अरबी शैली पुढं नेणारा कादंबरीकार

अरबी शैली पुढं नेणारा कादंबरीकार

लेबनीज कादंबरीकाराचं निधन 

२०२४ च्या सप्टेंबरात इलियास खूरी यांचं निधन झालं. ते लेबॅनीज होते, लेबनॉनमधे त्यांचं वास्तव्य होतं. त्यांचे आईवडील ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन होते. त्यांचं सुरवातीचं शिक्षण जॉर्डनमधे झालं आणि नंतरचं शिक्षण पॅरिसमधे झालं. खूरी अरेबिक आणि हिब्रू या दोन्ही भाषांचे उत्तम जाणकार होते.

आधुनिक अरेबिक साहित्यामधे इलियास खूरी यांचं नाव कदाचित नगीब महफूझ यांच्या नंतरचं असेल. महफूझ (नोबेल विजेते) प्रामुख्यानं ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखले जात. खूरी स्वतःच म्हणत की मी इतिहास लिहित नाही, मी माणसांचं जगणं लिहितो. 

 My Name is Adam (2016), Gate of the Sun (1998) या खूरीच्या दोन गाजलेल्या कादंबऱ्या.  

लेबनॉन इसरायलच्या उत्तरेला आहे. लेबनॉन आणि इसरायल एकमेकांचे शत्रू आहेत. दोघं एकमेकावर हल्ले करत असतात. पॅलेस्टाईन ही भूमी इसरायली लोकांनी लाटली, लुटली, हे लेबनॉन-इसरायल शत्रुत्वाचं मुख्य कारण आहे. हे दोन विषय खूरी आयुष्यभर त्यांच्या कादंबऱ्या, कविता, नाटकं, पत्रकारी लेखन यातून मांडत आले. खूरी हे एक पब्लिक इंटलेक्चुअल आहेत. ते  पुस्तकी आणि सैद्धांतिक नाहीत. ते त्यांच्या राजकीय भूमिका जाहीरपणे मांडत असतात.

खूरी पॅलेस्टाईनबद्दलच्या राजकीय भूमिका मांडतात हे खरं आहे पण त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे राजकीय कादंबऱ्या नाहीत. अनेक लेखक पात्रांची नावं बदलतात, गावांची नावं बदलतात, घटनांचे तपशील बदलतात आणि आपली मतं मांडतात. खूरी तसं करत नाहीत. पॅलेस्टाईन खूरींच्या डोक्यात जरूर असतं पण त्यांची पात्रं ऐतिहासिक नसतात. ते कादंबरीतून इतिहास मांडत नाहीत. ते पॅलेस्टिनी माणसं आपल्या साहित्यात मांडतात, ती  पूर्णतया काल्पनीक असतात.

गोष्टीत गोष्ट, त्या गोष्टीत आणखी एक गोष्ट, त्या गोष्टीत आणखी एक गोष्ट असा गोष्टींचा गुंतावळा खूरी यांच्या कादंबरीत असतो. कथानक   काळात आणि अवकाशात ऐसपैस मोकळं फिरतं. अरेबियन नाईट्स किंवा सिंदबादच्या सफरी ही शैली अरबी साहित्यानं जगाला दिली, त्या शैलीचा प्रभाव आपल्यावर आहे असं खूरी कबूल करतात.

खूरींना पात्र दिसतात. खूरी त्या पात्रांसमोर आरसा धरतात. नंतर ते पात्र आणि आरसा यांच्यामागं आणखी एक आरसा धरतात. निव्वळ भासांचा खेळ. काय खरं आणि काय खोटं त्याचा मेळ लागत नाही. तसा मेळ घालायचा प्रयत्नही वाचकानं करायचा नसतो. खूरी जे जे दाखवतात ते ते पहात जायचं असतं.

गेट ऑफ द सन मधे यून्स बेशुद्धावस्थेत आहे. खलील हा डॉक्टर त्याच्या उशाशी बसून त्याला गोष्टी सांगतोय. खलील आणि युन्स मित्र आहेत. त्यांनी अख्खं आयुष्य एकमेकांसह जगलंय, मजा एकत्र केलीय, लफडी एकत्र केलीयत. खलील ते सारं सांगतो, त्यात गावातली सारी खानदानं येतात.  ही खानदानं, माणसं, पॅलेस्टाईनमधली आहेत. १९४८ साली इसरायलनं पॅलेस्टाईन बळकावलं, माणसं बेघर झाली, लेबनॉनमधल्या छावणीत दाखल झाली. त्यांचं जगणं खलील-युन्सच्या गप्पांमधून येतं.

