकुराकडं लोकांचं लक्ष गेलं नाही. 

१९८९ मधे कल्पनाही करता येणार नाही असं वास्तव घडलं. फतवा.

१९८८ मधे सेटॅनिक व्हर्सेस प्रसिद्ध झालं. १९८८ च्या नव्हेंबरमधे मुस्लीम बहुसंख्य ब्रिटीश शहरात निदर्शनं झाली, धर्मनिंदेचा आरोप रश्दींवर झाला. पाठोपाठ इस्लामाबादमधे हिंसक निदर्शनं झाली, एका निदर्शनांत दहा पाकिस्तानी नागरीक ठार झाले. पाकिस्ताननं पुस्तकावर बंदी घातली. पाठोपाठ भारत सरकारनं भारतातले मुस्लीम डोळ्यासमोर ठेवून व्हर्सेसवर बंदी घातली.

हे सर्व चालू असताना इराणात या पुस्तकाकडं लोकांचं लक्ष नव्हतं. रश्दी हा इराणला मान्य असलेला लेखक होता. १९८५ साली ‘मिडनाईट्स चिल्ड्रन’ च्या पर्शियन भाषांतराला सरकारी पुरस्कार मिळाला होता. इराणच्या सरकारनं, इराणी पेपरांनी व्हर्सेसला दुर्लक्षिलं होतं. एका कंझर्वेटिव इराणी मासिकात पुस्तकाचं परीक्षण छापून आलं. त्यात ‘रश्दीची अवनती झाली असून ….इस्लामचा  चुकीचा अर्थ लावला गेलाय,…सेक्युलर दृष्टीकोनातून धर्माच्या निर्मितीचा विचार केला गेलाय..त्याकडं दुर्लक्ष करावं..’ असं म्हटलं होतं.

१९८८ मधे जगभर व्हर्सेसच्या प्रती जाळल्या जात होत्या, बंदी घातली जात होती, निदर्शनं होत होती त्यावेळी  खोमेनी इराणचे सर्वेसर्वा होते; त्यांची प्रकृती खूप खालावलेली होती, जवळपास मरणासन्न होते. ८० ते ८८ अशी ८ वर्षं इराकबरोबरच्या युद्धात लाखो इराणी मारले गेले होते, इराणची अर्थव्यवस्था धुळीला मिळालेली होती. लोक खोमेनींवर नाराज होते. आपलं स्थान कसं सावरावं या चिंतेत खोमेनी होते.

१२ फेब्रुवारी १९८९ रोजी पाकिस्तानात हिंसक निदर्शनं झाली. जगभर पुस्तकाची चर्चा उसळली. दोन ब्रिटीश इस्लामी कार्यकर्ते तेहरानला पोचले आणि त्यानी हा मामला सांस्कृतीक मंत्री खतामी यांच्या कानावर घातला. खतामी १३ तारखेच्या संध्याकाळी खोमेनींना भेटले. १३ तारखेच्या संध्याकाळपर्यंत खोमेनीना रश्दीचं असं असं पुस्तक आहे आणि त्यात अशी अशी धर्मनिंदा आहे असं काहीही माहित नव्हतं. खोमेनी स्वतःच्या डळमळीत स्थानाच्या चिंतेत होते.

१४ फेब्रुवारीला सकाळी फतवा निघाला. सलमान रश्दीला मारून टाका.

जाणकार सांगतात की खोमेनींना स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे असं वाटलं. खोमेनींच्या जवळचे लोक सांगतात की प्रसिद्धीचा कसा उपयोग करून घ्यावा याची चांगली जाण खोमेनीना होती. 

सलमान रश्दींचं पुस्तक हा पश्चिमी पाखंडी इस्लामविरोधी लोकांचा कट आहे असं खोमेनीनी जाहीर केलं. 

बस. 

मॅजिकल रियालिझमवाल्या रश्दींची कल्पना शक्ती तोकडी ठरेल असं वास्तव घडलं. 

रश्दींना ठार मारेल त्याला २८ लाख डॉलरचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.

लोकशाही आणि स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्यानं ब्रीटननं रश्दीना  संरक्षण दिलं. बाय द वे रश्दी १२ व्या वर्षी लंडनमधे पोचले होते आणि त्यांचं सगळं शिक्षण ब्रीटनमधे झालं होतं, ते ब्रिटीशच होते.

१४ फेब्रुवारीला फतवा निघाला आणि ३ जूनला खोमेनींचा मृत्यू झाला.

फतवा रद्द व्हावा असा दबाव जगभरच्या देशांनी इराणवर आणला. इराणचे धर्मगुरु म्हणाले की जो माणूस फतवा काढतो तोच तो रद्द करू शकतो. खोमेनी आता जिवंत नसल्यानं फतवा रद्द होऊ शकत नाही. इराणनं मारणाऱ्याच्या बक्षिसात आणखी ६ लाख डॉलरची भर घातली.

रश्दी लंडनमधे गुप्त झाले. चोविस तास पहाऱ्यात असत. सार्वजनिक कार्यक्रम रद्द. घरी बसून बसून त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. या त्रासात त्यांची पत्नी वैतागली, त्यांचा घटस्फोट झाला. त्याना मारण्याचे ८ प्रयत्न झाले. पोलिसांनी ते हाणून पाडले.

