क्रॉसिंग. एका भाचीशोधाची गोष्ट

क्रॉसिंग. एका भाचीशोधाची गोष्ट

क्रॉसिंग

ही लेवन अकिन या स्वीडिश दिक्दर्शकाची फिल्म आहे.

फिल्ममधली पात्रं जॉर्जियन, तुर्की आणि इंग्लीश भाषेत बोलतात.

लिया नावाची एक निवृत्त बाई आहे. जॉर्जियातली. जॉर्जिया हा तुर्कस्तानचा शेजारी देश आहे. तिची बहीण वारलीय. टेकला नावाची बहिणीची मुलगी, लियाची भाची, लहान असतानाच घरून गायब झाली.   ती ट्रान्स होती. तिचं ट्रान्स असणं बाटुनी या छोट्या सनातनी गावाला आवडत नाही, याचा त्रास टेकलाच्या आई वडिलांना आणि लियाला होत असतो. म्हणून तर टेकला गायब असते.

लिया टेकलाला शोधायचं ठरवते. तिच्याबद्दल येवढंच माहित असतं की ती इस्तंबुलमधे आहे. पण नक्की माहीत नाही, तिचा पत्ताही माहित नाही.येव्हाना ती २७-२८ वर्षांची झालीय. लिया इस्तंबुलमधे पोचते. शोध शोधते. टेकला सापडत नाही. लिया परतते. पण परतताना म्हणते ‘बाई गं, तू कशीही अस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुला शोधतच रहाणार’

वरवर गोष्ट साधी वाटते ना? पण गंमत आहे ती या शोधात आपल्याला जे दिसतं त्यात. ही फिल्म मुबी या चित्रपटगोदामात पहायला मिळते.

फिल्ममधे इस्तंबुल दिसतं.इस्तंबूलमधली वेश्या वस्ती दिसते, ट्रान्स लोकांच्या जागा दिसतात. एक ट्रान्स व्यक्तीही भेटते. 

बाहेरच्या लोकांच्या इस्तंबूलबद्दल रोमँटिक कल्पना असतात.हाया सोफिया, निळी मशीद, मार्मरा किनारा, इस्तंबुलमधला कव्हर्ड बाजार इत्यादी गोष्टी पहायला जगभरचे (अलिकडं भारतातलेही) लाखो लोक इस्तंबुलमधे जातात. इस्तंबूल हे एक टुरिस्ट शहर झालंय.

काही उत्सूक लोक अधिक वाचतात तेव्हां केमाल पाशा या इस्लाममधल्या एका प्रसिद्ध व्यक्तीचे संदर्भ इस्तंबूलबाबत येतात. इस्तंबुल ही ऑटोमन साम्राज्याची राजधानी आहे, बरंच प्राचीन शहर आहे येवढं लोकांच्या वाचनात येतं.

  ते असतं टुरिस्टी इस्तंबुल. क्रॉसिंगमधे आपल्याला इस्तंबूलमधलं वास्तव दिसतं. गावातली घरं दिसतात, गावातल्या छोटछोट्या खानावळी दिसतात, चिंचोळे रस्ते दिसतात, तुर्की नाच दिसतात, तुर्की पोलीस दिसतात. कचऱ्याच्या कुंडीत टाकून दिलेल्या खरकट्यातले पदार्थ खाणारी मुलं दिसतात.

दिक्दर्शक दाखवतो लिया नावाच्या एका महिलेची कहाणी, तिची भटंकती, तिला काय काय सोसावं लागतं ते. पण आपल्या नकळत आपण इस्तंबुल पहात जातो.

जसं मुंबईचं. मुंबई म्हणजे नरीमन पॉइंट, मॉल, दुकानं, श्रीमंत लोकांची घरं आणि चित्रपट सृष्टी. हीच कल्पना घेऊन लोकं मुंबईत येतात, प्रत्यक्षातली मुंबई वेगळीच असते. अंबानींच्या लग्नात एक मुंबई दिसते. मंटोच्या गोष्टींत वेगळी मुंबई दिसते.

मंटोच्या गोष्टीतली मुंबई दाखवण्याचा क्रॉसिंगच्या दिक्दर्शकाचा इरादा नाही पण गोष्ट सांगताना ती दिसते हे मात्र खरं.