यून्स जगणारे? माहीत नाही. तो मरणारे? माहित नाही. पण तो जिवंत आहे असं समजून त्याच्याशी गप्पा चालतात. या गप्पा सुरु होतात ते हस्सनची आई वारलेली असतं या निमित्तानं. आता ही हसनची आई (उम हसन) कोण? गोष्टीची एक लड तिच्यापासूनही सुरु होते.

  किती तरी माणसं, त्यांच्या प्रेमकहाण्यात, त्यांच्या हताशा, त्यांचे त्रास खूरी या कादंबरीत मांडतो. इसरायलनं केलेल्या अन्यायाचा ती बळी आहेत हे आपल्याला कळत असतं.  खूरी त्या अन्यायावर राजकीय भाषणं झोडत नाही, तो माणसांबद्दल बोलतो.

माय नेम ईज आदममधे खूरी पॅलेस्टाईनला घेट्टोची उपमा देतात. लिड्डा हे पॅलेस्टाईनमधलं गाव इसरायली लोकांनी व्यापलं. पॅलेस्टिनी लोकं मारली, घालवून दिली. जी उरली ती  अस्तित्वच गमावून बसली. अस्तित्व दाखवलं तर मारून टाकणार या भीतीनं. त्या लोकांचं मूकपण या कादंबरीत बोलतं.

या कादंबरीचीही गंमत आहे.

इलियास खूरी हा एक न्यू यॉर्कमधे शिकवणारा लेबॅनीज माणूस आहे. (खूरी खरोखरच न्यू यॉर्कमधे शिकवत होते.) त्यांना एक ॲडम डेनॉन नावाचा फलाफल विकणारा माणूस भेटतो. त्यानं खूरी यांची गेट ऑफ द सन ही कादंबरी वाचलेली असते. कादंबरी खरी, वाचणारा काल्पनिक. कादंबरी त्याला आवडलेली नसते. खूरी यांची सेनान नावाची एक विद्यार्थिनी असते. सेनान, खूरी आणि डेनॉन यांचा त्रिकोण होतो, गैरसमज होतात. सेनान ही सुद्धा एक खरीखुरी बाई होती. फक्त डेनॉन हा कल्पित होता. 

  डेनॉन मरतो. मरतो किवा आत्महत्या करतो. त्याचं घर जळतं. त्याची एक टिपणवही उरते. डेनॉनला एक कादंबरी लिहायची असते. त्या कादंबरीची टिपणं या टिपणवहीत असतात. खूरी त्या टिपणवहीतल्या मजकुरावरून एक कादंबरी तयार करतो आणि प्रसिद्ध करतो.

खूरी खराखुरा माणूस आहे आणि कादंबरीत तो एक कल्पित पात्र होतो. तो कल्पित खुरी डेनॉन या कल्पित लेखकाची कादंबरी प्रसिद्ध करतो. डेनॉनची कादंबरी कल्पितही आहे आणि दुसरीकडं ती खरोखर छापलेली कादंबरी आपण वाचतो.

कथानक गोल गोल फिरतं. पण अर्थातच त्यात लिड्डा या गावाचं वर्णन आहे, हरवलेल्या लिड्डा या गावाचं, हरवलेल्या पॅलेस्टाईनचं वर्णन आहे.

अरबी साहित्य पश्चिमेत फारसं वाचलं जात नाही. खूरी स्वतः दीर्घ काळ फ्रान्समधे आणि अमेरिकेत अरेबिक साहित्य शिकवत असल्यानं त्यांची ओळख पश्चिमी जगाला झाली.

पण एक झालं. त्यामुळं इंग्रजीच्या पलिकडंही सकस साहित्य आहे हे तरी जगाला कळलं.

।❖।

इलियास खूरी.

१९४८-२०२४

१४ कादंबऱ्या. २ कथा संग्रह. ५ समीक्षा ग्रंथ. ३ नाटकं. २ पटकथा.

सर्व साहित्य अरेबिक. १० कादंबऱ्यांचे इंग्रजीत अनुवाद.

Comments are closed.