अमेरिकेत अधिक मोकळेपणा असतो, अमेरिकेतली सुरक्षा व्यवस्था अधिक चांगली असते असा विचार करून रश्दी २००० साली अमेरिकेत स्थलांतरीत झाले. हळूहळू सार्वजनिक ठिकाणी वावरू लागले. एकदा भारतात साहित्यिक उरुसात जायचंही ठरलं होतं, पण भारतीय पोलिसांनी त्यांना धोका आहे असं सांगून प्रवेश नाकारला.

१९८९ ते २००० या काळात रश्दीनं ३ कादंबऱ्या लिहिल्या.

कोणाही लेखकाला पार नामोहरम करून टाकणारं वातावरण होतं.

 अमेरिकेत रश्दी स्थिरावले. निवांत झाले. २०१७ साली एलिझा या कवि-कादंबरीकार स्त्रीशी त्यांची ओळख झाली आणि २०२१ साली त्यांचं लग्नही झालं. हे त्यांचं पाचवं लग्न होतं. रश्दी जाम खुषीत होते. २०२२ मधे रश्दींची व्हिक्टर सिटी ही कादंबरी प्रसिद्ध झाली.

२०२२ च्या ऑगस्टमधे मधे एका लेबॅनीज माणसानं एका जाहीर समारंभात रश्दीवर सुराहल्ला केला. मारेकऱ्यानं २७ सेकंदात १५ वार केले. दीड महिने उपचार करून डॉक्टरांनी रश्दीना वाचवलं, एक डोळा मात्र गेला.

हल्ला, उपचार या घटनांच्या दरम्यान रश्दीला ज्या मानसिक ताणातून जावं लागलं त्यावर २०२४ मधे रश्दीनं नाईफ हे पुस्तक प्रसिद्ध केलं.

या पुस्तकाच्या निमित्तानं रश्दीनी आपलं सारं आयुष्य पुन्हा न्याहाळलं. रश्दीना भयस्वप्नं पडत असत. कोणी तरी आपल्यावर हल्ला केलाय असं स्वप्न त्यांना पडे आणि ते घाबरून जागे होत. कोणी तरी आपल्याला मारायला टपलाय असं त्यांना वाटत असे. मृत्यू आपला पत्ता शोधत निघालाय पण  पत्ता चुकल्यानं आपण वाचलोय आणि भलताच कोणी तरी मरतोय असं रश्दीना वाटत असे. 

मारेकरी प्रेक्षकातून अवचित रश्दींसमोर झेपावला आणि काय होतंय ते कळायच्या आत वार झाले. रश्दी म्हणतात की तो समोर आल्यावर मी म्हणालो ‘अरेच्या म्हणजे तूच तो होतास, मला मारण्यासाठी तयार असलेला.’

मार्खेजच्या कादंबरीत पूर्वसंकेताचं तंत्र वापरलं गेलंय. तेच तंत्र वापरून रश्दींसमोर अगदी पहिल्यांदाच आलेला मारेकरी रश्दींच्या मनात असलेला परिचित मारेकरी होतो. नाईफमधे कधी कधी रश्दी बोलतात तर कधी कधी तिऱ्हाईत रश्दींचं वर्णन करतो. रश्दी बाथरूमच्या आरशासमोर उभे रहातात, आरशातला माणूस एक वेगळी व्यक्ती होतो. आरशातले रश्दी आणि आरशाबाहेरचे रश्दी अशा दोन माणसांत नाइफ या पुस्तकात संवाद होतो. 

 मारेकरी झेपावला तेव्हां विचार करायला वेळ नव्हता. पण आता मुलाखती देत असताना रश्दी म्हणतात  की मी त्याला म्हणालो की अरेच्चा तूच तो आहेस.

वास्तव आणि कल्पिताची सरमिसळ करण्याला मॅजिकल रिॲलिझम म्हणतात. रश्दीच्या साहित्यिक मेंदूत ती शैली गुंफलेली आहे, तीच नाईफमधे बाहेर पडते. त्या पुस्तकात रश्दी मारेकऱ्याला कल्पनेत भेटतात, त्याची मुलाखत कल्पनेत घेतात.

रश्दी ठीक झालेत. त्यांची मुलं, त्यांची भाचरं, त्यांची नातवंडं शरीरानं इंग्लंडमधे असली तरी सतत (अमेरिकेत) त्यांच्या भोवती असल्यासारखी असतात. रश्दीनी पंचाहत्तरी ओलांडलीय. सध्याची त्यांची पत्नी त्यांच्या प्रेमात आहे, तेही तिच्या प्रेमात आहेत.

लेबॅनीज तरूणानं १९८९ सालचा फतवा २०२२ साली अमलात आणायचा प्रयत्न केला. केवळ चमत्कार झाला आणि रश्दी वाचले. रश्दीचा चमत्कारावर विश्वास नाही, ते म्हणतात की काही तरी अघटित घडलं आणि मी वाचलो.

रश्दी चिंतन करतातेत, एक नवा अनुभव त्यांनी घेतलाय.

नव्या कादंबरीची तयारी ते करत असणार.

फतवा अजून शिल्लक आहे.

।।

Comments are closed.