राज कपूर. एक पूर्ण सिनेमापुरुष

राज कपूर. एक पूर्ण सिनेमापुरुष

राज कपूर वयाच्या तिसऱ्या वर्षी १९२७ साली मुंबईत आला. पृथ्वीराज कपूर हे त्याचे वडील. राज कपूरचं त्यावेळचं नाव होतं सृष्टीनाथ कपूर. पृथ्वीराज पेशावरहून मुंबईत आले होते कारण ते अर्देशीर इराणीच्या आलम आरा या भारतातल्या पहिल्या बोलपटात काम करणार होते. 

मुंबईत मुंबईत पोचल्यावर लगोलग  वयाच्या पाचव्या वर्षी राज कपूरनं  टॉय कार्ट या नाटकात काम केलं. त्यात त्याला बक्षीसही मिळालं. 

१९३५ मधे ‘इन्किलाब’ मधल्या  अभिनयानं  राज कपूरची चित्रपट कारकीर्द सुरु झाली.  

तो काळ कसा होता?

१९३६ मधे व्ही शांताराम यांच्या  अमर ज्योती या चित्रपटाचं  व्हेनिस महोत्सवात कौतुक झालं. पाठोपाठ १९३७ साली ‘संत तुकाराम’ व्हेनिस महोत्सवात दाखल झाला. ज्युरींनी या चित्रपटाचा विशेष उल्लेख केला. संत तुकाराममधे तुकाराम गरूडाच्या पाठीवर बसून वैकुंठाकडं गेल्याचा ट्रिक सीन होता.   

 चित्रपटांवर वैचारिकतेची, सुधारणा इत्यादी सामाजिक चिंतांची गडद छाया होती. चित्रपट काय, साहित्य काय, पत्रकारी काय, प्रवचनं असत. करमणुकीला मान्यता नव्हती. मराठीत कादंबरी त्या काळात प्रसिद्ध झाली आणि कादंबरी हा प्रकार छचोर आहे अशी टीका झाली होती.

१९४३ साली पडद्यावर आलेल्या ‘किस्मत’नं सिनेमा या विषयाला एक निर्णायक वळण दिलं. अशोक कुमार नायक होता. गुन्हेगार होता.दुष्ट व्यक्ती नायक म्हणून दाखवलेला हा पहिलाच चित्रपट. चित्रपटातली नायिका कुमारी असतांनाही गरोदर झाल्याचं चित्रपटात दिसलं. गुन्हे, थरार इत्यादी नाट्यमय घटक चित्रपटात भरपूर होते. चित्रपट खूपच गाजला. चित्रपटानं खूप गल्ला गोळा केला.

राज कपूरला ती शैली सापडली.

१९४८ साली राज कपूरनं ‘आग’ केला. 

१९३५ ते १९४८ या काळात भारतात फार उलथापालथी झाल्या. दुसरं महायुद्ध झालं.स्वतंत्र्य चळवळ जोरात चालली. गांधी-नेहरू-पटेल; सावरकर, जिन्ना, आंबेडकर, सुभाषचंद्र बोस अशा अनेक विचारछटा राजकारणात उमटल्या. पैकी नेहरूंची छटा समाजवादी होती. बंगालमधे दुष्काळ झाला. गांधीजींचा खून झाला.फाळणी झाली. स्वातंत्र्य मिळालं.

आपण खूप गमावलंय पण स्वातंत्र्यानंतर आपण सुखी होऊ असं लोकांना वाटत होतं. हे मानस थेट १९६२ साली चीनकडून पराभव होई पर्यंत भारतात प्रभावी होतं. सुखाची स्वप्नं दाखवणारे आर्थिक प्रकल्प, भ्रष्टाचाराची प्रकरणं आणि दुष्काळ असे तीन घटक भारतीय मन अस्वस्थ करत होते. हे सारं चित्रपटांमधून पुसटसं दिसणं स्वाभाविक होतं.

सामान्य माणसाच्या जीवनाला राजकीय वगैरे गोष्टी स्पर्शून जरूर जातात पण तो त्याच्या जगण्याचा एक छोटा अंश असतो ही राज कपूरची समजूत होती. माणसाला जगायचं असतं. तो स्वप्न पहातो. स्वप्नं अमलात आणण्याची धडपड करतो. जखमी होतो. हताश होतो. दुःखी होतो. तरीही स्वप्नं पहाणं सोडत नाही. त्याच्या  स्वप्नात गाणी असतात, सेक्स असतो, रुतणारे काटे असतात, विरह असतो, मिलन असतं.

