पुस्तक भारताचा सुवर्ण काळ

पुस्तक भारताचा सुवर्ण काळ

भारताचा सुर्वण काळ. 

दी गोल्डन रोड या प्रस्तुत पुस्तकात भारताच्या सुवर्ण काळाचं विश्लेषण आहे.

इतिहासात सिल्क रोड ही कल्पना रूढ आहे. चीन (आशिया)  आणि युरोप यामधील दळणवळण प्रामुख्यानं ज्या मध्य आशियाई भागातून होत असे त्याला सिल्क रोड असं म्हणतात. हा मार्ग इसवीपूर्व दुसऱ्या शतकापासून जवळपास १५ व्या शतकापर्यंत वापरला जात होता असं मानलं जातं. अनेक पुस्तकं या कल्पनेबद्दल लिहितात. 

इतिहास संशोधक विल्यम डॅलरिंपल म्हणतात की सिल्क रोड ही एक दंतकथा आहे. सिल्क रोड समजा निर्माण झाला असेल तर १२ व्या शतकानंतर, मंगोल पश्चिमेकडे पसरले त्यानंतर. सिल्क रोडबद्दल कोणतेही पुरावे नाहीत असं डॅलरिंपल म्हणतात.

डॅलरिंपल तिथं थांबत नाहीत. प्रस्तुत ताजा पुस्तकात ते म्हणतात की इसवीपूर्व २५० पासून ते थेट इसवी १३ व्या शतकार्यंत जागतीक व्यापाराचं आणि आर्थिक व्यवहाराचं मुख्य केंद्र भारत होता. भारतातून समुद्राच्या मार्गानं पश्चिमेकडे रोमपर्यंत आणि पूर्वकडे चीनपर्यंत भारताचा व्यापार होता. चीनमधे व्यापाराबरोबरच बौद्ध संस्कृती भारतातून गेली; इंडोनेशिया आणि कंबोडियात संस्कृत भाषा आणि हिंदू संस्कृती भारतातून गेली. 

सिल्क रोडचे पुरावे सापडत नाहीत पण भारतीय व्यापाराचे पुरावे सापडतात. भारतीय मलमल रोममधे फार लोकप्रीय होती. मलमलीचे कपडे घालून फिरणं रोममधे इसवी पूर्व २५० मधे प्रतिष्ठेचं मानलं जात असे. मसाले आणि हिरेही भारतातून जात. जगातली सर्वात जुनी आणि मोठी हिऱ्यांची खाण गोवळकोंड्यात होती.  

इसवीपूर्व पहिल्या शतकात रोमन सैनिक ब्रीटनमधे किल्ले सांभाळत असत. ते सैनिक आपल्या खाण्यात भारतीय काळीमिरीवाले पदार्थ असले पाहिजेत अशी मागणी करत असत.

इसवी पूर्व पहिल्या शतकात प्लिनी हा रोमन सेनापती रोमचा कारभार पहात असे. तो दुःखी होता कारण  त्या काळात रोम ५.५ कोटी सेस्टेर्स (रोमन चलन) किमतीचं सोनं देशाबाहेर जात होतं, भारतात जात होतं. भारतीय व्यापारी रोममधे आपला माल विकत आणि त्याची किमत सोन्यामधे घेऊन जात. सेस्टेर्सची किमत साधारणपणे अर्धा डॉलर होते. म्हणजे त्या काळात सुमारे तीन कोटी डॉलरच्या वस्तू भारत विकत होता.

रोमन राणी ४ कोटी सेस्टेर्स किमतीचे हिऱ्याचे दागिने घालून मिरवत असे. हे दागिने भारतातून आयात केलेले असत. 

भारतीय माल जहाजातून अरबी समुद्रातून पर्शियन आखाताच्या वाटेनं इजिप्तला आणि तिथून भूमध्य सागरातून रोमपर्यंत जात असे.इजिप्त ही मोठी बाजारपेठ होती, भारतातून इजिप्तमधे १ अब्ज सेस्टेर्सचा माल जात असे.

भारतात जगामधला सर्वात मोठा सोन्याचा साठा त्या काळात होता.

