स्कॅाच ते वाईन. ब्रीटन.

स्कॅाच ते वाईन. ब्रीटन.

जगभरात वाईन पिण्यात फ्रान्स आघाडीवर असतो आणि इटाली वाईन निर्मितीत आघाडीवर असतो. दोन्ही बाबतीत ब्रीटन खूपच मागं आहे. पण आता ब्रीटन वाईन निर्मितीत उतरला आहे. हवामान बदलाचा ‘दुष्परिणाम’ ब्रीटनच्या पथ्थ्यावर पडला आहे. स्कॉच निर्माण करणारा देश वाईन निर्माता होऊ पहातोय.

।।

अगदी काल परवापर्यंत तुम्ही पॅरिसच्या बारमधे वेटरला ब्रिटीश वाईन आण असं सांगितलं असतंत तर त्यानं तुम्हाला हाकलून दिलं असतं. शेजारी बसलेल्या फ्रेंच माणसाला विचारलं असतंत ‘काय भाऊ, ब्रिटीश वाईन घेऊया काय?’ तर तो हसला असता.

ब्रिटीश आणि वाईन? काय संबंध?

ब्रिटीश म्हटलं तर एल, घट्टशी बियर; किंवा स्कॉच. वाईनशी ब्रीटनचा संबंध काय?

गेल्या वर्षीची गोष्ट. एका फ्रेंच शहरात, बारच्या अंगणात टेबलं लावली होती. तिथं फ्रेंच वाईन होत्या आणि फ्रेंच वाटावीत अशी नावं असलेल्या ब्रिटीश वाईन ठेवल्या होत्या. जमलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोकांना ब्रिटीश वाईन आवडली.

त्यांना आधीच सांगितलं असतं की ती वाईन ब्रिटीश आहे, फ्रेंच नाहीये, तर कदाचित त्यांनी ती वाईन घेतलीही नसती.

फ्रेंच वाईन; त्यातल्या त्यात शँपेन; म्हणजे वाईनमधला पहिला आणि अंतिम चॉईस. असं अगदी कालपरवापर्यंत होतं. आता चित्र बदललंय. ब्रिटिश मंडळी वाईन करू लागलीयत. आता ब्रिटीश राजघराण्याच्या पार्ट्यांमधे ब्रिटीश वाईन टेबलावर ठेवली जाते.

आता ब्रीटनमधे १ हजार द्राक्ष बागा झाल्या असून ४०० उत्पादक वाईन तयार करू लागले आहेत.गेल्या वर्षी ब्रिटीश वाईन उत्पादकांनी ८३ लाख बाटल्या वाईन तयार केली आणि बाजारात विकली. अर्थात फ्रान्सच्या तुलनेत आज ही संख्या खूपच लहान आहे. फ्रान्स ३० कोटी बाटल्या वाईन तयार करतं.

जगभर फसफसणाऱ्या वाईनमधे शँपेनची कीर्ती सर्वात जास्त असली तर जगात सर्वात जास्त वाईन इटालीत तयार होते. तिथं गेल्या वर्षी ४.७९ लाख टन वाईनची निर्मिती झाली. फ्रान्सनं तिसऱ्या नंबरावर ४.२९ लाख टन वाईन तयार केली. पण फ्रेंच वाईनला कीर्ती असल्यानं जगाच्या बाजारात फ्रेंच वाईनचा वाटा ३० टक्के आहे. ब्रीटन वाईन निर्मितीत पहिल्या दहामधेही नाही.

वाईन पिण्यात फ्रान्स पहिल्या नंबरवर आहे. फ्रेंच माणूस २०२१ साली ४७.३ लीटर वाईन प्याला; ब्रिटीश माणूस त्या वर्षी १९.३ लीटर वाईन प्याला.

ब्रिटीश एकाएकी वाईन कां करू लागले?

हा निसर्गानं केलेला लोचा आहे. गेल्या १० वर्षात साऱ्या जगात वातावरण बदल झालाय, तपमान वाढलंय. ब्रीटनमधे गेल्या दहा वर्षात तपमान १ अंश सेल्सियसनं वाढलंय. द्राक्ष तयार होण्यात तपमानाचा वाटा निर्णायक असतो.

तपमान जास्त म्हणजे साधारणपणे सूर्यप्रकाशाचे तास जास्त. जेवढी तपमान आणि सूर्यप्रकाश यात वाढ होते तितकं द्राक्षातली साखर आणि ॲसिडचं प्रमाण वाढतं. वनस्पतीतली साखर उत्पादन करण्याची यंत्रणा तपमानाशी आणि सूर्यप्रकाशाशी थेट निगडीत आहे. द.इंग्लंडमधे सरासरी तपमान १८ ते २५ अंश सेल्सियस असतं. द्राक्षाच्या दर्जेदार उत्पादनासाठी २५ ते ३२ अंश तपमानाची गरज असते.

असं म्हणायला हरकत नाही की इंग्लंडमधलं तपमान द्राक्षाच्या हिशोबात एक अंशानं कमी असे. ते वाढून २६/२७ अंशाच्या घरात जाऊ लागल्यावर द्राक्षांचं उत्पादन शक्य झालं.

द्राक्ष चांगला निचरा असलेल्या जमिनीत चांगली वाढतात. इंग्लंडच्या दक्षिणेला डोंगराच्या उतारावरची जमीन बरीच आहे. तिथं पाण्याचा निचरा होतो. जमीन आणि तपमान हे दोन घटक पोषक असल्यानं ब्रिटीश शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बागा लावायला सुरवात केली.