चिमूटभर सामाजिक आशय मणभर स्वप्नांचा खेळ हा फॉर्म्युला राज कपूरला सापडला.

राज कपूरनं नेहरू आणि समाजवादाची भलामण केली असा आरोप झाला. पण ते कितपत खरं मानायचं?  नेहरू  देशाचे हीरो होते. त्यांचं नेहरूप्रेम, त्यांचा रशियाकडला कल इत्यादी गोष्टी केवळ राजकीय चर्चाकिचाट करणाऱ्यांचा विषय होता, सामान्य माणसाच्या लेखी तो एक राजबिंडा माणूस होता, देशाचं  कल्याण करू पहाणारा माणूस होता.

राज कपूरच्या सिनेमात नेहरू बहुदा फक्त एकदाच आले. बूट पॉलीशमधे. तिथं जॉन चाचा आला होता. फक्त जॉन चाचा (डेविड) राजबिंडा नव्हता येवढंच. राज कपूरचा सिनेमा प्रवाहपतीत भारतीयाला बाहेर काढत होता. त्या अर्थानं, खूप आडवळणानं, त्याचा सिनेमा समाजवादी-नेहरूवादी होता.

‘आग’ मधे  नाट्य होतं. नायकाचे तीन प्रेमभंग होते. तीन नायिका होत्या. शेवटी ओरिजिनल नायिका नायकाच्या जीवनात परत येते आणि चित्रपटाचा सुखी शेवट होतो. स्वप्न. नायक एका स्वप्नाचा पाठलाग करतो, खूप त्रास सहन करतो, शेवटी स्वप्न साकार होतं.

चित्रपटात सात गाणी होती. गाणी एकापेक्षा एक होती. जिंदा हूं इस तराह की जिंदगी नही… हे मुकेशचं विरहगीत गाजलं. मुकेश आणि राज कपूर यांची गट्टी तिथून जुळली.

१९४९ मधे ‘बरसात’ आला. बरसातनं धमाल केली. कथानकात भरपूर नाट्य. भाबडे नायक नायिका. मित्र (प्रेमनाथ) हा वाईट्ट स्त्रीलंपट माणूस. दोघांच्याही जीवनात जाम तणाव आणि संघर्ष. शेवटी राजकपूरचं प्रेम यशस्वी होतं.  वाईट्ट प्राणनाथनं त्याच्या मैत्रिणीला वाईट वागवलेलं असतं, चित्रपटाच्या शेवटी त्याला पश्चात्ताप होतो पण तेव्हां त्याची मैत्रीण मेलेली असते. गळादाटू शेवट.

शंकर जयकिशनचं संगीत. हवामे उडता जाये मेरा लाल दुपट्टा मलमलका, जिया बेकरार है, मुझे किसीसे प्यार हो गया, बरसातमे ताक धिन धिन,मेरे आखोमे बस गया रे, पतली कमर है तिरछी नजर है, मै जिंदगीमे हरदम रोता ही रहा, छोड गये बालम, बिछडे हुए परदेसी अशी एकाहून एक भारी गाणी.

भारतीय माणसाला गाणी आवडतात. शास्त्रीय संगीत  चिमूटभर लोकांना कळतं. जनतेला कळतं ते लोकसंगीत. लोकसंगित हे लोकांचं संगित असतं, लोकसंगितातली गाणी कोणीही माणूस म्हणू शकतो, गुणगुणू शकतो. लोकसंगीत सामुहीक असतं. राज कपूरनं लोकसंगीत, लोकसंगितातलं ढोलक हे वाद्य, कोरस, हे  घटक त्याच्या गाण्यांत ठळकपणे आणले. राज कपूरच्या सिनेमांमधे अनेक संगितकार होते, अनेक गायक होते. प्रत्येक संगीतकार आणि गायक आपापल्या परीनं थोर आणि वेगळा होता.   तरीही ती गाणी राज कपूरची आहेत हे ठळकपणे कळत असे. 

१९५१ मधे राज कपूरनं आवारा केला. 

आवारानं तर बरसातवरही मात केली. आवारात खूप गुंता, खूप उपकथानकं होती. राज कपूर गुन्हेगार असतो. त्याचा खरा नसलेला बाप गुन्हेगार असतो. राज कपूरचा खरा बाप जज असतो. राज कपूरवरचा खटला त्याच्या बापासमोरच उभा रहातो. राजकपूर हा आपला मुलगा आहे हे त्याच्या बापाला माहीत नसतं. राजकपूरची प्रेयसी.ती त्याच्या खऱ्या बापाकडं कामाला असते. राजकपूर खिसेकापू असला तरी तिचं त्याच्यावर प्रेम. जाम गुंते. भारतीय माणसाला आवडेल असाच शेवट. राज कपूरला त्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होते, पण ती कमी असते. गुन्ह्यासाठी शिक्षा झाली आणि शिक्षा भोगून नायक स्वच्छ झाला. फिट्टंफाट. शेवटी नायक नायिकेचं मीलन. 