भारताजवळ गोळा झालेली संपत्ती व्यापाराच्या वाटेनं गोळा झाली होती, लढाया करून नव्हे. इंडोनेशिया, इंडोचीन, चीन या बाजूला भारतीय व्यापारी माल घेऊन जात, संस्कृत भाषा आणि हिंदू देवळंही घेऊन जात. भारतातल्या देवळांच्या दुप्पट तिप्पट आकाराची देवळ कंबोडियातल्या राजांनी बांधली, हिंदूंची नावं त्यांनी घेतली. हिंदू आणि त्या आधी बौद्ध धर्म पूर्वेकडं पसरला. अहिंसा हे तत्वज्ञान बौद्धांनी पूर्वकडं रुजवलं. 

बौद्ध भिख्खू आणि व्यापारी दोघंही एकत्रच प्रवास करत असत.

भारत ते रोम या व्यापारी मार्गाला डॅलिरिंपल गोल्डन रोड, सुवर्ण मार्ग असं म्हणतात.

हा झाला व्यापाराचा भाग. भारतातून अंकगणित आणि भूमिती या ज्ञानशाखाही अरबी समुद्रातून बगदादला गेल्या. अरब विचारवंतांनी संस्कृत ग्रंथांचं भाषांतर करून गणित आणि भूमिती अरबी भाषेत रुपांतरीत केली. तिथून नंतर गणित,भूमिती लॅटिनमधे व नंतर इंग्रजीत गेलं.

डॅलरिंपल पुस्तकात दाखवतात की इसवी पूर्व चौथ्या शतकात रोमचा भारताशीच मोठ्ठा व्यापारी संबंध होता, चीनबरोबरचा रोम व्यापार करत असल्याचे पुरावे सापडत नाहीत. त्या काळात खुष्कीच्या मार्गानं होणाऱ्या वाहतुकीच्या तुलनेत समुद्रातून होणारी वाहतूक किती तरी पट जास्त होती कारण समुद्रातून होणारी वाहतूक अधिक सुरक्षित होती, वेगवान होती.घोडे,उंट आणि गाढवांवरून जाणाऱ्या मालाच्या किती तरी पट जास्त माल एकेका जहाजातून जात असे, नव्वद फूट लांबीची जहाजं तेव्हां भारतीय सामान बोटीनं इजिप्तकड नेत असत.

 तसं थेट म्हटलं नसलं तरी सिल्क रोड ही कल्पना लेखक खोडून काढतो, सुवर्ण मार्गाचं महत्व सांगतो.

पुस्तकाच्या अगदी टोकाला दोन पॅऱ्यात लेखक भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळाचे उल्लेख करतो. इसवीपूर्व चारशे ते इसवी पूर्व बाराशे या काळात भारतात सोन्याचा धूर निघत होता आणि ज्ञान-विज्ञानानं शिखरं गाठली होती; त्या भारताची आज स्थिती कशी आहे असा प्रश्न लेखक विचारतो आणि तिथंच पुस्तक संपवतो.

भारताचा इतिहास अनेक इतिहासकार आणि संशोधकानी मांडला आहे. भारतात एकेकाळी वैभव होते हे बहुतेक सर्वानी मान्य केलं आहे. विल्यम डॅलरिंपल तेच या पुस्तकात मांडतात, पण आजवर ठळकपणे न मांडले गेलेले काही पुरावे ते या पुस्तकात वाचकांसमोर ठेवतात.उदा. रोममधे सापडलेले लेखी पुरावे. डॅलरिंपल यांची शैली रंजक आहे हे, नाट्यमय आहे. पण नाट्यमयतेच्या नादी लागून पुराव्यांपासून ते दूर जात नाहीत. थोडक्यात म्हणजे ते कादंबरी किवा नाटक लिहीत नाहीत, इतिहासच लिहितात.

The Anarchy: The Relentless Rise of the East India Company; Koh-i-Noor: The History of the World’s Most Infamous Diamond  ही डॅलरिंपल यांची या आधीची दोन पुस्तकं. भारताचा इतिहास हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय आहे. डॅलरिंपल ब्रिटीश आहेत,  दिल्लीपासून बऱ्याच अंतरावरच्या एका कसब्यात रहातात.

#

पुस्तक The Golden Road: How Ancient India Transformed the World 

लेखक William Dalrymple 

प्रकाशक Bloomsbury 

।।

Comments are closed.