डिसिका,रोझेलिनी अशांच्या १९४५ नंतरच्या फिल्मा आठवून पहा. फिल्ममधे असायला हवं ते नाट्य, मानवी भावनांचे खेळ, खिळवून टाकणारी पात्रं त्यांच्या सिनेमात असत. दुःखद वास्तव त्या चित्रपटात असे.कलेची गंमत अशी की ती दुःख दाखवत रसीकाला कलात्मक सुख-आनंद देत असते. डिसिकाच्या काही फिल्मा तर रोमँटिक म्हणाव्यात अशाच होत्या. रोमॅंटिक आणि काहीशा फँटसीसारख्या. त्या फिल्ममधे कधी कधी पऱ्या, देवदूतही दिसत.

त्या फिल्मचं वैशिष्ट्यं असं की त्यात वास्तव दिसत असे. स्टार वगैरे मंडळी नसत, काहीही चमकार नसे. रस्त्यावरचं चित्रण असे. क्रॉसिंगमधेही कॅमेरा रस्त्यावर फिरतो. 

एक गंमत. काही दृश्यांत समोर लिया दिसते आणि फ्रेमच्या डाव्या हाताला कोपऱ्यात काही तरी मधेच येतं. एका मुलाचा काही भाग. लिया फोकसमधे असते त्यामुळं हा जवळचा मुलगा कायच्या काय फोकसबाहेर असतो, पुसट पुसट. व्यावसायिक फोटोग्राफर अशी फ्रेम शिल्लक ठेवणार नाही. पण हा दिक्दर्शक ती फ्रेम ठेवतो. एकदा राहिली असती तर नजरचुकीनं राहिली असं म्हणता आलं असतं, दोनदा, तीनदा ही फ्रेम येते. अगदी चिंचोळ्या खोलीत चित्रीकरण करताना येणारी व्यावहारीक अडचण. रियालिझम वास्तव दर्शन?

घटना महत्वाच्या. भटकंती महत्वाची. शोध महत्वाचा. शोध घेताना फक्त पत्ता विचारायचा, मुलीचं वर्णन सांगायचं. एकूणात बोलणं, संवाद ओघानंच यायला हवेत, जवळ जवळ नाईलाज म्हणून. नाटकात संवाद महत्वाचे असतात, चित्रपटात ॲज इट ईज संवाद नसलेलेच बरे. लांबलचक भाषण, स्वगतं, पल्लेदार भाषणं वगैरे गोष्टी नसलेल्याच बऱ्या. चित्रपटाची ही वैशिष्ट्यं क्रॉसिंगमधे आहेत. पात्रं कमीत कमी बोलतात.

पण बोलतात ते भारी असतं.

लियाला एक अतरंग मुलगा भेटतो, तिला मदत करायला म्हणून सोबत करत असतो. टेकला सापडत नाही. पुढं काय असा प्रश्न निर्माण होतो. तो मुलगा लियाला तसं विचारतो. तिचं एका वाक्यात उत्तर असतं ‘भविष्याचा काहीही प्लान नाही. मी इथे नाहीशी होईन तिथपर्यंत मी इथे आहे.’

इस्तंबूल काय, न्यू यॉर्क काय, मुंबई काय. दुनियाभरची असहाय्य माणसं या शहरांत पोचतात. भविष्य दिसत नसतं. कधी कधी एक स्वप्न असतं. सिनेमात काम करणार, उद्योग करणार, भव्य काही तरी करणार, श्रीमंत होणार. काही लोकं अशा रीतीनं शहरात येऊन मोठे झालेले असतातही. भले लाखात एक असेल, कोटीत एक असेल. ती एकटी कहाणीही माणसाला शहराकडं खेचते. 

लिया आपल्या भाचीच्या शोधात दागिने विकून इस्तंबूलमधे पोचलेली असते. तिच्या सारखीच इतर माणसं तिला इस्तंबुलमधे भेटतात. लियाचं एक वाक्य आहे ‘माणसं इथे दिसेनाशी होण्यासाठी येतात. पीपल कम हिअर टू डिसॅपियर.’

लियाचा शब्द आहे डिसॅपियर, दिसेनाशी होणं. दिसेनाशी? दिसेनाशी नाही होत, विरघळून जातात. जॉर्जियन, रशियन, आर्मेनियन, ग्रीक, मॅसेडोनियन इत्यादी माणसं इस्तंबूलमधे येतात तेव्हां ती त्यांच्या मूळ देशातली असतात. इस्तंबूलमधे आल्यावर ती हरवतात, इस्तंबूलमधे विरघळतात.

मुंबई हे तर विरघलेल्या माणसांचंच शहर आहे.

तर अशी ही क्रॉसिंग.

।।

Comments are closed.