शेकडो वर्षांपूर्वी कदाचित वाईन उत्पादनाची प्रक्रिया गुप्त ठेवणं शक्य असेल. आता विज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं साखर आणि ॲसिड निर्मिती, अल्कोहोल निर्मिती, या बाबतचं तंत्रज्ञान कुठंही उपलब्ध असतं. ब्रिटीशांनी ते त्यांच्या पद्धतीनं वापरलं.

ब्रिटीश शेतकरी गडद जांभळ्या द्राक्षाची लागवड करतात. द्राक्ष चेचून लगदा केल्यानंतरची प्रक्रिया स्टीलच्या टाक्यांत होते. फर्मेंटेशनसाठी लागणारं यीस्ट मात्र ब्रिटीश स्थानिक पातळीवरच तयार करतात. त्यामुळं ब्रीटीश वाईनची खुमारी बदलते. ती खुमारी फ्रेंच वाईनपेक्षा, शँपेनपेक्षा वेगळी असते.

वाईनच्या बाटल्या तयार करणं अजून ब्रिटीशाना जमलेलं दिसत नाही. फ्रान्समधून बाटल्या आयात करतात. वाईनच्या बाटलीला मशरूमच्या आकाराचं बूच असतं. तो जोर लावून उचकलं की छान आवाज येतो. पिणाऱ्यांचं त्या आवाजावर प्रेम असतं. ती बुचं सध्या ब्रिटीश लोक फ्रान्समधून आयात करतात. होता होईतो वरकरणी बाटली फ्रेंच वाईनसारखी दिसावी अशी आयडिया असणार. पण अलीकडं ब्रिटीशांना स्वतःची स्वतंत्र ओळख करायची इच्छा झालीय. मशरूम बूच आणि बाटलीच्या गळ्याभोवती असणारा चकचकीत कागद ब्रिटीश वापरत नाहीत.

हवामान बदल उत्तरेत स्कॉटलंडमधेही झालाय. स्थानिक झऱ्याच्या पाण्याची खुमारी वापरून स्कॉच तयार करणारे स्कॉट्सही आता वाईन करायच्या विचारात आहेत, प्रयोगादाखल तिथं काही शेतांवर द्राक्षाच्या बागा उभ्या रहातायत.

हवामान बदल उपकारक ठरलाय हे खरं. पण या उपकारात सातत्य नाही. कारण हवामान बदल लहरी आहेत. तपमान वाढलं हे खरं आणि सूर्यही जास्त काळ तळपला हेही खरं. पण त्यात नियमिततता नाही.

काही दिवस चकचकीत सूर्यप्रकाश असतो आणि नंतर काही दिवस पाऊस पडतो. पाऊस खूप पडतो. द्राक्षातली साखर निर्मिती प्रक्रिया थबकते. अनेक दिवस सूर्य सापडल्याचा परिणाम पाऊस पुसून काढतो. पाऊस पडला की सर्द हवामानात पानांवर बुरशी पडते. बुरशी नाहिशी करण्यासाठी रसायन फवारावं लागतं. रसायन फवारलं की ऑरगॅनिकवाले रुसतात. द्राक्षाची आणि वाईनची किंमत घसरते.

डोंगराळ प्रदेशातला वारा हे आणखी एक लहरी प्रकरण. मंद वारा असला की परागीभवन होतं, हवेतला कार्बन डॉय ऑक्साईड पानं नीटपणे शोषून घेतात.जोराचा वारा आला की पानं गुदमरतात, त्यांना पुरेसा कार्बन डाय ऑक्साईड मिळत नाही. साखर निर्मिती मंदावते. परागीभवनही मंदावतं. द. इंग्लंडमधले द्राक्षाचे मळे डोंगराळ भागात असल्यानं कधी कधी वारा त्रास देतो.

हे केवळ इंग्लंडमधेच घडतय असं नाही. हवामानाचा लहरीपणा फ्रान्सलाही त्रास देतोय. गेली तीन चार वर्षं तिथं (आणि इंग्डंलमधेही) दुष्काळ आणि अतिवृष्टी अशी संकटं आलटून पालटून येत आहेत. गेल्या वर्षी फ्रान्स आणि इंग्लंड दोन्ही ठिकाणचं द्राक्षाचं उत्पादन १६ टक्क्यानं घसरलंय.

परिणामी द्राक्ष बागायतदार आणि वाईन निर्माते द्राक्षाच्या नव्या जाती शोधू लागलेत, तयार करू लागलेत; ज्या जाती हवामानाच्या लहरीपणाला तोंड देतील. वाईन निर्मितीच्या प्रक्रियेतही काही रासायनीक बदल करता येतील काय याचाही विचार वाईन उत्पादक करत आहेत.

ब्रिटीश वाईन उद्योग बरा चालतोय हे कळल्यावर फ्रेंच उद्यमी आता ब्रीटनकडं वळू लागले आहे. इंग्लंड ही शत्रूभूमी आहे असं मानणारे फ्रेंच आता ब्रीटनमधे जमीन घेऊन बागा आणि वाईन कारखाने उभारू लागलेत.

Taittinger आणि Pommery हे फ्रान्समधले जुने शँपेन उत्पादक आहेत. दोघांनीही इंग्लंडमधे बागा आणि वायनरी सुरु केल्यात. पैकी Taittinger १७३४ पासून वाईन तयार करत आहेत. त्यांनी केंटमधे नव्या वायनरीचं उद्घाटन राजघराण्यातल्या डचेसच्या हस्ते केलं. द्राक्षाचं एक नवं वाण त्यांनी वापरलंय आणि वाईनची चवही वेगळी असेल. अर्थात या वाईनची चव शँपेनसारखी नसेल हे सांगायलाही ते विसरलेले नाहीत. यंदा ते १ लाख बाटल्या वाईन केंटच्या वायनरीत निर्माण करणार आहेत.

।।

Comments are closed.