आवारात ११ गाणी होती. प्रत्येक गाणं एकापेक्षा एक भारी होतं. आवारातली गाणी जगभर पोचली. आवारा जगभर पोचला. आवारा हूं हे गाणं जगभर गायलं गेलं.

१९५५ मधे श्री ४२०. त्या सिनेमात मेरा जूता है जपानी हे गाणं होतं. तेही साऱ्या जगभर पोचलं. जगभर म्हणजे अगदी खरोखर जगभर.विशेषतः रशियात. रशियाचे अध्यक्ष बुल्गॅनिन यांनी म्हणे भारतीय शिष्टमंडळासमोर ते गाणं म्हटलं. रशियाचे आणखी एक अध्यक्ष भारतात आले आणि राज कपूर कुटुंबियांना मुद्दाम भेटून गेले. तेव्हांही त्यांनी मेरा जूता है जपानी, आवारा हूँ या गाण्यांचा उल्लेख केला.

‘आवारा’मधे (१९५१) हवेलीमधे वाढलेला; ऊच्चभ्रू (न्यायाधीश); बापशाही मानणारा एक माणूस आहे. दुसरा माणूस आहे राज कपूर, फाटका, आगापीछा नसलेला; समाजानं गुन्हेगारीचा शिक्का मारून वाळत टाकलेला. कथानक जाम नाट्यमय वळणं घेत फिरतं आणि शेवटी राज कपूरचा विजय होतो, न्यायाधीश नमतो, श्रीमंत मुलीचं फाटक्या राज कपूरशी जुळतं. 

समाजातल्या श्रीमंत प्रतिष्ठिताला राज कपूरनं आवारात नमवलं, समाजातल्या एका फाटक्या माणसाला प्रतिष्ठा मिळवून दिली.

श्री ४२० मधला  बावळट, धांदरट, फाटका, अगदीच सामान्य माणूस असलेला राज कपूर म्हणतो की तो इंटरनॅशनल आहे, त्याचे बूट जपानी, पँट ब्रिटीश आहे, डोक्यावर रशियाची लाल टोपी आहे पण त्याचं हृदय मात्र हिंदुस्तानी आहे.

इंटरनॅशनल माणूस ही भारताला परचित नसलेली समाजवादी प्रतिमा राज कपूरनं चित्रपटात वापरली.

१९५४ मधे राज कपूरचा बूट पॉलिश आला. त्यात तर नेहरू चाचा अगदी उघडपणेच होते. समाजातली गरीब मुलं. त्याना वाईट मार्गाला लावायचा प्रयत्न एक बाई करत असे. जॉन चाचानं त्यांना बूट  पॉलिश करून जगायला सांगितलं. 

बूट पॉलिशनं गरीब माणसाला प्रतिष्ठा दिली.

असं म्हणा की या सिनेमांना काही आशय बिशय होता.

‘बॉबी’ ला काय म्हणायचं?

त्यात कुठंय देशभक्ती, समाजवाद, माती मसण? 

प्रेम. ते साध्य करण्याची खटपट. संकटं. संकट निवारण. नाच आणि गाणी.

संगम.

 दोन मित्र. दोघांचं एकाच स्त्रीवर प्रेम. आली पंचाईत. पुढं काय होणार? कोणी तरी एक माणूस नाहिसा झाल्याशिवाय  मिलन कसं होणार? चित्रपटभर ही कहाणी पसरते. पात्रं परदेशात जातात. छान छान दृश्यं आपल्याला दिसतात. चित्रपटभर दर्दभरी गाणी.

जिस देशमे मधे गंगा आशावादी संदेश देते. राम तेरी गंगा या बटबटीत बाजारू चित्रपटात बाजारू झालेला भ्रष्ट देश राज कपूर दाखवतो.

१९३५ (इन्किलाब) ते १९८८ (राम तेरी गंगा मैली) अशा ५३ वर्षाच्या कारकीर्दीत राजकपूरनं ७४ चित्रपट केले, काहीत कामं केली, काहींचं दिक्दर्शन केलं, काहींची निर्मिती केली.

राज कपूरची चित्रपटाच्या सर्व अंगांवर पकड होती. 

पूर्ण सिनेमा पुरूष.

Comments are closed.